दुष्टः शाखामृगः शाखामारूढः कंपयन्द्रुमान् । चक्रे किलकिलाशब्दमात्मानं संप्रदर्शयन् ॥११॥

परम दुष्ट शाखामृग । शाखिशाखांवरी सवेग । वेंघूनि घुलकावी भ्रूभंग । त्म्वकें निजाङ्ग उफाळवी ॥८०॥
एके दुमीं न राहे स्थिर । अवघे काननींचे तरुवर । वेंघूनि कांपवी थरथर । निर्भय वानर आंगबळें ॥८१॥
डोळे मिचकावूनि घुलकावी । उफाळूनियां वांकुल्या दावी । खिखाटें भुभुकारें वानरभावीं । कुसी खांजबी गगनाक्ष ॥८२॥
उडी घालूनि निकतवृक्षीं । गगन लक्षूनि खांजवी कुक्षी । पत्रें फळें डांसळी भक्षी । वनितावक्षीं झेंपावें ॥८३॥
किलकिलाटें करी शब्द । रामेंसहित वनितावृंद । त्यातें आपणा दावी विशद । विटावी रद विचकूनी ॥८४॥
फुंपातें पिंजारी नासिका । मागें सरोनि पुढिली शाखा । उफाळूनियां कवळी देखा । देखूनि बायका हांसती ॥८५॥
रामा भोंवता ललनावृंद । कंदर्पकेली हास्यविनोद । करितां देखोनि तिन्हीं द्विविद । हांसती खदखद तें ऐका ॥८६॥

तस्य धार्ष्ट्य कपेर्वीक्ष्य तरुण्यो जातिचापलाः । हास्यप्रिया विजहसुर्बलदेवपरिग्रहाः ॥१२॥

स्वभावें चपळा अबळा तरुणा । देखूनि कपीच्या धीटपणा । बळरामेंसी उदितरमणा । त्या हासती दशना प्रकाशूनी ॥८७॥
हास्यप्रिया नवयौवना । निर्भय रामकामाङ्गना । कपिचेष्टित देखूनि नाना । सस्मितवदना विलोकिती ॥८८॥
रामेंसहितरामानिचय । हांसता वानर करी काय । तोही कथितों अभिप्राय । सादर होई कुरुवर्या ॥८९॥

ता हेलयामास कपिर्भ्रूक्षेपैः संमुखादिभिः । दर्शयन्स्वगुदं तासां रामस्य न निरीक्षतः ॥१३॥

रामपरिग्रह वनितानिकर । त्यांची हेलना करी वानर । अधोर्ध्व भ्रूभंग चाळूनि वक्र । दात करकर खावूनी ॥९०॥
पुढें उकावे झोंबावया । सवेंचि फिरे मागिल्या ठायां । आपुली तांबडी गांडी तया । दावूनियां खांजवी ॥९१॥
वनितां सहित वनजमाळी । वानरचेष्टा मुसळी हली । देखनि धर्षिता झाला उपळीं । श्रोतीं सकळीं परिसावें ॥९२॥

तं ग्राव्णा प्राहरत्क्रुद्धो बलः प्रहरतां वरः । स वंचयित्वा ग्रावाणं मदिराकलशं कपिः ।
गृहीत्वा लेहयामास घूर्तस्तं कोपयन्हसन् ॥१४॥

बळभद्र होवोनि क्रोधायमान । टाकी वानरावरी पाषाण । ज्याचें अचुक करप्रहरण । वर प्रहरता यास्तव तो ॥९३॥
परन्तु वानर समरशाली । वरिष्ठ योद्धा प्लवंगमदळीं । राक्षससमरीं न डंडळी । तो ते काळीं काय करी ॥९४॥
रामहस्तींचा पाषाणप्रहार । त्यातें चुकवूनि अतिसत्वर । मदिराकलश घेऊनि क्रूर । हांसे वक्र विकासुनी ॥९५॥  
तटतटां उडे ठायीं ठायीं । हेलना करूनि हांसे पाहीं । क्रोध उपजवी रामादेहीं । न पळे पाहीं दटावितां ॥९६॥
झोंबों धांवे वनितांकडे । तोंड करूनियां वांकुडें । रामा वांकुल्या दावी कोडें । निर्भय पुढें पुढें पिळंगे ॥९७॥
राम दटावी वानरा वारी । वानर त्याची अवज्ञा करी । वनिता बळेंचि धरी पदरीं । तें अवधारीं कुरुपाळा ॥९८॥

निर्भिद्य कलशं धृष्टो वासांस्यास्फालयद्बलम् । कदर्थीकृत्य बलवान्विप्रचक्रे मदोद्धतः ॥१५॥

राम दटावी वानरा धृष्टा । तो रामेंसी करी चेष्टा । कलश घेऊनि उडे तटतटां । न गणी श्रेष्ठा धृष्टत्वें ॥९९॥
अकस्मात रामापुढें । मदिराकलशाचे केले तुकडे । मद्य विखुरलें चहूंकडे । सवेग उडे तेथूनी ॥१००॥
रामरमणी नवयौवना । धांवोनि झोंबे त्यांचिया वसना । हिसकूनि करूं पाहे नग्ना । संकर्षणा न गणूनी ॥१॥
राम धांवे वानरा वारूं । तंव तो त्यावरी करी गुरगुर । झोंबूनि त्रासी वनितानिकर । नावरे अनावर धृष्टत्वें ॥२॥
कदर्थी करूनि बळरामासी । त्या देखतां तद्वनितांसी । फाडूनि वसना कंचुकियांसी । अवयवांसी बोचकरी ॥३॥
बळिष्ठ वानर मदोन्मत्त । रामा आंगबळें न गणित । रामरमणी त्रासिल्या बहुत । अपकार उद्धट आचरला ॥४॥
कंदर्पक्रीडेसी केलें विघ्न । रामेंसहित वनितामन । झालें ते काळीं उद्विग्न । म्हणती दारुण कपि नोहे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP