अध्याय ८६ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


राजोवाच - ब्रह्मन्वेदितुमिच्छामः स्वसारं रामकृष्णयोः । यथोपयेमे विजयो या ममास्सीप्तितामही ॥१॥

कुरुनृप म्हणे ब्रह्मनिष्ठा । वासिष्ठाग्रणी परम श्रेष्ठा । मम मानसीं जे उत्कंठा । ते वरिला पुरवावी ॥७॥
उत्कंठेचा करितों प्रश्न । तो निरूपीं विस्तारून । विशेष करितां हरिगुणश्रवण । न पवे मम मन तृप्तीतें ॥८॥
तरी ऐकें गा योगिराया । सुभद्रानामें वसुदेवतनया । प्राप्त जाली धनंजया । कोण्या उपायें तें सांग ॥९॥
जे कां रामकृष्णांची बहिणी । रामेम सुयोधना लाहूनी । देऊं इच्छिली तीतें हरूनी । करी निज गृहिणी कौन्तेय ॥१०॥
आणि माझी ते पितामही । दुष्प्राप्य असतां द्वारकानिलयीं । विजयें कैसी वरिली पाहीं । भवायी मज सांगें ॥११॥

श्रीशुक उवाच - अर्जुनस्तीर्थयात्रायां पर्यटन्नवनीं प्रभुः ।
गतः प्रभासमशृणोन्मातुलेयीं स आत्मनः ॥२॥

शुक म्हणे कौरवपाळा । तीर्थयात्रार्थ फिरतां इळा । अर्जुन प्रभासक्षेत्रा आला । तेथ ऐकिला वृत्तान्त ॥१२॥
तो वृत्तान्त कैसा म्हणसी । मातुळकन्या लावण्यराशी । राम देऊं इच्छी तयेसी । दुर्योधनासी स्नेहभरें ॥१३॥
प्रभुत्वें जो निजांगवणें । एकला त्रिजगा समरीं जिणे । गुह्य वृत्तान्त आपुल्या श्रवणें । ऐकिला तेणें तो ऐका ॥१४॥

दुर्योधनाय रामस्तां दास्यतीति न चापरे । तल्लिप्सुः स यतिर्भूत्वा त्रिदण्डी द्वारकांमगात् ॥३॥

मातुळतनया संकर्षणें । द्यावी दुर्योधनाकारणें । ऐसें इच्छिलें निजमनें । हें अपरें कोणें न इच्छिलें ॥१५॥
कृष्ण देवकी वसुदेव । आणि समस्तही यादव । ते ही बळरामाचा भाव । ऐकोनि सर्व नादरिती ॥१६॥
अर्जुनें ऐसी ऐकोनि गोष्टी । सुभद्राहरणलिप्सा पोटीं । धरूनि त्रिदंडियतिवरनटीं । नटला कपटी कापट्यें ॥१७॥
काषाय कमंडलु त्रिदंड । प्रानवजाप्ये बुटबुटी तोंड । बहिर्वासार्थ वसनखंड । कशिपु कौपीन भस्मलेप ॥१८॥
मातुळकन्येचा लिप्साळु । त्रिदंडिवेषें वंचिजे बळु । यतिवेष पूज्यतम केवळु । दावूनि समळ कामेच्छु ॥१९॥
ऐसा अर्जुन प्रबासक्षेत्रीं । सुभद्रावृत्तान्त ऐकूनि श्रोत्रीं । यतिवरवेषें द्वारकापुरीं । रिघतां नेत्रीं जन पाहती ॥२०॥
देखूनि त्रिदंडियतिवरवेष । नमिती नागरजन अशेष । म्हणती वार्षिक चार्‍ही मास । कीजे निवास येथ स्वामी ॥२१॥

तत्र वै वार्षिकान्मासान्न्यवात्सीत्स्वार्थसाधकः । पौरैः सबाजितोऽभीक्ष्णं रामेणाजानता च सः ॥४॥

ऐकूनि जनांची प्रार्थना । मानस तत्पर सुभद्राहरणा । स्वकार्यसाधक यतिवरराणा । राहिला जाणा स्वस्थमनें ॥२२॥
काया निश्चळ स्वस्थासनीं । दृढतर मौनें वाङ्नियमनीं । ध्यानस्थ मानस सुभद्राहरणीं । दंभाचरणी तपोधन ॥२३॥
त्यातें भाविक द्वारकावासी । नेऊनि पूजिती स्वसदनासी । म्हणती स्वामी चरणस्पर्शीं । पावन कीजे निलयातें ॥२४॥
द्वारकापुरीं लोक बहळ । प्रार्थना करिती सर्वकाळ । त्यांमाजी ज्याचें भाग्य सफळ । तो ने केवळ निजसदना ॥२५॥
ऐसा द्वारकापुरपाटनीं । बहुसाळ भजकांची दाटणी । न येची कोणाचे वाटणीं । नित्य निमंत्रणीं निमंत्रितां ॥२६॥
रामे नेणोनि कपटवेश । जाणोनि त्रिदंडी तापस । नेला स्वसदनीं भिक्षेस । प्रार्थना विशेष करूनिया ॥२७॥

एकदा गृहमानीय आतिथ्येन निमन्त्र्य तम् । श्रद्धयोपाहृतं भैक्ष्यं बलेन बुभुजे किल ॥५॥

करूनि सद्भावें अर्चन । पात्रीं वोगरिलें दिव्यान्न । प्रणवोदकें तें प्रोक्षून । केलें भोजन यतीश्वरें ॥२८॥
ऐसाचि पंचसप्तवार । रामें पूजिला यतीश्वर । श्रद्धापूर्वक सोपस्कर । कपटाचार नेणोनी ॥२९॥
अपूर्व कोणे एके दिवसीं । रामें निमंत्रित संन्यासी । नेऊनियां स्वसदनासी । सप्रेमेंसीं पूजियला ॥३०॥
रामें सप्रेमें अर्पिलें भैक्ष्य । अर्जुनें भक्षिलें तें निःशेष । तंव देखिलें सुभद्रेस । वेधलें मानस तें ऐका ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP