अध्याय ६८ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


उग्रसेनः क्षितिरीशो यद्व आज्ञापयत्प्रभुः । तदव्यग्रधियः श्रुत्वा कुरुध्वं मा विलबितम् ॥२१॥

म्हणे ऐका जी कौरवनाथा । विषादरहित करूनि चित्ता । आज्ञा नृपाची जे तत्त्वता । ते मी आतां निरूपितों ॥६४॥
उग्रसेन क्षितीचा ईश । जेणें पाळिला यदूचा वंश । आज्ञाधारक हृषीकेश । प्रभुत्वें शक्रास जो न गणी ॥१६५॥
तेणें आज्ञा तुम्हांसि केली । ते अव्यग्रबुद्धी ऐकिजे सकळीं । सर्वीं राहोनि आज्ञेतळीं । पाहिजे केली वर्तणुक ॥६६॥
विलंब न करावा येविषयीं । माझा स्नेह तुमच्या ठायीं । म्हणोनि आलों मी लवलाहीं । आज्ञा कायी ते ऐका ॥६७॥

यद्यूयं बहवस्त्वेकं जित्वाऽधर्मेण धार्मिकम् । अबध्नीताथ तन्मृष्ये बंधूनामैक्यकाम्यया ॥२२॥

द्वारकेमाजी सभास्थानीं । नृपासन्निध यादववृष्णि । बैसले असतां नारदें श्रवणीं । वार्ता येऊनि निवेदिली ॥६८॥
नारद म्हणे हस्तिनापुरीं । सुयोधनतनया स्वयंवरीं । साम्बें हरूनि ते नोवरी । निज रहंवरीं वाहिली ॥६९॥
द्वारके आणितां पवनगती । भूभुज गेले स्वदेशाप्रति । कौरव धाविन्नले महारथी । तिंहीं तो पथीं पडखळिला ॥१७०॥
साम्बें तयांसीं कीलं रण । अपार मारिलें कौरवसैन्य । भीष्मप्रमुख साहे जण । समराङ्गणीं तोषविले ॥७१॥
साही जणांसी केलें विरथ । सैन्या दाविला मृत्युपथ । कौरवीं करूनि अधर्म तेथ । भंगिला रथ साम्बाचा ॥७२॥
युगपत क्षोभले साही वीर । चौघीं मारिले चार्‍ही वारु । एकें सारथियाचें शिर । चाप कठोर पैं एकेम ॥७३॥
साम्ब विरथ येतां धरणीं । मिठ्या घालूनि साही जणीं । धरूनि बांधिला समराङ्गणीं । अन्यायकरणी हे केली ॥७४॥
ऐसें ऐकूनि नारदवचन । आवेशले यदुनंदन । त्यांसी वारूनि उग्रसेन । आज्ञाशासन पाठविलें ॥१७५॥
तुम्ही बहुत साम्ब एकला । विरथ निःशस्त्र धार्मिक भला । अधर्मयुद्धें आकळिला । यास्तव घडला दोष तुम्हां ॥७६॥
मूर्छित यानविवर्जित । अनवधान शस्त्ररहित । आणिकासम्मुख कीं दुश्चित्त । एकी बहुत अधर्म हे ॥७७॥
इतुके अधर्म घडले तुम्हां । असो आम्हीं ते केले क्षमा । विरोघ न घडावा तुम्हां आम्हां । सुहृदगरिमा लक्षूनी ॥७८॥
आम्ही तुम्ही सुहृद बन्धु । न व्हावा उभयांमाजी विरोधु । ऐसा लक्षूनि स्नेहवादु । क्षमिला क्रोधु ये विषयीं ॥७९॥
आतां कीजे स्नेहवर्धन । प्रेमें वंदूनि संकर्षण । शीघ्र वधूवरें घेऊन । यावें बोळवणे प्रसंगें ॥१८०॥
सौहार्द वाढविजे पहिलें । वृथा कलहें जें डहुळलें । आम्हीं सर्वही क्षमा केलें । आज्ञापिलें स्वीकरणें ॥८१॥
ऐसें बोलतां संकर्षण । कौरव क्षोभले होतां श्रवण । वदती आपणांमाजी आपण । श्रोतीं श्रवण तें कीजे ॥८२॥

वीर्यशौर्यबलोन्नद्धमात्मशक्तिसमं वचः । कुरवो बलदेवस्य निशम्योचुः प्रकोपिताः ॥२३॥

वीर्य शौर्य आणि बळ । इहीं करूनि उच्छृंखळ । जे न गनिती कृतान्तकाळ । अमोघ शीळ जयांचें ॥८३॥
आपुले शक्तिसमान वचन । स्वयें बोलिला संकर्षण । कौरव कोपले तें ऐकून । करिती हेळण दुर्वचनें ॥८४॥

अहो महच्चित्रमिदं कालगत्या दुरत्यया । आरुरुक्षत्युपानद्वै शिरो मुकुटसेवितम् ॥२४॥

करूनि यदुकुळाचें हेळण । कौरव आपणामाजी आपण । संकर्षणा ऐकवण । करूनि वचनें बोलती ॥१८५॥
अहो शब्दें महाखेद । म्हणती कटा हा प्रमाद । कालकलनेचा विनोद । आश्चर्य अगाध पहा हें ॥८६॥
काळगति हे दुरत्यय । तेणें विचित्र केलें काय । पादरक्षा त्यजूनि पाय । आरूढों पाहे मस्तकीं ॥८७॥
मुकुट मस्तका भूषण । मस्तक मुकुटा भूषितें स्थान । मुकुट लोटूनि पादत्राण । म्हणवी भूषण मुकुटाचें ॥८८॥
पायींची वाहाण पायींच बरी । ते आजी बैसों धांवे शिरीं । काळगतीची विपरीत परी । जे आम्हां पामरीं आज्ञापिजे ॥८९॥
यालागीं नीच दुरिल्या दोरें । पहिल्यापासूनि ठेवितां बरें । यादवें क्षुद्रें हीनें पामरें । आम्हीं अविचारें वाढविलीं ॥१९०॥

एते यौनेन संबद्धाः सहशय्यासनाशनाः । वृष्णयस्तुल्यतां नीता अस्मद्दत्तनृपासनाः ॥२५॥

पृथा वसुदेवाची बहिणी । दिधली कुंतिभोजा पोसणी । पाण्डुरायें ती केली राणी । पाणिग्रहणीं विध्युक्त ॥९१॥
तिया सोयरिकेचिया पदरें । यादववृष्णि हे सोयरे । ऐश्वर्यदानें स्नेहादरें । आपणांसमान वाढविले ॥९२॥
राजसभेचा सम्मान । यांसी देऊनि अभ्युत्थान । नृपानिकटी तुंगासन । देखोनि नृपगण वोळंगती ॥९३॥
अन्नसंबंध एकपंक्ती । न विचारूनि यांची ज्ञाति । भोजनीं शयनीं क्रीडतां द्यूतीं । समान नृपति हे केले ॥९४॥
ययातिशापें यादव हीन । आम्ही तैं सर्वही नाठवून । सुहृद्भावें स्नेहवर्धन । केले मान्य नृपवर्गीं ॥१९५॥
आम्हीं स्थापिले नृपासनीं । अस्मद्दत्त भोगिती अवनि । कृतोपकार तो विसरोनी । भूभुजचिह्नीं विराजती ॥९६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP