अध्याय ६० वा - श्लोक ५१ ते ५५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


उपलब्धं पतिप्रेम पातिव्रत्यं च तेऽनघे । यद्वाक्यैश्चाल्यमानाया न धीर्मय्यपकर्षिता ॥५१॥

ऐसिया अनुवादेंकरून । भोगमोक्षादि वर देऊन । भीमकीतें श्रीभगवान । आनंदपूर्ण करीतसे ॥२३॥
अनघे म्हणोनि संबोधिलें । म्हणे निष्पापे ऐकिलें । तुझें पातिव्रत्य भलें । त्वां जोडिलें पतिप्रेमें ॥२४॥
आम्ही उपहासवाक्येंकरून । चंचल केलें तुझें मन । परी त्वां माझे ठायींहून । बुद्धिकर्षण न केलें ॥४२५॥
माझिया नर्मोक्तीच्या श्रवणीं । चंचल न होतां अन्तःकरणीं । बुद्धि अन्यत्र विषयगामिनी । नव्हे म्हणोनि मी जाणें ॥२६॥
इतुकें बोलोनि रुक्मिणीप्रति । सकाम तापस जे जे व्रती । त्यांतें निंदी एकान्तभक्ति । दृढ कराया कारणें ॥२७॥

ये मां भजंति दांपत्ये तपसा व्रतचर्यया । कामात्मानोऽपवर्गेशं मोहिता मम मायया ॥५२॥

कठोर तपें तीव्र व्रतें । करूनि सकाम भजती मातें । भजूनि कामिती सुखातें । मिथुनीभूतें दाम्पत्यें ॥२८॥
दंपती म्हणजे कान्तकामिनी । त्यांसि भोगार्ह ज्या भोगश्रेणी । त्या वांछिती माझिया भजनीं । कैवल्यदानी मीं असतां ॥२९॥
मी जो अपवर्गाचा पति । त्या मज दाम्पत्यसुख वांछिती । मम मायेनें घातली भ्रान्ति । यास्तव नुमगती अपवर्ग ॥४३०॥
क्षीरसमुद्रीं देवोनि बुडी । जेंवि वांछिती फुटकी कवडी । कीं कल्पतरुतळवटीं बराडीं । क्षुधे कडाडी तुष सेवी ॥३१॥
जाऊनि कुबेराचिये मठीं । मागती फुटकी कांचवटी । तेंवि मज भजती भोगांसाठीं । केवळ करंटीं बहिर्मुखें ॥३२॥
तैसें नव्हेचि तुझें भजन । एकान्तभक्ता तुज जाणून । इहामुष्मिक कैवल्यदान । भोगनिर्वाण तुज दिधलें ॥३३॥
सकाम तुझ्याचि ठायीं भजती । तरी कां नोहे भवनिवृत्ति । ऐसी आशंका धरिसी चित्तीं । तरी परिसें यदर्थीं भीमकिये ॥३४॥
दुरत्यया जे मम माया । मोहावर्तें कवळी जयां । तयांची भ्रान्ति निरसावया । समर्थ नव्हती विधि हरही ॥४३५॥
मामेव ये प्रपद्यंते । तेचि तरती मम मायेतें । येरां रजतमसंवलितांतें । भजतां मोहातें वरपडती ॥३६॥
पंचायतनीं जे जे भजती । ते ते पावती मजचि प्रति । तरी कां माया न निस्तरती । म्हणसी सुमति तरी ऐक ॥३७॥
रजोगुणीं संभवे राग । तमोगुणीं द्वेषप्रसंग । रागद्वेषरहित चांग । शुद्ध सत्त्वात्मक मम भजन ॥३८॥
म्हणसी सकाम जे जे भजती । ते कैं कोणांतें द्वेषिती । रागें कोणां प्रति करिती । तेंही निगुतीं अवधारीं ॥३९॥
जियेविषयीं उपजे राग । तोचि विषय कामिती चांग । जिया विषयावरी विराग । द्वेषप्रसंग ते ठायीं ॥४४०॥
बाळक्रीडेच्या प्रसंगीं । अनुराग वर्ते सहोदरवर्गीं । तेचि पितृदायाच्या विभागीं । द्वेषमार्गीं प्रवर्तती ॥४१॥
मातृस्तन्याचा अनुराग । तैं माताच आवडे चांग । यूनां प्रियकर युवतिलिंग । तैं मानी उबग जननीचा ॥४२॥
एवं रागद्वेषोक्त मद्भजन । तेंचि भ्रमाचें मुख्य भाजन । मोहावर्तीं करी निमग्न । तें तूं संपूर्ण अवधारीं ॥४३॥

मां प्राप्य मानिन्यपवर्गसंपदं वांछंति ये संपद एव तत्पतिम् ।
ते मंदभाग्या निरयेऽपि ये नृणां मात्रात्मकत्वान्निरयः सुसंगमः ॥५३॥

भोग मोक्ष ज्याच्या ठायीं । सहज वर्तती सर्वदाही । ऐसिया मातें भजोनि पाहीं । वांछिती विषयी संपत्ति ॥४४॥
मातें भजूनि चिरकाळवरी । प्रसन्नतेचिये अवसरीं । मोक्ष न मागूनि विषयविकारीं । संपदा आसुरी वांछिती ॥४४५॥
मी जो भोगमोक्षांचा पति । प्रसन्न करूनि त्या मजप्रति । मोक्ष न मागूनि भयसंपत्ति । जे वांछिती ते निरयी ॥४६॥
निरयी म्हणसील कोणेपरी । तेंही भीमकिये अवधारीं । निरययातनामयशरीरीं । जे संसारीं पचताती ॥४७॥
विष्ठेमाजील जे जे किडे । त्यांसी विष्ठेमाजी पचणें घडे । ऐसें नव्हे तेंचि उघडें । नरक रोकडे देहेंसी ॥४८॥
विष्ठेमाजी जंतु पचती । सदयें काढून तयांप्रति । ठेविलें दुग्धीं शर्कराघृतीं । तेथ विश्रान्ति त्यां कैंची ॥४९॥
तस्मात् शरीरें नरकमय । धरूनि पातकीजनसमुदाय । सदेह नरकयातनाप्राय । भोगिता होय अधगरिमा ॥४५०॥
ऐशिया नरकामाजी पचती । तेथही मैथुनसुखावाप्ति । आहारनिद्राभयोन्नति । वर्ते जातिस्वभावें ॥५१॥
तस्मान्नरकामाजी जे भोग । अनेक जन्में भोगिले साङ्ग । मज भजोनि तोचि प्रसंग । सकाम दुर्भग वांछिती ॥५२॥
नरकापासून सोडविता । अक्षय सुखाचा दाता । त्या मज भजून कैवल्यनाथा । नरकसंपदा वांछिती ॥५३॥
एवं तन्मात्रात्मक जें सुख । तोचि जाणावा उघड नरक । मजही भजूनि तें मागती मूर्ख । विषयकामुक अभाग्य ॥५४॥
तैसें भजन तुवां न केलें । भवविरागें मन क्षाळिलें । निष्कामप्रेमें आधारिलें । तेंही कथिलें जातसे ॥४५५॥

दिष्ट्या गृहैश्वर्यसकृन्मयि त्वया कृतानुवृत्तिर्भवमोचनी खलैः ।
सुदुष्करासौ सुतरां दुराशिषो ह्यसुंभराया निकृतिंजुषः स्त्रियः ॥५४॥

पट्टमहिषिये गृहेश्वरी । ऐकें विदर्भनृपकुमारी । माझ्या ठायीं अनुवृत्ति पुरी । केली निर्धारीं एकदाचि ॥५६॥
ते तूं अनुवृत्ति कैसी म्हणसी । जे मोक्ष देऊनि भवातें निरसी । दिष्ट्या म्हणिजे कल्याणराशि । निश्चयेंसी तुज लब्ध ॥५७॥
हेंचि महाभाग्य जाण । आकल्प जोडिलें निष्काम पुण्य । निष्काम अनुवृत्तीसी कारण । भवमोचन ज्या योगें ॥५८॥
येर ज्या सकाम दुर्वृत्ता नारी । दुष्ट अभिपाय ज्यां अंतरीं । वंचनपरा सर्वांपरी । दुराचारी दुर्भाग्या ॥५९॥
यास्तव प्राणतर्पणपरा । वशवर्तिनी खळविकारा । निष्काम अनुवृत्तीचा वारा । त्यांसी दुष्कर जाण पां ॥४६०॥
ऐसिया बुडती भवसागरीं । विषय कामिती नानापरी । दुष्ट मनोरथ ज्यां अंतरीं । प्राणपोषणपरायणा ॥६१॥
असो त्या दुर्भगांचिया गोष्टी । तुजसारिखी इये सृष्टी । धन्यतमा अन्य गोरटी । न देखें दृष्टी भीमकिये ॥६२॥

न त्वादृशीं प्रणयिनीं गृहिणीं गृहेषु पश्यामि मानिनि यया स्वविवाहकाले ।
प्राप्तान्नृपानवगणय्य रहोहरो मे प्रस्थापितो द्विज उपश्रुतसत्कथस्य ॥५५॥

ऐकान्तिकी निष्कामभक्ति । भीमकीची अनन्य प्रीति । स्वमुखें सम्मानी श्रीपति । पूर्वानुष्ठितें स्मरोनी ॥६३॥
तुजसारिखी इये त्रिभुवनीं । न देखों अन्य प्रणयिनी । विनयभावें माझ्या भजनीं । कायवाड्मनीं मन्निष्ठा ॥६४॥
गृहिणी म्हणीजे गृहमेधिनी । पोष्यवर्गाच्या प्रतिपालनीं । ज्येष्ठां श्रेष्ठांचिया सम्मानीं । विनयगुणीं अनुकूळ ॥४६५॥
ऐसी कोठें कोणे गृहीं । तुजसारिखी दुसरी पाहीं । आम्ही कदापि देखिली नाहीं । कान्तविषयीं अनीर्ष्या ॥६६॥
अवो मानिनि स्वविवाहकाळीं । विख्यात भूभुज भूमंडळीं । तिया नृपांची मंडळी । जिणें त्यागिली वमनवत् ॥६७॥
कळो नेदितों मातापितरां । विप्र धाडिला द्वारकापुरा । पत्रिकालेखनें अभ्य़ंतरा । निजनिर्धारा जाणविलें ॥६८॥
वैष्णव जे मत्परायण । तयांच्या मुखें मत्कथाश्रवण । होतां मन्निष्ठ अंतःकरण । जाणोनि हरण म्यां केलें ॥६९॥
तैंहूनि माय माहेरींची । सोडोनि दिधली सर्वही रुचि । कदापि गोष्टी बंधुवर्गाची । ना इतरांची न काढिसी ॥४७०॥
माता पिता बन्धु स्वजन । त्यांचें श्रवणीं पडतां न्यून । कळवळूनियां स्त्रियांचें मन । होवोनि उद्विग्न पतिभजनीं ॥७१॥
तैसी नव्हेसि तूं रुक्मिणी । भवविरक्त जैसे ज्ञानी । ईषणात्यागें कैवल्यदानी । जाणोनि भजनीं अनुसरती ॥७२॥
तैसेंचि तुझें निर्वाणभजन । माता पिता बन्धु स्वजन । सांडून जालीस मदेकशरण । तेंही संपूर्ण अवधारीं ॥७३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP