यथाबुधो जलं हित्वा प्रतिच्छन्नं तदुद्भवैः । अभ्येति मृगतृणां वै तद्वत्त्वाहं पराड्मुखः ॥२६॥

मूधमति जैसा बाळ । जें कां जलोद्भव गोंडाळ । तेणें झांकलें त्यागूनि जळ । धांवे केवळ मृगतोया ॥४७॥
तैसा तुजसी पराड्मुख । होऊनि लटिकें संसारदुःख । अनुभवूं जातां पावे दुःख । परि विवेक दृढ नुपजे ॥४८॥
लटिकें म्हणसी संसारसुख । तरी कां होसी विषयोन्मुख । विषयत्यागीं काय अशक्य । तें तूं सम्यक अवधारीं ॥४९॥

नोत्सहेऽहं कृपणधीः कामकर्महतं मनः । रोद्धुं प्रमाथिभिश्चाक्षैर्ह्रियमाणमितस्ततः ॥२७॥

कृपणबुद्धीचें लक्षण । विषयवासनापंकें मलिन । म्हणोनि अविद्याकामकर्में मन । जालें क्षोभोन अनावर ॥२५०॥
विषय इंद्रियां वेधिती पूर्ण । इंद्रियां विषयांचें चिंतन । ऐसें परस्पराभिगमन । यालागीं मन अनिरुद्ध ॥५१॥
बलिष्ठें इंद्रियें नाटोपती । विषयवासनासमळ मति । म्हणोनि मनातें आकर्षिती । बळेंचि नेती इतस्ततः ॥५२॥
यालागीं आवरूं न शकेमन । ऐसाहे तव चरणा शरण । होवावयासि काय कारण । तें संपूर्ण अवधारीं ॥५३॥

सोऽहं तवांघ्र्‍युपगतोऽस्म्यसतां दुरापंतच्चाप्यहं भवदनुग्रह ईश मन्ये ।
पुंसो भवेद्यर्हि संसरणापवर्तस्त्वय्यब्जनाभ सदुपासनया मतिः स्यात् ॥२८॥

जो मी आकळूं न शके मन । ऐसाही तव चरणा शरण । म्हणसी अजिंक ज्याचें मन । तरी चरणा शरण तो कैसा ॥५४॥
ऐशिया परतंत्रा मजवरी । हा अनुग्रहचि तुझा हरि । येर्‍हवीं पदभजना अधिकारी । नोहे निर्धारीं मी देवा ॥२५५॥
अंतर्यामी तूं ईश्वर । तव पदभजनाचा अधिकार । असज्जनासि दुर्लभतर । अनुग्रह साचार मजवरी हा ॥५६॥
तव अनुग्रह पूर्ण असतां । तव पदभजनीं उपजे आस्था । म्हणसी संतकृपेनें हें साधतां । मज कां वृथा स्तवितोसी ॥५७॥
तरी जीवासि संसारनिवृत्ति । तव कृपेवीण नोहे निश्चिती । जैं तव कृपेची होय प्राप्ति । तैं उपजे मति सद्भजनीं ॥५८॥
अब्जनाभ हें संबोधन । जे नाभिपद्मीं पद्मासन । दृश्य द्रष्ट विश्वाभिमान । तो होय लीन कृपेनें ॥५९॥
कृपा करिसी तूं हृदयस्थ । तरीच आवडे परमार्थ । होऊनि भवविषयीं विरक्त । सत्पदनिरत तैं होय ॥२६०॥
ईश्वर अनुग्रह जोंवर न करी । तंव सद्गुरु न दिसे पृथ्वीवरी । आस्था न बैसे सच्छास्त्रीं । न रुचे मैत्री संतांची ॥६१॥
अंतरीं नुपजतां सद्भाव । प्रत्यक्ष भेटतां न नमी देव । काय कृष्णा तुज दानव । पुढें सावेव न देखती ॥६२॥
तस्मात् हृदयस्थ तूं भगवान । कृपेनें अनुग्रह करिसी पूर्ण । तैं मग आवडती सज्जन । त्यांचें भजन करूं लागे ॥६३॥
अनन्यभावें करितां सेवा । कृपानुग्रह करिसी तेव्हां । देती अक्षय चित्सुख ठेवा । भवहेलावा मग कैंचा ॥६४॥
एवं तवानुग्रह मात्र । करी सत्पदभजना पात्र । ब्रह्मावबोधें सोज्वळ नेत्र । तैं भवविचित्र भ्रमविना ॥२६५॥
ऐशिया कृपानुग्रहकरा । सत्पथबोधक जो अंतरा । तया घालूनि नमस्कारा । प्रार्थीं गिरा दो श्लोकीं ॥६६॥

नमो विज्ञानमात्राय सर्वप्रत्ययहेतवे । पुरुषेशप्रधानाय ब्रह्मणेऽनंतशक्तये ॥२९॥

विज्ञानमात्रा तुजकारणें । माझें नमन अक्रूर म्हणे । विज्ञानमात्र तो कैसा कोणें । पुसिजे प्रश्नें तरी ऐका ॥६७॥
सद्यःप्रसूत गर्भ पाहीं । प्रवृत्तिज्ञान नेणेचि कांहीं । परंतु स्वप्रत्यय त्याच्या ठायीं । असे कीं नाहीं विचारा ॥६८॥
सूर्यकांतींचा हुताशन । तेथ नसतांही इंधन । अव्यक्त असे भरूनि गगन । तेंवि विज्ञानमयमात्र ॥६९॥
मात्रशब्दें बोलिजे मान । विज्ञानमात्र तव परिमाण । सूर्यकांतज वेधी इंधन । तेंवि भवभानवेधक तूं ॥२७०॥
प्राकृतप्रवृत्तिविस्तार । कर पद अवयव जड शरीर । तद्रहित तूं विज्ञानमात्र । त्या नमस्कार तुज माझा ॥७१॥
सर्वग हृदयस्थ विज्ञानघन । सर्वप्रत्यया जो कारण । श्रोत्र त्वग् दृग् रसना घ्राण । ज्याचेनि सज्ञान स्वविषयीं ॥७२॥
अतएव सर्वप्रत्ययहेतु । तो तूं मुळींचा विज्ञानतंतु । ब्रह्मादितृणशाखापर्यंत । साक्षी संतत संस्करि ॥७३॥
स्थूळादिमहाकारणवरी । स्वप्रत्ययें अवस्था वरी । वर्तोनि जंगमीं स्थावरीं । देतां भंवरी भ्रमरहित ॥७४॥
पुरुषाशब्दें बोलिजे जीव । त्यासी सुखदुःखादि अनुभव । प्रापक जो त्या ईश्वर नांव । अविद्या स्वभाव काळ कर्म ॥२७५॥
प्रधान म्हणिजे तन्नियंता । नमो त्या तुज श्रीभगवंता । एवं प्रज्ञानाहूनि परता । तूं तत्त्वता परब्रह्म ॥७६॥
एवं ब्रह्म जें कां निर्गुण । अनंतशक्त्यात्मक परिपूर्ण । आदिमध्यान्तरहित जाण । तें प्रधान तुजमाजीं ॥७७॥
अनंता जे मायाशक्ति तुजमाजी तिची त्रिकाळवस्ती । मृगजळाचे प्रवाह दिसती । जेंवि गभस्तीमाजूनी ॥७८॥
एवं प्रधाना अधिष्ठान । विज्ञानमात्र तूं भगवान । त्या तुज माझें साष्टांगनमन । भवनिस्तरण तव नमनें ॥७९॥
अनंता नामें मायादेवी । प्रधानशब्दें जे बोलावी । तिचा प्रवर्तक गोसावी । तीतें चेष्टवी तो पुरुष ॥२८०॥
तिचें चेष्टारूप स्फुरण । काळ ऐसें त्या अभिमान । काळपुरुष आणि प्रधान । ब्रह्म परिपूर्ण अवघें तूं ॥८१॥
सर्वप्रत्ययासि तूं हेतु । बोलिले तें प्रतिपादितु । करी अच्युता प्रणिपातु । तो श्लोकार्थु अवधारा ॥८२॥

नमस्ते वासुदेवाय सर्वभूतक्षयाय च । हृषीकेश नमस्तुभ्यं प्रपन्नं पाहि मां प्रभो ॥३०॥

सर्व प्रत्ययाचीं कारणें । अंतःकरणादि कर्तृकरणें । ज्याचेनि तयां चेष्टणें । एकात्मपणें तव बोधें ॥८३॥
दृश्यपर्यंत अनुसर्जन । तत्संहर्ता संकर्षण । विषयस्फुरणें जो अभिधान । भासे भवभान ज्याचेनी ॥८४॥
तया भवभावा माझारी । अनुसंधानें प्रवृत्ति विवरी । ज्ञानें रक्षक सर्वांतरीं । तो निर्धारीं वासुदेव ॥२८५॥
सर्व संकल्पांचें जनन । जेथ होय तें अनावर मन । तो मनसिज तूं प्रद्युम्न । चाळक पूर्ण मनाचा ॥८६॥
ज्यातें रोधूं न शकती बुध । बुद्धिसाक्षी तो अनिरुद्ध । इत्यादि भेदीं जो अभेद । तो तूं प्रसिद्ध हृषीकेश ॥८७॥
एवं संहार अवन जनन । कर्मभेदें त्रिधाभिमान । व्यूहरूपी संकर्षण । हरि प्रद्युम्न अनिरुद्ध ॥८८॥
जे उत्पत्तिस्थितिलयकर । त्रिगुणावतारी विधि हरि हर । तो तूं व्यूहात्मक श्रीधर । परमेश्वर परमात्मा ॥८९॥
क्षयशब्दें बोलिजे धाम । सर्वभूतक्षय हें नाम । सर्वभूताश्रय जो परम । कीं विषयोद्गम जेथूनी ॥२९०॥
शब्दापासूनि होय गगन । स्पर्शापोटीं उपजे पवन । रूप प्रसवे हुताशन । रसीं जीवन प्रकाशे ॥९१॥
गंधापासूनि होय धरणी । एवं भूतें स्वकारणीं । तन्मात्राश्रय तो म्हणोनी । नामाभिधानीं भूतक्षय ॥९२॥
तन्मात्राश्रय जो अभिमान । तो बोलिला संकर्षण । विषयप्रलोभें होय निधन । तैं भूतसंहरण अविरुद्ध ॥९३॥
एवं सर्व सर्वात्मका । अक्रूर वंदूनि त्रिजगज्जनका । रक्षीं म्हणोनि श्रीपादुका । नमी मस्तका स्पर्शोनी ॥९४॥
एवं स्वचरणशरणा मातें । रक्षीं सिंपोनि कृपामृतें । हें प्रार्थन अनुचित येथें । कीं प्रभुत्वें तूतें करणेंचि ॥२९५॥
सूर्यासम्मुख जालियावरी । तो काय प्रकाशा आवरण करी । तेवीं शरणांतें अव्हेरी । मग कै थोरी प्रभुत्वा ॥९६॥
म्हणोनि प्रभु या संबोधनें । प्रपन रक्षीं नलगे म्हणणें । म्यां जें प्रार्थिलें अधीरपणें । तें साहणें सर्वज्ञा ॥९७॥
पंक्तीमाजी वाढितां अन्न । सर्वीं सरत्र समसमान । बाळ मागे करूनि रुदन । तेंवि प्रार्थन हें माझें ॥९८॥
अनन्यभावें शरणागत । त्यातें नुपेक्षीच समर्थ । मातें रक्षीं म्हणोनि येथ । भासे व्यर्थ मज माझें ॥९९॥
ऐसें अक्रूरें पुन्हा पुन्हा । प्रार्थना करूनि नमिलें चरणा । शुकें कथिलें मात्स्यीरमणा । त्या व्याख्याना निरोपिलें ॥३००॥
वक्ष्यमाण कथा पुढें । एकेचाळिसाव्या माजी उघडे । प्रमेय कथिजेल तें निवाडें । श्रोतीं रोकडें परिसावें ॥१॥
प्रवेशतां मथुरापुरीं । बलिप्रदानीं रजक मारी । पुढें वायकमाल्यकारीं । विनयें हरी तोषविला ॥२॥
अक्रूराशीं ऐश्वर्य पूर्ण । दावूनि केलें शंकाहरण । मथुरेमाजी प्रवेशून । निववी स्वजन तें ऐका ॥३॥
कृष्ण आनंदाचा कंद । रजक स्वदोषें पावेल वध । वायका माल्यकारा वरद । कंसाविरुद्ध मखभंगें ॥४॥
हे सविस्तर पुढें कथा । सावध होऊनि परिसिजे श्रोतां । न कीजे अपवर्गाची चिंता । सप्रेम रुचतां हरिगरिमा ॥३०५॥
ब्रह्मांडभरित प्रतिष्ठानीं । एकनाथ साम्राज्यदानी । चिदानंदाच्या आसनीं । स्वानंदभुवनीं शोभतसे ॥६॥
गोगणपति गोविंदराव । करितां कृपामृतवर्षाव । उचंबळला दयार्णव । कथागौरव तें भरितें ॥७॥
तें हें श्रीमद्भागवत । अशेष शब्दब्रह्ममथित । अष्टादशसहस्रमित । सार व्यासोक्त नवनीत जें ॥८॥
शुकें नृपाचे श्रवणवदनीं । सप्रेम भरितां सप्तदिनीं । पुष्टि बाणली सायुज्यसदनी । ब्रह्मांडभुवनीं न समाये ॥९॥
त्यामाजील हा स्कंध दशम । अक्रूरें स्तविला पुरुषोत्तम । श्रवणमात्रें पुरती काम । अध्याय उत्तम चाळिसावा ॥३१०॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्‍यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां श्रीकृष्णस्तवनं सगुणनिर्गुणद्विप्रकाराक्रूरेण कथनं नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४०॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥३०॥ टीका ओव्या ॥३१०॥ एवं संख्या ॥३४०॥ ( चाळिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १८५७५ )

चाळिसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP