अध्याय ६४ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


स त्वं कथं मम विभोऽक्षिपथः परात्मा योगेश्वरैःश्रुतिदृशाऽमलहृद्विभाव्यः ।
साक्षादधोक्षज उरुव्यसनांधबुद्धेः स्यान्मेऽनुदृश्य इह यस्य भवाऽपवर्गः ॥२६॥

विभो समर्था भो हृषीकेशी । तो तूं कैसा मम नयनांसी । साक्षात् प्रत्यक्षगोचर होसी । हें आश्चर्य मानसीं मज वाटे ॥७६॥
तो तूं म्हणिजे कोण कैसा । जो योगेश्वरीं श्रुतिडोळसां । अमळमानसांमाजी ठसा । भावनेचा पाडियला ॥७७॥
अविद्याबिम्बित चिदाभास । भवप्रवाहीं विषयाध्यास । जीवशब्दें त्या चैतन्यास । ब्रह्मवियोग दृढ झाला ॥७८॥
स्वस्वरूपविसरेंकरून । भवस्वर्गाचें वळघे रान । षड्विकार जन्म मरण । देह होऊन भोगीतसे ॥७९॥
संकल्पविकल्पाचें जाळ तेणें त्रिपुटीं भवभ्रमशीळ । इंद्रियद्वारा देह बहळ । करवी तळमळ सुखदुःखीं ॥१८०॥
तापत्रयाची आहाळणीं । इच्छी मृगजळाचें पाणी । इहामुत्रीं सुखशिराणी । भावूनि भ्रमणीं जो पडिला ॥८१॥
तो हा जेंवि चिदाभास । गुर्वर्कलब्ध श्रुतिडोळस । वास्तव आत्मत्वीं हव्यास । योगाभ्यास आदरी ॥८२॥
शमदमादि साधनकोटी । नित्यानित्यविवेकराहटी । इहामुत्रार्थविरागदृष्टि । जिणोनि त्रिपुटी दृढ होय ॥८३॥
सांख्यावबोधें व्यतिरेकज्ञान । तेणें अपरोक्षसमाधान । विसरावया भवभ्रमभान । मन उन्मन करी योगें ॥८४॥
प्राणप्रवृत्तिनिरोध । करणवृत्तींचा करी रोध । आसन दृढावी सुबद्ध । ब्रह्मानंद लक्षुनी ॥१८५॥
शनैः शनैः अभ्यासबळें । मानस उन्मन होऊनि बळे । प्रत्यागात्मतासाक्षित्व वितुळे । निःशेष मावळे भवभान ॥८६॥
अनादिअविद्याभ्रमें वियोग । तो जीव पावे ब्रह्मात्मयोगे । तया योगाचे अनेक मार्ग । जानती साङ्ग मुनिवर्य ॥८७॥
भक्तियोग ज्ञानयोग । अष्टाङ्गषडंग एकान्तयोग । कर्मयोग राजयोग । ऐसे अनेक योगपथ ॥८८॥
कोणा एका योगेंकरून । जीवबह्मांचें वियोगहरण । भवभ्रान्तीचें अस्तमान । योगसाधन इतुकेंचि ॥८९॥
ऐसे जे कां योगाग्रणी । उपनिपच्छ्रुति चक्षुस्थानीं । करूनि अमळ हृदयभुवनीं । तुजलागूनी भाविती ॥१९०॥
तो तूं माझिया अक्षिपथा । प्रत्यक्ष झालासि जी सर्वथा । म्हणसी भवभ्रमाआंतौता । मजही तत्त्वता न मानिसी कां ॥९१॥
इये शंकेच्या निरासा । कथितों माझी अधिकारदशा । ते ऐकिल्या प्रत्यय सहसा । बाणेल परेशा वस्तुत्वें ॥९२॥
उरु म्हणिजे बहळ व्यसन । अंधकूपीं जें सरठपण । तेणें दुःखें अंध नयन । वास्तव वयुन मावळलें ॥९३॥
दुःखान्धबुद्धि ऐशिया मज । प्रत्यक्ष झालासि तूं अधोक्षज । देखिलासी तेजःपुंज । विचित्र चोज हें गमतें ॥१९५॥
दृश्य भवभान गोचर । तेंवि मी म्हणसी दृश्यतर । अक्षजज्ञानाहूनि पर । केंवि साचार तुज कळलों ॥९६॥
तरी तूं ज्यासी दृश्य होसी । तद्भवाबंधा मोक्षण करिसी । ऐसी प्रतीति श्रुतिविश्वासीं । अनुभवासी  मज आली ॥९७॥
अंधकूपीं सरठदेही । कित्येक युगें दुःखप्रवाहीं । तो तव दर्शनमात्रें पाहीं । दिव्यविग्रही झालों असें ॥९८॥
अंधकूपीं दुःखदुर्भव । अपवर्ग तन्मोक्षाचें नांव । प्रत्यक्ष लाधलों मी स्वयमेव । हा इतरांसि अनुभव काय पुसो ॥९९॥
योगेश्वरही श्रुतिलोचनीं । साधनसंपन्न अमलात्मभुवनीं । भाविती तो प्रत्यक्ष नयनीं । गोचर म्हणोनि चित्र गमे ॥२००॥
केवळ जळाची शीतळता । जळावेगळी चढली हाता । कीं तेजाची प्रकाशकता । जे तेजावांचूनि आतुडली ॥१॥
किंवा धरणीचें धारण्य । आंगीं बाणलें जडत्वावीण । कीं पवनाचें वहिलेपण । स्पर्शावांचून आंगविलें ॥२॥
किं व्योमाचें व्यापकत्व । शून्यावीण सर्वगतत्व । उपलब्ध एवढें महत्त्व । तव दर्शनें भोगितसें ॥३॥
तो तूं दृश्यासमान कैसा । गोचर म्हणों भो जगदीशा । भक्तिप्रेमोत्कर्षासरिसा । बोधी परेशा तें ऐका ॥४॥

देवदेव जगन्नाथ गोविन्द पुरुषोत्तम । नारायण हृषीकेश पुण्यश्लोकाच्युताव्यय ॥२७॥

सुकृतवैशिष्ट्यें द्युतिमंत । देव ऐसा त्या संकेत । तद्द्युतिद्योतक तूं अनंत । देवदेव चिन्मूर्ति ॥२०५॥
जगनामाचें अक्षरयुग्म । जननगमनशील परम । जायमानचि गमनकाम । जग हें नाम तयासी ॥६॥
तया जगाचा तूं नाथ । जगाचि माजी सदोदित । नांदसी जननगमनातीत । जगहोवोनि जगदीशा ॥७॥
गोविन्दशब्दें वेदवेत्ता । गोविन्दशब्दें गोत्रधर्ता । गोविन्दशब्दें करणदेवता । निजात्मसत्ता प्रकाशक तूं ॥८॥
क्षराक्षरपुरुषव्यक्ति । माया अविद्या प्रकाशती । तन्निरासीं सन्मात्रज्योति । पुरुषोत्तम तूं परमात्मा ॥९॥
चतुर्विशति तत्त्वचिन्मय । नारा अभिधान त्यातें होय । तये अयनीं क्रीडसि सन्मय । नारायण या संकेतें ॥२१०॥
हरि हर ब्रह्मा वरुणार्कचंद्र । निरृति प्रजेश इन्द्रोपेन्द्र । या कारणांतें व्यापूनि पर । हृषीकेश तूं गोस्वामी ॥११॥
श्लोक शब्दें अमळ कीर्ति । पुण्यरूप निगम गाती । तयेसी आश्चर्य तूं गोपति । पुण्यश्लोक गोमंता ॥१२॥
तिर्यड्मय विकारें च्यवती । पुण्यक्षयीं दिविजां च्युति । अच्युतनामा तूं श्रीपति । क्षयसंसृतिविरहित ॥१३॥
संचितार्थीं होय व्यय । अगाध अक्षय तूं अव्यय । तुजमाजी जन्मूनि कालत्रय । वर्तोनि लय पावतसे ॥१४॥
जय अव्यया श्रीअच्युता ।  देवदेवा जगन्नाथा । पुण्यश्लोक गोगणवेत्ता । पुरुषोत्तमा नारायणा ॥२१५॥
इत्यादिनामीं संबोधून । हृषीकेश जो श्रीकृष्ण । त्यातें करी अनुज्ञापन । तें सज्जन परिस तूं ॥१६॥

अनुजानीहि मां कृष्ण यांतं देवगतिं विभो । यत्र क्वापि सतश्चेतो भूयान्मे त्वत्पदास्पदम् ॥२८॥

विभो समर्था कृष्णा तूंतें । इतुकें प्रार्थन माझें निरुतें । अनुलक्षूनि जाणिजे मातें । देवगतीतें गेलों हें ॥१७॥
देवलोकाबाप्ति झाली । मग जाणवणी किमर्त केली । ऐसें म्हणसी तरी ऐकिली । पाहिजे विनति हे माझी ॥१८॥
देवलोकीं अथवा कोठें । नेलिया कर्मफळें निर्दिष्टें । ते ते ठायीं मज वैकुण्ठें । अभीष्टनिष्ठे ओपावें ॥१९॥
तुझी अभीष्ट निष्ठा काय । ऐसें पुसती यादवराय । तरी मम चित्ता तुमचे पाय । वांचूनि विषय आन नसो ॥२२०॥
तंव पदकंजास्पद मम चित्त । सदैव असो भ्रमरभूत । यावीण विषय वमनवत । रुचिर न होत वैरस्यें ॥२१॥
माझी प्रार्थना इतुकी पाहीं । म्हणसी द्यावया सामर्थ्य नाहीं । तरी तें नमनें तुझ्या ठायीं । प्रतिपादूनियां देतसें ॥२२॥

नमस्ते सर्वभावाय ब्रह्मणेऽनंतशक्तये । कृष्णाय वासुदेवाय योगानां पतये नमः ॥२९॥

जात होत्साता सुरभुवना । नमिता झाला जनार्दना । नमनात्मकां संबोधनां । माजी प्रार्थना सुचवीतसे ॥२३॥
सर्वभावा तुजकारणें । नमन माझें अनन्यपणें । सर्व जगाचें जन्मणें । होय जेणें तो नमो ॥२४॥
जन्म स्थिति लय सर्व जगा । तुझेनि होतसे श्रीरंगा । एव्हडें सामर्थ्य असतां कां गा । नास्तिविभागा आणावी ॥२२५॥
नमो ब्रह्मणे या प्रणिपातें । सर्व कर्तृत्व तुजआतौतें । होत जातां अविकारते । कर्तृत्वकलंक न शिवे पैं ॥२६॥
कर्तृत्व असोनि विकार न शिवे । काय म्हणोनि पुसिजेल देवें । तरी अनंत शक्तये ऐसिया नांवें । नमनभावें प्रतिपादी ॥२७॥
अनंतशक्ति जिच्या आंगीं । ते मूळमाया शक्ति तन्वंगी । ज्याची त्या तुजकारणें वेगीं । एनसभंगीं मी नमितों ॥२८॥
वासुदेवाकारणें नमो । त्याचिया नामें सामर्थ्य गमो । सर्वभूताश्रयत्वें रमो । विनति माझी प्रभुहृदयीं ॥२९॥
केंवि म्हणसी भूताश्रय । तरी घटमठादि बहुविध कार्य । तरी त्या मृतिकेवीण काय । अन्य आहे उपादान ॥२३०॥
मृत्तिका जड अचेतन । तूं चैतन्यघन श्रीकृष्ण । यालागीं तुजकारणें नमन । नमो कृष्णाय म्हणोनी ॥३१॥
कृष हा भूवाचक शब्द । नकार निवृत्तिवाचक सिद्ध । तया दोहींचें ऐक्य विशद । ब्रह्म प्रसिद्ध कृष्ण तो तूं ॥३२॥
सच्चिदानंदघनाभिव्यक्त । तो हा कृष्णनामसंकेत । त्या तुजकारणें साष्टाङ्ग नमित । मत्प्रार्थित पूर्ण करीं ॥३३॥
तुझेनि सत्तायोगबळें । सर्व कर्तृत्वीं माया खेळे । ऐसिया तुझिये योगलीले । माजी नाकळे कैं काय ॥३४॥
योगानां पतये नमः । याचि मंत्रें सूचिली गरिमा । अभीष्ट देईं पुरुषोत्तमा । तव पादपद्मा चित्त रमो ॥२३५॥
ऐसिया परी द्वारकानाथ । नृगें वंदिला आनंदभरित । पुढें वर्तला जो वृत्तान्त । तो शुक कथित कुरुवर्या ॥३६॥

श्रीशुक उवाच - इत्युक्त्वा तं परिक्रम्य पादौ स्पृष्ट्वा स्वमौलिना ।
अनुज्ञातो विमानाग्र्यमारुहत्पश्यतां नृणाम् ॥३०॥

इतुकी करूनिया प्रार्थना । मुकुटें स्पर्शोनि श्रीकृष्णचरणां । सप्रेम घालूनि प्रदक्षिणा । पुसूनि विमाना वळघला ॥३७॥
पाहत असतां नरमंडळी । आज्ञा देतांचि श्रीवनमाळी । विमानारूढ सुकृतशाळी । मयूखमाळीसम गेला ॥३८॥
यदुकुमारादि सकळ जनीं । प्रत्यक्ष देखिलें असतां नयनीं । प्रतीतिपूर्वक त्यांलागुनी । चक्रपाणि बोधितसे ॥३९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP