अध्याय ६६ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अक्षैः सभायां क्रीडंतं भगवंतं भयातुराः । त्राहि त्राहि त्रिलोकेश वह्नेः प्रदहतः पुरम् ॥३६॥

सारीपाट मांडूनि पुढा । भगवन्तातें करितां क्रीडा । अग्निभर्यातीं हंमरडा । केला रोकडा ते ठायीं ॥६४॥
त्राहि त्राहि भो जगदीशा । त्रिजगद्रक्षका त्रिलोकेशा । प्रकर्षें वह्नि क्षोभला कैसा । केली कोळसा द्वारावती ॥२६५॥
जैसा जाळी शुष्केन्धना । तयाचि सारिखा दिव्यभुवना । रत्नखचिता हेमसदना । जाळितां कृशाना पळ न लगे ॥६६॥
भगवंता तूं  पाहसी कायी । आम्हा तुजवीण रक्षिता नाहीं । द्वारकापुराची केली लाही । धांव लवलाहीं जगज्जीवना ॥६७॥
ऐसें प्रार्थिती लहान थोर । ऐकतां जनांचा सशोक गजर । क्रीडा टाकूनि जगदीश्वर । पाहे सत्वर तें ऐका ॥६८॥

श्रुत्वा तज्जनवैक्लव्यं दृष्ट्वा स्वानां च साध्वसम् । शरण्यः सहसन्प्राह मा भैष्टेत्यवितास्म्यहम् ॥३७॥

ऐकूनि जनाची वैक्लव्यग्लानि । संकट स्वकीयांचें देखूनी । शरणां शरण्य चक्रपाणि । बोले हांसोनि तयांप्रति ॥६९॥
ना भी म्हणोनि अभयहस्तें । तयाचीं चित्तें केलीं स्वस्थें । भेऊं नका कृतान्तातें । रक्षितां तुम्हांतें मी आहें ॥२७०॥
माझिये छायेसि असतां तुम्हां । कायसी अग्निभयाची गरिमा । मज न स्मरतां पावलां श्रमा । कीजे क्षमा तें अवघें ॥७१॥
ऐसें अभय देऊनि सर्वां । ज्ञानीं पाहतां वासुदेवा । कपटकृत्या जाणोनि बरवा । प्रयोग योजिला तो ऐका ॥७२॥

सर्वस्यांतर्बहिःसाक्षी कृत्यां माहेश्वरीं विभुः । विज्ञाय तद्विघातार्थं पार्श्वस्थं चक्रमादिशत् ॥३८॥

सर्वांचिये अभ्यंतरीं । व्यापक गगनाही माझारी । तेणें कृत्या माहेश्वरी । प्रयोगाभिचारी जाणीतली ॥७३॥
विभु समर्थ श्रीभगवान । कृत्याप्रतिकारार्थ पूर्ण । आज्ञापिलें सुदर्शन । देदीप्यमान धगधगित ॥७४॥
कृष्णाज्ञेचा प्रताप । सुदर्शनाचें उग्र रूप । भंगावया कृत्याग्निदर्प । प्रेरिलें सकोप तें ऐक ॥२७५॥

तत्सूर्यकोटिप्रतिमं सुदर्शनं जाज्वल्यमानं प्रलयानलप्रभम् ।
स्वतेजसा खं ककुभोऽथ रोदसी चक्रं मुकुन्दास्त्रमथाग्निमार्दयत् ॥३९॥

कृष्णाज्ञेसरिसें चक्र । गगनीं संचरलें अवक्र । कोटिभास्कर भा भासुर । विधि हर शक्र भयचकित ॥७६॥
स्फुरद्रूप ज्वालानिचय । गगन झालें ज्वालामय । प्रळयपावक कैंचा काय । कान्ता आय न संवरे ॥७७॥
अधोर्ध्व दिक्चक्र भरलें नभ । केंउता प्रलयरुद्राचा क्षोभ । मुकुन्दास्त्र तें काळाग्निप्रभ । कृत्या अशुभ आर्दितसे ॥७८॥
अभिचारप्रयोगजनितकृत्या । माहेश्वरी परम व्रात्या । देखतां चक्राग्नीच्या नृत्या । प्रेरका मृत्या अर्पितसे ॥७९॥
केवळ विष्णुस्मरणापुढें । अभिचारकाप्ट्य समूळ उडे । कृत्याकृत्य तें केवढें । चक्रपडिपाडें तुळावया ॥२८०॥
लागतां सुदर्शनाच्या ज्वाळा । धरि न पुरे कृत्यानळा । प्राणधाकेंचि तये वेळा । क्षोभें परतला तें ऐका ॥८१॥

कृत्यानलः प्रतिहतः स रथांगपाणेरस्त्रौजसा स नृप भग्नमुखो निवृत्तः ।
वाराणसीं परिसमेत्य सुदक्षिणं तं सर्त्विग्जनं समदहत्स्वकृतोऽ‍भिचारः ॥४०॥

म्हणाल परतोनि केलें काय । तो ऐकावा अभिप्राय । निर्बळाच्या शस्त्रान्यायें । फिरोनि अपायकर झाला ॥८२॥
रथाङ्गपाणि जो श्रीकृष्ण । त्याचें अस्त्र सुदर्शन । तयाच्या तेजें कपटकृशान । पोळतां क्षोभोन परतला ॥८३॥
अब्रह्मण्यावरी प्रयोजिसी । तरी हा साधील संकल्पासी । ब्रह्मण्यावरी प्रेरितां त्यासीं । विपरीतार्थेंसी क्षोभला ॥८४॥
चक्राग्नीनें करितां भग्न । अभिचाराग्नि क्षोभला पूर्ण । विमुख झाला द्वारकेहून । सम्मुख सुदक्षिण लक्षिला ॥२८५॥
जैसा होय विद्युत्पात । तैसा पडिला वाराणसींत । ऋत्विग्ब्राह्मणजनपदासहित । केला घात नृपाचा ॥८६॥
स्वकृत क्षोभला अभिचार । तेणें केला तत्संहार । ज्याचें त्यावरी फिरलें शस्त्र । सर्व परिवार जाळिला ॥८७॥
अद्यापि जे प्रयोगपर । प्रेरिती साबरादि अभिचार । विपरीत होऊनि ते सत्वर । करिती संहार प्रेरकांचा ॥८८॥
असो क्षोभला अभिचार । तेणें राजा सहपरिवार । जाळिला तयाचिसरिसें चक्र । पातलें क्रूर तें ऐका ॥८९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP