शुद्धलेखन - विरामचिन्हें

व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


१ स्वल्पविराम (,)

(१) हे परमेश्वरा, तूं आम्हांला नेहमीं सद्बुद्धि दे. मुलांनो, सत्य बोलणें व सत्य वागणें यांतच आपलें खरें हित आहे हें ध्यानांत ठेवा.
परमेश्वरा, मुलांनो, या शब्दांची विभक्ति, संबोधन आहे. संबोधनार्थी शब्दापुढें स्वल्पविराम द्यावा.
(२) तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, येसाजी कंक हे शिवाजी महाराजाम्चे जिवास जीव देणारे बालमित्र होते. शिवाजी महाराज हे मोठे मुत्सद्दी, शूर, मातृपितृभक्त राजे होऊन गेले.
या वाक्यांत तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, मुत्सद्दी, शूर हे शब्द वाक्यांत समान दर्जाचे आहेत. अशा शब्दांपुढें स्वल्पविराम द्यावा. मात्र उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावयाचा असेल तर स्वल्पविराम दें नये. जसें :- बलराम व कृष्ण हे भाऊभाऊं होते. दूद, दही, ताक, लोणी आणि तूप हे सर्वच पदार्त पौष्टिक आहेत.
(३) बाजारांत काही जण माल विकत घेतात, काही माल विकतात, काही तर नुसते हिंडतात.
(४) हीन मनोवृत्तीच्या माणसाला दुसर्‍यास हसणें, दुसर्‍याची निंदा करणें, दुसर्‍यास नेहमी लाजविणें या गोष्टी मनापासून आवडतात.
यांत तिसर्‍या यांदींतील वाक्यें व चौथ्या यादींतील वाक्यांश हे समानाधिकरणी आहेत. अशा समानाधिकरण वाक्यांच्या वाक्यांशाच्या पुढें स्वल्पविराम देतात.
(५) बोलतांना अर्थ नीट रितीनें समजावा म्हणून आपण थोडें थांबतों. असा भाग लिहिताना थांबावयाचे ठिकाणीं स्वल्पविराम करितात.
जसें - यंदा पावसाळ्यानंतर अवेळीं जो पाऊस पडला, त्यानें शेतकर्‍यांचें पुष्कळ नुकसान झालें.
(६) शेतांत पीक चांगलें दिसूं लागलें कीं, शेतकरी खर्चाचें प्रमाण वाढवितात. परंतु त्यांनीं ध्यानांत ठेवावें कीं, घरांत येऊन पडेल तेंच  खरें आपलें उत्पन्न.
यांत की हें स्वरूपबोधक अव्यय आहे. या अव्ययापुढें स्वल्पविराम द्यावा.

-----------------------------

२ अर्धविराम (;)

संतापानें गणू घराबाहेर पडला खरा; पण आतां कोठें जावें हें त्यास कळेना. वाईट कृत्यांचे परिणाम ताबडतोब घडत नसतात; म्हणून ते आपणांस केव्हांच भोगावे लागणार नाहींत; असें मनुष्यानें समजू नये.
संयुक्त म्हणजे ( दोन स्वतंत्र लहान वाक्यांनीं बनलेल्या एका वाक्यांत ) शेवटच्या वाक्यापूर्वींच्या वाक्यांचे शेवटीं अर्धविराम द्यावा.
जसें :- सध्या साखर महाग व दुर्मिळ झाली; तरी लोकांनीं चहा पिण्याचें सोडलें नाहीं. हल्लीं नाटकें अगदींच मागें पडली; त्यांई जागा तूर्त तरी चित्रपटांनीं पटकाविली आहे.

------------------------------

३ पूर्णविराम (.)

(१) दिवसांतून प्रत्येकानें काही तरी लिहावें.
(२) वाचताना मुलांनीं न अडखळतां वाचावें.
(३) काल गारांचा पाऊस पडला.
(४) गारांच्या मार्‍यानें पानमळ्यांचें अतिशय नुकसान झालें.
ज्या वाक्यांत अर्थ पुरा झाला आहे अशा साध्या पूर्णवाक्याचे शेवटीं पूर्णविराम द्यावा. साधें म्हणजे प्रश्नार्थक अगर उद्गारार्थक नसलेलें वाक्य.
जसें - यावेळीं तरी प्रवासाची दगदग मला सोसणार नाहीं.

--------------------------------------

४ प्रश्नचिन्ह (?)

(१) मधू, तुझा अभ्यास झाला का ? ठीक. मग माझ्याबरोबर बाहेर फिरावयास येतोस काय ? लेखी काम राहिलें ? मग आधीं तें कर.
ज्या वाक्यांत पश्न केला असतो त्याचे शेवटी प्रश्नचिन्ह देतात.
(२) राजा कवीस म्हणाला, “ तुम्हांला काय पाहिजे तें मागा. ” कवीनें उत्तर दिलें. आपल्या मनांत काय द्यावेंसें वाटेल तें द्या. यांत काय हें प्रश्नार्थक सर्वनाम नाहीं. या वाक्यांचा अर्थ प्रश्नार्थक नाहीं.
दुसरीं उदाहरणें :- तुम्हांस कोण पाहिजे ? तुम्हांस कोणीं बोलाविलें ?

--------------------------------------

५ उद्गारचिन्ह (!)

अरेरे ! मुलगा मोटारीखालीं सांपडला वाटतें ! वा ! सदासर्वदा इकडे तिकडे हिंडूण का तूं परीक्षा पास होणार ! शाबास ! याला म्हणतात काम ! अबब ! केवढा हा सिंह !
ज्या वेळेस आपणांस आनंद, दुःख, आश्चर्य वाटतें त्यावेळी हे विकार दाखविणार्‍या शब्दांपुढे व अशा अर्थाच्या वाक्यापुढे उद्गारचिन्ह करितात. मरणापेक्षाही दारिद्र्यांत अधिक दुःख असतें ! हा वेड्या ! सर्वस्वीं परक्यावर अवलंबून जगण्यांत तुला मज वाटावी; धन्य तुझ्या विचारांची !

---------------------------------------

६ अवतरणचिन्ह ( ‘ - ’ आणि “ - ” )

आपल्या लिहिण्यांत दुसर्‍याचें बोलणें जसेंच्या तसें घावयाचें असेल तर तें अवतरनचिन्हांत घालावें.
जसें - (१) महात्मा फुले म्हणतात, “ अस्पृश्य हे आपले धर्मबंधुच आहेत. त्यांना कमी लेखून त्यांचेशीं वागणें हें मोठें पाप होय. ”
(२) ज्यानें त्यानें आपलें घर सुधारलें म्हणजे देशाची उन्नति आपोआप होईल ” हे त्याचे विचार ऐकून मी चकित झालों. कारण आपल्या देशांत असे कित्येक लोक आहेत की, त्यांना दुसर्‍यांच्या मदतीची जरुरी आहेच.
(३) विद्यार्थ्यांस सूचना. आज भुसावळचे ‘ साहित्य - विशारद ’ रा. पाटील यांचें ‘ मराठी भाषेचें श्रेष्ठत्व ’ या विषयावर व्याख्यान आहे. तरी सर्वांनीं सेंट्रलहॉलमध्ये जमावें.
(४) श्रीज्ञानेश्वरांची ‘ ज्ञानेश्वरी ’, एकनाथांचें ‘ भागवत ’ तुकारामांची ‘ गाथा ’ हे महाग्रंथ म्हणजे मराठी भाषेचे ‘ अमोल अलंकार ’ होत.
लिहिण्यांत एकाद्या महत्त्वाच्या शब्दाकडे अथवा वाक्याकडे वाचकांचें लक्ष वेधावें म्हणून तो शब्द अगर तें वाक्य अवतरनचिन्हांत लिहितात.

---------------------------------------

७ कंस [ ( ) [ ] ]

(१) छत्रपति शाहूनंतर ( ताराबाईचा नातू ) रामराजा याला सातारची गादी मिळाली. (२) आमची पुतणी ( आमचे बंधु कै. यादवराव गायकवाड यांची कन्या ) शांताबाई हिच्या विवाहाचा नेम मिति फाल्गुन वद्य ५ शके १८६५ ( ता. १५ मार्च १९४४ ) रोजी बुधवारचा केला आहे.
जेव्हां वाक्यांतील एकाद्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठीं मध्येंच कांहीं मजकूर घालावा लागतो, असा मजकूर कंसांत लिहितात. मात्र हा कंसांतील मजकूर गाळला तरी वाक्याचा मूळ अर्थ पुरा झाला पाहिजे अशी काळजी घ्यावी.
जसें - (१) मुंबईहून बडोद्यास जाताना आम्हीं बी. बी. सी. आय् ( बॉम्बे बरोडा सेंट्रल इंडिया ) रेल्वेनें प्रवास केला. (२) महाराजांनीं आम्हांला आसामी ( नोकरी ) दिली.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP