पदातेर्भगवंस्तस्य पदातिस्मिग्मनेमिना । चक्रेण शिर उत्कृत्य वाससोर्व्यचिनोन्मणिम् ॥२१॥

क्षात्रधर्म शास्त्रानुरूप । पदाति जाला यदुकुळदीप । चक्र काढूनियां देदीप्य । वधिला सपाप शतधन्वा ॥६६॥
निद्रितहंता स्यमंतकचोर । चक्रें त्याचें छेदूनि शिर । वस्त्रांमाजि वारंवार । मणि श्रीधर हुडकितसे ॥६७॥
मणि ठेविला अक्रूरापासीं । विदित असतांही सर्वज्ञासी । अग्रजाची समजाविसी । कारणें मणीसी धांडोळी ॥६८॥

अलब्धमणिरागत्य कृष्ण आहाग्रजांतिकम् । वृथाहतः शतधनुर्मणिरत्र न विद्यते ॥२२॥

मणि न लभे त्या परवंटी । अथवा कोठें वसनगांठी । मग परतोनियां जगजेठी । करी गोठी ज्येष्ठापें ॥६९॥
वृथा शतधनु वधिला पाहीं । मणि सर्वथा यापें नाहीं । हें ऐकोनि बळराम काया । बोले हृदयीं तर्कूनी ॥१७०॥

तत आह बलो नूनं स मणिः शतधन्वना । कस्मिंश्चित्पुरुषे न्यस्तस्तमन्वेष पुरं व्रज ॥२३॥

बळराम तर्कीं अभ्य़ंतरीं । म्हणे हा सर्वज्ञही श्रीहरि । रहस्य चोरूनियां वरिवरी । प्राकृतापरी समजावी ॥७१॥
त्यानन्तरें कृष्णासि म्हणे । बहुतेक मणि शतधन्व्यानें । कोणा पुरुषापाशीं यत्नें । ठेविला भेणें पुरगर्भीं । यास्तव जाऊनि द्वारकापुरीं । मणिअन्वेषण बरवें करीं । ऐसी बोलूनियां वैखरी । रामें मुरारि विसर्जिला ॥७२॥
आणिक कृष्णासी काय म्हणे । कुरुनृपा तें ऐकें श्रवणें । अभेदीं भेदाचें संभवणें । ऐसें करणें कळीकाळें ॥७३॥

अहं विदेहमिच्छामि द्रष्टुं प्रियतमं मम । इत्युक्त्वा मिथिलां राजग्विवेश यदुनंदनः ॥२४॥

एकचि ब्रह्म दोहीं रूपें । अवतरले हें कथिलें तुजपें । परंतु कळिकाजनितविकल्पें । बाचटिलें तें अवधारीं ॥७४॥
बलराम म्हणे सर्वज्ञ हरि । साक्षी सर्वांचे अंतरीं । शाधनुर्हननें मणीची चोरी । किमर्थ परिहरी मजसीं हा ॥१७५॥
ऐसा विकल्प धरूनि मनीं । कृष्णा आज्ञापिलें वचनीं । म्हणे जाऊनि द्वारकाभुवनीं । शोधिजे मणि सुविचारें ॥७६॥
माझा प्रियत्तम विदेहनपति । तद्दर्शनीं मजला आर्ति । समीप मिथिलानरप्रान्तीं । सहजस्थिती आलोंसों ॥७७॥
विदेह देखावयाकारणें । मिथिलेमाजि मजला जाणें । इतुकें बोलोनि संकर्षणें । केलीं प्रयाणें परस्परें ॥७८॥
यदुअन्वया आनंदवन । यालागिं म्हणिजे यदुनंदन । मिथिलेमाजि संकर्षण । भेटला जाउनि विदेहा ॥७९॥

तं दृष्ट्वा सहसोत्थाय मैथिलः प्रीतमानसः । अर्हयामास विधिवदर्हणीयं समर्हणैः ॥२५॥

त्यातें देखोनि अकस्मात । पुढें धांविला मिथिलानाथ । मनोल्लासें प्रीतिवंत । आनंदभरित हृतकमळीं ॥१८०॥
क्षेमालिङ्गन स्नेहाभिवृद्धि । स्वागत पुसोनि यथाविधि । दिव्यासनीं ईश्वरबुद्धी । पूजिता जाला सप्रेमें ॥८१॥
करूनि पादावनेजन । तीर्थ सर्वत्र संप्रोक्षून । भावें हृदयीं धरिले चरण । मूर्ध्नि स्पर्शोनि स्थापिले ॥८२॥
अर्घ्यपाद्यादि मधुपर्क । आचमना अर्पूनि शुद्धोदक । परिधानार्थ नीलांशुक । पीतांशुक प्रावरणा ॥८३॥
मुकुतकुंडलें वीरकंकणें । अंगदें मुद्रिका कंठाभरणें । माळा मेखळा पदभूषणें । रत्नजडितें समर्पिलीं ॥८४॥
केशरमिश्रित चंदनतिलक । चर्चिला सर्वाङीं सम्यक । कुंकुमाक्षतांची लखलख । माणिक्यप्रभा लाजविते ॥१८५॥
मुक्तावतंस खोविलें शिरीं । सुगंधपुष्पांची झल्लरी । पुष्पमाळा हृदयावरी । दिव्य धूसर उधळिले ॥८६॥
सुगंधचूर्णाच्या शलाका । अग्रीं योजूनियां पावका । आसनानिकटीं स्थापिले देखा । ज्या धूम्रें सकळिकां तोषविती ॥८७॥
कर्पूरदीपें एकारती । षड्रस नैवेद्य प्रसाद पंक्ति । फळ ताम्बूल अर्पूनि निगुती । अनन्यभक्ति तिष्ठतसे ॥८८॥
दक्षिणे अर्पूनि तनुवाड्मनें । कर्पूरज्योतिनीराजनें । रत्नाञ्जळि मंत्रसुमनें । स्तवनें नमनें प्रदक्षिणा ॥८९॥
ब्रह्माण्डगर्भीं पूज्यापूज्य । तो पूजिला तृणराड्ध्वज । पूजार्ह दिव्योपचारपुंज । अर्पूनि सहज यथाविधि ॥१९०॥
बद्धाञ्जलि विदेहनृपति । उभा ठाकोनि किङ्करवृत्ति । बळरामातें करी विनति । म्हणे विश्रान्ति मज दिधली ॥९१॥
आजि सुकृता आलें फळ । आजि पावन जालें कुळ । आजि उद्धरले पूर्वज सकळ । श्रीपदकमळ वंदिलिया ॥९२॥
इतुकें प्रार्थितों विनीत चित्तें । कृपा केली जरी समर्थें । कांहीं दिवस राहोनि येथें । वचनामृतें निववावें ॥९३॥
हें ऐकोनि संकर्षण । परमानंदें वोसंडून । म्हणे विदेहा जिवलगप्राण । तुजविण आन मज नाहीं ॥९४॥
ऐकोनि जनकाची प्रार्थना । परमाह्लाद संकर्षणा । कित्तेक काळ मिथिलाभुवना । माजि राहिला तें ऐका ॥१९५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP