यः सप्तहायनः शैलमुत्पाट्यैकेन पाणिना । दधार लीलया बाल उच्छिलींध्रमिवार्भकः ॥१६॥

नरांमाजि श्रेष्ठ नरेंद्र । त्रिजगीं वरिष्ठ तो अमरेन्द्र । ज्यातें नमिती सुरासुर । नर किन्नर गंधर्व ॥३१॥
तया इंद्राचा अवमान । करूनि वर्जिला त्याचा यज्ञ । गोपांकरवीं गोवर्धन । कृष्णें बोधून पुजविला ॥३२॥
तेणें इंद्र चढला क्षोभा । प्रळयमेघीं व्यापिलें नभा । तेव्हां व्रजजन जीवितलोभा । पद्मनाभा बोभाती ॥३३॥
ऐकोनि तयांचा आर्तस्वर । सातां वर्षांचा श्रीधर । उपडूनि एक्या करें गिरिवर । धरिता जाला तो तेव्हां ॥३४॥
जैसें बाळक लीलेंकरून । उच्छिलीन्ध्राचें उत्पाटन । करूनि उचली तेंवि कृष्ण । गोवर्धन धरी हस्तें ॥१३५॥
प्रलयमेघ सप्तराती । करकामारुतविद्युत्पातीं । इंद्रें पीडितां व्रजाप्रति । नोहे विपत्ति अणुमात्र ॥३६॥
ऐसा ज्याचा पराक्रम । जाणोनि त्याचा अतिक्रम । कोण करूं शकेल अधम । केवळ ब्रह्म श्रीकृष्ण ॥३७॥
ऐसा प्रताप वर्णूनि मुखें । अक्रूर तन्मय जाला सुखें । सकंप माथा तुकोनि हरिखें । नमिता जाला तें ऐका ॥३८॥

नमस्तस्मै भगवते कृष्णायाद्भुतकर्मणे । अनंतायादिभूताय कोऒटस्थायाऽऽत्मने नमः ॥१७॥

अकूर म्हणे शतधन्व्यासी । विचार करिसी एकान्तवासी । तोही विदित श्रीकृष्णासी । कीं सर्वनिवासी सर्वग तो ॥३९॥
तया भगवंताकारणें । नमस्कारितों अनन्यपणें । संपन्न असतां जो षड्गुणें । मनुष्याचरणें वर्ततसे ॥१४०॥
कृष्ण म्हणतां गमे बाल । अद्भुत कर्में पाहतां काळ । तयाचे पदीं माझें मौळ । कमळीं अळीकुलवत् रंगो ॥४१॥
ज्यासि नाहीं आदि अंत । देशकालादिपरिच्छेदरहित । संतत शाश्वत विकारातीत । तो अच्युत मी नमितों ॥४२॥
होण्याजाण्याहूनि पूर्वीं । यालागिं आदिभूत या नांवीं । ज्यातें म्हणती महानुभावी । तत्पदीं ठेवीं मी माथा ॥४३॥
जो कूटस्थ सर्वाशयीं । असोनी सज्ज नोहे केंहीं । तया सर्वगा आत्मया पाहीं । वाड्मनदेहीं मम नमन ॥४४॥
ऐसे शतशः नमस्कार । अक्रूरें करूनि वारंवार । वस्त्रें पुसूनि द्रवित नेत्र । स्मरोनि श्रीधर त्राहि म्हणे ॥१४५॥
शतधन्व्यातें म्हणे बापा । मनुष्यदेही कृष्णकृपा । न संपादी तो पात्र पापा । आकल्प खेपा न चुकती ॥४६॥
ऐसा अक्रूरें निराकरितां । शतधन्व्यासि पबळ चिंता । वांचावयाची खुंटली आस्था । मग वर्तली कथा ते ऐका ॥४७॥

प्रत्याख्यातः स तेनापि शतधन्वा महामणिम् । तस्मिन्न्यस्याश्वमारुह्य शतयोजनगं ययौ ॥१८॥

अक्रूरें निराकरिल्यावरी । मग शतधन्वा विचार करी । मणि देऊनि अक्रूराकरीं । अश्वीं स्वारी करूनि निघे ॥४८॥
अंतर्यामीं भगवत्सत्ता । तेणें प्रेरिलाचि होत्साता । ठेवूनि अक्रूरापें स्यमंता । जाला पळता प्राणभयें ॥४९॥
शतयोजनें जया गति । आरूढोनि त्या अश्वाप्रति । पळता जाला रातोरातीं । पूर्वदिक्प्रान्तीं म्रियमाण ॥१५०॥
इतुकी शतधन्व्याची कथा । द्वारका सांडूनि जाला पाळता । प्रभाते श्रुत जालें अनंता । तो सर्ववेत्ता काय करी ॥५१॥

गरुडध्वजमारुह्य रथं रामजनार्दनौ । अन्वयातां महावेगैरश्वै राजन्गुरुद्रुहम् ॥१९॥

प्रभाते उठूनि जनार्दन । सज्जूनि गरुडध्वज स्यंदन । आरूढोनि सहित संकर्षण । जाते जाले पाठिलागा ।५२॥
कुरुधराधरगिरींद्रचूडा । राया ऐकें श्रवणसुघडा । रथ जुंतिला जवीन घोडा । चालिला होडा जगत्पति ॥५३॥
जनकासमान श्वशुर मान्य । यालागिं गुरुत्व बोलती सुज्ञ । तद्वधकर्ता जो निर्घृण । त्यातें लक्षूनि रथ धांवे ॥५४॥
शतधन्वा जो गुरुद्रोही । महापापिष्ठ आततायी । त्यातें वधितां दोष नाहीं । म्हणोनि लवलाहीं धांवती ॥१५५॥
उल्लंघूनि उखामंडळ । सौराष्ट्र नेवाळ मरुवाळ । कुकुर अंधक माथुर सकळ । यमुनाजळ लंघिलें ॥५६॥
अंतर्वेदी कुरुधरित्री । शतधन्व्यानें लंघिली रात्रीं । प्रभाते परतोनि पाहतां नेत्रीं । गरुडकेतु विलोकिला ॥५७॥
तेणें पोटीं भरलें भय । शतयोजनें धांविला हय । पुढें न चलती त्याचे पाय । मृतप्राय तो पडिला ॥५८॥

मिथिलायामुपवने विसृज्य पतितं हयम् । पद्भ्यामधावत्संत्रस्तः कृष्णोऽप्यन्वद्रवद्रुषा ॥२०॥

मग मिथिलेच्या समीप वनीं । पतित अश्व विसर्जूनी । भयसंत्रस्त पळतां चरणीं । देखिला नयनीं श्रीकृष्णें ॥५९॥
पदातियापाठीं रथ । क्षात्रधर्मासि हें अनुचित । म्हणोनि पदाति कृष्णनाथ । होऊनि धांवत तया पृष्ठीं ॥१६०॥
निद्रित मारिला आपुला श्वशुर । यालागिं रोषे जगदीश्वर । कृष्ण सर्वगही साचार । धांवे सत्वर वधावया ॥६१॥
शतधन्व्याची भरली घडी । वळती पायांच्या वेंगडी । थुंका वाळोनि गेला तोंडीं । भरली हुडहुडी जीवभयें ॥६२॥
श्रोते शंका करिती येथ । समरविमुखा कृष्णनाथ । वधिता जाला हें अनुचित । यदर्थीं शास्त्रार्थ अवधारा ॥६३॥
यतीलागीं सुवर्ण देणें । व्रतस्था ताम्बूल समर्पणें । चोरा अभयें संरक्षणें । हीं नरककारणें दात्यातें ॥६४॥
आततायी देखिल्यावरी । तत्काळ वधावा धार्मिकीं वीरीं । यालागिं जाणोनि वधाधिकारी । वधी श्रीहरि तें ऐका ॥१६५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP