अध्याय ६४ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नाहं प्रतीच्छे वै राजन्नित्युक्त्वा स्वाम्यपाक्रमत् । नान्यद्गवामप्ययुतमिच्छामीत्यपरो ययौ ॥२१॥

प्रथम प्रतिग्राहक द्विजाग्रणी । तो निश्चयें बोलिला वाणी । लक्ष धेनु अंगीकारूनि । चोर होऊनि मी न वचें ॥२९॥
प्रथम प्रतिगृहीता हे माझी । मजला धेनु न देसी आजी । तरी मी येथ द्विजसमाजीं । तास्कर्यदोषा पावेन ॥१३०॥
तुजला संकट पडलें जरी । तरी माझी धेनु ठेवीं घरीं । तेणें दूषण दत्तपहारीं । तुझिये शिरीं मज नाहीं ॥३१॥
ऐसें बोलोनि ब्राह्मणोत्तम । टाकूनि गेला निजाश्रम । यावरी दुसरा द्विजसत्तम । वदला विषम तें ऐका ॥३२॥
अरे राया दानशूरा । दातयांमाजी परम चतुरा । मम धेनूचिया प्रतिकारा । लक्ष अपरा देतोसी ॥३३॥
दहा सहस्र त्याहीवरी । धेनु देऊं पाहसी जरी । तरी मी स्वधेनूवीण दुसरी । नाङ्गीकारीं कल्पान्तीं ॥३४॥
सायुत नियुत सह मम धेनु । घेऊनि तूंचि हो संपन्न । आम्हांसि देता श्रीभगवान । ऐसें बोलोनि तो गेला ॥१३५॥
धेनु त्यागोनि विप्र दोन्ही । गेले निजाश्रमालागूनी । मग मी पडलों चिन्तवणीं । यावन्मरणपर्यंत ॥३६॥

एतस्मिन्नंतरे याम्यैर्दूतैर्नीतो यमालयम् । यमेन पृष्टस्तत्राहं देवदेव जपत्पते ॥२२॥

ऐशियामध्यें अकस्मात । मरण झालें उपस्थित । घेऊनि गेले यमाचे दूत । यमपुरींत यमानिकटीं ॥३७॥
जगत्पते भो जगदाधारा । देवदेवा परमेश्वरा । यमें पुसिलें मज विचारा । त्या निर्धारा अवधारीं ॥३८॥

पूर्व त्वमशुभं भुंक्षे उताहो नृपते शुभम् । नांत दानस्य धर्मस्य पश्ये लोकस्य भास्वतः ॥२३॥

यमें संबोधूनियां मातें । पुसिलें निजसभेआंतौतें । आधीं आपुल्या अशुभातें । अथवा शुभातें भोगीं पां ॥३९॥
तुझिया दानधर्मासी अंत । नाहीं म्हणोनि लोक भास्वत । भोगीं अक्षय तव सुकृत । मी निश्चित पाहतसें ॥१४०॥
तेव्हां मीही आपुल्या मनीं । विवरिता झालों निर्धारूनी । अनंतदानादि धर्मश्रेणी । संपादूनि येथ आलों ॥४१॥
तथा पुण्यप्रकाशास्तव । अक्षयलोक भोगीन दिव्य । ऐसें विवरूनि पाहिलें सर्व । मग केला निर्वाह तो ऐका ॥४२॥

पूर्व देवाशुभं भुंज इति प्राह पतेति सः । तावदद्राक्षमात्मानं कृकलासं पतन्प्रभो ॥२४॥

देव ऐसिया संबोधनें । यमधर्मासि प्रार्थिलें वचनें । पूर्वीं अशुभातें भोगणें । मजकारणें मानतसे ॥४३॥
ऐसें बोलतां मजलागून । यमधर्म म्हणे अधःपतन । पावें हें वाक्य होतां श्रवण । च्यवलों तेथून तत्काळ ॥४४॥
पतन पावलों अंधकूपीं । सरठवपु हे पापरूपी । आपणा देखूनि दुष्कर्मकल्पीं । अघसंकल्पीं वेष्टिलों ॥१४५॥
प्रभो समर्था जगदुद्धरणा । तुजलागीं आली माझी करुणा । प्रवर्तलासि मम् उद्धरणा । हें अंतःकरणामाजी गमे ॥४६॥

ब्रह्मण्यस्य वदान्यस्य तव दासस्य केशव । स्मृतिर्नाद्यापि विध्वस्ता भवत्संदर्शनार्थिनः ॥२५॥

भो केशवा ऐकें विनति । अद्यापि विध्वंस न पवे स्मृति । म्हणसी कारण काय यदर्थीं । तें यथामति निरूपितों ॥४७॥
ब्रह्मशब्दें बोलिजे वेद । तदुदित कर्म जें जें विशद । वेदाज्ञेसी देऊनि खांद । आचर मंद न होऊनिया ॥४८॥
वेदाज्ञेचा दृढविश्वास । तदाचरणीं परमोल्लास । फळाशा न स्पर्शे मानस । ब्रह्मण्यपुरुष तो जाण ॥४९॥
वदान्य म्हणिजे कायवाड्मनें । याचकेच्छा सर्वस्व देणें । वदान्यतेचीं अळंकरणें । आंगीं लेणें ज्या शोभे ॥१५०॥
आणि तूं सर्वग सर्वोत्तम । तव दास्याचा परम नियम । उपासकता अनन्यप्रेम । भजनीं सकाम नान्यत्र ॥५१॥
सर्वभूतीं लक्षूनि तुज । भेदभावाचें भर्जित बीज । प्रवृत्तिमात्र परमार्थकाज । शोभवीं सांज दिन रजनी ॥५२॥
दास्यविषयींच सापेक्ष । फळाशेविषयीं जो निरपेक्ष । अनन्यबोधें जो अपरोक्ष । वर्तोनि दक्ष व्यवहारीं ॥५३॥
सम्यक म्हणिजे बरव्यापारी । तव दर्शनीं प्रेमा पुरी । ते तूं म्हणसी कवणेपरी । ऐक मुरारि निरूपितों ॥५४॥
मेघमुखें जळ निवडलें । सकंचुकीं गगनीं चढलें । पवनें जडत्वा वरपडलें । नरका जालें जळ असतां ॥१५५॥
अपरोक्षबोधें जलत्वा जाणें । जडत्वें व्यवहारीं वर्तणें । त्या जैं सागरीं समरसपणें । ऐक्य पावणें फावतसे ॥५६॥
तेंवि वाच्यांश शबलांश । निरसितां जीवेश्वर निःशेष । निर्विकल्प स्वसामरस्य । व्यतिरेक दर्शन त्या नाम ॥५७॥
निर्विकल्प ब्रह्मात्मबोध । ओतप्रोत ब्रह्मानंद । गूळगोडीचा नोहे भेद । तेंवि अभेद सगुणत्वीं ॥५८॥
सगुणावयदर्शन ऐसें । ऐसिये दशेचें ज्यातें पिसें । दर्शनार्थी तो म्हणिजेत असे । येरें वायसें भेदज्ञें ॥५९॥
आंगीं कामाचा संचार । अध्यस्त कामिनीशरीर । स्वप्नीं भासूनि तदाकार । रतिव्यवहार संपादी ॥१६०॥
नसतां दुसरी तेथ अंगना । सगुण भासे स्मरकल्याणा । ऐसें सकाम करितां ध्याना । सगुणदर्शना अर्थिती ॥६१॥
न ते सम्यक संदर्शनार्थी । सम्यक्पदाची हे व्युत्पत्ति । येर दर्शनमात्र ते भ्रान्ति । विपरीत बोधीं वर्ततसे ॥६२॥
दृष्य द्रष्टा आणि दर्शन । ये त्रिपुटीचें गोचर ज्ञान । तेंचि मुख्यत्वें भवभान । अधिष्ठान सुखदुःखा ॥६३॥
संकल्पविकल्पाचें निज । हेंचि जन्ममरणाचें बीज । हेंचि अधोर्ध्वगतीचें काज । विरक्ता लाज हे दशा ॥६४॥
ऐसिये त्रिपुटीचिया वयुनें । सगुणदर्शन वांछिती मनें । सम्यक् दर्शनार्थी त्यांलागीं म्हणणें । न घडे जाणें केशवा ॥१६५॥
अंधापायीं स्वर्णगोटा । लागतां उपेक्षी करंटा । तेंवि वास्तवज्ञानेंवीण चेष्टा । सगुण निर्गुण अवघ्याचि ॥६६॥
राया म्हणसी वस्तुसामर्थ्य । तरी तें ऐकें यथातथ्य । योगभ्रष्टावीण पथ्य । नोहे निश्चित इतरांसी ॥६७॥
नामस्मरणें चक्रपाणि । प्रह्रादाच्या संकतश्रेणी । निरसी तें नाम आतां कोणी । दृढ होवोनि न स्मरती ॥६८॥
प्रह्रादाचा दृढ निश्चय । तैसा ज्या आंगीं प्रत्यय । तोचि योगभ्रष्ट निश्चय । सर्व कविवर्य जाणती ॥६९॥
निश्चयाचे नुघडती डोळे । संकल्पविकल्पें बुद्धि तरळे । सकामसाधनें वरिवरी बरळे । करितां होपळ ते होती ॥१७०॥
दृढनिश्चयें स्थिरावला । योगभ्रष्ट म्हणिजे त्याला । संकल्पविकल्पें जो तरळला । म्हणिजे त्याला भवग्रस्त ॥७१॥
योग करितां झाला भ्रष्ट । ते न म्हणावे वृथा कष्ट । मार्गें जातां चुकला वाट । पुन्हा तो नीट पथ लाहे ॥७२॥
असो विस्तारें कारण काय । कुरुभूपाळा तो नृगराय । स्मृतीचें कारण कथिता होय । तो अन्वय अवधारीं ॥७३॥
ब्रह्मण्या वदान्या मज तव दासा । सम्यक्दर्शनाची पिपासा । यास्तव अद्यापि मम स्मृति नाशा । न पवे परेशा निर्धारें ॥७४॥
ऐसा कथूनि निजाधिकार । पुढतीं अघटित लाभ थोर । मानूनि कृष्णेंसीं उत्तर । आश्चर्यकर बोलतसे ॥१७५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP