अध्याय ४४ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


वल्गतः शत्रुमभितः कृष्णस्व वदनांबुजम् । वीक्षतां श्रमवार्युप्तं पद्मकोशभिवांबुभिः ॥११॥

पहा सखिया हो कौतुक । शत्रुजयार्थ नंदतोक । आवेशें प्रयत्नपूर्वक । झोंबे सम्यक चहूंकडूनी ॥७७॥
अभितः म्हणिजे सर्वांकडूनी । शत्रु आकळी चक्रपाणि । तेणें श्रमांबु उमटलें वदनीं । जेंवि जीवनीं अब्जकळिका ॥७८॥

किं न पश्यत रामस्य मुखमाताम्रलोचनम् । मुष्टिकं प्रति सामर्षं हाससंरंभशोभितम् ॥१२॥

कां न पहा रामवदन । आवेशें आरक्त लोचन । मुष्टिकातें दटावून । शोभायमान सस्मित ॥७९॥
अधर चावूनि उभय रदनीं । अभंग प्रताप मल्लकदनीं । वीरलक्ष्मी सस्मितवदनीं । पाहतां सज्जनीं धणी न पुरे ॥८०॥

पुण्या बत व्रजभुवो यदयं नृलिंगगूढः पुराणपुरुषो वनचित्रमाल्यः ।
गाः पालयन्सहबलः क्कणयंश्च वेणुं विक्रीडयांचति गिरित्ररमार्चितांघ्रिः ॥१३॥

तंव अन्यवनिता म्हणती बाई । पुण्यवंत हे व्रजींची भोई । जया कारणास्तव इये ठायीं । शेषशायी अवतरला ॥८१॥
पुराणपुरुष जो श्रीपति । घेऊनि नरदेहाची बुंथी । आच्छादूनि ऐश्वर्यशक्ति । गोपाकृति नटलासे ॥८२॥
विचित्र वनसंभवें सुमनें । कंठीं मुगुटीं कृतभूषणें । क्रीडेसहित संकर्षणें । रक्षित गोधनें होत्साता ॥८३॥
वेदव्याख्यानीं जो प्रवीणु । स्वयें अध्यापी कमलासनु । तो येथ धरूनि प्रणववेणु । करी क्कणन निजवदनें ॥८४॥
गिरीश धरूनि कपि आकृति । रमा होवोनि सीता सती । ज्याचे पादाब्ज अर्चिती । तो गोपति गोगोप्ता ॥८५॥
ऐशा धन्य व्रजींच्या भूमी । क्रीडतां निवती श्रीपादपद्मीं । धिग् धिग् निर्दैवा पैं आम्ही । देखों श्रमीं समरंगीं ॥८६॥
सभासदस्य अन्यायपर । न करिती बळाबळविचार । बाळांसमान मल्ल क्रूर । करितां धिक्कार समस्तां ॥८७॥
बलिष्ठ मल्ल बाळकांवरी । घालूनि निग्रहूं पाहती समरीं । धिग् धिग् ऐसे सभाधिकारी । पडती अघोरीं महानरकीं ॥८८॥
तंव येरी म्हणती आमुचें पुण्य । परम अल्प साधारण । यास्तव अनवसरीं कृष्ण । आमुचे नयन विलोकिती ॥८९॥
पैल गोपींचीं महा तपें । पुण्यें नुमानवतींचि मापें । जिहीं श्रीकृष्ण क्रीडाकल्पें । यथासंकल्पें सेविला ॥९०॥
ऐशी वामदृशांची ग्लानि । गोपी सभाग्य हरिक्रीडनीं । श्लोकत्रयें बादरायणि । नृपा लागूनि निरूपी ॥९१॥

गोप्यस्तपः किमचरन्यदमुण्य रूपं लावण्यसारमसमोर्ध्वमनन्यसिद्धम् ।
दृग्भिः पिबंत्यनुसवाभिनवं दुरापमेकांतधाम यशसः श्रिय ऐश्वयस्य ॥१४॥

काय आचरल्या गोपी तपें । तया पुण्याच्या साक्षेपें । लक्ष्मी वेधिली जया रूपें । तें ज्या सोपें विलोकिती ॥९२॥
अनंतकौटिकंदर्पकांति । कुरवंडूनि टाकिजे परती । तें लावण्यसार कृष्णाकृति । गोपी प्राशिती निजनयनें ॥९३॥
ब्रह्मांडसंदोहा माझारी । लावण्यसमता कोणी न करी तेथ अधिक लावण्यपरी । वदतां वैखरी सलज्ज ॥९४॥
अलंकारें लावण्य विविध । त्यासी बोलिजे अन्यसिद्ध । ऐश्वर्यलक्ष्मी जे स्वतःसिद्ध । तें धाम प्रसिद्ध अनन्य ॥९५॥
एवं आभरणांवांचून । ज्याचें लावण्य शोभायमान । त्रिजगीं ऐश्वर्य शोभवी पूर्ण । गोपीनयन प्राशिती तें ॥९६॥
मधुप मधुपानें उन्मत्त । लावण्यामृत नूतन नित्य । प्राशितां गोपीनयन मत्त । पूर्णसुकृत यास्तव तें ॥९७॥
यशःश्रीचें एकांतधाम । ब्रह्मादिकांसि दुर्लभ परम । तो लावण्यसुखसंभ्रम । गोपी निःसीम भोगिती ॥९८॥
कैसकैश्या कोणे समयीं । कोण क्रीडा कोणे ठायीं । कैसी लावण्यसुखनवाई । भोगिती तेंही अवधारा ॥९९॥

या दोहनेऽवहनने मथनोपलेपप्रेंखेंखनार्भरुदितोक्षणमार्जनादौ ।
गायंति चैनमनुरक्तधियोऽश्रुकंठ्य धन्या व्रजस्त्रिय उरुक्रमचित्तयानाः ॥१५॥

व्रजस्त्रिया ज्या दोहनकाळीं । लावण्यरूपी श्रीवनमाळी । आठवूनियां हृदयकमळीं । गाती स्नेहाळी तच्छंदें ॥१००॥
दोहनपात्रीं वाजती धारा । सानुरागें जगदुद्धारा । गाती तच्छेंदें सुन्दरा । पुणें सधरा व्रजरामा ॥१॥
एकी करितां कणकंडना । सप्रेम गाती मधुसूदना । एकी करितां दधिमंथना । गाती कृष्णा अनुरक्ता ॥२॥
एकी सारवितां स्वसदनें । हरिगुण गाती सप्रेमवदनें । एकी हालविती पाळणे । कृष्णगायनें रंगोनी ॥३॥
लेंकुरा बुझाविते अवसरीं । वदनीं गाती कैटभारि । सडासमार्जन करितां घरीं । पूतनारि वधू गाती ॥४॥
गातां अनुरागें मुकुन्द । सबाह्य पावती परमानंद । अनेक जन्मींचा विसरती खेद । तो आह्लाद विधि नेणे ॥१०५॥
बुद्धि रंगल्या कृष्णगुणीं । आनंदाश्रु स्रवती नयनीं । धन्य धन्य त्या व्रजकामिनी । कृष्णचिंतनीं अनुरक्ता ॥६॥
विशाळ ज्याचा पदविन्यास । उरुक्रमनामें बोलिजे त्यास । त्रिविक्रम तो हृषीकेश । व्रजवनितांस सुखसेव्य ॥७॥
चित्तें रंगल्या उरुक्रमीं । म्हणूनि न वधी संसारऊर्मीं । धन्या व्रजवधू वर्ततां धामीं । तें न देखों आम्ही दुर्भाग्यें ॥८॥
आणखी म्हणती अहोरात्र । नित्यनूतन कृष्णचरित्र । सादर पाहती त्यांचे नेत्र । तेंही समग्र अवधारा ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP