अध्याय ६८ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच -
दुर्योधनसुतां राजन्लक्ष्मणाम समितिंजयः । स्वयंवरस्थामहरत्सांबो जांबवतीसुतः ॥१॥

शुक म्हणे गा कुरुवरिष्ठा । हरिगुणश्रवणा एकनिष्ठा । सुयोधनतनया जे बरवंटा । लावण्यचोहटा वररत्न ॥११॥
सौन्दर्यरसाची पूतळी । मनसिजमानसभवमराळी । कामाङ्गनेची विलासकेली । लावण्यजलमयसुखसरिता ॥१२॥
सर्व शुभलक्षणें संपन्ना । यालागीं नामें ते लक्ष्मणा । अधिष्ठितां नवयौवना । स्वयंवररचना आदरिली ॥१३॥
पत्रें देऊनि भाटवार्तिक । ब्राह्मण उपाध्ये ग्रामयाजक । धाडूनि भूपति अनेक । प्रार्थिले कौतुक पहावया ॥१४॥
दुर्योधनसुता नोवरी । लावण्यरसाची माधुरी । पार्थिवीं ऐकूनि पृथ्वीवरी । आले झडकरी स्वयंवरा ॥१५॥
अंगवंगकलिंगप्रमुख । त्रिपुर कामरूप कामाक्ष । पर्वतवासी भूप अनेक । मिनले कौतुक पहावया ॥१६॥
काश्मीर गौड गुर्जर मद्र । कैकेय कोसल चैद्य माथुर । मालव सैन्धव सुह्म सौराष्ट्र । मैथिल औत्किल नृप आले ॥१७॥
माण्ड्य पाण्ड्य माण्डलिक । हैहय पाञ्चाळ मागधप्रमुख । नैषध विदर्भ वेणुदारिक । आले सकळिक महाराष्ट्र ॥१८॥
आन्ध्र द्रविड केरळ । कर्णाटक तैलंग तिगळ । चौळ मल्याळ सिंहळ । पाबळ मावळ वैराट ॥१९॥
एवमादि समस्त राजे । स्वयंवरा आले नोवरीकाजें । कौरवीं सम्मानूनि त्यां वोजें । नृपासमाजीं बैसविलें ॥२०॥
मंगळतुरांचे बोभाट । बिरुदें पढती नृपांचे भाट । बंदिमागधस्तोत्रपाठ । सभा घनदाट विराजली ॥२१॥
शृंगारूनियां नोवरी । वेष्टित सखियांच्या परिवारीं । जैशा गौरीतें किन्नरी । तेंवि किङ्करी वोळगती ॥२२॥
घेऊनि रत्नदंडी चामरें । उभयभागीं ऊर्ध्वकरें । किङ्करी वारिती अपरा चीरें । सूक्ष्म सपूरें विराजती ॥२३॥
वेत्रपाणि चेटिकावर्ग । पुढें कौतुकें सूचिती मार्ग । नृपैश्वर्यें बोधिती साङ्ग । सखिया सवेग नृपतनये ॥२४॥
कुळ शीळ सौन्दर्य यश । ऊर्जित ऐश्वर्य निवास देश । लक्ष्मणा परिसोनि अशेष । न घाली मानस यांमाजी ॥२५॥
ऐसी पाहत असतां सभा । विरहावेश न धरे साम्बा । नोवरीची लक्षूनि शोभा । इच्छी वल्लभा करावया ॥२६॥
सवेग उचलूनि दोहीं करीं । नोवरी वाहूनि निज रहंवरीं । निघता झाला पवनापरी । द्वारकापुरी लक्षूनी ॥२७॥
साम्ब जाम्बवतीचा बाळ । समराङ्गणीं केवळ काळ । पाहत असतां सर्व भूपाळ । चालिला अबळ रणजेता ॥२८॥
संग्रामतेजा समितिञ्जय । जाम्बवतीचा वरिष्ठ तनय । कौरवांसहित न गणूनि राय । जाया घेऊनि निघाला ॥२९॥
तेणें हडबडिल्या किङ्करी । म्हणती नोवरी बलात्कारीं । वाहूनियां निज रहंवरीं । नेतो लौकरी धांवा हो ॥३०॥
सभा खबळळिली संपूर्ण । क्रोधा चढिले भीष्मद्रोण । लहान थोर कौरवगण । वदती वचन तें ऐका ॥३१॥

कौरवाः कुपिता ऊचुर्दुर्विनीतोऽयमर्भकः । कदर्थीकृत्य नः कन्यामकामानहरद्बलात् ॥२॥

सर्व कौरव कोपा चढले । त्यांमाजी श्रेष्ठ बोलते झाले । म्हणती आम्हां अवमानिलें । धारिष्ट केलें केवढें ॥३२॥
धीट उद्धट हा अर्भक । अल्पही आमुचा न धरूनि धाक । नृपति न गणूनियां अनेक । नोवरी निःशंक नेतसे ॥३३॥
कदर्थी करूनि आम्हां सकळां । अष्टवार्षिकी कन्या अबळा । अकामा हरिली कौरवबाळा । करधृतमाळा स्वयंवरीं ॥३४॥
न विचारूनि आपुलें बळ । न गणूनि पृथ्वीचे भूपाळ । न मानूनियां कौरवपाळ । उद्धत केवळ अर्भक हा ॥३५॥
बळेंचि नेतो आमुची कन्या । ऐसिया अयोग्य सामान्या । धरूनि करा दृढबंधना । दुर्योधना अविनीता ॥३६॥

बध्नीतेमं दुर्विनीतं किं करिष्यंति वृष्णयः । येऽस्मत्प्रसादोपचितां दत्तां नो भुंजते महीम् ॥३॥

धरूनि बांधा यातें दृढ । कायसा यदुवृष्णींचा पाड । आमुच्या आश्रयें झाले वाड । मिरविती तोंड नृपांमाजी ॥३७॥
ययातिशापें जे वाळिले । कुलीननृपतींहीं हेळिले । भूपसम्मानीं गाळिले । आम्हीं पाळिले सुहृदत्वे ॥३८॥
कुन्तिभोजाची पोसणी कन्या । पृथा पाण्डूची वराङ्गना । तत्संबंधें या सामान्यां । आम्ही सम्माना मिळविलें ॥३९॥
अल्प भूखंड देऊनि यांतें । नृपांमाजी केलें सरते । विपरीत होती जैं आम्हांतें । तैं मग यांतें कोण पुसे ॥४०॥
आमुच्या प्रसादें लाधले मही । तयेचें ऐश्वर्य भोगूनि इहीं । विपरीत होतां आमच्या ठायीं । पाड काई मग यांचा ॥४१॥

निगृहीतं सुतं श्रुत्वा यद्येष्यंतीह वृष्णयः । भग्नदर्पाः शमं यांति प्राणा इव सुसंयताः ॥४॥

सुतातें घातलें कारागृहीं । ऐकोनि वृष्णियादवीं तिहीं । क्षोभें धांवोनि आलिया पाहीं । भग्नदर्प तेही होतील ॥४२॥
नृपांमाजी म्हणविती शूर । जंव कौरवेंसी न घडे समर । वृष्णिभोजांध दाशार्हकुक्कुर । विदर्प सत्वर होतील ॥४३॥
दर्प भंगल्या होतील शान्त । प्रशम पावती सुशिक्षित । पुढती धरिती विनयपथ । होती सनाथ आमुचेनी ॥४४॥
जैसीं इंद्रियें अनावरें । केलीं सुखरतींहीं घाबिरें । तथापि साधनें क्रूरें । करितां सत्वरें आकळती ॥४५॥
प्राणायामादियोगाभ्यास । यमनियमादिशमदमास । करितां शिक्षा इंद्रियांस । तैं प्रशमास पावती ॥४६॥
अनावर जो करणगण । त्याचें करितां सुष्ठु दमन । मग तो सम्यक् पावे पूर्ण । तैसेचि जाण यादवही ॥४७॥
न धरूनि वृष्णिपाळांची भीड । अर्भक धरूनि बांधा दृढ । ऐसें कुरुवृद्धाचें तोंड । वदतां झडझड उठावले ॥४८॥
कवच टोप बाणले वीरीं । सन्नद्ध होऊनि शस्त्रास्त्रीं । सगेग वळघले रहंवरीं । पवनापरी धांविन्नले ॥४९॥
ऐसी आज्ञा करितां भीष्में । वीर लोटले पराक्रमें । कोण कोण तयांचीं नामें । कथितों नियमें अवधारा ॥५०॥

इति कर्णः शलो भूरिर्यज्ञकेतुः सुयोधनः । सांबमारेभिरे बद्धु कुरुवृद्धानुमोदिताः ॥५॥

कर्ण कानीन कुन्तीसुत । प्रतापतेजस्वी भास्वत । बाह्लिकात्मज सोमदत्त । तत्सुत विख्यात भूरिश्रवा ॥५१॥
शल सुयोधन यज्ञकेतु । धृतराष्ट्राचे रेतोजात । कुरुवृद्ध तो गंगासुत । अपर कृतान्त समरंगीं ॥५२॥
जेणें जिंकूनि परशुराम । ब्रह्मचर्याचा रक्षिला नेम । ऐसा कुरुवृद्धनामा भीष्म । साम्बदमना उठावला ॥५३॥
महारथी हे साही जण । अपरिमित कौरवसैन्य । पाठीं धांवतां देखोन । कृष्णनंदन परतला ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP