अध्याय ६४ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


कृष्णः परिजनं प्राह भगवान्देवकीसुतः । ब्रह्मण्यदेवो धर्मात्मा राजन्याननुशिक्षयन् ॥३१॥

कृष्णाज्ञेनें जो जन वर्ते । परिजन ऐसें म्हणिजे त्यातें । भगवान बोलता झाला तेथें । त्या सर्वांतें कळावया ॥२४०॥
दैवी संपत्तीमाजी संभव । यालागीं देवकीसुत हें नांव । एर्‍हवीं केवळ ब्रह्मण्यदेव । धर्मस्थापक धर्मात्मा ॥४१॥
राजन्य म्हणीजे भूपाळगणां । शिकवणेच्या बोले वचना । तें तूं ऐकें कुरुभूषणा । मात्स्यीरमणा परीक्षिति ॥४२॥

दुर्जरं बत ब्रह्मस्वं भुक्तमग्नेर्मनागपि । तेजीयसोऽपि किमुत राज्ञामीश्वरमानिनाम् ॥३२॥

बत ऐसिया खेदेंकरून । परमाश्चर्यें चमत्कारून । सामंत राजे प्रजाजन । बोले भगवान शिकवण त्यां ॥४३॥
स्व ऐसें धनाचें नांव । तें मृच्चर्माम्बरलोहादि सर्व । रस औषधि विषय वैभव । जें कवळी जीव आत्मत्वें ॥४४॥
मृत्तिका म्हणिजे क्षेत्रवृत्ति । चर्म म्हणिजे हयगोहस्ती । अंबरें म्हणिजे आच्छादनार्थीं । वसनजाति उच्चावच ॥२४५॥
अष्टलोह मुद्राभाजनें । गोरस मधु आसव पानें । औषधि म्हणिजे अनेक धान्यें । विषयविभव तें मान्यत्व ॥४६॥
एवं स्वशब्दें हें आघवें । ब्रह्मस्व ब्राह्मणाचें जाणावें । बलात्कारें कोणा जिरवे । ऐसा नाठवे त्रिकाळीं ॥४७॥
सर्वभक्ष अग्नीसि नांव । तया न जिरवे ब्रह्मस्व । तेजिष्ठाहूनि विशेष गौरव । तेजिष्ठत्व विप्राचें ॥४८॥
बृहस्पतीचें चर्मधन । चंद्रें केलें ताराहरण । तो क्षयरोगें झाला रुग्ण । सलांछन अद्यापि ॥४९॥
विष्णु साक्षात् परशुराम । क्षत्रकुळांचा करूनि होम । पृथ्वीदानें द्विजोत्तम । पूर्णकामें तोषविले ॥२५०॥
पुन्हा पदीं संलग्न माती । दत्तापहरनदोषावाप्ति । बह्मस्वग्रहणीं भावूनि भीति । याचिली क्षिति रत्नाकरा ॥५१॥
शिवें करितां ब्रह्मस्वहरण । तत्काळ पावला लिंगपतन । भगाङ्कित झाला संक्रंदन । सहस्रनयन द्विजरोषें ॥५२॥
ऐसी ब्रह्मादिकांची कथा । तेथ क्षत्रियां अभिमानवंतां । ब्रह्मस्व न जिरे ऐसें म्हणतां । काय अपूर्व मानावें ॥५३॥
आम्ही राजे नरेश्वर । ऐसा वाहती जे अहंकार । ब्रह्मस्वहरणीं नरक घोर । पावती दुस्तर पितरेंसीं ॥५४॥
जमदग्नीची यज्ञधेनु । नेली कार्तवीर्यें हरून । यास्तव क्षत्रकुळनिर्दळन । पावला मरण जगज्जेता ॥२५५॥
स्वतेजें अग्नि त्रिजग जाळी । तो ब्रह्मस्वा कांपे चळीं । तेजिष्ठाहूनि महाबळी । म्हणे वनमाळी ब्रह्मस्व ॥५६॥
गरुडें गिळितां निषादगण । त्यामाजी गिळितां एक ब्राह्मण । न गिळवे कंठीं पोळला पूर्ण । मग उगळून टाकिला ॥५७॥
ऐसें एकैक सांगों किती । ब्रह्मस्व गिळावयाची शक्ति । कोणा आंगीं न दिसे पुरती । म्हणे श्रीपति स्वजनांतें ॥५८॥

नाहं हालाहलं मन्ये विषं यस्य प्रतिक्रिया । ब्रह्मस्वं हि विषं प्रोक्तं नास्य पतिविधिर्भुवि ॥३३॥

सागरसंभव हाळाहळ । तें मी न मनीं विष प्रबळ । अमृतादि ओषधि उतार बहळ । केलिया तत्काळ तें निरसे ॥५९॥
हाळाहळहूनि विषतर । तें ब्रह्मस्वचि महाक्रूर । ज्याची न चलेचि प्रतिकार । निर्जर विधि हर करितांही ॥२६०॥
केतुलें विषाचें कठिनपण । तेंही ऐक करितों कथन । ब्रह्मस्व विषाहूनि दारुण । तें लक्षण अवधारा ॥६१॥

हिनस्ति विषमत्तारं वह्निरद्भिः प्रशाम्यति । कुलं समूलं दहति ब्रह्मस्वारणिपावकः ॥३४॥

विष मारक विषभक्षका । त्याचेनि न मारवेचि आणिका । अग्नि दाहक सांसर्गिका । न जळे पावका अस्पृष्ट ॥६२॥
विष सेवणारा मात्र मरे । परंतु पूर्वापर वंश उरे । ब्रह्मस्वारणिजपापाङ्गारें । कुळचि संहरे संपूर्ण ॥६३॥
दावानळें तृणादि जळती । समूळ न जाळी तो त्यांप्रति । मूळां रक्षण करी क्षिति । पुन्हा उत्पत्ति त्यां होय ॥६४॥
ब्रह्मस्वारणिजपावक दाही । तेथूनि मूळाचें उरणें नाहीं । समूळ प्रवर्ते कुळक्षयीं । ब्रह्मादिकांही अनावर ॥२६५॥
विष भक्षितां व्यापी तनु । तेणें तनूचें होय पतन । मग तो स्वकृत पाप पुण्य । भोगी जन्मोन यथोचित ॥६६॥
तैसा नव्हे ब्रह्मस्वहर्ता । नरकीं कुळाचें पतनकर्ता । कृतपुण्याची नुरे वार्ता । दोष पर्वतासम वाटे ॥६७॥
कुळेंसहित अंधतमीं । पडे घोर नरकीं दुर्गमीं । चंद्रसूर्य भ्रमती व्योमीं । नरकीं कृमि तोंवरी तो ॥६८॥
जळें पावक प्रशम पावे । ब्रह्मस्वारणिज तैसा नव्हे । हें सर्वांसी असो ठावें । विशेष जाणावें मामकीं ॥६९॥
ऐसें सांगूनि साधारण । यावरी कथी व्यवस्थाकथन । तें सज्जनीं कीजे श्रवण । सावधान होवोनियां ॥२७०॥

ब्रह्मस्वं दुरनुज्ञातं भुक्तं हंति त्रिपूरुषम् । प्रसह्यातिबलाद्भुक्तं दश पूर्वान्दशापरान् ॥३५॥

दुरनुज्ञात जें ब्रह्मस्व । स्त्रीपुरुषांचा पुसी ठाव । दुरनुज्ञात कासया नांव । तोही भाव अवधारा ॥७१॥
काळनियम काळान्तरनियम । सत्यप्रतिज्ञापत्रीं नाम । घालूनि ब्रह्मस्व नेदी अधम । दुरनुज्ञात तें म्हणिजे ॥७२॥
ऐसिया ब्रह्मस्व बुडविणारा । पुत्रपौत्रेंसीं यातना घोरा । आणि जो करूनि बलात्कारा । ब्रह्मस्वहर्ता दुरात्मा ॥७३॥
पितृपितामहादि पूर्वजदशक । पुत्रपौत्रादि अपर दशक । तयांसहित एकवीस पुरुष । कुंभीपाक भोगिते ॥७४॥
बलात्कारें ब्रह्मस्वहरण । तस्करावीण करील कोण । म्हणाल तरी तें करा श्रवण । म्हणे भगवान स्वजनातें ॥२७५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP