अध्याय ६३ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - अपश्यतां चानिरुद्धं तद्बंधूनां च भारत । चत्वारो वार्षिका मासा व्यतियुरनुशोचताम् ॥१॥

चित्रलेखेनें अनिरुद्ध नेला । प्रभाते सदनीं गलबला झाला । रामकृष्णादि प्रद्युम्नाला । वृत्तान्त कथिला किङ्करीं ॥७॥
रति रुक्मिणी रुक्मवती । रोहिणी देवकीसह रेवती । रोचनेच्या सदना येती । वृत्तान्त पुसती तयेतें ॥८॥
येरी म्हणे त्रिदिनव्रत । व्रतस्थ होते कीर्तननिरत । म्हणोनि मजला हें अबिदित । नव्हता एकान्तसुखशयनीं ॥९॥
किङ्कर म्हणती सभास्थानीं । अर्धरात्री क्रमिली श्रवणीं । कीर्तन संपतां मंचकासनीं । स्वेच्छा शयनीं पहुडलिया ॥१०॥
निद्रित झाले सेवक सर्व । प्रभाते वर्तलें अपूर्व । मंचकासहित रोचनाधव । नेला लाघव करूनियां ॥११॥
कोणें नेला ऐसें न कळे । पिहित द्वारें असतां सकळें । हें ऐकतां यादवकुळें । झालीं व्याकुळें सर्वत्र ॥१२॥
न देखतां अनिरुद्धातें । समस्त बंधुवर्गाचीं चित्तें । झालीं अत्यंत शोकभरितें । शुद्धि कोणातें तर्केना ॥१३॥
प्रसूतिकाळीं प्रद्युम्नासी । शंबरें नेलें वधावयासी । दैवें रक्षिलें तेथ त्यासी । हेही तैसीच गोष्टी गमे ॥१४॥
ऐसें अनेक तर्क करिती । एक दैवज्ञा पूसती । देवदेव्हारें धुंडिती । घालूनि विनती आरतिया ॥१५॥
रोचनेचा शोक भारी । भोंवत्या आश्वासिती नारी । गद प्रद्युम्न राम मुरारी । बाष्पें नेत्रीं ढाळिती ॥१६॥
देवकी रोहिणी रेवती । रुक्मिणीसहित रुक्मवती । परमाक्रोशें आक्रंदती । आंगें टाकिती धरणीये ॥१७॥
नेणती सगुण हे रोचना । कांतेंवीण दीनवदना । कैसी कंठील अहर्गणा । म्हणोनि ललना विलपती ॥१८॥
तिये समयीं उद्धवाक्रूर । समस्तांतें देती धीर । म्हणती सावध स्थिर स्थिर । दीर्घ विचार करा म्हणती ॥१९॥
तेव्हां रायें उग्रसेनें । अनिरुद्धाचे गवेपणे । चार प्रेरूनि वनोपवनें । द्वीपें भुवनें शोधविलीं ॥२०॥
ब्राह्मण घातले अनुष्ठानीं । एक व्रतस्थ बैसले मौनी । एक हरिहरदेवतायतनीं । नियमेंकरूनि राहिले ॥२१॥
एक अश्वत्था प्रदक्षिणा । एक तुळसीवृंदावना । एक ते सूर्यनारायणा । अर्घ्यदानें तोषविती ॥२२॥
अनिरुद्धाचा विसर न पडे । दुःखें यादव झाले वेडे । रुक्मवती सदैव रडे । रोचनेकडे पाहूनी ॥२३॥
एक म्हणती अमरभुवनीं । अनिरुद्ध नेला निर्जरगणीं । पार्याताची मानूनि हानि । वज्रपाणि क्षोभला ॥२४॥
ऐसे अनेक तर्क करिती । दुःखें सदैव आक्रंदती । यावद्वर्षाकाळसमाप्ति । क्रमिल्या राती सशोक ॥२५॥
चार्‍ही मास वर्षाकाळीं । बंधुवर्गांची मंडळी । अनिरुद्धाच्या शोकानळीं । दुःखें समूळीं आहाळतसे ॥२६॥
जेव्हां बाणें नागपाशीं । अनिरुद्ध बांधूनि रणभूमीसी । पाडिला त्याचे अवस्थेसी । देखूनि देवर्षि कळवळिला ॥२७॥
सवेग पातला द्वारकापुरा । वार्ता कथिली द्वारकेश्वरा । अनिरुद्ध नेला बाणनगरा । उषा सुन्दरा पर्णावया ॥२८॥
उषेसी भवानीचा वर । स्वप्नीं तुजसीं रमेल नर । तोचि होईल तव भर्तार । केला निर्धार वरदानें ॥२९॥
शुक्लमाधवीं द्वादशीनिशीं । स्वप्नीं उषाअनिरुद्धेंसी । योग झाला मग तयासी । शोणितपुरासी तिहीं नेलें ॥३०॥
तेथें उषेचें पाणिग्रहण । केलें गान्धर्वविधानेंकरून । यावत्काळ वनितारत्न - । भोगीं वेधून राहिला ॥३१॥
बाणासुरासी हा वृत्तान्त । विदित होतां झाला तप्त । सवें घेऊनि प्रचंड दैत्य । अनिरुद्धातें धरूं गेला ॥३२॥
येरें परिघप्रहारातळीं । झोडिली शत्रुवर्गाची फळी । प्रचंड दैत्य मारिले बळी । केली रवंदळी रणाङ्गणीं ॥३३॥
रथही बाणाचा भंगिला । अन्यरथीं तो वळघला । तेणें नागपाशीं बांधिला । निरोधें रक्षिला अनिरुद्ध ॥३४॥
भगवंतासी पूर्वींच विदित । तथापि वर्ते अज्ञवत । साधावया अवतारकृत्य । करावया दैत्यमदभंग ॥३५॥

नारदात्तदुपाकर्ण्य वार्तां बद्धस्य कर्म च । प्रययुः शोणितपुरं वृष्णयः कृष्णदैवताः ॥२॥

नारदमुखें सकळामाजीं । आपण ऐकता झाला सहजीं । अनिरुद्धाची शुद्धि आजी । लागली म्हणोनि प्रकाशी ॥३६॥
सभास्थानीं उग्रसेन । कृष्ण प्रद्युम्न संकर्षण । अनिरुद्धउषापाणिग्रहण । युद्ध दारुण दैत्येंसीं ॥३७॥
अनिरुद्धातें नागपाशीं । बाणें बांधिलें रणभूमीसी । यादवीं गोष्टी ऐकूनि ऐसी । परम आवेशीं उठावले ॥३८॥
कृष्णचि ज्यांची उपासना । कृष्णावीण न भजती आना । कृष्ण दैवत यादवगणां । श्रीकृष्णाज्ञा त्यां होतां ॥३९॥
ठोकिल्या प्रस्थानकुंजरभेरी । सन्नद्ध झाले ते शस्त्रास्त्रीं । प्रळययुद्धाची सामग्री । सेना आसुरी भंगावया ॥४०॥
लघुतर यादवांचा अंकित । पाहूं न शके त्या कृतान्त । तेथ प्रत्यक्ष मन्मथसुत । बांधिती दैत्य हें नवल ॥४१॥
आजी विध्वंसूं शोणितपुर । समरीं मारूं बाणासुर । आडवा येईल जरी शङ्कर । तरी त्या निष्ठुर करूं शिक्षा ॥४२॥
परमदुर्मद यादवसैन्य । रात्रंदिवस इच्छिती रण । त्यांसी हे वार्ता होतां श्रवण । क्षोभें दारुण उठावले ॥४३॥
प्रतापें शोणितपुराप्रति । यादव जाते झाले किती । वीरांसहित सेनागणती । ऐक निश्चिती कुरुवर्या ॥४४॥

प्रद्युम्नो युयुधानश्च गदः सांबोऽथ सारणः । नंदोपनंदभद्राच्या रामकृष्णानुवर्तिनः ॥३॥
अक्षौहिणीभिर्द्वादशभिः समेतां सर्वतोदिशम् । रुरुधुर्बाणनगरं समंतात्सात्वतर्षभाः ॥४॥

विष्णुपुराणीं पराशर । राम कृष्ण प्रद्युम्नवीर । गेले गरुडीं होवोनि स्वार । नाहीं विस्तार बहु वदला ॥४५॥
येथें श्रीमद्भागवतीं । प्रबळ सेनेसीं श्रीपति । गेला शोणितपुराप्रति । वदला सुमति शुकयोगी ॥४६॥
ज्येष्ठ कृष्णाचा नंदन । जो कां मकरध्वज प्रद्युम्न । आणि प्रतापी युयुधान । सात्यकि अभिधान जयाचें ॥४७॥
तृतीय धाकुटा श्रीकृष्णबंधु । केवळ धनुर्विदेचा सिंधु । जेणें भंगिला जरासंधु । रुक्मिणीहरणसमरंगीं ॥४८॥
चौथा जाम्बवतीचा तनय । साम्बनामा वृष्णिवर्य । ज्याचें अमोघ वीर्घ शौर्य । समरीं प्रळयपावक जो ॥४९॥
सारणनामा पांचवा वीर । यदुयूथपांमाजी शूर । ज्यासीं सुभट न धरी धीर । प्रळयरुद्रसमतेचा ॥५०॥
नंद उपनंद हे दोघे । सव्यदक्षिणपार्श्वभागें । चालती रामकृष्णांसंगें । आज्ञाप्रसंगें वर्तती ॥५१॥
भद्रातनय भद्रवीर । श्रीकृष्णाचा औरस कुमर । प्रतापतेजस्वी भास्कर । अपर भृगुवर समरंगीं ॥५२॥
एवं यादवसेनाधर । वृष्णि अंधक भोज कुकुर । सांगतां सर्वांचा विस्तार । ग्रंथ फार वाढेल ॥५३॥
आद्यशब्दें हे समस्त । जाणती श्रोते विपश्चित । रामकृष्णीं परमविनीत । आज्ञानुवर्ती सर्वस्वें ॥५४॥
एवं द्वादश अक्षौहिणी । सन्नद्ध बद्ध चतुरंगिणी । सवें घेऊनि रामकृष्णीं । द्वारकेहूनि निघाले ॥५५॥
वाद्यें वाजती भयंकरें । म्हणती जयांतें रणतुरें । सिंहनादाचेनि गजरें । भरलें शारें कृतान्ता ॥५६॥
ऐसे वीर प्रतापजेठी । पातले शोणितपुरानिकटीं । बाणनगरा देऊनि घरटी । बैसले हठी बळसिंधु ॥५७॥
रोधूनि सर्वही दिग्विभाग । पुरग्रहणार्थ करिती लाग । बाहेर निघावयातें मार्ग । नागरवर्ग न लाहती ॥५८॥
ऐसे प्रतापी सात्वतश्रेष्ठ । झाले शोणितपुरीं प्रविष्ट । नगरनागरां देती कष्ट । तेंही स्पष्ट अवधारा ॥५९॥
म्हणाल मानुषी यादवसेना । केंवि पातली बाणभुवना । ऐसा संशय भासेल मना । यदर्थीं वचना अवधारा ॥६०॥
द्वारका निर्मिली कवणेपरी । कैसी मथुरा नेली रात्रीं । ज्यातें सुधर्मा ओपिली अमरीं । तो काय न करी श्रीकृष्ण ॥६१॥
वोळगे तिष्ठती अमरगण । त्यातें विमानीं यादवसैन्य । वाहूनि नेतां प्रयास कोण । न कीजे प्रश्न येविषयीं ॥६२॥
सपक्ष तुरंग जुंतिले रथीं । सपक्ष अश्वीं वीरपंक्ति । मनोवेगें गगनपथीं । जाऊनि रोधिती बाणपुरा ॥६३॥
नगर रोधूनि चहूंकडे । यादव प्रतापी बैसले गाढे । युद्ध करिती कोण्या पाडें । तें निवाडें परिसा हो ॥६४॥

भज्यमानपुरोद्यानप्राकाराट्टालगोपुरम् । प्रेक्षमाणो रुषाविष्टस्तुल्यसैन्योऽभिनिर्ययौ ॥५॥

नगराभोंवतीं वनोपवनें । विध्वंसिलीं यादवसैन्यें । उत्तुंगदुर्गें केलीं भग्नें । पुरगोपुरें ढांसळिलीं ॥६५॥
अट्टाळिया उच्चतर । पाडिल्या करूनि यंत्रप्रहार । कंपायमान केलें नगर । देखोनि असुर क्षोभला ॥६६॥
जैसें प्रतापी यादवदळ । तत्तुल्य दैत्यसैन्य प्रबळ । घेऊनि निघाला बळीचा बाळ । प्रळयानळपडिपाडें ॥६७॥
तये समयीं शिखंडकेतु । अकस्मात झाला पतितु । बाण खोंचला हृदयाआंतु । पार्वतीकान्त स्मरे मनीं ॥६८॥
माझा अभिमान गौरीरमणा । यथार्थ करीं निजवरदाना । प्रार्थिलासि म्यां पुररक्षणा । तें या क्षणाकारणें ॥६९॥
केतु भंगोनि पडतां क्षिती । बाण हृदयीं ऐसें चिंती । अंतर जाणोनि गौरीपति । रक्षणार्थीं प्रवर्तला ॥७०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP