सर्वभूतात्मदृक्साक्षातस्यागमनकारणम् । विज्ञायाचिंतयन्नायं श्रीकामो माऽभजत्पुरा ॥६॥

सर्वभूतांचा अंतरात्मक । अंतःकरणसाक्षी मुख्य । जाणोनि विप्रागम सम्यक । चित्तीं निष्टंक चिंतितसे ॥३८॥
म्हणे हा निघतां सदनाहून । पूर्वीं श्रीकाम मजलागून । भजला आतां मज देखून । सलज्ज होऊन न वदेची ॥३९॥
किंवा पूर्वीं बहुतजन्मीं । श्रीकामपर स्वधर्मनियमीं । मज भजला मग सद्गुरुसद्मीं । वसतां निष्कामपर जाला ॥४०॥
तो हा मम सखा प्रियतम । दर्शनाचें धरूनि प्रेम । येते समयीं अभीष्टकाम । विप्रांतरींचा हरि चिंती ॥४१॥

पत्न्याः पतिव्रतायास्तु सखा प्रियचिकीर्षया । प्राप्तो मामस्य दास्यामि संपदोऽमर्त्यदुर्ल्लभाः ॥७॥  

पतिव्रता स्त्री सद्गुणराशी । तियेसी संतोष करावयासी । इच्छूनि अभीष्टवैभवासी । आला मजपासीं प्रियसखा ॥४२॥
गुरुसदनींचा मम सहाध्यायी । प्रेमा धरूनि माझ्या ठायीं । आला ऐसियातें ये समयीं । मी सर्वही वोपीन ॥४३॥
इंद्रादिअमरां दुर्ल्लभ लक्ष्मी । ते मी निर्मीनं याचे सद्मीं । ऐसें विवरूनि हृदयपद्मीं । करी तें सत्तमीं परिसावें ॥४४॥

इत्थं विचिंत्य वसनाच्चीरबद्धान्द्विजन्मनः । स्वयं जहार किमिदमिति पृथुकतंडुलान् ॥८॥

ऐसें चिंतूनियां अंतरीं । ब्राह्मणें निजमात्रे माझारी । पृथक बांधिले वस्त्रांतरीं । स्वकरीं हरि हरी त्यांतें ॥४५॥
पृथुकबंधना वस्त्र धड । नाहीं म्हणोनि जीर्ण उदंड । एकवटूनि ग्रंथी दृढ । करूनि निगूढ जे केली ॥४६॥
ते ग्रंथीतें झोंबूनि हरी । काय म्हणोनि स्वीकरी हरी । पृथुकतंडुल घेऊनि करीं । बोले मुरारी तें ऐका ॥४७॥

नन्वेतदुपनीतं मे परमप्रीणनं सखे । तर्पयंत्यंग मां विश्वमेते पृथुकतंडुलाः ॥९॥

कां लपविसी ब्राह्मणोत्तमा । बहुतेक हेंचि उपायन आम्हां । आणिलें इतुकेन मी विश्वात्मा । विश्वें सहित तृप्त असें ॥४८॥
अंग या कोमलसंबोधनें । म्हणे सखया मजकारणें । प्रियतम उपायन आणिलें तेणें । जगदात्मपणें संतृप्त मी ॥४९॥
तुझे इतुके पृथुकतंडुल । विश्वें सहित मज केवळ । तृप्त करिती हें वाक्य अढळ । मी गोपाळ तुज वदतों ॥५०॥

इति मुष्टिं सकृज्जग्ध्वा द्वितीयां जग्धुमाददे । तावच्छ्रीर्जगृहे हस्तं तत्परा परमेष्ठिनः ॥१०॥

ऐसें बोलूनियां श्रीहरी । वस्त्रग्रंथि मुक्त करी । पृथुकमुष्टि घेऊनि करीं । मुखा भीतरी निक्षेपी ॥५१॥
ब्रह्मार्पण म्हणूनि भक्षी । द्वितीयमुष्टिग्रहणापेक्षी । ऐसें इंदिरा रुक्मिणी लक्षी । धरी कमळाक्षी करकमळा ॥५२॥
धरावया श्रीकृष्णकर । जाली वैदर्भी तत्पर । किमर्थ म्हणाल तरी विचार । ऐका सादर होत्साते ॥५३॥
सूर्यासवें जैसी दिप्ति । तेंवि वैदर्भी वैष्णवी शक्ति । व्यापूनि श्रीकृष्णाची मति । वर्ते निगुती अनुगत्वें ॥५४॥
भक्तवत्सल श्रीभगवंत । उचंबळला सप्रेमभरित । देतां न म्हणे अल्प बहुत । जाणोनि हस्त येरी धरी ॥५५॥
परमेष्ठी जो श्रीकृष्णनाथ । तत्परा जे कां तत्पदनिरत । स्वकान्ताचा धरूनि हात । वदली संकेत तो ऐका ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP