अध्याय ८४ वा - श्लोक ५६ ते ६०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


सदस्यर्त्विक्सुरगणान्नृभूतपितृचारणान् । श्रीनिकेतमनुज्ञाप्य शंसन्तः प्रययुः क्रतुम् ॥५६॥

रामकृष्णांच्या प्रतापतेजें । वशवर्ती सुरगण सहजें । आवाहिले जे यज्ञकाजें । बरवे वोजे तें यजिले ॥३७५॥
सदस्यप्रमुखऋत्विज अवघे । वस्त्राभरणीं पूजिले वेगें । चारणपितृगण तत्प्रसंगें । भूतमात्र मनुजादि ॥७६॥
यथोचित अहेर त्यां अर्पून । सभास्थानीं सम्मानून । परिमळद्रव्यें स्रक्चंदन । ताम्बूल दिधलें सर्वत्र ॥७७॥
श्रीवत्स ज्याचे वक्षस्थलीं । तो श्रीकृष्ण कौशल्यशाली । आणि बलराम महाबळी । जनकाजवळी वोळगती ॥७८॥
तया श्रीनिकेता श्रीहरिची । सर्वीं आज्ञा घेऊनि साची । प्रशंसा करित अध्वराची । शीघ्र जाती स्वस्थाना ॥७९॥
विदर्भप्रमुख सुहृदनृपती । गौरविले सप्रेमभक्ती । आज्ञा घेऊनि स्वदेशाप्रती । जातां शंसिती क्रतु अवघे ॥३८०॥
सदस्य आणि ऋत्विजगण । देवमनुष्यपितृचारण । त्यांचें यथोक्त करूनि पूजन । भूतमात्रां तोषविलें ॥८१॥
आज्ञा घेऊनि गेलिया त्यांतें । तदुपरि श्रेष्ठकौरवांतें । बोळविलें तें ही निरुतें । सांगे नृपातें योगींद्र ॥८२॥

धृतराष्ट्रोऽनुजः पार्था भीष्मो द्रोणः पृथा यमौ । नारदो भगवान्व्यासः सुहृत्सम्बन्धिबान्धवाः ॥५७॥
बन्धूत्परिष्वज्य यदून् सौहृय्दाक्लिन्नचेतसः । ययुर्विरहकृच्छेण स्वदेशांश्चापरे जनाः ॥५८॥

प्राज्ञाचक्षु धृतराष्ट्रनृपति । विदुर त्याचा अनुज सुमति । पृथानंदन प्रतापमूर्ति । धर्मभीमार्जुन त्रिवर्ग हे ॥८३॥
माद्रीतनय सहदेवकुळ । अश्विनीकुमर जे कां यमल । पृथानामें कुन्ती केवळ । इत्यादि सकळा गौरविलें ॥८४॥
वसनाभरणें मोलागळीं । विचित्रयानें पदार्थ सकळी । मधुरोतरीं स्नेहबहळीं । सम्मानूनी बोळविले ॥३८५॥
वैष्णवांमाजि जो अग्रणी । तो देवर्षि नारदमुनी । यज्ञारंभीं कथिले मुने । द्वैपायनादि ते अवघे ॥८६॥
आणि जे जे सोयरे आप्त । देहसंबंधें बंधुत्व प्राप्त । त्यांतें गौरवूनि यथोचित । हृदयीं धरित स्नेहभरें ॥८७॥
परस्परें हृदयीं द्रवती । वियोगविहरें नेत्र स्रवती । आज्ञा घेऊनि स्वदेशाप्रती । निघतां खंते उभयत्र ॥८८॥
सहसा वियोग न साहवे । तथापि एकत्र न राहवे । स्वदेशाप्रति लागलें जावें । विचित्र दैवें विघडलिया ॥८९॥
देशोदेशींचे प्रजाजन । पुण्यशीळ धर्मसंपन्न । ते स्वस्थानीं करितां गमन । स्वमुखें यज्ञ प्रशंसिती ॥३९०॥
यादवांचीं कुळेंअठरा । स्निग्धां आप्तां सुहृदप्रवरां । गौरवूनि त्यां सपुत्रदारां । सहकिंकरां बोळविलें ॥९१॥
यावरी नंद जो व्रजपती । ज्याचे उपकार लिहितां क्षिती । गमे अवाडें अवुरती । बोळवी त्याप्रति तें ऐका ॥९२॥

नन्दस्तु सह गोपालैर्बृहत्या पूजयार्चितः । कृष्णरामोग्रसेनाद्यैवात्सीद्बन्धुवत्सलः ॥५९॥

नंदव्रजींचे जे निवासी । गोपाळ होते नंदापाशीं । तिहीं सहित व्रजपतीसी । श्रेष्ठोपचारीं पूजियेलें ॥९३॥
महापूजा जियेचें नांव । जीमाजि महार्ह उपचार सर्व । तिहीं करूनि बल्लवराव । प्रेमसद्भावें समर्चिला ॥९४॥
रामकृष्ण उग्रसेन । देवंक वसुदेव आदिकरून । विनयभावें संप्रार्थून । नंदसहगण राहविला ॥३९५॥
मित्रबंधुही करूनि विनति । म्हणती भो भो बल्लवपति । यज्ञप्रसंगें आम्हांप्रति । पडली गुंती आजिवरी ॥९६॥
तुम्ही आम्ही एकान्तवासी । बैसलों नाहीं कोण्हे दिवसीं । सुखसंवादें पळघटिकेसी । लोटिलें नाहीं संवादे ॥९७॥
सुवर्णाची निर्मूनि पुरी । मथुरा नेली समुद्रोदरीं । तैंहूनि सखया पडलों दुरी । स्नेहें अंतरीं झुरतसों ॥९८॥
अवकाश करूनि यावें भेटी । परंतु शत्रूची भंवती घरटी । संकटाहूनि महासंकटीं । मज्जनोन्मज्जनीं निर्बुजलों ॥९९॥
सूर्योपरागीं कुरुक्षेत्रा । भाग्यें मिनली समग्र यात्रा । येथ विध्युक्त सारिलें सत्रा । भेटलों मित्रां आप्तांसी ॥४००॥
तुमचिया सहवासाची धणी । पूर्ण नोहेचि शिराणी । यालागीं कांहीं दिवस रजनी । येथ राहूनी तोषविजे ॥१॥
बंधुवत्सल बल्लवनाथ । तोषला सप्रेम हृदया आत । कळवळूनि राहिला स्वस्थ । पुढील वृत्तान्त अवधारा ॥२॥

वसुदेवोऽञ्जसोतीर्य मनोरथमहार्नवम् । सुहृद्वृतः पीतमना नंदमाह करे स्पृशन् ॥६०॥

कौरवकुमुदकाननचन्द्रा । ऐकें परीक्षिति नरेन्द्रा । वसुदेव मनोरथसमुद्रा । लंघूनि गेला आह्लादें ॥३॥
अंजसा म्हणिजे सर्व प्रकारें । जितुकीं यज्ञाङ्गें दुस्तरें । तितुकीं स्वमनोरथानुसारें । उल्लंघिलीं संतोषें ॥४॥
मेरु इतुका उतरला भार । कीं बाहीं निस्तरला सागर । तैसा वसुदेव विज्वर । जाला अध्वर संपलिया ॥४०५॥
करूनि दीक्षाविसर्जन । वसनाभरणें अंगीकारून । सुहृद आप्तीं परिवारून । सभास्थानीं विराजला ॥६॥
प्रफुल्लित हृदयारविन्द । हस्तीं धरूनि गोपनंद । त्याप्रति बोलिला वाक्यें विशद । तो अनुवाद अवधारा ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP