अध्याय ६९ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


पृष्टश्वाविदुषेवासौ कदाऽऽयातो भवानिति । क्रियते किं नु पूर्णानामपूर्णैरस्मदादिभिः ॥२१॥

नारददागमन विदित नाहीं । तया अविदुषापरी पाहीं । त्रिकाळज्ञ शेषशायी । पुसे काई तें ऐका ॥९७॥
भवान् म्हणिजे अगा मुनि । केव्हां आलासि द्वारकभुवनीं । काय करावें आम्हीं अपूर्णीं । तुम्हासारिख्या पूर्णांचें ॥९८॥
आम्हांसारिखे अपूर्ण जन । तिन्हीं पूर्णांचें दास्याचरण । कैसें काय करावें कोण । योग्यता गौण गमे आमुची ॥९९॥
आम्ही कुटुंबी कुटुंबासक्त । स्वामी निष्काम निजात्मरत । आम्ही स्वामीचा पूरवूं हेत । हें अघटित असो पैं ॥२००॥
तथापि आमुच्या कल्याणकाजा । आज्ञा करावी जी मुनिराजा । इत्यादिवचनीं प्रार्थि द्विजा । कुरुभूभुजा तें ऐक ॥१॥

अथापि ब्रूहि नो ब्रह्मञ्जन्मैतच्छोभनं कुरु । स तु विस्मित उत्थाय तूष्णीमन्यदगाद्गृहम् ॥२२॥

आम्ही कुटुंबी भवनिमग्न । तथापि ब्राह्मणा बोले वचन । मम जन्म हें करीं क्षोभन । दास्याचरणें आपुलिया ॥२॥
ऐसें ऐकूनि नारदमुनि । विस्मित होत्सा निजमनीं । सवेग उठिला मौनेंकरूनी । अन्य सदनीं प्रवेशला ॥३॥

तत्राप्यचष्ट गोविंदं लालयंत सुताञ्शिशून् । ततोऽन्यस्मिन्गृहेऽपश्यन्मज्जनाय कृतोद्यमम् ॥२३॥

हरिरमणीचें रमणीय भुवन । मुनि पाहे जंव प्रवेशून । तेथ गोविंद सुतलालन । करी घेऊनि उत्संगीं ॥४॥
सस्निग्धप्रेमें चुम्बी वदन । हनु कपोल उदर स्तन । शिशूतें हांसवी स्पर्शून । कमलारमण परमात्मा ॥२०५॥
एका बोलवी कलभाषणीं । एका उठवी धरूनि पाणि । एका हांसवी अमृतेक्षणीं । एका धरूनि चालवित ॥६॥
ऐसा स्वसुतां शिशूंतें । लालवितां कमलाकान्तें । नारदें देखूनि कौतुकातें । विस्मितचित्तें मग परते ॥७॥
या जी मुनि कां परतलां । ऐसें भगवान बोलता झाला । नारद न देऊनि प्रतिवचनाला । रिघता झाला अन्य गृहीं ॥८॥
हरीतें त्याचें अभीष्ट विदित । म्हणोनि आग्रह त्या न करित । स्वस्थमानसें शिशु लालित । जेथिंचा तेथ स्थिर राहे ॥९॥
नारद अन्य सदनीं पाहे । तेथ कौतुक देखता होये । सहस्रदासींचिया समूहें । हरि भजताहे हरिणाक्षी ॥२१०॥
मांडूनि स्फटिकाची चवाई । वरी बैसवूनि शेषशायी । सुगंध स्नेह चर्चिती पाहीं । कुवलयवदना कुरळातें ॥११॥
दिव्य सुगंधद्रव्यकर्दम । वनिता लावण्यरसललाम । करीं मर्दूनि मेघश्याम । अतिसप्रेम उटिती ॥१२॥
भगवंताची तनु निर्मळ । उटूनि करूं पाहती अमळ । अमळीं सहसा न निघे मळ । चकित मेळ अबलांचा ॥१३॥
भरूनि कनकाचीं गंगाळें । उष्णोदक घालिती ढाळें । अभ्यंगोद्योग हा मुनीचे डोळे । चकित झाले देखूनी ॥१४॥
पुढें न घालितां पाउला । सवेग मागुती परतला । अन्यसदनीं प्रवेशला । तें कुरुपाळा अवधारीं ॥२१५॥

जुह्वंतं च वितानाग्नीन्यजंतं पंचभिर्मखैः । भोजयंतं द्विजान्क्वापि भुंजानमवशेषितम् ॥२४॥

कोणे एके सदनीं मुनि । प्रत्यूषकाळीं प्रवेशूनी । काय करी चक्रपाणि । तें निजनयनीं अवलोकी ॥१६॥
याज्ञवल्क्यशाखासूत्र । अनुदित होमाचा अवसर । आहवनीयादि कृतविहार । यजी सादर गृहपति ॥१७॥
इतुकें देखूनि तया स्थानीं । मागुता पाउलीं परते मुनि । रिघोनि अन्य एके सदनीं । कौतुक नयनीं पाहतसे ॥१८॥
तेथ पंचमहायज्ञा अवसर । कक्षेमाजी धरूनि वज्र । महानसाग्नि मणिकोदपात्र । करी श्रीधर संमेलन ॥१९॥
आवसथीं महानसाग्नि । एक्या श्वासें मेळवूनी । उद्धृतचरु संस्कारूनी । पंचमहायज्ञी प्रवर्ते ॥२२०॥
देवयज्ञ भूतयज्ञ । पितृयज्ञ मनुष्ययज्ञ । ब्रह्मपठनें ब्रह्मयज्ञ । पंचमहायज्ञ मुनि देखे ॥२१॥
तेथूनि नकळत मुरडे मुनि । सवेग प्रवेशे अन्य सदनीं । तेथ विप्रांच्या अर्चनीं । चक्रपाणी रत देखे ॥२२॥
वेदयज्ञ तपोवतार । पावक भास्कर जे कां अपर । नानाशाखी धरामर । पूजी श्रीधर सद्भावें ॥२३॥
पादावनेजनें करूनी । अत्रगंधाद्युपचारश्रेणी । सप्रेमभागें समर्पूनी । परिवेषूनी दिव्यान्नें ॥२४॥
शलाटवादिव्यंजनें नाना । नागररामठमरीचिचूर्णा । अनेक संधिता पृथग्लवणा । कुशिंबिरिका बहुविधा ॥२२५॥
द्वादश पायसान्नांच्या परी । चरु चित्रान्नें विविधाकारीं । घृतपाचितादि पंचप्रकारीं । बहुविधभक्ष्यें परिवेषिलीं ॥२६॥
लेह्यपेयचोष्यखाद्यें । भक्ष्यभोज्यादि षड्विधें । अन्नें अर्पूनि परमानंदें । विप्रवृंदें संतर्पी ॥२७॥
वितुषमुद्गदाळीचीं सूपें । हरिद्रालवण्यरामठकल्पें । सद्य गोघृतें अनल्पें । द्विजां साक्षेपें हरि अर्पी ॥२८॥
विप्रां जेववितां भगवान । अमृताहूनि गौल्य भाषण । करी क्षणक्षणा प्रार्थन । इतुकें देखूनि मुनिपरते ॥२९॥
सवेंचि कोणे एके ठायीं । रिघोनि मुनि पाहे नवायी । तंव तेथेंही शेषशायी । करी कायी तें ऐका ॥२३०॥
जेवूनि उठिल्या द्विजांच्या श्रेणी । त्या वर्षती आशीर्वचनीं । भूरी ताम्बूल त्यां अर्पुनी । मग भोजनीं स्वयें बैसे ॥३१॥
पाकशाळेमाजी अन्न । विपयज्ञावशिष्ट पूर्ण । पंक्तिकारांसह आपण । करी भोजन यज्ञभोक्ता ॥३२॥
दुरूनि इतुकें लक्षी मुनि । मग प्रवेशे आणिके सदनीं । तेथ कौतुक देखे नयनीं । कुरुकुळतरणी तें ऐक ॥३३॥

क्वापि संध्यामुपासीनं जपंतं ब्रह्मवाग्यतम् । एकत्र चासिचर्माभ्यां चरंतमसिवर्त्मसु ॥२५॥

कोणे एके अन्य सदनीं । हरि तत्पर संध्यावदनीं । उपांशु जपे वेदजननी । वाङ्नियमूनि मौनस्थ ॥३४॥
इतुकें देखूनि नारद । अन्य सदनीं पाहे विशद । खड्गखेटकधर गोविंद । देखून मुग्धवत् राहे ॥२३५॥
छत्तीस दंडावती विद्या । सान्दीपनिप्रबोधलब्धा । तत्परिशीलनें गोविंदा । उत्साह आद्या जगदीशा ॥३६॥
खेटक धरूनि वाममुष्टीं । दक्षिणकरीं कृपाणयष्टि । तदभ्यासाची कसवटी । दावी सृष्टी खङ्गधरां ॥३७॥
सरक चवंक बैसका ठाण । तिर्यक वक्र परिवर्तन । वामसव्यप्रहारप्रवीण । अग्रप्रेरण सड्गाग्रें ॥३८॥
भ्रमणचापल्य मंडळें । अधोर्ध्वप्रहार करकौशल्यें । परप्रहारें खेटकें विफळें । कीजती सकळें अभ्यस्तें ॥३९॥
इत्यादि असिचर्मेंकरून । खड्गविद्यामार्गीं प्रवीण । विचरतां ऐशातें देखोन । मुनि तेथून परतला ॥२४०॥
मग प्रवेशे अन्य सदनीं । तेथ प्रशस्त देखे अवनि । हरिकृत कौतुक पाहे नयनीं । कुरुकुळतरणि तें ऐकें ॥४१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP