अध्याय ४१ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अक्रूर उवाच :- नाहं भवद्भ्यां रहितः प्रवेक्ष्ये मथुरां प्रभो ।
त्यक्तुं नार्हसि मां नाथ भक्तं ते भक्तवत्सल ॥११॥

म्हणे तुम्हांवीण मी सहसा । योग्य नव्हें मथुराप्रवेशा । जळावेगळा तळमळी मासा । व्याकुळ तैसा मम प्राण ॥४७॥
प्रभु समर्थ तूं ऐश्वर्यनिधि । गोपशैशव हे उपाधि । स्वभक्त टाकणें ऐसी बुद्धि । कोणें विधि आदरिली ॥४८॥
भक्तवत्सल तूं आमुचा नाथ । प्रभुत्वें ऐश्वर्यें समर्थ । असतां वियोगणें हा अर्थ । मज यथार्थ तर्केना ॥४९॥
सांडूनि सुहृद गोपगण । जातां संकोच मानी मन । समस्तीं यावें तरी तूं दीन । म्हणोनि अनुमान तर्किसी ॥५०॥
तरी तूं नाथ आमुचे शिरीं । तेणें सर्व समृद्धि घरीं । कोणेविसीं संकोच न करीं । सहपरिवारीं चालावें ॥५१॥

आगच्छ याम गेहान्नः सनाथान्कुर्वधोक्षज । सहाग्रजः सगोपालैः सुहृद्भिश्च सुहृत्तम ॥१२॥

साग्रज सुहृद सबल्लव । सहित यानें शकट सर्व । आश्रम सनाथ करूनि दैव । हें अपूर्व मज दावीं ॥५२॥
अपूर्व दैव म्हणसी कैसें । तरी सुहृत्तमें पुराणपुरुषें । मज गौरवावें विशेषें । श्रीजगदीशें अधोक्षजें ॥५३॥
बाह्य शरीराचे जे आप्त । सुहृद म्हणिजेती ते समस्त । तूं सर्वात्मक सर्वगत । परमपुरुषार्थ सुहृत्तम ॥५४॥
म्हणोनि सनाथ मजला करीं । आश्रमा येईं सहपरिवारीं । तेणें लाहीन ऐश्वर्यथोरी । कोणेपरी तें ऐक ॥५५॥

पुनीहि पादरजस गृहान्नो गृहमेधिनाम् । यच्छौचेनानुतृप्यंति पितरः साग्नयः सुराः ॥१३॥

गृहस्थधर्माचे अधिकारी । आम्ही गृहमेधी संसारी । आमुचे आश्रम पवित्र करीं । पदरजबारिकर्दमें ॥५६॥
सरज श्रीपदशौचोदक । पडतां ममांगणीं सम्यक । नांदीमुख अश्रुमुख । अर्यमाप्रमुख दिव्यपितर ॥५७॥
सोमप उश्मप बर्हिष्वद । मौनप सूक्तप अग्निष्वद । कव्यवाहनादि पितर विषद । अक्षय आनंद पावती ॥५८॥
गार्हपत्यादि समस्त अग्नि । तव पादाब्ज आवनेजनी । तृप्त होतां सर्वांयज्ञीं । अवभृथस्नानीं कृतपूत ॥५९॥
श्रीपदशौचोदकें करून । इंद्रप्रमुख सुरवरगण । अक्षय तृप्ति पावती पूर्ण । तैं तप कोण नाचरलों ॥६०॥
एवं त्रिलोकीतर्पण । घडलें तच्छ्रेयःसंपादन । ऐसे आश्रम करी पावन । पदरज क्षाळून आंगणीं ॥६१॥
आश्रममात्र पवित्र नव्हे । श्रीपदप्रक्षालनगौरवें । दुर्लभ ऐश्वर्य जोडे दैवें । तें आघवें अवधारीं ॥६२॥

अवनिज्यांघ्रियुगलमासीच्छ्लोक्यो बलिर्महान् । ऐश्वर्यमतुलं लेभे गति चैकांतिनां तु या ॥१४॥

अंघ्रियुगळ प्रक्षाळून । परम कीर्त्यर्ह होईन । अतुळ ऐश्वर्य लाहीन । आणि निर्वाणमोक्षश्री ॥६३॥
पूर्वीं अवनेजनें कोणासी । ऐश्वर्य जोडलें ऐसें म्हणसी । तरी तूं ऐकें हृषीकेशी । इयेविषीं निरोपितों ॥६४॥
वैरोचनि जो कां बळी । त्रिपादभूमिप्रदानकाळीं । तवांघ्रियुगळाच्या पाखाळीं । स्वकीर्ति धवळी जगत्त्रयीं ॥६५॥
आणि तूंतें काठीकार । करूनि अजस्र राखवी द्वार । विषम नमनी तव अंतर । जेंवि पिता पुत्रैश्वर्यें ॥६६॥
पिता पुत्राची सेवा करी । विषम न वटे उभयांतरीं । हेचि अतुलैश्वर्यथोरी । जे सत्ता तुजवरी ज्या विभवें ॥६७॥
ब्रह्मादिकांचेही माथां । अगाधैश्वर्यें जोडे सत्ता । परी तूंतें राबती अक्षोभता । हें ऐश्वर्यं तत्त्वता बळीचें ॥६८॥
आणि भोगूनि शक्रासन । सर्वथा बळीसी नाहीं पतन । एकांतीं कीं गति संपूर्ण । भक्तासमान नित्यमुक्त ॥६९॥
क्षीणपुण्यें इतर शक्र । पतन पावती अधोवक्त्र । बळी ते गतीसी नोहे पात्र । परम पवित्र सुश्लोक्य ॥७०॥

आपस्तेंऽघ्र्‍यवनेजन्यस्त्रील्लोंकाञ्शुचयोऽपुनन् । शिरसाधत्त याः शर्वः स्वर्याताः सगरात्मजाः ॥१५॥

तुझीं पादावनेजनजळें । त्रिलोकी पावन करिती अमळें । शिरीं धरिलीं जाश्वनीळें । आणि उद्धरिलें सगरात्मजां ॥७१॥
ऐसा तव पादप्रक्षालनें । श्लाघ्य संपन बहुकल्याणें । पावेन ऐसें कृपाळुपणें । कीजे म्हणोनि प्रार्थिलें ॥७२॥
मग विचारी अंतःकरणीं । जेथ कुंठित निगमवाणी । अनंतवदनीं शिणला फणी । तो कैं स्तवनीं स्तविजेल ॥७३॥
आतां नमनमात्रचि करणें । अभीष्ट जाणिजेल सर्वज्ञें । ऐसें विवरोनि अंतःकरणें । करी वंदनें तें ऐका ॥७४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP