अध्याय ५९ वा - श्लोक १ ते २

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


राजोवाच - यहा हतो भगवता भौमे येन च ताः स्त्रियाः । निरुद्धा यत्तदाचक्ष्य विक्रमं शार्ङ्गधन्वनः ॥१॥

वाड्मयप्रकाशकभास्करा । विशिष्ठाचिया प्रपौत्रपुत्रा । त्रिकालज्ञा योगीश्वरा । हरियशवक्त्रामृत पाजीं ॥७॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । त्या कृष्णानें भौमहनन । जैसें केलें तैसें कथन । करूनि श्रवण तृप्त करीं ॥८॥
षोडश सहस्र कन्यारत्नें । भौमासुरानें हरूनि यत्नें । निरोधूनियां रक्षिलीं प्रयत्नें । तेंहीं श्रवणें परिसवीं ॥९॥
चकारार्थी भौमनिधन । योजिलें कोण्या कारणें करून । ते सविस्तर निरूपण । कीजे कथन मुनिवर्या ॥१०॥
इया श्रवणामाजि लाभ । चार्‍ही पुरुषार्थ स्वयंभ । जोडती आणि पद्मनाभ । होय वल्लभ सप्रेमें ॥११॥
क्षीरोदमथनोद्भवरत्न । तेजें शार्ङ्गशरासन । वाहे म्हणोन श्रीभगवान । शार्ङ्गधन्वा कवि म्हणती ॥१२॥
शार्ङ्गपाणीचा विक्रम । कैसा भौमनिधनोद्यम । कन्या हरूनि मेघश्याम । विवाहसंभ्रम संपादी ॥१३॥
हें मज सांगा विस्तारून । म्हणोनि रायें केला प्रश्न । तो निरूपी शुक भगवान । कीजे श्रवण तें संतीं ॥१४॥

श्रीशुक उवाच - इंद्रेण हृतच्छत्रेण हृतकुंडलबंधुना । हृतामराद्रिस्थानेन ज्ञापितो भौमचेष्टितम् ।
सभार्यो गरूडारूढः प्राग्ज्योतिषपुरं ययौ ॥२॥

राया कुरुकुळक्षीरोदका । वाड्माधुर्यपीयूषजनका । हरिगुणप्रश्नप्रकाशका । ललामतिलका कौस्तुभा ॥१५॥
तव जठरींचा करुणाड्कुर । तोचि केवळ सुरतरुवर । ऐश्वर्यलक्ष्मीविजयचंद्र । मारक गर खळकुटिलां ॥१६॥
धर्मोपचारक धन्वंतरि । कलिमलरुग्णा निरुजा करी । याचकस्वेच्छा दुभाळु भारी । ते तव दित्सा सुरसुरभि ॥१७॥
दृढधैर्याचा ऐरावती । तुजपासव तत्प्रसूति । त्वद्भवचातुर्यकळा दिगंतीं । नृत्य करिती सुरांगना ॥१८॥
तुझा प्रताप उच्चैःश्रवा । तरणिसमान तुझिया नांवा । वाहूनि तावी दुष्टदानवां । बोधक सर्वां जवाथिया ॥१९॥
लावण्यरौचर्याची मदिरा । नयनीं प्राशितां ललनानिकरा । प्रमदा होती प्रमादपरा । मन्मथतंत्रा विविशत्वें ॥२०॥
नीतिप्रत्यंचामंडित । शार्ङ्गकोदंड तव चेष्टि । कैं कोण्हाही नोहे नत । भूभुज भ्रान्त गुणघोषें ॥२१॥
भीतां अभयद दृप्तां भयद । त्वद्भवकंबुसंभवनाद । तुझी बिरुदावळी विशद । एवं क्षीरोद तूं राया ॥२२॥
तुझिया प्रश्नीं माझें मन । होऊनि हरिगुणगरिमाभिज्ञ । परमोत्साहें कथितां पूर्ण । श्रवणीं सज्जन रंजविती ॥२३॥
द्वारकेमाजि वसतां हरि । इंद्रें येऊनि दीनापरी । भौमचेष्टित परोपरी । करुणोत्तरीं श्रुत केलें ॥२४॥
अमृतस्रावी वरुणच्छत्र । हरिता जाला धरित्रीपुत्र । मान भंगोनि क्लेशपात्र । संतप्तगात्र सुरवर्य ॥२५॥
लोकपाळांमाजि वर्ण । तत्प्रभुत्वें संक्रंदन । हरिलें भंगोनि आतपत्राण । मरणासमान श्रम मानी ॥२६॥
बंधु म्हणिजे माता अदिति । भौमें तिचिया कुंडलांप्रति । हिरूनि नेलिया हृदयीं खंती । मानी सुरपति बहुसाळ ॥२७॥
अमरलोकीं मणिपर्वत । विचित्रधातुरत्नमंडित । प्राग्ज्योतिष नगर तेथ । भौमें रचिलें प्रतापें ॥२८॥
इत्यादि दुःखें दिवस्पति । हृदयीं स्मरूनि कृष्णाप्रति । विदित करूनि केली विनंती । भौमदुर्मतिहननार्थ ॥२९॥
कोणे समयीं कोणे ठायीं । इंद्रें प्रार्थिला शेषशायी । हें तूं राया पुससी कांहीं । तरी तें सर्वही तुज कथितों ॥३०॥
वाराहपुराणींचा संकेत । भूमिदेवीनें भगवंत । प्रार्थूनि भौमासुराचा घात । न करीं म्हणोनि याचिला ॥३१॥
तेव्हां भूमिदेवीतें हरि । अभय देऊनि प्रतिज्ञा करी । तुझिये आज्ञेवेगळा न मरीं । जाण निर्धारीं भौमा मी ॥३२॥
तिये भूमिदेवीचा अंश । जाणोनि सत्यभामा प्रत्यक्ष । सवें घेऊनि जगदधीश । भौमवधास पैं गेला ॥३३॥
अग्निपुराणीं कथा ऐसी । सत्यभामा प्रिय कृष्णासे । तिचिये सदनीं असतां त्यासे । इंद्रें येऊनि प्रार्थिलें ॥३४॥
तेव्हां प्रियेचिया वालभें । सवें नेऊनि पद्मनाभें । भौम वधिला समरक्षोभें । कौतुक कनकाभें दाखविलें ॥३५॥
असो हरिवंशीं विस्तृत । निरूपिला जो वृत्तान्त । तोही अवधारा संकेत । अल्पसा येथ कथिजेल ॥३६॥
द्वारकाभुवन निर्मिल्यावरी । तेथ ऐश्वर्यें नांदतां हरि । धरूनि दर्शनेच्छा अंतरीं । नारदमुनि पातला ॥३७॥
सुरुतरूचें प्रसून एक । कृष्णचरणीं अर्पिलें देख । तया सुवासें सम्यक । द्वारकाभुवन कोंदलें ॥३८॥
अमरलोकींचें अमोघ सुमन । रुक्मिणीप्रेमें श्रीभगवान । देता जाला कौतुकेंकरून । घ्राणतर्पण मानूनी ॥३९॥
द्वारकेमाजि तो परिमाळ । भरतां वेधले प्राणि सकळ । चंदनीं व्याळ कमळीं अलिउळ । तैसे विह्वळ सौरभ्यें ॥४०॥
सूर्यरश्मि ब्रह्मांडमठीं । प्रसरती परंतु बिंबानिकटीं । उष्मा प्रकाश विशेष दाटी । सौरभ्य उठी तेंवि सुमनीं ॥४१॥
केवळ रुक्मिणिचें मंदिर । झालें दिव्यसुगंधागार । गुंजारवती कृष्णभ्रमर । तेणें अंबर मुखरित ॥४२॥
तिये रुक्मिणीचिया दासी । सहज विचरतां पण्यदेशीं । सत्यभामेच्या किंकरींसीं । संगम जाला अवचिता ॥४३॥
तंव त्या डवरल्या दिव्यसुगंधें । रुक्मिण्यैश्वर्य वदती शब्दें । श्रीकृष्णाचीं वाक्यें स्निग्धें । अन्य नायिका न लाहती ॥४४॥
स्वस्वामिनीचा कृष्णीं प्रेमा । यास्तव प्रियतम पुरुषोत्तमा । अन्य नायिका हरिसंगमा । इच्छितां श्रमा पावती ॥४५॥
पट्टमहिषी रुक्मिणी एकी । येरी नायिका मात्र कामुकी । कृष्णपढियंती भीमकी । सुरनरपन्नकीं विख्यात ॥४६॥
काली पातला ब्रह्मनंदन । तेणें कृष्णासि उपायन । अर्पिलें अमरलोकींचें सुमन । जें द्वारकाभुवन भरी वासें ॥४७॥
आमुची स्वामिनी हरिवल्लभा । परम पढियंती पंकजनाभा । तियेच्या रतिरसगौरवलाभा । सौरभ्यशोभा हरि अर्पी ॥४८॥
ऐशा बोलती परस्परीं । ऐकोनि भामेच्या किंकरी । खेद पावोनि अभ्यंतरीं । पातल्या झडकरी निज सदना ॥४९॥
नमस्कारूनि गोसाविणी । म्हणती वृथा आमुचीं जिणीं । बाह्य विचरतां लाजिरवाणीं । धन्य रुक्मिणी सेविती त्या ॥५०॥
रुक्मिणी आवडे पुरुषोत्तमा । उभयतांचा उत्कृष्ट प्रेमा । इतर नायिका हरिसंगमा । हृदयपद्मामाजि झुरती ॥५१॥
सत्यभामा हे ऐकोनि गोष्टी । म्हणे मजवीण अवघे सृष्टी । कृष्णासि प्रियतमा गोरटी । नाहींच पोटीं निश्चय हा ॥५२॥
ऐसें असतां आजि हे वार्ता । तुमच्या वदनें म्यां ऐकतां । परम विस्मय गमला चित्ता । कारण तत्त्वता मज सांगा ॥५३॥
तंव त्या म्हणती गोसाविणी । सद्गुणचातुर्यलावण्यखाणी । आजिपर्यंत आमुचे मनीं । नाहीं मुखरणी आन वधू ॥५४॥
तुझिया वचनासाठीं जीव । देऊं शके वासुदेव । ऐसा होतां आमुचा भाव । तो आजि वाव जाला पैं ॥५५॥
आजि आम्हांसि हाटवटीं । जातां भेटल्या रुकिणीचेटी । परस्परें वदतां गोठी । ऐकोनि पोटीं स्मय गमला ॥५६॥
स्वर्गींहूनि नारदमुनि । येऊनि भेटला चक्रपाणी । तेणें श्रीकृष्णाचे चरणीं । दिव्य सुमन समर्पिलें ॥५७॥
तयाच्या गंधें द्वारकापुर । जालें संपूर्ण सौरभ्यप्रचुर । अपूर्व जाणोनि शार्ङ्गधर । देता जाला भीमकिये ॥५८॥
कामुकी मात्र अपरांगना । रुक्मिणी मुखरणी वरांगना । इत्यादि ऐकूनि दासीवचना । विषादें मना बाचटिलें ॥५९॥
ऐसें ऐकोनि किंकरीवचन । क्षोभलें सत्यभामेचें मन । पिटूनि हृदय ललाट वदन । दीर्घ रुदन आदरिलें ॥६०॥
गडबडाम लोळे धरणिवरी । भंवत्या सांवरिती किंकरी । म्हणती स्वामिनी शोक न करीं । झणें श्रीहरि परिसेल ॥६१॥
तंव ते म्हणे परत्या सरा । रुक्मिणी पढियंती श्रीधरा । माझिया स्नेहा पडला चिरा । आतां शरीरा मी न रखें ॥६२॥
केश तोडितां करतळीं । सुटली वीरगुंठी मोकळी । तुटली मुक्ताफळांची जाळी । मुक्तें भूतळीं विखुरलीं ॥६३॥
तडतडां तोडिले कंठींचे हार । फाडिली कंचुकी दिव्याम्बर । कर्ण घ्राण करपद शिर । रत्नालंकार विसंचिल ॥६४॥
दांत खाऊनि ओष्ठ रगडी । दीर्घाक्रोशें बोटें मोडी । म्हणे सवतीनें तडातोडी । प्रेमविघडि पैं केली ॥६५॥
बोल कायसा सवतीप्रति । कुटिल कपटी हा श्रीपति । कार्यापुरती लावूनि प्रीति । वर्ते निश्चिति बहिरंग ॥६६॥
भोळी नेणें मी कपट याचें । वालभ मानीं बहिरंगाचें । साजणें खंडलें येथूनि साचें । कोण जिणियाचें सुख आतां ॥६७॥
म्हणोनि धडधडां बडवी उर । करतळीं पिटी निकरें शिर । आक्रंदोनि टाकी शरीर । किंकरीनिकर सांवरिती ॥६८॥
कंठीं घालूं पाहे पाश । शस्त्रें करूं इच्छी नाश । हृदयीं घालूनि पाषाणास । प्राण निःशेष देऊं इच्छी ॥६९॥
कपटीयाचें साजणें काय । सधर माहेर नाहीं माय । यालागीं छेदूनि सांडीन काय । पुन्हा न पाहें मुख हरीचें ॥७०॥
माझिया सखिया सांगातिणी । तुम्ही जिवलगा मायबहिणी । वोज करा माझिये मरणीं । न लवा पाणी कपटियाच्या ॥७१॥
येथें आलिया गिरिधर । त्यासि न वदावें उत्तर । माजें झांकूनि शरीर । त्यास बाहीर दवडा गे ॥७२॥
आता कायसी भीड त्याची । प्रकट गोष्टी वदा साची । जे अधिकारी दिव्यपुष्पाची । वाढवीं तयेची वल्लभता ॥७३॥
ऐसी सांडूनि हरीची भीड । त्याचें कपट दावा उघड । पुढती बोलतां आला उभड । घेऊनि तोंड रडे पडे ॥७४॥
गडबडां धरणीवरी लोळे । सर्वांग धुळीनें माखलें । मूर्च्छा गात्र विकळ पडिलें । प्राण जाले व्याकुळ ॥७५॥
ऐसिये समयीं किंकरीजनें । मंचकीं पहुडविलें उचलुनी । झांकूनियां सूक्ष्म वसनीं । मौनें दुरूनि निरीक्षिती ॥७६॥
भामामंदिरीं वर्तलें ऐसें । जाणोनि सर्वज्ञें परेशें । पूर्वभजनप्रेमोत्कर्षें । प्रकटी विशेषें लाम्पट्य ॥७७॥
अकस्मात भामासदनीं । येऊनियां चक्रपाणि । उद्विग्न देखूनि परिचारिणी । करसंकेतें पुसतसे ॥७८॥
अस्ताव्यस्त गृहोपकरणें । त्रुटितें खंडितें रत्नाभरणें । मुक्ताहार मणिभूषणें । अन्वेषणें करिताती ॥७९॥
ऐसिया व्यग्र किंकरीगणा । करसंकेतें त्रैलोक्यराणा । पुसतां उपांशु करिती कथना । सर्वाचरणा भामेच्या ॥८०॥
विदित असतांही श्रीहरि । तर्जनी ठेवूनि नासिकेवरी । मौनमुद्रेनें किंकरी वारी । शय्यागारी प्रवेशे ॥८१॥
भामा अचेतन पुत्रिकाप्राय । देखोनि म्हणे परमाश्चर्य । वृथा श्रमाचें कारण काय । महदन्याय हा केला ॥८२॥
मग बैसोनि मंचकावरी । उपबर्हणा काढूनि हरि । भामामस्तक मांडियेवरी । धरूनि आदरी सान्तवना ॥८३॥
मुखावरील वसनाञ्चळ । काढूनि कारुण्यें गोपाळ । स्पर्शें शंतम श्रीकर कमळ । चिहनें सकळ अवलोकी ॥८४॥
केश मोकळे मुखावरी । श्रवणामागें वारूनि हरि । नम्र परिमार्जूनि करीं । अधर अंबरें पूशिले ॥८५॥
साञ्जन द्रवले बाष्पबिंदु । तेणें कळंकी वदनेंदु । राहु स्पर्शासम सखेदु । मंदानंदु म्लानत्वें ॥८६॥
सूर्योपरागीं खग्रास होतां । पद्मां कुमुदां समसाम्यता । तेंवि नयनाब्जां कुड्मलीकृतां । मन्मथजनितां अवलोकी ॥८७॥
कनककदळीचिया वना । प्रबळ झगटतां शोकपवना । चिरफळ्या होती सुकुमारपर्णा । कंचुकावसना तेंवि दशा ॥८८॥
जेंवि हाटकेश्वराचिया लिंगा । सार्द्र कुसुमीं पूजिल्या आंगा । कल्माष उठती तेंवि डागां । कज्जलबाष्पीं कुचकुंभीं ॥८९॥
पद्मजाच्या प्रबोधनीं । पद्मालयें पाणिग्रहणीं । पद्मारहिता अभयदानीं । शंतमपणि विलसती जे ॥९०॥
तया पाणिपद्में हरि । स्पर्शोनि भामापयोधरीं । कज्जलबिंदु मार्जन करी । आणि मोहरी कामोर्मि ॥९१॥
घृतादिद्रावक सहस्रकिरण । जलसान्निध्यें द्रवे लवण । पूर्णचंद्रातें विलोकून । द्रवे संपूर्ण शशिकान्त ॥९२॥
तेंवि कृष्णाच्या कृपापाङ्गें । चेतना द्रवलीं भामाअंगें । तथापि ईर्ष्या मानभंगें । न करी जागें निजवर्ष्मा ॥९३॥
ऐसें जाणोनि श्रीमुकुंद । अखिलाद्यैक आनंदकंद । म्हणे कायसा एवढा खेद । किमर्थ विषाद संभवला ॥९४॥
पट्टमहिषी प्रियतमा मज । यालागिं सांगों आलों गुज । सखेद देखोनि हृदयकंज । विहवळ जालें पैं माझें ॥९५॥
कोणतें शोकाचें कारण । प्रियतमेवीण सांगेल कोण । कथिल्यावांचूनि अंतःकरण । खेदमार्जन केंवि करी ॥९६॥
ऐसें वदनें बोले हरि । गात्र कुरवाळी शंतमकरीं । हें ऐकोनि रोषातुरी । काय करी सत्यभामा ॥९७॥
करकरां खाऊनियां दांत । क्रोधें झिडकूनि टाकिला हात । ओष्ठ चावोनि हुंकारयुक्त । तिग्मदृक्पात वक्तमुखें ॥९८॥
करूनि गात्रा परिवर्तन । किमर्थ कितवाचें आगमन । मम गात्राचें संस्पर्शन । अयोग्य जाण कुहकत्वें ॥९९॥
सुमनसभुवनोद्भव जें सुमन । मुनिप्रसादमय संपूर्ण । तें जियेतें समर्पून । सुप्रसन्न पैं केलें ॥१००॥
जयेच्या सौमनस्याकारणें । सुमनससुमना समर्पणें । तियेचे सुरतीं सुख भोगणें । संस्पर्शन तद्गात्रा ॥१॥
कैतवभावें प्रतारणा । करूनि दाविली स्निग्धभावना । आजिपर्यंत अंतःकरणा । भांबाविलें पैं माझ्या ॥२॥
आजि जाणों आले गुण । कळलें प्रेमाचें लक्षण । यावरी सर्वथा न ठेवीं प्राण । न दावीं वदन सवतीतें ॥३॥
वडील वडवडिली मजभोंवतीं । वालभ लावूनि विघडिला पति । वाडवा वरपडली मम प्रीति । फुटलें मोतीं सांधेना ॥४॥
इत्यादि सरोष क्रूरवचनें । सोढव्य करूनि जनार्दनें । चुंबन देऊनि हास्यवदनें । ललितलालनें लालवित ॥१०५॥
म्हणे तूं मज दयिताग्रणी । हें तूंचि जाणसी अंतःकरणीं वृथा प्रवर्तों परिहारकरणीं । कैतवकरणीसमसमय ॥६॥
तव वचनाची मज शिराणी । जे तूं दयिता वरिष्ट राणी । म्हणोनि अपूर्व गोष्टी कर्णीं । आलों धांवोनि कथावया ॥७॥
येथ देखोनि तुझी हे दशा । खेदें कवळिलें करणत्रिदशा । कथूं आलों गुह्य पदशा । अवधारणें हें तुज उचित ॥८॥
इत्यादि वचनें मेघनीळा । वर्षतां विषाददावानळा । शांत करूनि हृत्पद्ममुकुळा । फुल्लार केलें संस्पर्शें ॥९॥
कटिपासूनि शयनाकार । अर्ध अर्धांगीं धृतशरीर । चुम्बूनि वक्त्रासहस्रार । श्रवणीं श्रीधर गुज सांगे ॥११०॥
आर्यवर्यांचिये मुकुटीं । ज्याची पूज्यता वैकुण्ठपीठीं । तो मुनि कृपेनें पातला भेटी । ते अमृतवृष्टिसम घटिका ॥११॥
सुरसद्मभव तेणें सुमन । सुरवरभोग्यसौरभ्यपूर्ण । समर्पिलें मज उपायन । स्नेहवर्धन करूनियां ॥१२॥
तयाच्या दर्शनें भुलले नयन । सौरभ्यवेधें वेधिलें घ्राण । तेव्हां माझें अंतःकरण । विचारीं पूर्ण प्रवर्तलें ॥१३॥
हें अर्पावें दयितेप्रति । दयिताग्रणी ते सात्राजिती । तृतीय पत्नी लौकिकरीती । वडील म्हणती भीमकिये ॥१४॥
जें जें आचरिजे पैं श्रेष्ठीं । इतरां जनां तेचि राहटी । यालागिं वेदशास्त्रपरिपाटी । लौकिकदृष्टि रक्षावया ॥११५॥
पुष्पार्पणें वडिलपण । रक्षिलें तीसी देऊनि मान । परंतु आमुचें अंतःकरण । कोण्हालागून न तर्के ॥१६॥
पुष्पदर्शनें आह्लाद जाला । तेव्हांचि चित्तें संकल्प केला । सुदुम आणूनि सत्यभामेला । समर्पावा सप्रेमें ॥१७॥
कीं ते माझी प्रियांतुरी । सर्वदा राहणें तियेचे घरीं । सुरद्रुमसुमनाच्या सेजारीं । पौरंदरीशचीसाम्य ॥१८॥
ऐसें संकल्पिलें मनीं । तें गुजकथना तुजलागूनी । येथ आलिया हे तव करणी । देखोनि मनीं स्मय गमला ॥१९॥
तुजसारिखी चातुर्यखाणी । पट्टमहिषी वरिष्ठराणी । निजगुजकथनाची शिराणी । अंतःकरणीं बहु वाटे ॥१२०॥
कोणें डहुळिलें मानसा । प्रबळ विशाद हा कायसा । ईर्ष्याखेदें ऐसी दशा । आंगवणें हं अनुचित पैं ॥२१॥
पूर्वीं तुझिये पाणिग्रहणीं । प्रसन्न पितरें देवता अग्नि । महर्षि वदले आशीर्वचनीं । अविच्छिन्ना प्रीतिरस्तु ॥२२॥
तया आशीर्वादनिश्चयें । तव विषादीं न वाटे भय । आजि देखोनि हा अतिशय । परमाश्चर्य मज जालें ॥२३॥
भीमकीच्या पाणिग्रहणीं । वीर पडिले समराङ्गणीं । धडमुण्डांकित जाली धरणी । विडम्बणी रुक्मिया ॥२४॥
बळात्कारें केलें हरण । तेथ कें सुखाचें पाणिग्रहण । मातापिताजन उद्विग्न । आशीर्वचनें तैशींची ॥१२५॥
असो येथूनि सांडी खेद । सत्य मानूनि ममानुवाद । प्रेमा अविच्छिन्न अभेद । वृथा विषाद न करावा ॥२६॥
ऐसें बोधितां कैटभारि । भामा प्रमुदित अभ्यन्तरीं । तथापि विषाद जो बाहेरी । तो झडकरी न सांडवे ॥२७॥
मेघ उघडल्या सलिल वाहे । अग्निगोपनीं धूम्र राहे । तेंवि ईर्ष्या दाविती होय । आनन्दमय जाल्याही ॥२८॥
श्वास सांडूनि श्रमितापरी । झिडकूनि बैसे पाठिमोरी । म्हणे ऐसिया मधुरोत्तरीं । कितव प्रतारी मुग्धांतें ॥२९॥
जेथें रुचलें असेल मन । तेथ सुखें करावें गमन । भूत भविष्य वर्तमान । आमुचें येथूनि अदृष्टें ॥१३०॥
ऐसी उदासीन भामा । वचनें बोले मेघश्यामा । रोषें दुणावी पूर्वप्रेमा । रतिसंगमा वांछूनी ॥३१॥
हें जाणोनि कमलारमण । खुणावूनियां किंकरीगण । पात्रीं भरूनि उष्णजीवन । गंडूषपात्र आणविलें ॥३२॥
गंडूषपात्र धरिती एकी । दुजी जळ घाली हरिहस्तकीं । द्विभुजीं भामा कवळूनि निकी । अपरीं कौतुकीं मुख क्षाळी ॥३३॥
सूक्ष्मवसनें पुसूनि वदन । धूसर कांति परिमार्जून । तगटी कंचुकी लेववून । करवी परिधान पट्कुळ ॥३४॥
केशशोधनपट्टिकायंत्र । स्वकरीं घेऊनि त्रैलोक्यमित्र । धम्मिल्ल विंचरूनि सुतार । ग्रथी वेणिका निजहस्तें ॥१३५॥
अर्धशशांक मौळसुमन । मध्यें बिजोरा देदीप्यमान । तद्गत तंतूकुत गोपन । वेणिकारचनकौशल्यें ॥३६॥
मूद राखडी केतकीपत्र । कांकडोळा श्रीफळ बदर । पथ्या आमळक गुच्छोत्तर । रत्नखचित खेवणिका ॥३७॥
सुनीळ यमुना केशपाश । श्वेत जाह्नवी पुष्पविशेष । रत्नाभरणें भारईस । समय त्रिवेणी भासुरभा ॥३८॥
ऐसी वेणिका रचूनि शौरि । पृष्ठीं संवाहन स्वकरीं करी । तेणें सत्यभामा घाबिरी । नमस्कारी हरिचरणा ॥३९॥
सखिया हांसती मंद मंद । म्हणती आजिचा परमानंद । भोगावया वनितावृंद । अल्प सुकृतें योग्य नव्हे ॥१४०॥
हें ऐकोनि भामावदन । जालें प्रमुदित फुल्लारमान । तुलना न करी राकारमण । अमृतपूर्ण असतांही ॥४१॥
कृष्णें केशर घेऊनि करीं । निढळीं रेखिली कुंकुमचिरी । ऊध्वरेखा तयाउपरी । रम्य कस्तूरी कोरींव ॥४२॥
भृकुटिमध्यस्थ भा गोंदिली । तया उपरि चंदनटिकली । त्रियामा मोहूनि परिमार्जिली । वदनपंकजा मर्दूनियां ॥४३॥
नयनीं सूदलें दिव्यांजन । तेणें सोज्वळ दिसती नयन । तद्भाभोक्ता जगज्जीवन । प्रमुदित मन भामेचें ॥४४॥
वसनें कंचुकीसह कुचतटीं । झांकूनि कंठा दिधली उटी । कोंपरकळाविया मणगटीं । मलयज पोटीं चर्चिला ॥१४५॥
रत्नमंजूषाउत्कीलनें । स्वकरीं लेववी रत्नभूषणें । मुक्ताफळादि श्रवणाभरणें । निडळमाळिका आकर्ण ॥४६॥
बाहुभूषणें जडित चुडे । रत्नखचित कंकणजोडे । मुद्रिकांवरी अनर्घ्य खडे । ते चहूंकडे भा तरळे ॥४७॥
ग्रैवेयकें कंठाभरणें । मुक्तमाळीका पदकें पूर्णें । वैडूर्यमंडित कांचसुमनें । हार डोलती कुचकलशीं ॥४८॥
सांवरूनियां क्षौमवसना । कटिप्रदेशीं अमूल्य रशना । स्वकरी लेववी त्रैलोक्यराणा । पाशकीलना योजूनी ॥४९॥
मंजीर नूपुर अंदु वाळे । पदाग्रीं योजवी दशांगुळें । अणवट जोडवियांच्या ताळें । पोल्हारियांचा रव गाजे ॥१५०॥
विरोद्या शफरिका सेवटीं । रत्नजडिता कनिष्ठ बोटीं । सुमनहार घालूनि कंठीं । चुंबी गोरटी परमात्मा ॥५१॥
कृष्णें खुणावितां सहचरी । मुकुर दाखवी घेऊनि करीं । दंपती देखूनि मुकुरान्तरीं । भामा अंतरीं उल्हासे ॥५२॥
ऐसिया सलंकृता वर्ष्मा । भोगीं योग्यता पुरुषोत्तमा । ऐसें अंतरीं भावूनि भामा । प्रमुदित क्षेमा अभिलाषी ॥५३॥
इत्यादि दावूनि स्त्रैणचर्या । प्रकुपित प्रसन्न केली जाया । पुढें लक्षूनि अन्य कार्या । तें कुरुवर्या अवधारीं ॥५४॥
श्रीकृष्णइच्छेच्या प्रेरणें । ऐसिये समयीं संक्रंदनें । भामासदनीं दीनवदनें । कथिलें गार्‍हाणें भौमाचें ॥१५५॥
श्रीकृष्णातें वृद्धश्रवा । म्हणे भो भो वासुदेवा । भौमें त्रासिलें अमरां सर्वां । तो श्रम आघवा तुज विदित ॥५६॥
अमृतस्रावी वरुणच्छत्र । हरिलें करूनि बळात्कार । अदितिमातेचा श्रृंगार । कुंडलें रुचिरें अपहरिलीं ॥५७॥
अमराद्रि जो बोलिजे स्वर्ग । तेथ जें उतम मणिश्रृंग । तें स्थान हरूनियां निलाग । राहे अभंग दुष्टात्मा ॥५८॥
डोळां हरळ जैसा खुपे । जिंकिला न वचे निजप्रतापें । अमर कांपती ज्याचेनि दर्पें । खगेंद्र झडपे सर्पवत् ॥५९॥
करावयासि सुरकैपक्ष । अवतरलासि तूं गोपा दक्ष । जाणोनि आलों शरणापेक्ष । रक्षीं स्वपक्ष साक्षेपें ॥१६०॥
शरणागताची आर्ति हरणें । हेंचि विवरिजे अंतःकरणें । त्यावीण वनितावालभ करणें । श्रेष्ठांकारणें अनुचित हें ॥६१॥
ऐसें ऐकोनि अमरावनकें । अभीष्ट मानिलें मन्मथजनकें । म्हणे प्रसंगें योजिलें निकें । समरकौतुकें स्मरलास्य ॥६२॥
भूमितनय भौमासुर । भामा भूमीचा अवतार । इचिये आज्ञेनें हा असुर । संहारीन ये काळीं ॥६३॥
ऐसें विवरूनि अंतःकरणीं । भामेसहित चक्रपाणि । गरुडारूढ भौमहननीं । सज्ज होऊनि निघाला ॥६४॥
बुझावितां भामासती। इंद्रें कथिली सुरविपत्ति । दोंहीं संकटांची निवृति । करी श्रीपति कौतुकें ॥१६५॥
यत्नीं पत्नी बुझाली । पुढती तिची उपेक्षा केली । तैं लालसता वृथा गेली । आंगीं लागली कुहकता ॥६६॥
शरणागताच्या आर्तिहरणा । न करूनि करितां स्त्रैणाचरणा । तैं धिक्कार श्रेष्ठपणा । सुरमुनिगणामाजिवडा ॥६७॥
यालागिं दोन्ही एके समयीं । साधावया शेषशायी । केली कौशल्यें नवाई । दोघां हृदयीं सुखवृद्धि ॥६८॥
गरुडारूढ अंकासनीं । प्राणवल्लभा समराङ्गणीं । सत्यभामे वेगळी कोण्ही । चक्रपाणि आन नेणे ॥६९॥
ऐसिया बोधें प्रमुदित भामा । रतिरस सांडूनि हरि संग्रामा । आला म्हणोनि अमरोत्तमा । हृदयीं प्रेमा उचंबळे ॥१७०॥
प्राग्ज्योतिषपुराप्रति । गरुडारूढ मारुतगति । दैवतासहित दयिताप्रीती । गेला श्रीपति उत्साहें ॥७१॥
म्हणाल किमर्थ गरुडारूढ । तोही ऐका अर्थ उघड । प्राग्ज्योतिषपुर अवघड । पवना सांकडें प्रवेशीं ॥७२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP