अध्याय ८४ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


सन्निकर्षोऽत्र मर्त्यानामनादरणकारणम् । गाङ्गं हित्वा यथान्यांभस्तत्रत्यो याति शुद्धये ॥३१॥

अत्यंत सहवासाचे सलगी । ते प्रीति मर्यादा आदरभंगी । याचा अनुभव सर्वां आंगीं । नव्हे सांगी सांगणीची ॥२००॥
गंगातीरीं वसती प्राणी । ते गंगेतें सांडूनी । प्रवर्तती तीर्थाटनीं । दोषक्षालनीं उद्युक्त ॥१॥
उदरीं वाहिलें नवमास । प्रसूत्यादि साहिले क्लेश । सलगी सांडूनि ते मातेस । सासुश्वशुरांस अभ्यर्ची ॥२॥
स्वप्रकाशें मंडित किरणीं । अहरह गगनीं प्रकटे तरणी । नैरंतर्यें न भजे कोण्ही । सादर ग्रहणीं जन होती ॥३॥
पायसपयाज्यशर्करामुक्ति । तेथ बाहुल्ये ये विरक्ति । कट्वम्लरामठक्षारतिक्तीं । सादर होती कीं ना हो ॥४॥
एवं सन्निकर्षसलगीगुणें । प्रेममर्यादामहत्त्व उणें । यास्तव कृष्ण मानूनि अर्भकपणें । प्रश्न करणें या योग्य ॥२०५॥
वसुदेव अविद्याभ्रमेंकरूनी । कृष्णीं निजार्भकत्व मानी । कृष्णमहिमा ही जाणोनी । सलगी करूनि अनादरता ॥६॥
कृष्ण दिसतां मनुजाकृति । मनुजा ऐसा न घेपे भ्रान्ति । अगाध कृष्णाची अनुभूति । न नसे कल्पातीं तें ऐका ॥७॥

यस्यानुभूतिः कालेन लयोत्पत्त्यादिनास्य वै । स्वतोऽन्यस्माच्च गुणतो न कुतश्चन रिष्यति ॥३२॥

ज्याची अनुभूति न नाशे कदा । ऐका तयाही अनुवादा । गजत्सजनावनान्त धंदा । होतां अबोधामाजि न लपे ॥८॥
येर प्राकृत सकळ प्राणी । जननस्थितिलय करितां गुणीं । अनुभव लोपे क्षणक्षणीं । घडमोदणीमाजिवडा ॥९॥
पूर्व देह पावे लय । तेव्हां हारपे तत्प्रत्यय । नूतन तनु प्राप्त होय । तैं धरी सोय तस्मरणीं ॥२१०॥
तैसी न नशे हरि अनुभूति । अवतरतांही सुरकार्यार्थीं । स्फुरदूप जे स्वसंवित्ति । ते कल्पान्तीं न पालटे ॥११॥
अथवा उर्वारुकापरी । अपक्कीं तैक्त्य पक्कीं माधुरी । अनुभूतीचा लोप करी । काळान्तरीं न तेंवि हें ॥१२॥
किंवा आपेंआप जैसी । विद्युल्लता स्फुरणासरिसी । गगनीं लोपे हरिस्मृति तैसी । आपेंआपही न लोपे ॥१३॥
अथवा आणिकाही व्याघातें । न पवे अनुभूति लोपातें । घटप्रतीति मुद्गरघातें । पावे भंगातें ज्यापरी ॥१४॥
अथवा न नशे गुणेंकरून । तेंही ऐका उदाहरण । रूपान्तरोत्पत्ति करून । पालटी गुण पूर्वरूपा ॥२१५॥
निद्रालस्यप्रसादजडता । तमोगुणीं वर्ते वस्तुता । रजोगुणें त्या पालट होतां । तृष्णाप्रलोभकार्मठ्य ॥१६॥
तैशी कृष्णाची अनुभूति । अचिन्त्यैश्वर्यगुणसंपत्ति । गुणीं न नशे तेही रीती । यथानिगुती निरूपिली ॥१७॥
कोणा एक्या योगेंकरून । अनुभव व्याहत न होय जाण । सदृष्टांत हें व्याख्यान । शुकभगवान निरूपिती ॥१८॥

तं क्लेशकर्मपरिपाकगुणप्रवाहैरव्याहतानुभवमीश्वरमद्वितीयम् ।
प्राणादिभिः स्वविभवैरुपगूढमन्यो मन्येत सूर्यमिव मेघहिमोपरागैः ॥३३॥

क्लेशकर्म आणि परिपाक । कीं सत्वजस्तमोगुणात्मक । इत्यादि प्रवाह अनेक । ज्याचा अनुभव न रोधिती ॥१९॥
ऐसिया अव्याहतानुभवातें । अद्वितीय ईश्वर जाणोनि पुरतें । आपुल्या विभवीं छादित निरुतें । अन्य प्राकृत जन मानी ॥२२०॥
क्लेशकर्मपरिपाकगुण । अनुभग न नशे इहींकरून । ऐका तयाचें लक्षण । ब्रह्मनंदन म्हणे मुनींतें ॥२१॥
क्लेश म्हणिजे रागादिक । प्रियतम मानूनि इहामुष्मिक । वास्तव विसरणें निष्टंक । न शिवे कलंक हा कृष्णा ॥२२॥
इहामुष्मिक उभय स्थळीं । प्रियतम मानूनि हृदयकमळीं । कृष्ण कोणता विषय कवळी । स्वबोधशाळी परिपूर्ण ॥२३॥
गा त्या विषयाच्या अनुरागें । सकामकर्में करी आंगें । तत्फळप्राप्तीच्या प्रसंगें । अनुभव भंगे कृष्णाचा ॥२४॥
तरी तो सनातन सर्वगत । इहामुष्मिकी यातायात । स्वबोध विसरूनि मानी नथ्य । हें तरी तेथ घडूं शके ॥२२५॥
विषयानुरागमात्र मळ । अनुभव व्याहत करी केवळ । तो असतां मग कर्म सकळ । करी प्रबळ फळलोभें ॥२६॥
मग त्या कर्माचरणकाळीं । जीवत्व अहंता झांकोळी । अनुभव व्याहत तये वेळीं । होय समुळीं वास्तव जो ॥२७॥
वास्तव अनुभव व्याहत होतां । आपणा भावी परिपाकभोक्ता । परिपाक म्हणिजे कर्माचरिता । माजि सुखदुःख जें निपजे ॥२८॥
सुकृत परिपक्क तेंचि सुख । मानी तद्भोगीं संतोख । वास्तव अनुभूति पावे लुक । स्वबोधच्छादक हें पटळ ॥२९॥
विषयानुराग नाहींच कृष्णा । यालागीं स्वानुभव न झांकी तृष्णा । तदर्थ कर्में न करी नाना । कार्मठ्यपणा माजि नये ॥२३०॥
कृष्ण नोहे सुखदुःखभोक्ता । न पवे निजानुभवव्याघात । विडंबानुसार अनुकार करितां । व्याहतप्रत्यय नोहे कीं ॥३१॥
कृष्ण जन्मला वसुदेवसदनीं । ऐशीच प्रथा सर्व जनीं । परी तो स्पर्शला नाहीं योनी । हें न ठावें मनीं वसुदेवा ॥३२॥
ज्यासी जन्मचि नाहीं साच । त्याचें कर्मही मग आहाच । सुखदुःखभोक्तृत्वें नडनाच । कैंचा वाच्य ते ठायीं ॥३३॥
ऐसा अमळ कालत्रयीं । तबोध व्याहत एतत्त्रितयीं । नोहे ऐसा तुमच्या ठायीं । प्रत्यय बाणे कीं ना हों ॥३४॥
नातरी प्रकाश प्रवृत्ति मोह । हे जे गुणत्रयप्रवाह । मायामय जो कृष्णदेह । वसवूनी प्रत्यय लोपविती ॥२३५॥
वस्तुता कृष्णासी देहचि नाहीं । तेथ गुणप्रवाह कवणे ठायीं । प्रकटूनि व्याहत करील पाहीं वस्तव अनुभव कृष्णाचा ॥३६॥
ऐसियातें अन्य जन । आपुले आंगींचे इत्यादि गुण । तिहीं छादित मानी जाण । सूर्यासमान तें ऐका ॥३७॥
आपुल्या दृष्टीचिया कवळें । चंद्रा आंगींचें तेज पिवळें । मूर्ख मानी परंतु न कळे । आपुले डोळे मलिन हें ॥३८॥
कीं आपुली दृष्टि मेघपटळीं । लोपवितां लोपला मानी हेळी । आपुलें विभव तन्मंडळीं । प्राकृतें आंधळीं आरोपिती ॥३९॥
कीं शारदीं सजळनीहारधुई । निबिड दाटे जिये ठायीं । ते जन म्हणती सूर्यचि नाहीं । प्रकट असतांहीं न देखती ॥२४०॥
कीं राहुमंडळा आणि सूर्या । द्वादश योजनें अंतर तया । असतां नेत्रीं प्राकृतांचिया । ग्रहणीं ग्रासिला साच गमे ॥४१॥
ऐसा अन्य प्राकृत जन । प्राणज्ञानक्रियाकारण । समुच्चयें छादितप्रत्यय जाण । आपणासमान हरि भावी ॥४२॥
पंजरनिबद्ध जैसा पक्षी । पंजरच्छिद्रान्तरेंचि लक्षी । तैसा नव्हे जो अंतरिक्षीं । स्वानुभवपक्षीं उडणारा ॥४३॥
पंजरनिबद्ध आपुले मनीं । आपणासमान त्याही मानी । आपण बद्ध तो चिद्गगनीं । विलसे म्हणोनी त्या न कळे ॥४४॥
तैसा कृष्ण आपुले उदरीं । जन्मला मानूनि अनादरी । आम्हांलागीं प्रश्न करी । यथाधिकारीं हें उचित ॥२४५॥
ऐसी नारदोक्ति ऐकून । त्यानंतरें ते मुनिजन । आनकदुंदुभिप्रति वचन । ऐकें राया वदले तें ॥४६॥

अथोचुर्मुनयो राजन्नाभाष्यानकदुंदुभिम् । सर्वेषां श्रृण्वतां राज्ञां ततहिवाच्युतरामयोः ॥३४॥

ऐकत असतां सर्व राजे । तेथ उपविष्ट होते जे जे । आणि रामाच्युतही सहजें । श्रवण करीत असतां पैं ॥४७॥
वसुदेवाप्रति म्हणती मुनी । कर्मनिरास कर्में करूनी । पुशिला तरी तो ऐकें श्रवणीं । जो प्राचीन कविजनीं निरूपिला ॥४८॥

कर्मणा कर्मनिर्हार एष साधुनिरूपितः । यच्छ्रद्धया यजेद्विष्णुं सर्वयज्ञेश्वरं मखैः ॥३५॥

कर्में करूनि कर्म सुटणें । ऐसा प्रकार उत्तमपणें । कथिजेल तो श्रवण करणें । सावधपणें वसुदेवा ॥४९॥
पूर्णश्रद्धें करून विष्णु । यजिजे होऊनि वितृष्णु । यज्ञसमुच्चयें करून । कर्ममोचन तत्कर्में ॥२५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP