आश्रमानृषिमुख्यानां कृत्वा भगन्वनस्पतीन् । अदूषयच्छकृन्मूत्रैरग्नीन्वैतानिकान्खलः ॥६॥

महर्षिमुख्य तपस्वी थोर । त्यांचे आश्रम मनोहर । तेथ प्रवेशूनि वानर । करी संहार वृक्षांचा ॥५०॥
आश्रमाभोवतीं वनोपवनें । पुष्पवाटिका देवायतनें । वापीकूपतडागजीवनें । यज्ञायतनें मखशाळा ॥५१॥
वृक्ष उन्मळी महाप्रबळ । केलीं पुष्पें वनें निर्मूळ । कुत्सित करी निर्मळ जळ । लावी अनळ उटजांतें ॥५२॥
आहवनीयादिअग्निकुंडीं । हगे मुते लेंडें सांडी । तापसांची धरूनि शेंडी । मुरडी बोंडी घ्राणाची ॥५३॥
कानीं धरूनि उचली एकां । घ्राणामाजी फुंकी फुंका । गुतगुलिया करूनि बायकां । धर्षी मुखा विचकूनी ॥५४॥
ऐशा अनेक वानरचेष्टा । करूनि तापसां वोपी कष्टां । करुणा नयेचि त्या पापिष्ठा । मुनिवरिष्ठा श्रम देतां ॥५५॥
म्हणसी श्रम दे कोणे परी । निर्दय कुविद्या वानरी । कुरुभूपाळा श्रवण करीं । शुकवैखरी वर्णितसे ॥५६॥

पुरुषोन्योषितो दृप्तः क्ष्माभृद्द्रोणी गुहासु सः । निक्षिप्य चाप्यधाच्छैलैः पेशस्कारीव कीटकम् ॥७॥

पुरुष योषिता एके शयनीं । उन्मत्त त्यांतें ने उचलूनी । पर्वत दरीगुहास्थानीं । ठेवी कोंडूनि शिळानिचयीं ॥५७॥
अपर वनिता अपर पुरुष । अकस्मात ने उचलूनि त्यांस । पर्वतदरकुटीं विवरीं वास । करवी द्वारास झांकूनी ॥५८॥
पर्वत नेऊनि ठेवी द्वारीं । कीटकाप्रति जैसी भ्रमरी । सदनीं कोंडूनि स्वेच्छाचारीं । विचरे बाहेरी नैर्घृण्यें ॥५९॥
वानराचें उन्मत्तपण । तें तूं राया करीं श्रवण । आश्रम केले सदूषण । वनिता छळण अवधारीं ॥६०॥

एवं देशान्विप्रकुर्वन्दूषयंश्च कुलस्त्रियः । श्रुत्वा सुललित्म गीतं गिरिं रैवतकं ययौ ॥८॥

एवं पूर्वोक्तप्रकारीं । प्रकर्षें विघ्नें देशावरी । करूनि प्रजांची बोहरी । तपस्वी भारी पीडियेले ॥६१॥
कुलस्त्रियांचीं वस्त्रें हरणें । बलात्कारें करी छळणें । पुरुषां देखतां त्यांसीं रमनें । गिरिकाननें फिरवी त्यां ॥६२॥
जळीं निर्जळीं वनोदरीं । गिरिगह्वरीं गुहान्तरीं । वनिता नेवोनि बलात्कारीं । क्रीडा वानरी करी त्यांसीं ॥६३॥
ऐसा अन्याय झाला फार । तेणें करपला सुकृताङ्कुर । धर्मगोपक जगदीश्वर । क्षोभे सत्वर साक्षित्वें ॥६४॥
उन्मतपणें वानर बळी । देश बुडवी समुद्रजळीं । कित्येक रगडिले पर्वतातळीं । जालूनि धुळी मेळविले ॥६५॥
विधंसिले मुनिआश्रम । भ्म्गिले सफळित दिव्य दुम । मोडिले पतिव्रतांचे नेम । बळें दुष्कर्म करूनिया ॥६६॥
ऐसा उन्मत्त वानर द्विविद । अन्याय आचरला बहुविध । तेणें हृदयस्थ ईश्वर सद्य । दुर्बुद्धिप्रद झाला पैं ॥६७॥
पतिव्रता गिरिकंदरीं । नेऊनि छळितां बलात्कारीं । तंव अकस्मात सप्तस्वरी । गीतमाधुरी ऐकियेली ॥६८॥
सुललित ऐकूनि गायन । सप्तस्वरीं तानमान । तेणें मोहित झालें मन । ध्वनि लक्षूनि निघाला ॥६९॥
सुगंध लक्षूनि धांवे भमर । तैसाचि ध्वनिमार्गें वानर । गायनीं लोधूनियां सत्वर । रैवताद्रीतें पातला ॥७०॥
तेथें जाऊनि पाहिलें काय । तो ऐकावा अभिप्राय । वक्ता सर्वज्ञ योगिराय । कथिता होय तें ऐका ॥७१॥

तत्रापश्यद्यदुपतिं रामं पुष्करमालिनम् । सुदर्शनीयसर्वांगं ललनायूथमध्यगम् ॥९॥

द्विविद पाहे जंव रैवतीं । तंव तो बळभद्र यादवपति । पंकजमाळा कंठीं रुळती । सुष्ठुकान्ति दर्शनीय ॥७२॥
पहावया योग्य तनु । लावण्यमंडित नवयौवन । ललनायूथीं विद्यमान । त्यातें देखोनि कपि खवळे ॥७३॥
पुन्हा त्यांतें कोणे परी । देखता झाला द्विविद हरि । तें परिसिजे श्रोतीं चतुरीं । मुनिवैखरी कुरुपतिवत् ॥७४॥

गायंतं वारुणीं पीत्वा मदविह्वललोचनम् । विभ्राजमानं वपुषा प्रभिन्नमिव वारणम् ॥१०॥

वरुणप्रहिता मदिरा वारुणी । तीव्र जीची उन्मादकरणी । बळभद्र तियेतें प्राशूनी । सुललितगायनीं निमग्न ॥७५॥
मदिरामदें घूर्णित नयन । स्वशरीरें विराजमान । जैसा मदोन्मत्त वारण । संकर्षण तेंवि डुल्ले ॥७६॥
वारुणीमदिरामद शरीरीं । सुललितगायन ललनानिकरीं । करीत असतां द्विविद हरि । त्यातें नेत्रीं अवलोकी ॥७७॥
आंगीं ऐश्वर्यप्रताप पूर्ण । मदिरामदाचें घूर्णितपण । कामिनीकंदर्पकेलिप्रवीण । निर्भय गायन करीतसे ॥७८॥
देखूनि ऐसिया बळरामातें । द्विविदवानरें येऊनि तेथें । न साहोनि तत्क्रीडेतें । करी चेष्टांतें त्या ऐका ॥७९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP