अध्याय ६० वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - एतावदुक्त्वा भगवानात्मानं वल्लभामिव । मन्यमानामविश्लेषात्तद्दर्पघ्न उपारमत् ॥२१॥

व्यंग्योक्तीचें उपसंहरण । मुख्यत्वें हेंचि तत्कारण । इतुकीं वाक्यें श्रीभगवान । बोलोनि इत्यर्थ जो धरिला ॥१५०॥
भगवंताच्या प्रेमगुणें । भीमकी जाणे स्वलावण्यें । सर्वांहूनि प्रियतमपणें । मजकारणें हरि मानी ॥५१॥
ऐसा वैदर्भीचा दर्प । निरसावया मन्मथबाप । उपहासवाक्यांचा कलाप । इतुका बोलोनि आवरिला ॥५२॥
इतुकें कृष्ण बोलिल्यावरी । भीष्मकरायाची कुमारी । विदर्प होवोनि अभ्यंतरीं । मानी मेरु कोसळला ॥५३॥

इति श्रीलोकेशपतेस्तदाऽऽत्मनः प्रियस्य देव्यश्रुतपूर्वमप्रियम् ।
आश्रुत्य भीता हृदि जातवेपथुश्चिंतां दुरतां रुदती जगाम ह ॥२२॥

त्रैलोक्याचा नायक हरि । निजवल्लभ तो व्यंग्योत्तरीं । बोलतां भंगली अभ्यंतरीं । तें अवधारीं नृपवर्या ॥५४॥
जन्मापासूनि जो प्रियतम । तयाच्या वदनें वाक्यें विषम । ऐकतांचि भंगलें प्रेम । मानसीं श्रम संचरला ॥१५५॥
द्योतमाना रुक्मिणी देवी । जिणें हीं वाक्यें कदापि पूर्वीं । ऐकिलीं नव्हतीं तीं ऐकूनि जीवीं । चिह्नें भयाचीं उमटलीं ॥५६॥
हृदयामाजी खोचली वेगीं । कंप दाटला सर्वांङ्गीं । जलप्रवाह नेत्रमार्गीं । करणवर्गी वैकल्य ॥५७॥
जयेसि नाहीं पैल पार । ऐसी दुस्तर चिंता घोर । पावती झाली पैं सकुमार । तो चिह्नप्रकार अवधारा ॥५८॥

पदा सुजातेन नखारुणश्रिया भुवं लिखंत्यश्रुभिरंजनासितैः ।
असिंचती कुंकुमरूषितौ स्तनौ तस्थावधोमुख्यतिदुःखरुद्धवाक् ॥२३॥

नखशशाङ्ककलाकिरण । तिहीं रंजित पदतळ अरुण । तया चरणें भूलेखन । करीत राहिली तटस्थ ॥५९॥
कज्जलमिश्रित अश्रु स्रवती । सजल कृष्ण कर्दमें क्षिति । टपटपां सिंपीत होत्साती । अधोमुखी स्फुंदतसे ॥१६०॥
डबडबूनि आला धर्म । तेणें द्रवलें कुचकुंकुम । तत्कर्दर्में अंषुकोत्तम । शोणायमान भासतसे ॥६१॥
नयनींचे सकज्जल बाष्पबिंदु । श्वेतवसनीं स्रवती विशदु । शोण सकुंकुम कुचस्वेदु । वसन भेदूनि प्रकटला ॥६२॥
सितासिता उभय सरितां । माजी सरस्वती ते शोणता । त्रिवेणीसंगम हृदयावरुता । माधव नेत्रीं अवलोकी ॥६३॥
भगवन्मुखींचें अप्रिय वचन । परम कडवट मरणाहून । श्रवणीं पडतांचि खिळिलें वदन । पडिलें मौन वैखरिये ॥६४॥
याहूनि विशेष जे अवस्था । पावती झाली वैदर्भसुता । ते तूं ऐकें कौरवनाथा । म्हणे वक्ता शुकयोगी ॥१६५॥

तस्याः सुदुःखभयशोकविनष्टबुद्धेर्हस्ताच्छ्लथद्वलयतो व्यजनं पपात ।
देहश्च विक्लवधियः सहसैव मुह्यन्रंभेव वायुविहता प्रविकीर्य केशान् ॥२४॥

सुदुःख म्हणजे काय म्हणसी । तरी अप्रियवाक्यश्रवणासरसी । महाभय काळजी मानसीं । आनंदकोशीं झळंबली ॥६६॥
अप्रियोक्तीचें नसतां काज । आजि कां वदला गरुडध्वज । यावरी माझ्या त्याग सहज । हें दृढ बीज शंकेचें ॥६७॥
सशोक ऐसिये शंकेकरूनी । अनुतापवितर्क करितां मनीं । बुद्धि गेली हारपोनी । धैर्यापासोनि सांडवली ॥६८॥
विगतधैर्यें रुक्मिणीचीं । हस्तापासूनि वलयें साचीं । गळोनि पडलीं परी तयांची । शुद्धि अणुमात्र नुपलभे ॥६९॥
धरिला होता वालव्यजन । गळोनि पडला हस्तांतून मुखभा गेली हारपोन । विवर्ण वदन रुदनेंसी ॥१७०॥
अकस्मात पावली मोह । मूर्छा वैकल्य जाकळी देह । तया सांवराया रोह । अधैर्य धैर्या करूं न दे ॥७१॥
प्रचंडवातें जैसी कदळी । तेंवि उलथली भूमंडळीं । सुटली केशांची मोळी । ते वदनपाळी विखुरली ॥७२॥
ऐसी चिह्नें वल्लभेआंगीं । देखोनि कळवळिला शार्ङ्गी । प्रेमवात्सल्य ये प्रसंगीं । श्रीशुकयोगी वर्णितसे ॥७३॥

तद्दृष्ट्वा भगवान्कृष्णः प्रियायाः प्रेमबंधनम् । हास्यप्रौढीमजानंत्यः करुणः सोऽन्वकंपत ॥२५॥

आपुल्या वाग्बाणीं भेदलें हृदय । तेणें रुक्मिणी प्रेतप्राय । तें देखोनि यादवराय । परम सदय कळवळिला ॥७४॥
नेणोनि हास्यरहस्यखोली । भीमकी वाग्बाणीं भंगली । ऐसियेवरी करुणा आली । मग आदरिली अनुकंपा ॥१७५॥
पूर्विलाहूनि प्रेमा वृद्धी । पावे ऐसी लक्षूनि बुद्धि । करिता झाला कृपानिधि । तें शुक बोधी नृपातें ॥७६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP