अध्याय ४१ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


देवदेव जगन्नाथ पुण्यश्रवणकीर्तन । यदूत्तमोत्तमश्लोक नारायण नमोऽस्तु ते ॥१६॥

देव म्हणिजे द्योतमान । दिविभुवन ज्यां वसतिस्थान । त्यांतें द्योतक चैतन्यघन । त्या तुज नमन देवदेवा ॥७५॥
अखिलजगाची नयनशक्ती । सत्तायोगें धरिसी पुरती । जगन्नाथ तूं जगत्पति । विदित विनति तुज माझी ॥७६॥
पुण्यरूप ज्याचें यश । जन्मकर्म लीलावेश । श्रवणें कीर्तनें निरसी दोष । निःश्रेयस निष्पादी ॥७७॥
तया पुण्यश्रवणकीर्तना । नमो नमो जी श्रीजनार्दना । जाणसी माझी विज्ञापना । अभीष्टज्ञा पुण्ययशा ॥७८॥
ययातिशापें समळ कुळ । स्वजन्में केलें त्रिजगीं धवळ । यालागीं कालत्रयीं मंगळ । नाम निर्मळ यदूत्तम ॥७९॥
अमळकीर्ति निगमप्रणीत । तो हा उत्तमश्लोकसंकेत । स्मृतिपुराणीं महर्षि गात । नमो अद्भुतऐश्वर्या ॥८०॥
नारायणा नरायतना । गुणभुतात्मक नारस्थाना । एवं नमन निर्गुणा सगुणा । संबोधूनि पृथक्त्वें ॥८१॥
अक्रूरें मानूनि आपुले मनीं । नामस्मरणीं अभिवंदूनी । भगवत्प्राप्ति अमृतदानीं । साधन याहूनि आन नसे ॥८२॥
म्हणोनि बहुधा संबोधनें । स्मरोनि करितां अभिवंदनें । कृपादृष्टीं जनार्दनें । पाहोनि वचनें बोलतसे ॥८३॥

श्रीभगवानुवाच - आयास्ये भवतो गेहमहमार्यसमन्वितः । यदुचक्रद्रुहं हत्वा वितरिष्ये सुहृत्प्रियम् ॥१७॥

श्रीकृष्ण म्हणे अक्रूरातें । मी येईन तव गृहातें । अग्रजें सहित येऊनि तेथें । अभीष्टातें पुरवीन ॥८४॥
परंतु यदुकुलमंडलद्रोही । जंववरी कंस वधिला नाहीं । तंववरी कोठें न वचें पाहीं । तें रहस्य कांहीं अवधारीं ॥८५॥
मी जाईन जयाच्या सदना । कंस तयाच्या करील कंदना । आणि विपरीत भेदभावना । तुझ्या ठायीं कल्पील ॥८६॥
यालागीं वधूनि यदुकुळद्वेष्टा । सदना येईन सहित श्रेष्ठा । सुहृदां आप्तां कनिष्ठां ज्येष्ठां । प्रिय अभीष्टा वोपीन ॥८७॥
ऐसी भगवन्मुखीं वाणी । अक्रूरें घेऊनि आपुले श्रवणीं । जैसा दुष्काळीं बुभुक्षु प्राणी । त्यागी जाणोनि विषान्न ॥८८॥

श्रीशुक उवाच - एवमुक्तो भगवता सोऽक्रूरो विमना इव ।
पुरीं प्रविष्टः कंसाय कर्मावेद्य गृहं ययौ ॥१८॥

शुक म्हणे गा कौरवराया । तैसा आग्रह सांडूनियां । अभिवंदूनि देवकीतनया । निघता झाला विमनस्क ॥८९॥
विमनस्काचे परी म्लान । कीं अभीष्ट प्राप्तीचें व्यवधान । मग मथुरापुरीं प्रवेशोन । कंसा जाऊन भेटला ॥९०॥
प्रभुत्वें जुहारूनियां कंस । समासें निवेदी कृतकर्मास । जे आज्ञेप्रमाणें उभयतास । घेऊन आलों भोजेंद्रा ॥९१॥
आणि नंदादि सर्व पशुप । नानाद्रव्यें रस अमूप । उपवनीं उतरले समीप । कथिलें संक्षेप कृतकर्म ॥९२॥
मग घेऊनि कंसाज्ञा । अक्रूर जाता झाला सदना । यानंतरें कुरुभूषणा । कृष्णाचरणा अवधारीं ॥९३॥

अथापराह्णे भगवान्कृष्णः संकर्षणान्वितः । मथुरां प्राविशद्गोपैर्दिदृक्षुः परिवारितः ॥१९॥

अक्रूरविसर्जनानंतर । अपराह्णकाळीं जगदीश्वर । साटोप साग्रज सानुचर । वयस्यभारवेष्टित ॥९४॥
देखावया मथुरापुरी । आवडी धरूनि अभ्यंतरीं । प्रेवशला कोणेपरी । तें अवधारीं कुरुभूपा ॥९५॥
जैसी कृष्णें देखिली पुरी । चौ श्लोकीं ते शुकवैखरी । वदली तैसें व्याख्यान चतुरीं । भाषाविवरीं परिसावें ॥९६॥

ददर्श तां स्फाटिकतुंगगोपुरद्वारां बृहद्धेमकपाटतोरणाम् ।
ताम्रारकोष्ठां परिखादुरासदामुद्यानरम्योपवनोपशोभिताम् ॥२०॥

गगनचुंबित महाद्वारें । रम्य स्फटिकांचीं गोपुरें । वज्रगोमेदपाचप्रवरें । रत्नविचित्रें खेवणिलीं ॥९७॥
गोपुरशिखरीं झळकती ध्वजा । सरत्नकलशा तेजःपुंजा । गमे पालविती अधोक्षजा । स्वधामवोजा पहावया ॥९८॥
विशाळ स्फटिकाच्या चौकटी । गणपति रेखिले ऊर्ध्वपाटीं । उभय विशाखउंबरवटीं । शोभा गोमटी जडिताची ॥९९॥
उभय विशाखमूळभागीं । क्षीरोदमथनोद्भवश्वेतांगी । स्फाटिकप्रतिमा दिग्गजलिंगीं । वज्रमणीचे चौदंती ॥१००॥
तयासेजीं उंबरवटा । कमठाकृति नील निघोंटा । अल्प उच्चता मध्यकोष्ठा । कीर्तिमुखें ते विशाळें ॥१॥
वल्ली कमळें शुक सारिका । जडित रत्नीं निर्मिल्या देखा । खणोखणीं चित्रपताका । पवनें लखलखा झळकती ॥२॥
चंड कपाटें पुरवघटित । वज्रमणीचे शंकु वृत्त । कीलकीलनें उत्कीलित । जेंवि निशांत रविउदयीं ॥३॥
रत्नजडित कनकपर्णें । मुक्तादामपाचकिरणें । खणोखणीं रम्य तोरणें । भासुर सदनें लाजविती ॥४॥
भंवते परिख वरुणालया - । सारिखे सजळ भरले राया । नक्रां मकरां यादोनिचयां । क्रीडावया विस्तीर्ण ॥१०५॥
उपपरिखांच्या परिधिवसें । दुर्गाग्रभाग अष्टांग दिसे । परप्रयत्ना असाध्य कैसे । दुर्गम जैसें मृत्युमुख ॥६॥
मूळपाषाण लोहबंदी । उपरी अष्टलोहांची वेदी । वप्रप्रकोष्ठीं संधीं संधीं । यंत्रसमृद्धि परहननीं ॥७॥
पाचपेरोजमरकतचर्या । शोभती दुर्गाग्रीं बरविया । काद्रव्यें फणा उभारलिया । जेंवि पहाया गरुडातें ॥८॥
परिखाप्रदेशीं उपवनें । पुष्पवाटिका सुगंध सुमनें । क्रमुक कदळी द्राक्षाविपिनें । श्रीसंपन्नें शोभती ॥९॥
जाई जुई मालती कुंद । बकुलसेवंतीचंपकवृंद । वायु सुगंध मंद मंद । झळके विशद निगूढत्वें ॥११०॥
ऐशा अनेक पुष्पयाती । फळसमृद्ध तरुवर किती । नगराभोंवत्या उपवनपंक्ती । सुरस शोभती जलसौख्यें ॥११॥
नगरापासूनि दुरी ना जवळी । रम्योद्यानें सुफळित फळीं । पनस अच्युत शाल शाल्मली । बदरी आंवळी अशोक ॥१२॥
ताल तमाल तील तिंतिणी जंबु । वट अश्वत्थ उंबर निंब । कपित्थ चंदन बिल्व कदंब । बहुविध निंबे लकुचादि ॥१३॥
मधु प्रियाळु श्लेष्मातकी । कुटज राजोदन केतकी । तूत तुरंज भल्लातकी । पार्यातकी वनशोभा ॥१४॥
ऐसीं उद्यानें अनेक । नगराभोंवतीं पृथक् पृथक । रहाट मोठा कूप तटाक । संपथ वापी पुष्करणी ॥११५॥
पक्षि विराव वनोपवनीं । भ्रमर गुंजारवती सुमनीं । किलकिलाती वानरश्रेणी । बहुविध प्राणी निवताती ॥१६॥
वनोपवनाभोंवत्या भिंती । द्वारें देहल्या बैठका निगुती । जलयंत्रांच्या ऊर्ध्वगती । विचित्र शोभती शालाग्रीं ॥१७॥
चौक रमणीय चैत्य वेदी । पाचस्फटिकमाणिक्यबंदी । वैदूर्यमणि जडिले संधीं । नुमजे कधीं दिनरजनी ॥१८॥
असो ऐसे नृपाराम । नगराभोम्वते उत्तमोत्तम । पाहता झाला मेघश्याम । नगरी परम शोभाढ्य ॥१९॥
ताम्र तार नारी पुरट । अष्टलोह आरकूट । तन्मयघटिता शाला निघोंट । वस्तुसंघाट साठविणें ॥१२०॥
धेनुमहिषीकुञ्जरशाळा । शकटशाकटीस्यंदनशाळा । अजाअविकक्रमेळशाळा । अश्वशाळा विस्तीर्ण ॥२१॥
देवागारें धर्मशाळा । मठ मठिका पर्णशाळा । वेदशास्त्राध्ययनशाळा । यज्ञशाळा प्रशस्ता ॥२२॥
चित्रविचित्र रंगशाळा । अस्त्रें शस्त्रें वस्त्रशाळा । रुग्णोपचारी भेषजशाळा । यंत्रशाळा सद्रव्या ॥२३॥
नाट्यशाळा नाटकशाळा । वाद्यशाळा वादकशाळा । नृत्यशाळा नर्तकशाळा । गायनशाळा गांधर्वी ॥२४॥
पारधीच्या समृद्धिशाळा । दस्युदमनादिबंदिशाळा । कुरंगव्याघ्रशुनकशाळा । गोळांगुळश्येमादि ॥१२५॥
अष्टादशधान्यसमृद्दि । धननिक्षेप महानिधि । ताम्रारकोष्ठा ये पदबोधीं । अर्थ ऐसा प्रकाशे ॥२६॥
सौरभ्यशाळा परिमळद्रव्यें । रसांचे संग्रह विविधें गव्यें । भांडागारें राजसेव्यें । जैसीं दिव्यें सुरसदनें ॥२७॥
बहुविध नेपथ्यमांदुसा । गगना न लगे सुवर्णकोशां । वैदूर्यरत्नांच्या अशेषा । संदोहशाळा भटगुप्ता ॥२८॥
आणिक कोणे प्रकारें पुरी । देखता झाला कैटभारि । ते पुरगर्भींची संपदाकुसरी । परिसिजे चतुरीं विशेषीं ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP