एके त्वाखिलकर्माणि संन्यस्योपशमं गताः । ज्ञानिनो ज्ञानयज्ञेन यजंति ज्ञानविग्रहम् ॥६॥

विरक्तिसद्रृहणीं गृहस्थ । निरुपाधिकता प्रायश्चित्त । ज्ञानाहिताग्नि सद्गुरुनाथ । त्यापें दीक्षित तदनुज्ञा ॥७७॥
आपातताखिल वेदार्थ । श्रवणसूत्रें भूपरमित । काम्यें निषिद्धें पैं उज्झित । अस्थिशकलें कपालें ॥७८॥
न्तियनैमित्तिक जें कां कर्म । सार्द्र प्रायश्चित्त निष्काम । औपासनार्थ धरूनि प्रेम । वेदीं उत्तम चित्तशुद्धि ॥७९॥
सविक्षेप जो ज्ञानानळ । तो त्यागूनि लौकिक समळ । हृदयारणिमथनें अमळ । सूक्ष्म तत्काळ प्रकटिला ॥८०॥
पंचविषयीं निर्विकार । तेचि पंचभूसंस्कार । साधनचतुष्टयसंभार । केली सुंदर आसादनी ॥८१॥
विवेकाध्वर्यु स्थापिला । विचारब्रह्मा प्रतिष्ठिला । नियमहोता तेथें केला । निश्चय जाला उद्गाता ॥८२॥
संचित प्रारब्ध क्रियमाण । प्रधानहवि अभीगारून । निजात्मप्रत्ययमंत्रपठन । उपशमासन यजमाना ॥८३॥
प्रथम जे कां द्वेषराग । होमिले आघाराज्यभाग । तदुपरि अधिकार जाला चांग । सांगोपांग अवदानीं ॥८४॥
स्वगतभेदाची निवृत्ति । तेचि यज्ञीं पूर्णाहुति । अवशिष्ट जे आत्मस्थिति । इळोपहुति स्वच्छंदें ॥८५॥
नित्यानंदाचें अवतरण । तेंचि पुरोडाशप्राशन । ज्ञप्तिप्रत्यय विसर्जून । अवभृथस्नानपूर्णता ॥८६॥
ऐसा करूनि ज्ञानयज्ञ । यजिती ज्ञानात्मा भगवान । तेणें पावले निर्वाण । संसृतिभानवर्जित जे ॥८७॥
अहंदुर्ब्राह्मण्य गेलें । सोहंदीक्षितपण जें आलें । तेंही पूर्णत्वीं मुरालें । मग संचलें शांतिसुख ॥८८॥
ऐसे एक ज्ञानाध्वरी । एक ते उपासनाप्रकारीं । उपासिती तूंतें हरि । तें अवधारीं दों श्लोकीं ॥८९॥

अन्ये च संस्कृतात्मानो विधिनाभिहितेन ते । यजंति त्वन्मयास्त्वां वै बहुमूर्त्यैकमूर्तिकम् ॥७॥

त्यामाजि प्रथम वैष्णवधर्म । विष्णूपूजन यथानुक्रम । प्रातःकृत्यादि आह्निककर्म । विष्णुपरमसद्भाव ॥९०॥
वर्तमान भूत भाव्य । ते अखिलादिपुरुष एव । येर मायिकअभाव । दृश्य सर्व भवभ्रम ॥९१॥
गुरूपसादनदीक्षागृहीत । देहादिमनोबुद्धिपर्यंत । श्रद्धापूर्वक संस्कारवंत । अतंद्रिय अनुसरले ॥९२॥
शब्दार्थ श्रोता श्रवण विष्णु । स्पर्श स्पर्शज्ञ त्वग् भगवानु । दृश्य दृग् द्रष्टा दर्शनु । मधुसूदन परमात्मा ॥९३॥
रस रसना रसाभिज्ञ । गंध घ्राता घ्रातव्य घ्राण । सर्व सर्वग जनार्दन । भज्य भजन भजकात्मा ॥९४॥
ऐसे सबाह्य सर्वावयव । जाणती अभेद वासुदेव । पुढती भजनाचें लाघव । पृथग् जाणीव वर्ते तो ॥९५॥
अंतःकरण केवळ विष्णु । जेथ सुषुप्त करनगुण । लीन झालिया प्राज्ञाभिमानु । आनंद अभिन्न उपासिती ॥९६॥
ईशन्मात्र मानस जागें होतां । भगवद्भजनानुरागें । संकल्प उठती संस्कारवोघें । नोहे वावुगें विक्षिप्त ॥९७॥
तेथ प्रकाशे स्वप्नावस्था । देखें सिंहासनीं हृदयस्था । आपण आचरे अर्चनपथा । यथोक्त आस्थापूर्वक ॥९८॥
किंवा भगवद्गुणगणमाळा । पढोनि तोषवी हरिजनमेळा । अथवा हरियश हरिप्रेमळा । गातां जिव्हाळा तच्छ्रवणीं ॥९९॥
अथवा देखे पर्वोत्सव । विष्णुक्षेत्रें यात्रा गौरव । संत सज्जन महानुभाव । स्निग्ध लाघव भक्तीचें ॥१००॥
अथवा प्रत्यक्ष कृष्णमूर्ति । प्रकटली भजनाच्या एकांतीं । तिनें स्पर्शोनि अमृतहस्तीं । केली विश्रांति भवविलयें ॥१॥
ऐसे संकल्प असंख्य । मानस प्रसवे भजनोन्मुख । स्वप्नामाजीही भजनसुख । भोगी विमुख विषयीं ॥२॥
बुद्धि जागिन्नलिया तेथ । विश्वाभिमान होय जागृत । तैं गुरूपदिष्ट निश्चयकृत । भगवच्चरित अवलोकीं ॥३॥
व्यक्तिरेकान्वय ओतप्रोत । भगवत्तत्त्व सुनिश्चित । येर मायाभ्रमनिर्मित । दृश्य समस्त बहुरूप ॥४॥
त्यामाजीही प्रियतम चित्ता । भगवद्गुणयशोमंडित कथा । येर विरसा नवरसवार्ता । ज्या वीथिस्था नागरी ॥१०५॥
नमन साष्टांग लोटांगण । भगवन्मूर्ति भगवज्जन । तत्संस्पर्शें तोषगहन । अंगनालिंगन प्रिय न वटे ॥६॥
जितुकें दृश्य रूपा आलें । तितुकें भगवन्मय भाविलें । भवभावनें शून्य पडिलें । चित्त जडिलें हरिरूपीं ॥७॥
सुनीळ दिसतां दृष्टीपुढें । कृष्णरूपचि भासे उघडें । पीत पीतांबर पडिपाडें । वाडेंकोडें अनुभविती ॥८॥
श्वेतभगवद्दर्शनदीप्ति । अरुण तितुकी अधरोष्ठकांति । रक्त हरिपदतळभा म्हणती । कृष्ण कल्पिती कुंतळभा ॥९॥
मिश्रप्रभा शिखंडचूड । रुक्मललामश्रेणि सुघड । हरित वनमाळेचा उघड । फाके उजेड चहूंकडे ॥११०॥
नेत्रगोचर ऐसें पाहतां । हरिरूपाची स्मृति ये चित्ता । दृश्य भवभान नुघवी माथा । एकात्मता हरिरूपीं ॥११॥
रसना रसाभिज्ञपणें । रसाळ हरिसुख चाखों जाणें । तृप्त सर्वदा स्वानंदपानें । जगज्जीवनें टवटवीत ॥१२॥
गोड अवघा हरिचिद्रस । भवभावना बाकस फोस । घ्राण दर्शन आदिपुरुष । पुण्यगंध पृथ्वीचा ॥१३॥
ऐशिया वोजा भगवन्मय । अवघा इंद्रियसमुच्चय । नेणे वावुगी विषयसोय । सदा तन्मय हरिरंगीं ॥१४॥
वाणी नामस्मरणीं निरत । गुणकीर्तनीं अतंद्रित । हरियसःकथनीं प्रेमाद्भुत । आनंदभरित तद्योगें ॥११५॥
विजातीय म्हणोनि पक्षी । मनुजसंवादा उपेक्षी । अवघें जनपद तैसें लक्षी । प्रवृत्तिपक्षीं व्यवहारीं ॥१६॥
न मिळे वावुगा संवादा । वृथा उत्तर नेदी शब्दा । नामस्मरण कां कीर्तनधंदा । सदा सर्वदा वैखरी ॥१७॥
साबरागमी जैसा ग्रहणीं । साबरमंत्र जपतां वाणीं । मानस रक्षी सावधपणीं । हरिगुणपठनीं तेवीं सदा ॥१८॥
स्वप्नीं देखे पर्वोत्सव । तो जागृतीचा परिणामभाव । जागृदवस्थेचे व्यवसाव । स्वप्नीं सावेव प्रकटती ॥१९॥
एवं कर्मेंद्रियप्रवृत्ति । चाले हरिचर्यापथीं । कोणे काळीं न पदे रिती । भोगी विश्रांति तद्योगें ॥१२०॥
विधिपूर्वक जो अभिहितपथ । ऐका तयाचाही अर्थ । वैखानसादि भागवत । कीं नारदप्रणीत पांचरात्र ॥२१॥
अक्रूर म्हणे श्रीभगवंता । तुवां निर्मिल्या भजनपथा । अनुष्ठिती जे एकात्मता । निरसूनि वार्ता भेदाची ॥२२॥
संकर्शण श्रीवासुदेव । प्रद्युम्नानिरुद्ध चतुर्व्यूह । बहुधा भेद एकात्मभाव । भजती सावेव सप्रेमें ॥२३॥
एक नारायणोपनिषद । जैसा प्रकटी अर्थविशद । आत्मा नारायण अभेद । सच्चिदानंद उपासिती ॥२४॥
ऐसे वैष्णवधर्में भजती । त्यांसी अभेद एकात्मरति । अस्त पावली संसृति । हें काय पुढती बोलावें ॥१२५॥

त्वामेवान्य शिवोक्तेन मार्गेण शिवरूपिणम् । बह्वाचार्यविभेदेन भगवन्समुपासते ॥८॥

आणि तूंतेंचि शैवागमें । एक भजती विध्युक्त नेमें । निरूपिजती ते अनुक्रमें । पुरुषोत्तमें परिसावें ॥२६॥
शिवप्रणीत मार्गेंकरून । बहुतां आचार्यापासून । करिती बहुविधदीक्षाग्रहण । यजिती भगवान शिवरूपी ॥२७॥
शिवचिह्नित कापालिक । प्रसाद पाशुपद कौळिक । दिगंशुकी भैरवप्रमुख । माहेश्वरादि शांभव जे ॥२८॥
ऐसे बहुविध भेदेंकरून । उपासिताती तुजलागून । त्यांसि ही न बाधी पुनरागमन । कीं झालिया अभिन्न तव बोधें ॥२९॥
सप्रेमनिष्कामभजनानंद । यास्तव अपरोक्षज्ञानावबोध । तरीच तुटे भवमूळकन्द । येर निषिद्ध पाखंड ॥१३०॥
असो ऐसे वैष्णव शैव । देवताबुद्धिपृथग्भाव । धरूनि यजिती जे स्वमेव । तें तें सर्व तुज अर्पे ॥३१॥

सर्व एव यजन्ति त्वां सर्वदेवमयेश्वरम् । येऽप्यन्यदेवताभक्ता यद्यप्यन्यधियः प्रभो ॥९॥

विष्णु शंकर गजानन । भर्ग भगवती पंचायतन । कीं इंद्राग्नी सोम वरुण । भिन्न भिन्न उपासिती ॥३२॥
परी तूं सर्वात्मा सर्वेश्वर । यास्तव तुज ते सर्वोपचार । जर्‍ही ते पृथद्गेवतापर । भावनांकुर बुद्धीचे ॥३३॥
क्षुद्राक्षुद्रदेवताभक्त । परी तें तवार्चनचि समस्त । सर्वात्मका तूं म्हणसी येथ । तरी उपासकांत विरोध कां ॥३४॥
आपुलालिया उपासना । अवलंबिती मतें नाना । धरूनि तेथींचिया अभिमाना । अन्यत्र भजना दूषिती ॥१३५॥
ऐसें केवीं एकात्मते । लाहोनि भजती मज एकातें । ऐसें न म्हणावें समर्थें । कारण यातें तें ऐक ॥३६॥
सकाम वासनेचिया बीजा । धरूनि क्षुद्रां करिती पूजा । परी त्या भजना फळद बोजा । गरुडध्वजा तूं ऐक ॥३७॥
आवडतीं बीजें पेरिलीं मळां । आवडीसारिख्या देती फळा । परी तें पासूनि एका जळा । फळद सकळा तूं तैसा ॥३८॥
क्षुद्र वासना सकाममति । क्षुद्र देवता आराधिती । सर्वग चैतन्यात्मक वसति । तुझी त्यांप्रति अनोळख ॥३९॥
निर्दैवा हस्तीं चिन्तामणि । परी तो नेणें त्या लागोनी । मानी हननीं ओठंगणीं । तो फळदानी तितुकाची ॥१४०॥
तैसे होऊनि कामनापर । क्षुद्राराधनीं । अतितत्पर । अर्पिती शुभाशुभ उपचार । निष्ठा अघोर फळलोभें ॥४१॥
त्यां तीं फळें तुजपासून । परी ते म्हणती क्षुद्राधीन । जेंवि पाखंडी गंगावन । विहिरे करून प्राशिती ॥४२॥
ऐसे सकाम विविधा यजनीं । यजती मनीषाभदें करूनी । तें सर्वगा तुज लागोनी । अर्पें म्हणोनि फळ जोडे ॥४३॥
फलद तूं ज्यां जैसी बुद्धि । ते मानिती तत्कर्मसिद्धि । यास्तव क्षुद्रांची प्रसिद्धि । परी ते निरवधि तुज अर्पे ॥४४॥
एथ दृष्टान्त बोलिला शुक । तो परिसिजे श्रोतीं श्लोक । येक्या सिक्थें चरु सम्यक । पक्वापक्क जाणों ये ॥१४५॥

यथाद्रिप्रभवा नद्यः पर्जन्यापूरितां प्रभो । विशन्ति सर्वतः सिन्धुं तद्वत्त्वां गतयोन्ततः ॥१०॥

त्रयी सांख्य कां विविध योग । शैव वैष्णवी दीक्षा चांग । वाम दक्षिण बहुविध मार्ग । जेंवी सरितावोघ ऋजु कुटिळ ॥४६॥
आवडीची विचित्र गति । तदनुसार भजकांप्रति । सरळ वक्र मार्गें भजती । परी हळद अन्तीं तूं त्यांतें ॥४७॥
अद्रीपासूनि जेंवि सरिता । पूर्ण पर्जन्योदकें भरिता । वामदक्षिण ओघें त्वरिता । मिळती तत्त्वता सिंधूतें ॥४८॥
कुटिळ सरळ भजनवोघ । परि सप्रेमजळा चपळवेग । तेणें मिळती ते सवेग । चैतन्याब्धि तुजमाजी ॥४९॥
ऐसा सर्वत्र सर्वदा भजना । सर्वां सुलभ सर्वात्मना । हेतु तेथींच्या व्याख्याना । परिसा श्रवणा वसवूनी ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP