अध्याय ८४ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तस्याद्य ते ददृशिमाङ्घ्रिमघौघमर्ष तीर्थास्पदं हृदिकृतं सुविपक्वयोगैः ।
उत्सिक्तभक्त्युपहताशयजीवकोशा आपुर्भवद्गतिमथोऽनुगृहाण भवतान् ॥२६॥

आद्यशब्दें परमपुरुषा । ऐकें आमुच्या सुकृतविशेषा । जें त्रिजगाच्या निरसी कलुषा । आश्रय अशेषां तीर्थां जें ॥६६॥
तिये गंगेचें जन्मस्थान । तुझें चरणपंकज जाण । तदाश्रयें तें समर्थ पूर्ण । त्रिजग पावन करावया ॥६७॥
ऐसें तुझें चरणरविंद । सपक्कयोगें योगिवृंद । अचंचळ हृदयीं ध्याती विशद । परमानंद निजबोधें ॥६८॥
परंतु दृग्गोचर त्यां नाहीं । विशुद्धचित्तेंचि ध्याती हृदयीं । तें हें तवांघ्रिपंकज पाहीं । प्रकट इंद्रियीं पहात असों ॥६९॥
जियें कां मिथ्या विषयोन्मुखें । इंद्रियें भ्रमभरितें भ्रामकें । तियें तव चरणांच्या अवलोकें । केवळ चित्सुखें निवालीं ॥१७०॥
यास्तव अगाध पुण्येंकरून । आम्ही देखत असों तव चरण । अतःपर जाणोनि स्वपादशरण । आम्हांलागून अनुग्रहीं ॥७१॥
स्वभक्त करूनि आम्हांप्रति । मग अनुग्रहीं निजात्मरति । यदर्थी शंका करिसी चित्तीं । तरी ते विनती अवधारीं ॥७२॥
म्हणसी भक्ति करूनि विशेष कोण । करित आलां तपाचरण । तेंचि पुढती आचरून । कां पां निर्वाण न साधां ॥७३॥
ऐसें न म्हणावें परेशा । न लाहतां भक्तीच्या उत्कर्षा । कैवल्यलाभाची दुराशा । वॄथा मानसामाजिवडी ॥७४॥
भक्त्युद्रेक अंतःकरणीं । तो उचंबळे सर्वां करणं । अभेदात्मत्वप्रेमा भजनीं । अविद्याहरणीं समर्थ जो ॥१७५॥
भक्तिप्रेमाचा उद्रेक । अभेदबोधा प्रकाशक । जीवकोश आशयात्मक । भंगी निष्टंक सावरण ॥७६॥
ऐसें जाणोनि पूर्वकोविद । भक्तिप्रेमें परमानंद । लाहोनि तवानुग्रह विशद । कैवल्यपद पावले ॥७७॥
एवं भक्त्युद्रेकें सद्गति । पूर्वापर साधिली संतीं । अन्यसाधनें यथारीती । श्रमतां न लाहती कैं कोणी ॥७८॥
यास्तव आम्हां तव पदभक्ति । अनुग्रहिजे हे करूनि विनति । मुनिवर आज्ञा घेऊनि निघती । हें परीक्षितीप्रति शुक सांगे ॥७९॥

श्रीशुक उवाच - इत्यनुज्ञाप्य दाशार्ह धृतराष्ट्रं युधिष्ठिरम् ।
राजर्शे स्वाश्रमान्गन्तुं मुनयो दधिरे मनः ॥२७॥

दासार्ह म्हणिजे यादवांप्रति । तो जो श्रीकृष्ण यादवपति । इत्यादि वचनीं विनीतभक्ति । आज्ञाघेती मुनिवर्य ॥१८०॥
तया कृष्णाप्रति पुसोनि आज्ञा । धृतराष्ट्रातें तियेचि संज्ञा । युधिष्ठिरातें कृतप्रार्थना । स्वाश्रमभुवना जावया ॥८१॥
राजयांमाजि ऋषीश्वरा । ऐकें परीक्षिति श्रवणचतुरा । स्वाश्रमा जावयाकारणें त्वरा । उद्योग मुनिवरीं मनिं धरिला ॥८२॥
सिद्धपादुका लेइले पदीं । देवार्चनादिमात्रा खांदीं । चंचळ देखोनि मुनींची मांदी । वसुदेव वंदी तें ऐका ॥८३॥

तद्वीक्ष्य तानुपव्रज्य वसुदेवो महायशाः । प्रणम्य चोपसंगृह्य बभाषेदं सुयंत्रितः ॥२८॥

मुनींचा देखोनि गमनोद्योग । त्यांप्रति जाऊनियां सवेग । वसुदेव केवळ महाभाग । वंदी साष्टांग तयांप्रति ॥८४॥
तयां मुनींचे धरूनि चरण । तयांसि वचन वक्ष्यमाण । बोलिला सुयंत्रित होऊन । सुष्ठुकर्मा वशवर्ती ॥१८५॥

वासुदेव उवाच - नमो वः सर्वदेवेभ्य ऋषयः श्रोतुमर्हथ । कर्मणा कर्मनिर्हारो यथा स्यान्नस्तदुच्यताम् ॥२९॥

सुष्ठुबुद्धीसीं वश जाला । म्हणोनि सत्पात्रा शरण गेला । त्यांतें काय पुसता जाला । तें नृपाळा अवधारीं ॥८६॥
नमस्कार म्हणे तुम्हां । सर्वदेवमय तुमचा आत्मा । निगमीं आगमीं तुमची गरिमा । सर्व पुराणें वदताती ॥८७॥

सम्मतिःपुराणान्तरे - सर्व देवमयो विप्रः सर्वतीर्थमयस्तथा । तस्मात्तत्पादतीर्थं च पिबेत्पापापनुत्तये ॥१॥

अनधिकारी पढती श्रुति । यालागीं न लिहिली संमति । सर्वदेवेभ्य या पदार्थीं । पुराणोक्ति लिहिलीसे ॥८८॥
सर्वदेवमय भूदेव । सर्वतीर्थमय अतएव । तो हा ऋषींचा समुदाव । नमूनि वसुदेव काय म्हणे ॥८९॥
सर्व ऋषींतें म्हणे स्वामी । विनति माझी श्रवणधामीं । ऐकावया योग्य तुम्ही । म्हणोनि पैं मी प्रार्थितसें ॥१९०॥
कैसी विनति पुसाल ऐसें । तरी कर्में करूनि कर्म निरसे । तें मज सांगा कृपावशें । होय तैसें सर्वज्ञ हो ॥९१॥
जैसें केलिया कर्माचरण । होय कर्माचें निरसन । कीं कर्मच्छेदककर्म कोण । जेणें करून तें खंडे ॥९२॥
कर्मच्छेदककर्म पृथक । कीं आचरणामाजि पार्थक्य । कर्मचि कर्मा निरासक । होय सम्यक तें कथिजे ॥९३॥
ऐसी ऐकूनि वसुदेववाणी । महर्षींचा मुकुटमणि । तो देवर्षि नारदमुनि । बोले हांसोनि मुनिवर्या ॥९४॥

नारद उवाच - नातिचित्रमिदं विप्रा वसुदेवो बुभुत्सया । कृष्णं मत्वाऽर्भकं यन्नः पृच्छति श्रेय आत्मनः ॥३०॥

मुनींतें म्हणे भो भो विप्रा । वसुदेवप्रश्न ऐका बरा । ऐकूनि कांहीं आश्चर्य न करा । यथाधिकारा जाणोनी ॥१९५॥
कृष्ण निजार्भक जाणोन । बोधावयचे इच्छेकरून । आम्हां पुसे आत्मकल्याण । हें आश्चर्य गहन न मानावें ॥९६॥
सूर्य प्रकट असतां सृष्टी । आंधळियासी नेत्र काठी । कीं निर्दैवा धनाच्या कोटी । नसतां अदृष्टीं अगोचरा ॥९७॥
तेंवि श्रीकृष्णातें सोडून । आम्हांप्रति आत्मकल्याण । पुसे ऐका विस्मय गहन । तुम्हांलागून जो गमला ॥९८॥
तरी यदर्थीं नारद म्हणे । निकट सहवासें हेळने । करूनि घडे अनादरणें । तें हें श्रवणें अवधारा ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP