अध्याय ८७ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


परीक्षिदुवाच - ब्रह्मन्ब्रह्मण्यनिर्द्देश्ये निर्गुणे गुणवृत्तयः । कथं चरन्ति श्रुतयः साक्षात्सदसतः परे ॥१॥

ब्रह्मन् ऐसिया संबोधनें । शुकाचार्यातें नृपति म्हणे । अर्निर्द्देश्यीं ब्रह्मीं निर्गुणे । केंवि प्रवर्तणें श्रुतींचें ॥१३॥
असत्सत् या उभयां पर । केवळ परब्रह्म निराकार । तेथें साक्षात् सगुण साकार । श्रुति संचार केंवि करिती ॥१४॥
म्हणाल श्रुतींसी आकार नाहीं । तरी मूर्तिमंत विधीच्या गेंहीं । श्रुति वर्तती हे सर्वां ही । व्यासोक्ति कायी विदित नसे ॥१५॥
कीं अंतस्थ उष्माण स्पर्श स्वर । ह्रस्वदीर्घप्लुतादि प्रकार । इत्यादि वर्णीं श्रुत्युच्चार । कीं तो साकार न म्हणावा ॥१६॥
तस्मात् श्रुति ज्या सगुणवृत्ति । साक्षात् परब्रह्मीं कें विचरती । ऐसी शंका धरूनि चित्तीं । करूनि विनती नृप राहे ॥१७॥
इतुका प्रथमश्लोकींचा अर्थ । भाषा उपलविला पदार्थ । श्रीधरस्वामींचें व्याख्यान येथ । विस्तृत शास्त्रपरिभाषा ॥१८॥
भाविकां श्रोतयां अनध्ययनें । वाटे अत्यंत कंटाळवाणें । म्हणती गर्ता जेंवि पाषाणें । भरणें उभरणें ठगठग पैं ॥१९॥
यालागीं साडूनियां तो विस्तार । पदसंदर्भव्याख्यानमात्र । उपलविलिया होती सादर । लहान थोर श्रवणार्थीं ॥२०॥
यदर्थीं श्रोते विपश्चित । म्हणती कोविदां प्रिय हा ग्रंथ । या लागीं व्याख्यान श्रीधरोक्त । भाषापर्यायें परिसवीं ॥२१॥
हें ऐकोनि संतांप्रति । दयार्नवें केली विनति । केवळ अनधीत मंदमति । केंवि त्या हातीं हें वदवां ॥२२॥
शास्त्रपरिभाषापर्याय । अव्युप्तन्ना विदित काय । तथापि तुमचें असतां अभय । दावाल सोय तेंचि वदों ॥२३॥
ऐसी करूनियां विनवणी । माथा ठेवूनि संतां चरणीं । शास्त्रपरिभाषापर्यायकथनीं । दयार्नववाणी प्रवर्तली ॥२४॥
नृप म्हणे भो योगीश्वरा । निर्गुणब्रह्मीं श्रुति साकारा । साक्षात् चरति ऐसी गिरा । ऐकोनि अंतरा स्मय गमला ॥२५॥
जरी श्रुतींचा अर्थ गहन । तरी त्या शब्दांची सांठवण । पात्रावांचूनि थोर लहान । पदार्थ कोण संग्रहिती ॥२६॥
घटमठादि वाजंतरीं । गगन व्यवहारीं आणिजे चतुरीं । व्यजनीं चामरीं पल्लवीं भस्रीं । वायु व्यवहारीं वर्तविजे ॥२७॥
इन्धनाधारें प्रवृत्ति अनळा । धात्वादिमृच्चर्मपात्रीं जळा । कीं विविधद्रव्याधारें सकळां । घडे परिमळा प्रवृत्ति ॥२८॥
कुड्यादिसीमावरणें पृथ्वी । व्यवहारीं घडे प्रवृत्ति जेंवी । शब्दांमाजी श्रुत्यर्थ तेंवी । सांठवलासे अगोचर ही ॥२९॥
तया शब्दांची त्रिधा प्रवृत्ति । मुख्या लक्षणा गौणी म्हणती । त्यांमाजी मुख्येजी ही गती । रूढि आणि योगभेदीं ॥३०॥
यांची प्रवृत्ति कोणें ठायें । सावध परिसा कथितों तेही । निर्देशाहीं पदार्थीं पाहीं । संज्ञासंज्ञिसंकेतें ॥३१॥
नाम आणि नामधारक । संज्ञासंज्ञी ते सम्यक । निर्देशार्ह असतां देख । प्रवृत्ति शाब्दिक तेथ घडे ॥३२॥
निर्देश म्हणिजे निवडपनें । घडे जिये वस्तू कारणें । तेथ शब्दांचीं प्रवर्तनें । त्रिविधा भिन्नें जियें कथिलीं ॥३३॥
वनीं चरतां धेनुशतक । त्यामाजी निवडूनि पुसतां एक । तेथें रूढिप्रवृत्ति देख । त्रिविधात्मक निर्देशी ॥३४॥
स्वरूप जाति आणि गुणें । त्रिविधबोधें गौ निवडणें । पुष्ट धेनु कपिला म्हणणें । त्रिधा भिन्नें वाक्यार्थें ॥३५॥
सर्वसाधारणांमाजी पुष्ट । म्हणतां स्वरूपचि निर्दिष्ट । अविकें महिषी अजा यथेष्ट । तैं जाति निर्दिष्ट गोशब्दें ॥३६॥
पाटला बहुला रक्ता शुक्ला । तैं गुणनिर्दिष्टा म्हणिजे कपिला । रूढिभेदाचा विस्तार केला । त्रिधा मोकळा कळला कीं ॥३७॥
अनिर्देश्य ब्रह्म निर्गुण । तेथें कैंचे जात्यादि गुण । तस्मात् रूधिप्रवृत्तिप्रवर्तन । तेथ कोठून घडूं शके ॥३८॥
और्ण कौशेय कार्पास । जातिभेद हे अंबरास । स्थूळसूक्ष्मादि बहुवस । स्वरूपविशेष निर्दिष्ट ॥३९॥
श्वेत रक्त चित्राम्बरें । गुणनिर्दिष्टें ऐसीं वस्त्रें । चिदंबरीं या प्रकारें । केंवि शब्दें संचरिजे ॥४०॥
रूढि मुख्या निराकरिली । आतां लक्षणा जे बोलिली । तेही निरूपिजेल भली । सावध परिसिली पाहिजे ॥४१॥
निर्देशार्ही वस्तुमात्रीं । लक्षणाशब्दप्रवृत्ति वक्त्रीं । उदाहरणीं कथिता श्रोत्रीं । रुचे आणि उमजे ही ॥४२॥
गंगेवरी गौळवाडा । म्हणतां अभिनव वाटे मूढां । तेथ लक्षणाशब्दवृत्ति सुघडा । करी निवाडा शब्दार्था ॥४३॥
गंगा सांडूनि घेइजे तट । ऐसी जहल्लक्षणा करितां नीट । तैसें ब्रह्म नित्य निघोंट । काशा निकट लक्षावें ॥४४॥
दुरूनि पथिका दाविती वाट । वटावरूनि जाइजे नीट । तेथ वट सांडूनि लक्षिजे स्पष्ट । पंथ चोखट वामसव्यें ॥४५॥
तेंवि ब्रह्मीं लक्षणाप्रवृत्ति । घडे केंवि कोणे रीति । तैसी गौणीचीही व्याप्ति । न घडे निश्चिती निर्गुणीं ॥४६॥
पुरुषव्याघ्र या संबोधनें । कवि शंसिती नृपाकारणें । तेथ क्रौर्यचापल्यादि गुणें । प्रवृत्ति जाणणें शब्दाची ॥४७॥
तैसी येथ अद्वयब्रह्मीं । कोठील गुणां उपमी । या लागीं प्रवृत्ति गौणानामी । न घडे व्योमीं पल्लववत् ॥४८॥
ब्रह्म केवळ अनिर्देश्य । तेथ योगवॄत्तीशीं अवकाश । न घडे कैसा तो विशेष । चतुरीं चित्तास आणावा ॥४९॥
पंकयोगें पंकज कमळ । कीं गंगायोगें गाङ्गकुळ । पुण्ययोगें पुण्यशीळ । कीं दुःशीळ दुष्कृतें ॥५०॥
दशरथथोगें दाशरथि । जनकयोगें जानकी म्हणती । अब्जसादृश्य कराब्जाप्रति । योगवृत्ति गौणी पैं ॥५१॥
गाङ्गीं मठ म्हणतिये वेळे । लक्षणायोगवृत्तीच्या बळें । गंगातटी लक्षितां विवळे । कीं म्हणिजे जळें प्लावित पैं ॥५२॥
जलजनामें रूढ कमळ । तैसेंचि जलज पैं जंबाळ । जलजाक्ष रूढीस्तव केवळ । अक्षि जंबाळसम न घदे ॥५३॥
क्रियानिर्दिष्ट योगवृत्ति । पचनक्रियेची ज्या प्रवृत्ति । पाचक ऐसें त्यातें म्हणती । लेखका न म्हणती पाचक पैं ॥५४॥
तस्मात निर्दिष्टे वस्तुमात्रीं । इत्याद शब्दप्रवृत्ति शास्त्रीं । शोभती वक्त्यांच्या वक्त्रीं । श्रुतिस्मृतिमात्रीं सर्वत्र ॥५५॥
ब्रह्म अनिर्देश्य केवळ । तेथ शब्दप्रवृत्ति होय विफळ । निर्गुणीं गौणवृत्तीचा मळ । न लगे केवळ नभःसाम्यें ॥५६॥
कार्यकारणांहूनि पर । त्यातें म्हणिजे सदसत्पर । संबंध नसतां लक्षणाकार । ब्रह्मीं संचार केंवि परी ॥५७॥
एवं वस्तु पदार्थ नव्हे । अपपदार्थेंसीं वाक्यगौरवें । श्रुतिगोचरत्व केंवि घडावें । हें निवडावें सर्वज्ञीं ॥५८॥
ऐसी शंका विवरूनि चित्तीं । नृपें शुकासी केली विनती । तो सर्वज्ञ करील शंकानिवृत्ती । तेंचि श्रोतीं परिसावें ॥५९॥

श्रीशुक उवाच - बुद्धीन्द्रियमनःप्राणाञ्जनानामसृजत्प्रभुः । मात्रार्थं च भवार्थं च आत्मनेऽकल्पनाय च ॥२॥

साद्यंत नृपाची ऐकोनि शंका । कथनीं परमाह्लाद शुका । विवरूनि उत्तर वदला निका । सादर ऐका तें आतां ॥६०॥
महासर्बाप्ययाचे अंतीं । भौतिकें भूतीं लीनें होती । भूतीं आश्रयितां प्रकृति । गौणा प्रकृति साम्या ये ॥६१॥
तैं मग निर्गुण निराकार । बह्म केवळ निराकार । तेथ शब्दाच्या संचार । न घडे साचार कुरुवर्या ॥६२॥
एवं शंका अंगीकारणें । मान देऊनि नृपाचे प्रज्ञे । शंकापरिहार कोण्या गुणें । करी तें श्रवणें अवधारा ॥६३॥
पुढती सृजनाचा अवसर । होता पूर्वत्वें ईश्वर । शुद्धसत्वात्मक साचार । प्रकृतिपर स्वयें होय ॥६४॥
तैं प्रकृत्यंतःपाती । प्रसुप्त प्राचीन जीवपंक्ति । तयां यथापूर्व संसृति । प्रभु स्वशक्ति प्रवर्तवी ॥६५॥
पूर्वसंस्कारवंत जीव । प्रकृतिमाजी लीन सर्व । तयां लिंवशरीर देऊनि देव । करी सावयव संकल्पें ॥६६॥
दशेन्द्रियें पंचप्राण । मनोबुद्धिसहित जाण । सत्रा कळांचें लिंग पूर्ण । जीवांलागून सृजी प्रभु ॥६७॥
लिंगशरीर लाहतां जीव । विपरीत ज्ञानाचा संभव । विषयात्मक जे दृश्य भाव । कवळी वास्तव विसरूनी ॥६८॥
पूर्वसंस्कारें संसृति । ऐसी प्राप्त जीवांप्रति । तेथ पभु करुणामूर्ति । स्वयें निवृत्ति उद्बोधी ॥६९॥
लक्षूनि जीवाचें कल्याण । लिंगदेहाचें करी सृजन । त्यामाजी चतुर्विध प्रयोजन । योजी संपूर्ण बेजत्वें ॥७०॥
लिंगदेह लाहतां जीव । स्वयंभ विषयसेवनीं धांव । तदर्थ स्थूळ सावयव । कवळी स्वयमेव आत्मत्वें ॥७१॥
एवं विषयसेवनासाठीं । पडिली लिंगदेहाशीं गांठी । त्यामाजी सांसारिक रहाटी । कर्मपरिपाटी प्रभु बोधी ॥७२॥
तया कर्मफळाचा भोक्ता । लाहे लोकान्तरें तत्वता । संपादूनी शुभ सुकृता । हे ही स्वसत्ता प्रभूची ॥७३॥
एवं विषयार्थ भवार्थ आत्मार्थ । प्रभु लंगें जीवां देत । निष्कामभजनें तेथ निवृत्त । अकल्पनार्थ त्यालागीं ॥७४॥
कल्पनेचा अवमान होतां । अपवर्ग स्वतःसिद्ध आइता । ऐसी जीवांची सर्व चिन्ता । पूर्वींच तत्वता प्रभु वाहे ॥७५॥
एवं धर्मार्थकाममोक्ष । सृष्ट्यादिकीं प्रवर्तनें । घडे ईश्वरा सर्वज्ञपणें । तेंचि श्रवणें अवधारीं ॥७७॥
जीवांसी अविद्यात्मक आवरण । म्हणोनि पावती संसरण । मायावरणातीत पूर्ण । प्रभु म्हणोन नित्य मुक्त ॥७८॥
प्रभु मायेचा नियंता । अनंतगुणीं परिपूर्णता । असोन न वचे गुणातीतता । अमळसत्ता संतत पैं ॥७९॥
प्रभूतें आवरूं न शकती गुण । या लागीं नित्य तो निर्गुण । साक्षी स्वसंवेद्य सर्वज्ञ । सर्वशक्तिमान् सर्वात्मा ॥८०॥
सर्वोपास्य सर्वनियंता । सर्वकर्मफळाचा दाता । सर्वमंगलायतन तत्वता । सच्चिदानंद भगवंत ॥८१॥
इत्यादि विशेषणीं श्रुति । प्रभूचें वैशिष्ट्य प्रतिपादिती । तो श्रुतिसमुच्चय लिहितां ग्रंथीं । अवर्ण पठती तैं बाध ॥८२॥
अंत्य अवर्ण अनधिकारी । केवळ श्रुतींच्या उच्चारमात्रीं । पातित्य पावती तेचि अवसरीं । पडती दुस्तरीं घोरनरकीं ॥८३॥
या लागीं त्यांचिये करुणे स्तव । विशेषणमात्रीं श्रुतींचा भाव । सूचिला तो अभिप्राव । महानुभाव जाणती पैं ॥८४॥
प्रभु परमात्मा पूर्णचैतन्य । सर्वग समष्टिप्रपंचवान । ब्रह्माण्डान्तःपाती गहन । केवळ सर्वज्ञ स्वसंवेद्य ॥८५॥
जीव व्यष्टिप्रपंचमात्र । परिमित सप्तवितस्तिगात्र । किंचिज्ज्ञ सुखदुःखपात्र । स्वकर्मतंत्र फळभोक्ता ॥८६॥
ऐसियां जीवांसी तत्वता । ईश्वरपदीं सामरस्यता । श्रुति बोलती प्रभूच्या सत्ता । तत्त्वंपदार्थविवरणें ॥८७॥
तत्त्वंपदार्थां उभयांप्रति । सामानाधिकरण्यप्रतीति । सोपाधिकां समान म्हणती । परि तें निश्चिती न घडे पैं ॥८८॥
मीमांसकांचिया मतें । वैश्वदेवी आमिक्षेतें । सामानाधिकरन्य निरुतें । पदार्थबोधें तद्धितींच्या ॥८९॥
विश्वेदेव देवता पृथक । आमिक्षा द्रव्य तदात्मक । हा सामानाधिकरण्यविवेक । सोपाधिक मैमांसी ॥९०॥
खांज्य यष्ट्यश्व म्हणते वेळे । पदार्थीं सामानाधिकरण्य मिळे । तत्वंपदार्थीं मोकळें । तेंवि हें न विवळे साम्यत्व ॥९१॥
तत्त्वंपदार्थ दोन्ही भिन्न । यालागीं न घडे सामानाधिकरण्य । तत्पद पूर्णत्वें सर्वज्ञ । त्वंपद अल्पज्ञ कर्मभाक् ॥९२॥
तैसेंचि सहज उत्पळ नीळ । द्रव्यगुणांचा स्वयंम मेळ । निरूढ अजहल्लक्षणा केवळ । तत्त्वंपदमेळ तेंवि नव्हे ॥९३॥
करकाद्रव्य श्वेतगुण । सहज दोहींचें जननमरण । तत्त्वंपदीं तैसें जाण । सामानाधिकरन्य घडेना ॥९४॥
तत्पदाचें विशेषण । सहसा त्वंपद नसे जाण । आणि सहजत्व उभयालागून । न घडे म्हणून विरुद्धार्थें ॥९५॥
त्वंपद अज्ञान कर्मतंत्र । केवळ जन्ममरणाचें पात्र । तत्पद नित्यमुक्त अज अजस्र । विरुद्ध प्रकार हा उभयां ॥९६॥
तैसीच कुसुमितदुमा गंगा । करितां जहल्लक्षणाप्रसंगा । तत्त्वंपदीं न पवे योगा । सामानाधिकरण्य हें ॥९७॥
गंगातटीं कुसुमित द्रुम । कुसुमितदुमा यास्तव नाम । तत्त्वंपदीं कोण तें धाम । काय सांहून लक्षावें ॥९८॥
यास्तव तत्वंपदीं उभयचैतन्य । लक्षूनि सामानाधिकरण्य । जहदजहल्लक्षणा पूर्ण । येथ घटमान श्रुतिप्रणीत ॥९९॥
जेंवि शत्रु भंगिले स्वहस्तीं । तो हा येथ ध्यानस्थ नृपत्ती । जहदजहल्लक्षणा निगुती । ऐक्य साधिती उभयांतें ॥१००॥
सन्नद्ध बद्ध रथारूढ । चतुरंगिणी सेना दृढ । शत्रुमर्दनकर्म अवघड । त्यागून रूढ उपाधि हे ॥१॥
जहत् म्हणिजे या उपाधित्यागें । अजहत् नृपमात्र घेइजे आंगें । ध्यानींचें विडंबन तें आघवें । त्यजितां नृपाङ्गें ऐक्य घडे ॥२॥
तेंवि समष्टिप्रपंच मायोपाधि । व्यष्टिप्रपंच अवद्योपाधि । या जीवेश्वरांच्या उभयोपाधि । निरसतां शुद्धि ऐक्यता ॥३॥
उपाधि विरुद्धांशत्याग । शुद्ध लक्ष्यें चिदंशयोग । घडे म्हणतां पूर्वीं वियोग । कधींही होता सत्कुळा ॥४॥
उपाधीचिया आवरणें । भासलीं होतीं भिन्नपणें । तीं निरसतां ऐक्य करणें । लागे काय नूतन पैं ॥१०५॥
तस्मात उभय चैतन्या ऐक्य । उपाधिनिरासें घडे सम्यक । उपाधिनाशें उभयात्मक । अभिन्न एक परबह्म ॥६॥
एवं निर्गुणीं पर्यवसान । जहदजहल्लक्षणे करून । उभयचैतन्या घडे पूर्ण । श्रुतिप्रमाण गुरुवचनीं ॥७॥
अस्थूळादिश्रुतींचीं वचनें । उपाधिनिषेधाकारणें । लूता तंतुसृजनग्रसनें । तेंवि क्रीडणें प्रभूतें ॥८॥
जेथवरी शब्दाची प्रवृत्ति । तेथवरी वदोनी नेति नेति । मौनमुद्रा धरूनि अंतीं । श्रुति बोधिती सन्मात्र ॥९॥
वास्तव आत्मावगमें अंतीं । अतन्निरसनें श्रुति फळती । चपळा स्फुरोनि घनीं विरती । तेंवि सांठवती परब्रह्मीं ॥११०॥
उपासनादि श्रुतींचीं वाक्यें । झणीं मानिसी परमार्थविमुखें । सृष्ट्याद्यवलंबनें सम्यकें । ज्ञानसाधनें सन्मय पैं ॥११॥
तस्मात् ब्रह्मपर साद्यंत निगम । ब्रह्मप्रापक सर्वां सुगम । न बोधतां न वचे भ्रम । यास्तव दुर्गम कर्म जडां ॥१२॥

सैषा ह्युपनिषद्ब्राह्मी पूर्वेषां पूर्वजैर्धृता । श्रद्धया धारयेद्यस्तां क्षेमं गछेदकिञ्चनः ॥३॥

ते हे ब्राह्मी उपनिषत् पहिली । पूर्वजीं वडिलांचिये वडिलीं । निष्ठा धरूनि अनुष्ठिली । जे तुज कथिली जात असे ॥१३॥
पूर्वपक्षें चित्तशुद्धि । सिद्धान्तबोधें मोक्षसिद्धि । अथोक्तालंबना यथाविधि । बोधें ब्रह्मपदीं समरसवी ॥१४॥
या लागीं बाह्मी ब्रह्मपरा । श्रद्धापूर्वक प्रिय ज्या नरा । वितंडातर्क न शिवोनि गिरा । विवरीत गुरुवरापासीं जो ॥११५॥
श्रद्धापूर्वक श्रवणादर । करूनि मननें धारणापर । व्यतिरेकबोधें साक्षात्कार । लाहूनि चिन्मात्रमय निवडे ॥१६॥
तोचि अकिंचन अधिकारी । देहादि उपाधि निरसूनि पुरी । लाहे ब्रह्मस्थिति निर्धारीं । सत्य वैखरी हे माझी ॥१७॥
इये उपनिषत्कथनीं पाहीं । प्राचीनगाथा तुज मी कांहीं । संदर्भार्थ कथितों तेही । श्रवणालयीं सांठविजे ॥१८॥

अत्र ते वर्णयिष्यामि गाथां नारायणान्विताम् । नारदस्य च संवासमृषेर्नारायणस्य च ॥४॥

नारदनारायणसंवाद । नारायणाश्रमीम विशद । हे नारायणान्वित गाथा शुद्ध । ऐकें सावध कथितों ते ॥१९॥

एकदा नारदो लोकान्पर्यटन्भगवत्प्रियः । सनातनमृषिं द्रष्टुं ययौ नारायणाश्रमम् ॥५॥

कोणे एके अपूर्व समयीं । नारद फिरतां लोक तिहीं । नारायणाश्रमीं पाहीं । येता झाला स्वच्छंदें ॥१२०॥
केवळ भगवत्प्रिय नारद । हरिगुणकथनीं परमानंद । गगनगामी आत्मविद । आला स्वच्छंद तपोधन ॥२१॥
नारायणातें देखावया । हृदयीं प्रेमा धरूनियां । नारायणाश्रमालया । आला मुनिवर्यां माजिवडा ॥२२॥
गगना सारिखें ज्याचें मन । ज्याचें अमृतोपम भाषण । परोपकाराथ कर्माचरण । तो सनातन ऋषिवर्य ॥२३॥
त्यातें देखावया कारणें । नारदाचें झालें येणें । जया ऋषीनें निजात्मगुणें । त्रिजग कल्याणें भरियेलें ॥२४॥
ऐका तया ऋषीचे गुण । कथितों संक्षेपें तुज लागून । जेणें जिंकून कायवाङ्मन । केलें कल्याण त्रिजगासी ॥१२५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP