अध्याय ५९ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने । नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रये ॥२६॥

तुझी प्रपितामही जे कुंती । तिनें ज्या मंत्रें श्रीपति । प्रसन्न केला तो मंत्र क्षिति । जपूनि स्तविती पदनमनें ॥५१॥
जयाचिया नाभिपद्मा । पासून जन्मला रजात्मक ब्रह्मा । तेणें सृजिलें ब्रह्माण्डधामा । रूपनामात्मक विश्व ॥५२॥
त्या तुज जगत्कारणा नयन । तूं त्रिजगाचें उपादान । भूतमौतिकां अधिष्ठान । तुजवीण आन असेना ॥५३॥
पंकजमयी माला कंठीं । वाहसी तयेची ऐसी गोठी । सत्कीर्तिपराग ब्रह्माण्डघटीं । धवलित सृष्टि तव यशभा ॥५४॥
अमळकोमळपंकजनेत्र - । मंडित ध्याती जे तव गात्र । ते स्वसुखाचे होती पात्र । एवं पवित्र तव ध्यान ॥३५५॥
पदतल रातोत्पलवत् मृदुल । जेथ सश्रीक सुचिह्नमेळ । आमोघवेधें सत्प्रेमळ । अलिउळ गुंजारव करिती ॥५६॥
इत्यादि चतुर्थ्यंत नामीं । अर्थेंसहित हृदयपद्मीं । चिंतूनि प्रभूतें वसुधा नमी । तें मुनिवाग्मी निरूपी ॥५७॥
पुढती काय इळादेवी । नमूनि भगवंतातें स्तवी । श्रोतीं व्युत्पत्ति ते आघवी । स्वस्थ परिसावी हरिगरिमा ॥५८॥

नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय विष्णवे । पुरुषायाऽऽदिबीजाय पूर्णबोधाय ते नमः ॥२७॥

नमो भगवंता तुजकारणें । निरतिशयानंद ऐश्वर्यगुणें । विराजमान पूर्णपणें । वास्तव वयुनें मत्प्रणति ॥५९॥
निरतिशयानंद ऐश्वर्य । यास्तव सर्वभूताश्रय । अखिलाद्यत्वें निवासमय । वासुदेवाय नमो नमः ॥३६०॥
अखिल ब्रह्माण्डें व्यापून । व्याप्यव्यापकत्वें न होतां भिन्न । शुद्ध शाश्वत सनातन । विष्णवे नमन एतदर्थें ॥६१॥
म्हणसी परिच्छिन्न मी देहधारी । जन्मलों वसुदेवाचे जठरीं । सर्वभूताश्रय मम शरीरीं । न घडे निर्धारीं व्यक्तत्वें ॥६२॥
सर्वाश्रयत्व कोठून कैसें । माझ्या ठायीं लक्षिलें असे । ऐसें म्हणिजेल आदिपुरुषें । तरी विश्वेशें परिसावें ॥६३॥
सर्वत्र कार्यापासूनि पूर्वीं । सन्मात्रत्व श्रुतिगौरवीं । प्रतिपादिलें तें पुरुषनांवीं । लक्षूनि उर्वीं नमो म्हणे ॥६४॥
सर्व सर्वग सर्वात्मक । सन्मात्र अभेद अद्वय एक । तो तूं पुरुष श्रुतिवाचक । जाणोनि निष्टंक भू वंदी ॥३६५॥
हेंही कैसें घडेल म्हणसी । तरी जगत्कारणें प्रधानेंसीं । त्या सर्वांतें जें प्रकाशी । सत्तायोगेंसीं आदिबीज ॥६६॥
तया आदिबीजात्मका तूतें । जाणोनि नमिलें म्यां निरुतें । उपादान या प्रपंचातें । तुजवीण येथें असेना ॥६७॥
म्हणसी घटमठादिकार्यांप्रति । उपादान केवळ माती । जड अचेतन याचि रीती । त्वां मजप्रति जाणितलें ॥६८॥
ऐसें न म्हणावें गोपाळा । मृदादि उपादानां सकळां । जडत्व असतां कार्यमेळा । प्रकट केला कर्त्यानें ॥६९॥
निमित्त कर्तृकारणाविण । मृदादिकारणा अनुपकरण । संविन्मात्र स्वबोधपूर्ण । तूं सर्वज्ञ सर्वदृक् ॥३७०॥
प्रधानादि कारणें जडें । कार्यें प्रसवती तव उजिवडें । अन्यकरणापेक्षा पडे । हें प्राकृत कोडें तुज नाहीं ॥७१॥
जरी सर्वोत्कृष्ट कारणांपूर्वीं । असणें माझें बोलसी उर्वी । तरी त्या असणियांचें कारण केंवी । प्रतिपादिसी तें सांग ॥७२॥
ये शंकेच्या परिहरणीं । प्रभूतें नमूनि बोले धरणी । श्लोकोक्त सातां विशेषणीं । तें सज्जनीं परिसावें ॥७३॥

अजाज जनयित्रेऽस्य ब्रह्मणेऽनंतशक्तये । परावरात्मन्भूतात्मन्परमात्मन्नमोऽस्तु ते ॥२८॥

कार्यरूपें जायमान । त्यासी कारण असे आन । तूं अज अव्यय सनातन । अकारण अनादि ॥७४॥
तुझिया योगसत्ताबळें । माया सचेत ऐसी कळे । अनंत ब्रह्माण्डांचिये माळे । गुण प्रसवोनियां गौण रची ॥३७५॥
तस्मात् तूंचि या जनयिता । अजत्वें अनादि अकारण असतां । कारणाकारणद्वयसंकेता । श्लोकोक्त हेतुद्वय बोधी ॥७६॥
ब्रह्मणे या विशेषणें । बृहत्वात् ब्रह्म तूंतें म्हणणें । अनादि अजत्व प्रतिपादणें । तुजकारणें या हेतू ॥७७॥
अज असतां सृजन कैसें । जनयितृत्व केंवि दिसे । तरी अनंतशक्तये या विशेषणवशें । प्रतिपाद्य असे निगमोक्त ॥७८॥
बृहत्वास्तव अजस्व सिद्ध । तैसेंच जनयितृत्वही विषद । अनंतशक्तित्वें प्रतिपाद्य । एवं अविरोध मम नमन ॥७९॥
परावरात्मन् ऐसिया पदें । संबोधिलें वाक्यें विशदें । येथींचा अर्थ श्रीमुकुन्दें । अखिलकोविदें आणिजेत ॥३८०॥
पित्यापासून पुत्र झाला । पित्यातें आजा प्रसवला । आज्यालागून पणजा व्याला । प्रसवे पणज्याला निपणजा ॥८१॥
एवं ओषधीपासूनि अन्न । अन्न अन्नापासोनि रेत उत्पन्न । रेत रुधिर परिणमोन । पुरुष उत्पन्न होतसे ॥८२॥
तिया ओषधि भूसंभव । पर्जन्यें बीजप्रादुर्भाव । तेजोनिळें जलवर्षाव । पर्जन्य नांव त्या होय ॥८३॥
पंच भूतां प्रसवे नभ । तेथें कारण काळक्षोभ । एवं अष्टधाप्रकृतिकोंभे । परावरात्वें तुज कथुला ॥८४॥
एवं अष्टधा प्रकृति जड । परावरत्वें कथिली रूढ । तीमाजि आत्मत्वें जो उघड । प्रकाश सुघड चिदाभास ॥३८५॥
ऐसा अनुगत तव प्रकाश । वेदान्तवाच्य चिदाभास । जीवशब्दें बोलिजे ज्यास । स्वकर्मास जो भोक्ता ॥८६॥
स्वकर्मद्वारा फलानुरूप । भोगणें घडे पुण्यपाप । सुरनरतिर्यग्योनि अमूप । कृतसंकल्प परावर ॥८७॥
जरी तूं म्हणसी तमादि त्रिगुण । विश्वसृजनादिहेतु जाण । गुणत्रयासही कारण । प्रसवे प्रधान प्रसिद्ध ॥८८॥
पुरुष प्रधान क्षोभक । तोही काळनैमित्तिक । येथ माझा स्तवनघोक । कोण विवेक करावया ॥८९॥
ऐसें न म्हणावें गोपाळा । यदर्थीं स्वमुखें प्रार्थीं इला । तो तूं परिसें कुरुनृपाळा । हेत्वर्थ सरळा ये श्लोकीं ॥३९०॥

त्वं वै सिसृक्षू रज उत्कटं पभो तमो निरोधाय बिभर्ष्यसंवृतः ।
स्थानाय सत्त्वं जगतो जगत्पते कालः प्रधानं पुरुषो भवान्परः ॥२९॥

पूर्वश्लोकींचें अंतिम पद । तेंचि वाखाणावया विशद । इये श्लोकीं शुक कोविद । कारणानुवाद वाखाणी ॥९१॥
विश्वसृजनाकारणें । तूंचि उत्कट रजोगुणें । अवगोनि करिसी अनेक सृजनें । प्रवृत्तिभानें नावरितां ॥९२॥
तया विश्वाचा संस्थितिहेतु । त्वत्कृत प्राचीन स्वधर्मसेतु । तत्पालन सत्ववंतु । आविर्भूत सत्त्वात्मा ॥९३॥
तेचि वाढल्या बहुवस सृष्टि । उत्पथ अनावर देखूनि दृष्टी । तमोत्कर्षें घालिसी पोटीं । निर्मोह शेवटीं अलिप्त तूं ॥९४॥
काळपुरुषप्रधानगुण । इयें कारणें भिन्न भिन्न । तुजवीण यांतें प्रकाशक आन । भो परमात्मन् कोण असे ॥३९५॥
सूर्यापासूनि निघती किरण । तत्प्रकाशें धवळे गगन । तेणें विश्वा प्रवर्तन । देखणें नयनें तद्योगें ॥९६॥
तया तेजाचा उपसंहार । करूनि पाहतां एक भास्कर । भास्करात्मा तूं अगोचर । तेज गोचर विषयरूप ॥९७॥
भूतभौतिकां अंतर्गत । व्यंजकत्वें साक्षीभूत । पुरुष प्रधान गुण समस्त । कालनिमित्त तूं अवधारीं ॥९८॥
तुझिया प्रकाशव्यंजकगुणें । करणें होतीं विषयात्मभिज्ञें । तियें निर्विषया तुजकारणें । कवण्या वयुनें अवगमिती ॥९९॥
व्यष्टिगोगम्य नव्हसी म्हणों । तरी समष्टीचा जो गोगण । यासही तुझें अगोचर वयुन । तो तूं परमात्मन् परात्पर ॥४००॥
मृषा आभास जडतन्मात्रें । तदभिज्ञें करणें परें । करणांसही पर मानस खरें । बुद्धि निर्धारें मनःपरा ॥१॥
बुद्धीहूनि जो परात्पर । तो तूं परमात्मा अगोचर । कार्य कारण सृष्टिप्रकार । तुजमाजी अपर तो कैंचा ॥२॥
वास्तव आत्मा अद्वितीय । तेथ कैंचा व्यतिरेकान्वय । ये श्लोकीं तो अभिप्राय । भू वदताहे तें ऐका ॥३॥

अहं पयो ज्योतिरथानिलो नभो मात्राणि देवा मन इंद्रियाणि ।
कर्ता महानित्यखिलं चराचरं त्वय्यद्वितीये भगवन्नयं भ्रमः ॥३०॥

आधाररूपा जे कां मही । तिये मज पृथक्सत्तत्व नाहीं । आपोमात्रा अमृतमयी । तुजवीण कायी पृथक् असे ॥४॥
रसाकर्षण अभिवर्षण । कर्ता आदित्य जो पर्जन्य । तिये ज्योतीस अधिष्ठान । नसे तुजवीण जगदीशा ॥४०५॥
अनिलचलनें ज्योति झळके । तेणें लखलखितां पावकें । शोषणें वर्षणें पचनात्मकें । होती अशेखें तव सत्ता ॥६॥
एवं भू जल अनळानिळ । गगनगर्भीं साळुमाळ । तया गगना कोण स्थूळ । तुजमाजी केवळ त्यां वसती ॥७॥
पंच भूतें इथें पृथगाकारें । शब्दस्पर्शादिकें तन्मात्रें । प्रकटलीं तामसें अहंकारें । सबाह्यान्तरें तूं त्यांत ॥८॥
वाक् आणि पादोपस्थ गुद । कर्मेंद्रियांचे पांचही भेद । श्रोत्र त्वक् चक्षु रसना घ्राण विशद । इयें प्रसिद्ध ज्ञानेंद्रियें ॥९॥
प्राणापानादि चेष्टाकरणें । पंधरा प्रकाशती रजोगुणें । तुजवीण यांचें होणें जाणें । कोणें कोणें म्हणिजेल ॥४१०॥
दोल[अवमार्ल वरिं दस्र । हव्यवाहन इंद्रोपेन्द्र । प्रजापति निरृति हें सुरचक्र । कैचें अपर हें तुजमाजी ॥११॥
अंतःकरणादि कर्तृकरणें । विष्णुशशाङ्ककमलासनें । नारायणें गौरीरमणें । पंचधाभिन्नें अधिष्ठिलीं ॥१२॥
एवं त्रिगुणात्मकें कार्यें । त्रिधा अहंकारें विराटमयें । तो अहंकार तुजमाजी काय । वर्तता होय पृथक्त्वें ॥१३॥
अहंकाराचें कारण । ज्यासी महत्तत्त्व हें अभिधान । त्यातें प्रसवें अव्यक्त जाण । इत्यादि कारणपरंपरा ॥१४॥
एवं उपक्रमोपसंहार । बोधप्रवृति श्रुतिगोचर । येथ तूं अद्वितीय अगोचर । हा विचार भ्रम अवघा ॥४१५॥
जैसी उकारमात्रेमाजी । विक्षेपवयुनें स्वप्नराजी । तैजस अवगमी ते प्रबोध उमजीं । भ्रमावांचूनि साच असे ॥१६॥
तेंवि तूं सच्चिदानंद अद्वितीय । तेथ प्रपंचभ्रम हा मायामय । एवं तूंचि व्यतिरेकान्वय । भ्रमाचा लय तव बोधीं ॥१७॥
एवंविधा जगदीश्वरा । नमनें स्तवनें प्रार्थूनि धरा । भौमासुराचिया कुमरा । अभय श्रीधरा याचीतसे ॥१८॥
विनीतभावें करूनि विनते । प्रसन्न केला कमकापति । मग भौमपुत्र धरूनि हातीं । निरोवी क्षिति तें ऐका ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP