अध्याय ६० वा - श्लोक ५६ ते ५९

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


भ्रातु र्विरूपकरणं युधि निर्जितस्य प्रोद्वाहपर्वणि च तद्वधमक्षगोष्ठ्यम् ।
दुःखं समुथमसहोऽस्मदयोगभीत्या नैवाऽब्रवीः किमपि तेन वयं जितास्ते ॥५६॥

तुझिया विवाहप्रसंगीं । राजे भंगिले म्यां समरंगीं । तुझा अग्रज रुक्मी वेगीं । पाठीलागीं पावला ॥७४॥
सांडूनि यादवांचा दळभार । माझा रोधिला रहंवर । युद्ध केलें परम क्रूर । अस्त्रें निष्ठुर वर्षला ॥४७५॥
तैं त्या मारितां गदाप्रहारें । त्वां प्रार्थिलें करुणोत्तरें । मग त्या विरूप करूनि त्वरें । सजीव शरीरें सोडिला ॥७६॥
तें तूं अद्यापि कोणे काळीं । वदली नाहींस कोणाजवळी । दुःख न धरूनि हृदयकमळीं । प्रेमकल्लोळीं मज भजसी ॥७७॥
याहीहूनि विशेष दुःख । तवाग्रजें पौत्रीस्वयंवरीं देख । द्यूतक्रीडेमाजी सम्यक । बळभद्र मुख्य हेळिला ॥७८॥
तेणें सकोप परिघप्रहारें । रुक्मि मारिला असतां निकरें । तैं त्वां आमुच्या स्नेहादरें । सशोक उत्तरें नाठविलीं ॥७९॥
अद्यापि कोठें कोणाजवळीं । वदली नाहींस वेल्हाळी । शल्य धरूनि हृदयकमळीं । सर्व काळीं मज भजसी ॥४८०॥
बन्धुस्नेहें विषमोत्तरें । ऐकतां स्वामीच्या अंतरें । क्षोभें ओसंडिजेल अव्हेरें । चित्त घाबरें या योगें ॥८१॥
याचिया भवास्तव दुःसह दुःख । तुवां गिळिलें समपीयूष । हें मी जाणें अंतरसाक्ष । जिंकिलें नावेक त्वां आम्हां ॥८२॥
जीं अंतरशत्रु जिणिले । सर्वभूतात्मका मज भजले । अभेदबोधें जे उमजले । आम्ही अंकिले पैं त्यांचे ॥८३॥
आणखी अनन्य सप्रेमभावें । आम्हां जिंकिलें तुवां देवें । कैसें म्हणसी तें आघवें । कथितों स्वभावें तव चरित ॥८४॥

दूतस्त्वयाऽऽत्मलभनें सुविविक्तमंत्र प्रस्थापितो मयि चिरायति शून्यमेतत् ।
मत्या जिहास इदमंगमनन्ययोग्यं तिष्ठेत तत्त्वयि वयं प्रतिनंदयामः ॥५७॥

अखिलान्तर्गत जो मी आत्मा । त्या मत्प्राप्तीचिया प्रयत्नकामा । पत्रीं लिहूनि धाडिलें नेमा । ते चातुर्यगरिमा मी जाणें ॥४८५॥
उदयिक दिन लंघूनि परवां । मम विवाहीं नृपां सर्वां । जिंकावया सहयादवां । त्वरित यावें मम हरणा ॥८६॥
अंग या कोमलामंत्रणें। संबोधूनियां मजकारणें । पत्रीं केलें निश्चयसूचने । तें मी जाणें भीमकिये ॥८७॥
कदाचित्समयीं तूं न पवसी । मी न लाहें तव चरणांसी । तैं शून्यता त्रैलोक्यासी । झाली ऐसी मी मानीं ॥८८॥
अंतर्यामीं तूं अनन्य । अनन्ययोग्य हें ममाङ्ग जाण । झणें प्राकृत स्पर्शती आन । यास्तव त्यागीन प्रयत्नें ॥८९॥
तुझी पत्रिकेमाजील उक्ति । ते मज अद्यापि स्मरती चित्तीं । अंबुजाक्षा तव प्रसादप्राप्ति । न होतां निश्चिती तनु न राखें ॥४९०॥
प्राण सोडीन तेचि घडी । जन्मान्तरीं व्रतकडाडी । जन्मशतां सुकृतपौढी । तव पद आवडी वरीन ॥९१॥
तवानुग्रह न होतां देह । सोडी ऐसा दृढ निश्चय । हा जाणोनि अभिप्राय । माझें हृदय कळवळिलें ॥९२॥
ऐसी सप्रेम निष्ठा तुझी । देखोनि चित्तवृत्ति माझी । वेधली जैसा भ्रमर कंजीं । लंपट रुंजी रसलोभें ॥९३॥
हे तव निष्ठा तुजचि साजे । हर ब्रह्मेन्द्रां दुर्लभ सहजें । एवं उत्तीर्णतेचें ओझें । उतरूनि भजें प्रेमाचें ॥९४॥
तुझिया प्रेमा मी उत्तीर्ण । होऊं न शकें सत्य जाण । विनोदवचनीं तुझें मन । आनंदपूर्ण करीतसें ॥४९५॥
प्रेमसंरंभनर्मोक्ति । याचें कारण हेंचि सुमति । तव मनातें आनंदप्राप्ति । करणें निश्चिती भीमकिये ॥९६॥
ऐसीं कृष्णमुखींचीं वचनें । निरोपूनियां व्यासनंदनें । पुढें परीक्षितीकारणें । करी कथन तें अवधारा ॥९७॥

श्रीशुक उवाच - एवं सौरतसंलापैर्भगवान्देवकीसुतः । स्वरतो रमया रेमे नरलोक विडंबयन् ॥५८॥

एवं म्हणिजे ऐशिया परी । राया देवकीतनय जो हरि । सुरतक्रीडेच्या अवसरीं । मानवाकारीं रमतसे ॥९८॥
स्वरत म्हणिजे आत्मरत । तोही रमेसह ऐसा रमत । नरलोकाची अवगणीभूत । निज आचरित प्रकाशी ॥९९॥
षड्गुणैश्वर्यपरिपूर्ण । योगमायाप्रभावेंकरून । अभेदीं भेदांचें रोचन । करी सर्वज्ञ सविलासें ॥५००॥
एवं सुरतक्रीडावसरीं । प्रेमसंरंभनर्मोत्तरीं । कृष्ण रुक्मिणी निज मंदिरीं । परस्परें वदलीं जें ॥१॥
तो कृष्णरुक्मिणीप्रेमकलह । सुरतसंरंभकथारोह । कथिल्यावरी कमलानाहो । करी नवलाव तो ऐका ॥२॥

तथाऽऽन्यासामपि विभुर्गृहेषु गृहवानित । आस्थितो गृहमेधीयान्धर्मांल्लोकगुरुर्हरिः ॥५९॥

जैसा रुक्मिणीचिये मंदिरीं । परमानंदें क्रीडे हरि । सशतषोडशसहस्रां घरीं । त्याच प्रकारें गृहधर्मीं ॥३॥
शता आगळीं सहस्रें सोळा । आणि या वेगळ्या अष्ट अबळा । तितुकीं रूपें एकी कमळा । रुक्मिणीदेवी जाणावी ॥४॥
तैसाच तितुक्या सदनीं पृथक । गृहस्थधर्मीं गृहस्थलोक । वर्तती तैसा यदुनायक । गृहवंतासम वर्ततसे ॥५०५॥
सर्व लोकांचा गुरु विधाता । त्या विधातयाचाही जो जनिता । तोही नरचर्या अनुसरता । झाला तत्त्वतां कुरुवर्या ॥६॥
इतुकी कथा व्याससुतें । निरूपिली परीक्षितीतें । मुनिचक्रें सह शौनकातें । सूतपुत्रें निरूपिली ॥७॥
तें हें भागवत सविस्तर । व्यासप्रणीत अठरा सहस्र । परमहंसाचें पीयूषपात्र । शुककुरुवरसंवाद ॥८॥
त्यामाजील दशम स्कंध । कृष्णरुक्मिणीनर्मानुवाद । दयार्णववदनें भाषा विशद । व्याख्यान शुद्ध हरिवरद ॥९॥
एवं पष्टितमेऽ‍ध्यायीं । इतुकी कथा कथिली पाहीं । एकषष्टाव्यामाजी कायी । शेषशायी करी लीला ॥५१०॥
साष्ट सशत सहस्त्रें सोळा । कृष्णें वरिल्या ज्या नृपबाळा । तत्संततिवृद्धिसोहळा । आणि विवाह संततीचे ॥११॥
हें निरूपण सविस्तर । पुढिले अध्यायीं कुरुवर । परिसेल तेथ पंक्तिकार । श्रोतीं सादर होइजे ॥१२॥
दयार्नवाची इतुकी विनति । रुक्मिणीऐसी सप्रेम भक्ति । लाहोनि भजिजे रुक्मिणीपति । भवनिवृत्ति तद्योगें ॥१३॥
श्रीएकनाथ प्रतिष्ठानीं । चिदानंदाच्या सिंहासनीं । विराजमान स्वानंदभुवनीं । सर्वग गोगणीं गोविंद ॥१४॥
तत्पादोदकप्रवाहिनी । निरत गौतम गौतमीपानीं । पिपीलिकानिवासस्थानीं । दयार्णवदनें हरि वदला ॥५१५॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्‍यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां कृष्णरुक्मिणीप्रेमसंरंभकथनं नाम षष्टितमोऽध्यायः ॥६०॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५९॥ ओवी - संख्या ॥५१५॥ एवं संख्या ॥५७४॥ ( साठावा अध्याय मिळून ओवीसंख्या २८८५४ )

अध्याय साठावा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP