अध्याय ४१ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अश्नंत्य एकास्तदपास्य सोत्सवा अभ्यज्यमाना अकृतोपमज्जनाः ।
स्वपंत्य उत्थाय निशम्य निःस्वनं प्रपाययंत्योऽर्भमपोह्य मातरः ॥२६॥

एकी क्षुधिता जेविती ताटीं । ग्रास चाविती मोडिती बोटीं । तंव कृष्णागमनचावटी । श्रवणपुटीं प्रवेशली ॥२००॥
उत्साहभरिता श्रवणमात्रें क्षुधे । तृषेसी विसरल्या पात्रें । कृष्णदर्शना उत्सुक नेत्रें । धांवतां गात्रें नावरती ॥१॥
धांवतां पदर रुलती बिदीं । येरी वनितांची मांदी खुरंदी । गळोनि पडल्या नोहे शुद्धि । धांवती नुसधीं कलेवरें ॥२॥
मुखीं भरले जे षड्रस । चावणें गिळणें हे स्मृति ओस । हातीं उचलिले तैसेचि ग्रास । जाती जगदीश पहावया ॥३॥
ह्याहीहूनि कौतुक आन । राया ऐकें सावधान । केवळ लज्जेचें भाजन । तो हा स्त्रीजन विधिसृष्ट ॥४॥
त्याही अभ्यंग करावया । तैलें सर्वांगीं माखलिया । शिरीं चर्चूनि चोखणिया । स्नाना आलिया शिळेवरी ॥२०५॥
वसनाभरणरहित आंगें । वरी माखली चोखणी रंगें । धांवती वेधलिया श्रीरंगें । प्रवृत्तिपांगें न पांगती ॥६॥
डोई चिकटलीं घांसती अबळा । कृष्णमृत्तिका मर्दिली बाळां । कर्दम सर्वांगीं माखला । मुखमंडल अनोळखी ॥७॥
तैशाच तनु न सांवरीत । जळें न होतां सुस्नात । धांवती वधू शतानुशत । श्रवणें विस्मित परीक्षिति ॥८॥
एकी प्रसुप्तासुखसेजारीं । कृष्णागमनोत्सवाच्या गजरीं । अग्नि स्पर्शतां द्रव्ययंत्रीं । गोळापरी धांवती त्या ॥९॥
बाळका पाजिती स्नेहाळ जननी । कृष्णागमन पडतां कानीं । धांवतां पडलीं स्तनींहूनी । नेणती ग्लानि रुदनाची ॥२१०॥
राया येथ नवल काय । करणज्ञानें प्रपंच होय । करणोपरमें फावल्या सोय । तैं स्वप्नप्राय भवभान ॥११॥
स्वप्नसंसारीं प्रसवली । पुत्रेसहित ते पहुडली । दैवें अवचिती जागृति आली । मग कैं माउली शिशु जोपी ॥१२॥
तैसा परमात्मा सुखकंद । करणां फावल्या तत्सुखवेध । देहस्मृतीचा होय अबोध । येथ विरोध कोणता ॥१३॥
ऐशा धांविल्या वाडेंकोडें । कृष्ण पाहती निजनिवाडें । कृष्णें जाणूनि त्यांचिये चाडे । कोण्या पाडें तोषविल्या ॥१४॥

मनांसि तासामरविंदलोचनः प्रगल्भलीलाहसितावलोकनैः ।
जहार मत्तद्विरदेंद्रिविक्रमो दृशां ददच्छ्रीरमणात्मनोत्सवम् ॥२७॥

जे लीलेनें विधिहरसुर । मोइले होत्साते अजस्र । वर्तती होवोनि लीलातंत्र । प्रगल्भतर यास्तव ते ॥२१५॥
अबळामोहकें जीं कौशल्यें । प्रबुद्ध तियें मानिती शल्यें । प्रगल्भलीलारससाफल्यें । हरिचांचल्यें विधिगोळीं ॥१६॥
अयस्कांतें चळती लोह । तैसा प्रगल्भलीलामोह । त्रिजगा वेधक हरिविग्रह । वनितासमूह ते वेधी ॥१७॥
इंद्रनीळाचें गाळोनि कीळ । सुनीळप्रभा कोमळ अमळ । तत्प्रतिमेचा रंग सोज्वळ । फांके निर्मळ निद्गगनीं ॥१८॥
तो हा अद्यापि योगिजन । लक्षयोगें मुरडूनि नयन । पाहोनि होताती उन्मन । सच्चित्सुखघन तनुधारी ॥१९॥
कमलनेत्रीं कोमळदृष्टि । उद्दामलीलानाटकयष्टि । त्रिभंगीं ठाण ठकारधाटी । चाले जगजेठी ठमकत ॥२२०॥
रत्नजडित शोभे मुकुट । बर्हश्रेणी ललाटजुष्ट । कुटिल कुंतल श्रवणानिकट । पाहे व्यंकट स्मितवदनीं ॥२१॥
गंड मंडित कुंटळकांति । दशनीं कोटिचंद्रांची द्युति । सरळ नासिका चापाकृति । भ्रू तरळती सविभ्रमा ॥२२॥
उभयोष्ठांच्या मीलनोन्मीलनीं । आनंद कोंदे ब्रह्मांडभुवनीं । सुललित शब्द निघती वदनीं । ज्यांच्या श्रवणीं श्री वेधे ॥२३॥
चिबुक हनुवटी वर्तुळ । कंबुकंठ बाहु सरळ । कपाटसन्निभ वक्षःस्थळ । ककुदीं सबळ वृषसाम्य ॥२४॥
केयूरांगदें दंडलीं दंडीं । मनगटीं जडित कंकणजोडी । तरळ मुद्रिकांच्या उजिवडीं । फांके ब्रह्मांडीं विद्युद्भा ॥२२५॥
जगदर त्रिवळी सहित । नाभि गंभीर दक्षिणावर्त । सूक्ष्म रोमराजी अनुदित । अंबर पीत परिधान ॥२६॥
मेखळे क्षुद्रघंटिकादाटी । पल्लव सोडूनि मालगांठी । जानु वर्तुळ त्रिकोणघोंटी । चरणतळवटीं भास्करभा ॥२७॥
चरणीं वाळेवांकी अंदु । पदविन्यासें उमटती शब्दु । गजेंद्रविक्रम श्रीगोविंदु । चाले अमंदमंदवत् ॥२८॥
दिव्यकौशेयपट प्रावरण । उभय पल्लव देदीप्यमान । डुलत चाले मत्त वारण । तेंवि श्रीकृष्ण पद ठेवी ॥२९॥
संवगडियांच्या खांदियावरी । हात ठेवूनि चाले हरि । तरळ भृकुटी कमलनेत्रीं । सस्मितवक्त्रीं वधू वेधी ॥२३०॥
कृष्णदर्शना उताविळा । तनुविस्मृता नगरअबळा । धांवूनि आलिया त्यांसि डोळां । सुखसोहळा दाखवी ॥३१॥
प्रगल्भलीलारसिक तनु । सविलासहासावलोकेंकरून । रमणीय रमेचें रमवी मन । निववी वधूगण त्या रूपें ॥३२॥
सनाथ केल्या लक्ष्मीहून । मानसें हरीनें नेलीं हरून । लावण्य दाविलें डोळे भरून । झाल्या निमग्न स्वानंदीं ॥३३॥
उत्सव देऊनि वधूनयनांसी । हरिता झाला मानसांसी । ना त्या स्वानंदसमरसीं । निमग्न केल्या कां न म्हणा ॥३४॥
तिहीं ते देखोनि कृष्णमूर्ति । कैसी भोगिली निजविश्रांति । तें तूं ऐकें परीक्षिति । म्हणे भारती शुकाची ॥२३५॥

दृष्ट्वा मुहुः श्रुतमनुद्रुतचेतसस्तं तत्प्रेक्षणोत्स्मिंतसुधोक्षणलब्धमानाः ।
आनंदमूर्तिमुपगुह्य दृशात्मलब्धं हृष्यत्त्वचो जहुरनंतमरिंदमाधिम् ॥२८॥

अनंतजन्में श्रुति स्मृति । वर्णितां ऐकिली ज्याची कीर्ति । ते हे प्रत्यक्ष कृष्णमूर्ति । नारदोक्ति श्रुत होती ॥३६॥
वारंवार श्रवणेंकरून । पूर्वींच सवेघ होतें मन । मूर्ति अकस्मात देखोन । निर्भर पूर्ण उत्साहें ॥३७॥
विशेष सविलास तत्प्रेक्षण । हास्ययुक्त सुंदर वदन । तेंचि केवळ सुधासेवन । लाहोनि नयन निवाले ॥३८॥
मग त्या दृष्टिसम्मानप्राप्ता । स्मितावलोकनामृतें तृप्ता । नेत्रें प्राशूनि आंतौता । नेती एकांता हृत्पद्मीं ॥३९॥
फावलिया मानससदनीं । आनंदमूर्ति कवटाळूनी । निर्भर झाल्या आलिंगोनी । त्वचा थरकोनि हरिखेल्या ॥२४०॥
अरिंदम हे परीक्षिति । वामा पावोनि निजविश्रांति । अनंत जन्मींची वियोगखंती । ते निश्चिती टाकिली ॥४१॥
अरिंदम हें संबोधन । निर्जितषड्वैरी म्हणोन । शृंगाररसीं झणें निमग्न । होसी म्हणोन सुचविलें ॥४२॥
शृंगाररसभावें हे कथा । झणें घेसी धरित्रीनाथा । तरी दुर्जय काम उधवील माथा । मग सत्पथा अंतरसी ॥४३॥
अरिंदमसंबोधनें करून । ऐसें केलें सावधान । म्हणे राया हें निरूपण । शांत संपूर्ण वेदांत ॥४४॥
ऐशा आनंदनिर्भर नारी । हृदयीं आलिंगूनि श्रीहरि । प्रसन्नवदना कोणे परी । राममुरारी त्या यजिती ॥२४५॥

प्रासादशिखरारूढाः प्रीत्युत्फुल्लमुखांबुजाः । अभ्यवर्षन्सौमनस्यैः प्रमदा बळकेशवौ ॥२९॥

उभ्या होत्या प्रासादशिखरीं । गवाक्षद्वारीं कीं गोपुरीं । कृष्णप्रेमें त्या समस्त नारी । वक्त्रकह्लारीं प्रफुल्लिता ॥४६॥
रामकृष्णांवरी तिये समयीं । सुष्ठुं सुमनांची वृष्टि तिहीं । केली म्हणतांच राजा हृदयीं । शंकित होवोनि पुसतसे ॥४७॥
तनुविस्मृता धांवल्या नारी । तेव्हां सुमनें कैंचीं करीं । त्या वर्षल्या कवणे परी । हे अंतरीं मज शंका ॥४८॥
मुनि म्हणे गा श्रोतया चतुरा । प्रेमोत्कर्षें वधू निर्भरा । शोभनमानससुमनभारा । वर्षत्या झाल्या उह्लासें ॥४९॥
उत्फुल्ल प्रीतीच्या निर्भरीं । आनंदाश्रु वर्षती नेत्रीं । नेत्रकमळीं कृष्णावरी । वर्षती ऐसें न म्हणिजे ॥२५०॥
कीं हर्षें रोमांचित त्वचा । पुलक पाझर सुखस्वेदाचा । तोचि वर्षाव तत्सुमनांचा । प्रेमोत्साहें न मनावा ॥५१॥
नातरी सप्रेम सादर श्रवणें । सेवितां कृष्णाचें बोलणें । कळवळूनि अंतःकरणें । द्रवणें वृष्टिसम नोहे ॥५२॥
कीं कारुण्यें अंतःकरणीं । शोभन शब्द निघती वदनीं । ते अभीष्टवृष्टि गगनसुमनीं । केली म्हणोनि न मनावें ॥५३॥
एवं मनाचे शोभन भाव । सौमनस्य त्यांचें नांव । तिहीं वर्षल्या नारी सर्व । हें अपूर्व तुज कथिलें ॥५४॥
आणिक कित्येक वृद्ध पुरंध्री । लाजाक्षतासुमनोपचारीं । वळघल्या होत्या प्रासादशिखरीं । त्या हरीवरी वर्षल्या ॥२५५॥
कीं सुमनशब्दें जे सुरवर । तत्संबंधीं सुमनभार । तिहीं वर्षल्या प्रमदा अपार । ज्या निर्जरपुरवनिता ॥५६॥
एवं रामकेशवांवरी । सुमनीं वर्षल्या नरसुरनारी । पुढें चालतां कैटभारि । कैसा द्विजवरीं पूजिला ॥५७॥

दध्यक्षतैः सोदपात्रैः स्रग्गंधैरभ्युपायनैः । तावानर्चुः प्रमुदितास्तत्र तत्र द्विजातयः ॥३०॥

कनकरजतादि पर्यळीं । दध्यक्षतापुष्पीं फळीं । सुमनमाळा गंधें पिवळीं । आणि धवळीं श्रीगंधें ॥५८॥
धूपदीपादि सामग्री । खंडशर्करा तांबूलवस्त्रीं । शुद्धोदकें कनकपात्रीं । येती सामोरीं द्विजवृंदें ॥५९॥
राम गोपाळ श्रीपति । ईश्वरभावें द्विज पूजिती । शकुनार्थ दध्यक्षता अर्पिती । मग लेपिती विलेपनें ॥२६०॥
केशरतिलक रेखूनि भाळा । सर्वां कंठीं घालिती माळा । वरी उधळिती दिव्य परिमळा । फुलीं मोकळा वर्षती ॥६१॥
सधूपदशांगशळाका । उजळूनि साज्य त्रिवर्तिका । आर्द्र खाद्यें खर्जूरिका । पयःशर्करा नैवेद्य ॥६२॥
पनस कदळें आम्रफळें । द्राक्षें दाडिमें रायावळे । साखरनिंबें बोरें जांबळें । सेव्यें मृदुलें अर्पिलीं ॥६३॥
त्रयोदशगुणान्वित तांबूल । यथाशक्ति दक्षिणा विपुल । कर्पूरें नीराजिती सोज्वळ । पुष्पांजळि मंत्रपुष्पें ॥६४॥
उपायनें वस्त्राभरणें । प्रसाद मानूनि घेतलीं कृष्णें । द्विज संतोष पावूनि मनें । आशीर्वचनें ओपिती ॥२६५॥
ऐसे द्विजवर ठायीं ठायीं । हर्षें पूजिती शेषशायी । पुरजनवनिता आपुले ठायीं । चिंतिती कायी तें ऐका ॥६६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP