अध्याय ५६ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


किं कृत्वा साधु मह्यं स्यान्न शपेद्वा जनो यथा । अदीर्घदर्शनं क्षुद्रं मूढं द्रविणलोलुपम् ॥४१॥

म्हणे सुशीले शुभानने । हृद्गत जाणसी सर्वाभिज्ञे । मम माथांचीं दुर्लाच्छनें । उपायें कोणें निवारती ॥१२॥
कोणतें कर्म केलें असतां । कृपा उपजेल कृष्णनाथा । जनपद दोष न ठेवी माथां । मज देखतां न नोकिती ॥१३॥
माझें देखोनियां वदन । अदीर्घद्रष्टा न म्हणती जन । बुद्धिमंद विचारहीन । पामर कृपण मूर्ख ऐसें ॥१४॥
इतुके दोष माझ्या ठायीं । जनीं पकटचि दिसती पाहीं । मणिसंग्रहें परमान्ययी । धनलोलुप जन म्हणती ॥४१५॥
इतुक्या दोषांच्या निरसना । एक विचार स्फुरला मना । जरी मी निस्तरें येणें व्यसना । तरी मज आज्ञा देईं पां ॥१६॥
मग तो विचार कान्तेपासीं । निर्धारूनि निजमानसीं । सांगता झाला तें नृपासी । सांगे महर्षि शुक योगी ॥१७॥

दास्ये दुहितरं तस्मै स्त्रीरत्नं रत्नमेव च । उपायोऽयं  समीचीनस्तस्य शान्तिर्न चान्यथा ॥४२॥

जेंवि जाम्बवतें आपण । कन्यादानीं मणि आंदण । देऊनि केलें समाधान । तैसेंचि लांछन निरसावें ॥१८॥
आपुली कन्या सत्यभामा । उपवर सुन्दर सद्गुणसीमा । हे आर्पूनि मेघःश्यामा । दोषकाळीमा क्षाळावी ॥१९॥
सत्यभामेच्या पाणिग्रहणीं । आंदणा दीजे स्यमंतकमणि । धनलोभी हे सदोष वाणी । येथोनि कोणी न बोलती ॥४२०॥
सत्राजितें या विवेकोत्तरीं । पुशिले असतां निज अंतुरी । बोलती तें परिसिजे चतुरीं । शुकवैखरी श्लोकार्थें ॥२१॥
कामिनी म्हणे उत्तमोत्तम । समीचीन हा उपाय परम । तया दोषाचें लांछनतम । याविण शम हो न शके ॥२२॥
यावीण आन उपायकोटि । करितां कृतागसत्वकुटी । न वचे बैसली जे ललाटीं । यावत् घरटी रविचंद्रां ॥२३॥
यालागीं हाचि उपाय सार । सौभग्यनाथा केजे सधर । हे ऐकोनियां सुविचार । झाला तत्पर सत्राजित ॥२४॥

एवं व्यवसितो बुद्ध्यासत्राजित्स्वसुतां शुभाम् । मणिं च स्वयमुद्यम्य कृष्णायोपजहार ह ॥४३॥

कोणासी मध्यस्थ करूनियां । वृत्तान्त कथिजे यादवराया । विवरितां ऐसिया उपाया । तव प्रसंगें समया अनुसरला ॥४२५॥
म्हणाल प्रसंग कैसा कवण । तरी शंबरासुरातें मारून । रतिसहित द्वारकाभुवन । जेव्हां प्रद्युम्न प्रवेशला ॥२६॥
द्वारकावासी लहानथोर । प्रवेशले तैं हरिमंदिर । तयाचित्राजी कृतविचार । सत्राजितही स्वयें आला ॥२७॥
प्रद्युम्नागमनोत्साहो । सर्वत्र द्वारकावासियां स्नेहो । तयाचि प्रसंगामाजि लाहो । सत्राजितेंही साधियला ॥२८॥
नमूनि उग्रसेना राजया । वसुदेवप्रमुखां भगवत्प्रिया । देवकीजनका देवकराया - । पासीं वृत्तान्त निवेदिला ॥२९॥
करी धरूनि एकान्तासी । नेऊनि सांगे देवकापासीं । म्हणे माझिये निजमानसीं । गोष्टी ऐसी आवडतसे ॥४३०॥
सत्यभामा हे माझी दुहिता । उपवर सुन्दर सद्गुणभरिता । दैवविधानें कृष्णनाथा । पाणिग्रहणीं अर्पावी ॥३१॥
विवरूनि नृपेंसीं हें मात । प्रार्थूनि वसुदेव कृष्णनाथ । हीन दीन मी अनाथ । कीजे सनाथ कृपेनें ॥३२॥
देवकें रायासी कथिली मात । तेणें वसुदेव कृष्णनाथ । पाचारूनि हा वृत्तान्त । सत्राजितोक्त त्या कथिला ॥३३॥
कृतागसत्वें व्रीडावान । आपुला सुहृद अनन्य शरण । त्यासी कृपेनें सनाथ करून । कन्यारत्न स्वकीजे ॥३४॥
येऊनि स्वमुखें करुणा भाकी । याहूनि कोण ते कीर्ति लोकीं । स्नेहगौरवें विश्वासमुखीं । सुहृद कौतुकें रंजविजे ॥४३५॥
हेंचि श्रेष्ठत्वा भूषण । सुहृद आप्त हीन दीन । कृतागसही झालिया शरण । आपणासमान त्या केजे ॥३६॥
ऐसें उग्रसेन भूपति । स्वमुखें बोधी धर्मनीति । सादर परिसोनि रुक्मिणीपति । ऐकिलें म्हणती जनकातें ॥३७॥
वसुदेव आणि संकर्षण । म्हणती नृपाज्ञा कीजे मान्य । सोयरा सत्राजित प्राचीन । दुहिता प्रार्थून अर्पित ॥३८॥
ऐसें विवरूनि नृपानिकटीं । सत्राजिताची मानिली गोठी । मग ब्राह्मविवाहपरिपाटीं । केली राहाटी लग्नाची ॥३९॥
ऐसा निश्चय स्वबुद्धीकरून । सत्राजितें दुहितारत्न । कृष्णाकारणें कन्यादान । विधिविधानें समर्पिलें ॥४४०॥
विधिविधान सविस्तर । कथितां वाढेल ग्रंथ फार । यालागीं शुकोक्तश्लोकानुसार । चमत्कार हा कथिल ॥४१॥
सत्यभामेच्या पाणिग्रहणीं । आंदण दिधला स्यमंतकमणि । एवं सुभगा लावण्यखाणी । चक्रपाणिप्रिय झाली ॥४२॥
ऐसा सत्राजितें विवेक । रचूनि केली सोयरिक । लोकापवादाचा कलंक । क्षाळूनि शशाङ्कसम झाला ॥४३॥
स्वमुखें करूनियां प्रार्थन । सहितमणीसीं कन्यादान । देऊनि परिमार्जी लांछन । तथापि विघ्न उरलेंसे ॥४४॥
यालागीं ऐश्वर्यपदींचा अर्थ । तो इतरांसी महदनर्थ । तदर्थ प्राकृत धरिती स्वार्थ । त्यांतें व्यर्थ श्रम ऐसे ॥४४५॥
सर्वज्ञ पूर्वींच हें जाणती । म्हणोनि न होती विषयस्वार्थी । कन्यकास्यमंतकांची प्राप्ति । होतां श्रीपति अक्षुब्ध ॥४६॥
कन्यारत्न स्यमंतकरत्न । दोह्नी जोडतांहे श्रीकृष्ण । तयांमाजी अंगीकरण । करी न करी तें ऐका ॥४७॥

तां सत्यभामा भगवानुपयेमे यथाविधि । बहुभिर्याचितां शीलरूपौदार्यगुणान्विताम् ॥४४॥

ललनाललाम सत्यभामा । लावण्यें ठेंगणी गणितां रमा । सुशीळ स्वभवाची सीमा । जे अपरप्रतिमा शैब्येची ॥४८॥
जामघवनिता शैव्या सती । जीची आज्ञा नुलंघी पति । तैसीच सत्यभामेची ख्याति । वक्ष्यमाण ग्रंथीं कथिजेल ॥४९॥
औदार्यादि समस्त गुणीं । मंडित जाणोनि बहुतां जनीं । करूं याजिली निजात्मरमणी । बहुतां प्रयत्नीं बहुतेकीं ॥४५०॥
कृतवर्मादि यादव थोर । भूभुज भूमंडळींचे अपार । सत्राजितातें याञ्चापर । होवोनि सादर उपार्जिती ॥५१॥
बहुतांमाजी शतधन्व्यातें । कांहीं अनुसर सत्राजितें । भाविला होता आपुल्या चित्तें । तोही येथें उपेक्षिला ॥५२॥
क्षाळावया आपुला दोष । कन्या देऊनि जोडिलें यश । हें जाणोनि पुराणपुरुष । पाणिग्रहणास प्रवर्तला ॥५३॥
तिये सत्यभामेतें हरि । षड्गुणैश्वर्यें सर्वोपचारीं । वेदविधानें मंत्रोच्चारीं । गृहिणीं करीं करग्रहणीं ॥५४॥
परंतु स्यमंतकाचे विषयीं । काय बोलिला शेषशायी । तें परिसावें श्रोतयांही । विवेक हृदयीं वसावया ॥४५५॥
 
भगवानाह न मणिं प्रतीच्छामो वयं नृप । तवाऽऽस्तां देवभक्तस्य वयं तु फलभागिनः ॥४५॥

अर्थस्वार्थें महदनर्थ । हाचि मुख्यत्वें परमार्थ । षङ्गुणैश्वर्यें समर्थ । बोले यथार्थ तें ऐका ॥५६॥
कुरुकंजाकरप्रबोधका । पयःपानीयप्रमेयविवेका । श्रवणचंचूकृतमराळतिलका । श्रोतृनायका परीक्षिति ॥५७॥
तये समयीं श्रीभगवान । सत्राजिताप्रति बोले वचन । स्यमंतक हा मणि आंदण । आम्हांलागूनि न पाहिजे ॥५८॥
कां पां न पाहिजे म्हणसी । तरी ऐकावें इयेविषीं । देवप्रसाद हा ज्याचा त्यासी । इतरा प्रयासीं न रक्षवे ॥५९॥
तुम्हीं सूर्यभक्त अनन्य । जाणोनि रवि झाला प्रसन्न । तेणें प्रसादा स्यमंतकरत्न । दिधलें पूर्ण कृपेनें ॥४६०॥
तें सफल्यें तुम्हांचि पासीं । सुप्रसन्न ऐश्वर्येंसीं । शोभायमान सद्गुणराशि । क्षोभें इतरांसी विघ्नकर ॥६१॥
पूर्वीं जमदग्नीच्या करीं । प्रसादा सुरसुरभि निर्जरीं । दिधली असतां बलात्कारीं । कार्तवीर्यें अपहरितां ॥६२॥
सुरभि गेली अमरसदना । कार्तवीर्य मुकला प्राणा । हैहयाच्या वंशवना । भार्गवानळें जाळियलें ॥६३॥
तयाचि वणवयामाझारी । झाली निःक्षत्र धरित्री । देवताप्रसाद ऐशियापरी । न शोभे इतरीं अपहरितां ॥६४॥
ऐशिया अनेक उपपत्ति । पुराणान्तरीं बोलिल्या असती । तथापि प्राणी लंपट होती । ते वरपडती विघ्नातें ॥४६५॥
यालागीं तुमचा तुम्हांचि पासीं । देवताप्रसाद देवभक्तांसी । असो याचिया फळभोगासी । आम्ही अधिकारी सर्वस्वें ॥६६॥
जंववरी पक्कता पावे फळ । तंववरी राहिल्या निश्चळ । फळभोगाचा आलिया काळ । भोक्ते केवळ फळभागी ॥६७॥
सत्राजितासी ऐसिया वचनीं । वर्जिलें देतां स्यमंतकमणि । यामाजी गूढार्थ चक्रपाणि । वदला कोणी नुमजती तो ॥६८॥
फळभागी या वाक्यावरी । सत्राजितें अभ्यंतरीं । मानिलें स्यमंतक माझिये घरीं । सुवर्णभारीं वर्षेल ॥६९॥
तया सुवर्णभाग्यालागीं । दुहिता जामातृविभागीं । एवं उपचारप्रसंगीं । आम्ही फळभोगीं अधिकारी ॥४७०॥
म्हणाल गूढार्थ तो काय । श्रीकृष्णाचा अभिप्राय । पुत्राभावीं कन्याचि होय । पितृवैभवा अधिकारी ॥७१॥
किमर्थ आंदण मणिच मात्र । सत्राजितासी नाहींच पुत्र । याचे निधनीं धन सर्वत्र । समणि दौहित्र लाहती ॥७२॥
ऐसा गूढार्थ बोलिला हरि । संतुष्ट सत्राजित अंतरीं । एवं अर्थानर्थकारी । तो या प्रकारीं निरूपिला ॥७३॥
पुढें स्यमंतकाचि कारणें । सत्राजित जाईल प्राणें । प्रसंगें तेंही श्रवण करणें । सत्तावन्नावे अध्यायीं ॥७४॥
इतुकी कथा कुरुभूषणा । श्रवणीं घालूनि योगिराणा । पुढील कथेच्या निरूपणा । म्हणे अवधाना दे राया ॥४७५॥
इति श्रीमद्भागवतीं । सूत निरूपी शौनकाप्रति । अठरा सहस्र संख्या गनती । पारमहंसी संहिता जे ॥७६॥
त्यामाजील दशमस्कंध । छप्पन्नावा अध्याय विशद । श्रीशुकपरीक्षितिसंवाद । मिथ्यापवादपरिहरण ॥७७॥
मृगयाव्याजें प्रसेनमरण । स्यमंतकाचें गवेषण । जाम्बवतीचें पाणिग्रहण । भामालग्न निरूपिलें ॥७८॥
पुढिले अध्यायामाझारी । सत्राजिता शतधनु मारी । त्यातें मारूनियां श्रीहरि । दुःख परिहरी भामेचें ॥७९॥
तिये कथेचिया श्रवणीं । श्रोतयांलागीं आमंत्रणीं । श्रवणमात्रें दुर्यशोहानि । यशः श्री वरूनि हरि भजिजे ॥४८०॥
प्रतिष्ठानभद्रासनीं । श्रीएकनाथ साम्राज्यदानीं । चिदानंदें निर्जरश्रेणी । स्वानंदभुवनीं वोळंगती ॥८१॥
तेथ गोविन्द गोव्याख्याता । तेणें पद्मकर ठेवूनि माथां । भाषाव्याख्यानीं केला सरता । वरदकृपेनें दयार्णव ॥८२॥
तें हें हरिवरदव्याख्यान । सद्भावें जे करिती श्रवण । त्याचे मनोरथ होती पूर्ण । कैवल्यसदन हरि ओपी ॥४८३॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां स्यमंतकाख्याने जाम्बवतीसत्यभामाविवाहकथनं नाम षट्पंचाशत्तमोऽध्यायः ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४५॥ ओवीसंख्या ॥४८३॥ एवं संख्या ॥५२८॥ ( छप्पन्नावा अध्याय मिळून ओवीसंख्या २६९९७ )

अध्याय छप्पन्नावा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP