अध्याय ३९ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


निमज्य तस्मिन्सलिले जपन्ब्रह्म सनातनम् । तावेव ददृशेऽक्रूरो रामकृष्णो समन्वितौ ॥४१॥

निमज्य उन्मज्य वारत्रय । पूर्णांजलि भरोनि तोय । स्नानीं प्रयोग पढता होय । देशकालादि स्मरोनी ॥६७॥
पुन्हा करूनि निमज्जन । अघमर्षण सूक्तपठन । करितां कृष्णीं झळंबे मन । तें लक्षण अवधारा ॥६८॥
रामकृष्ण कोमळ बाळ । चाणूर मुष्टिक जैसे काळ । त्यांपें नेतों मीं चांडाळ । केवळ खळ शिशुघाती ॥६९॥
कोणीकडे हे शिशु सुकुमार । मल्ल कोठें वज्रकठोर । अपाड त्यांसि जानोनि समर । हे शंका अक्रूर अवलंबी ॥३७०॥
तें जाणूनि जगत्पति । करावया शंकानिवृत्ति । अघमर्षणीं अक्रूराप्रति । ऐश्वर्यशक्ति प्रकाशी ॥७१॥
जळीं निमग्न पाहे नेत्रीं । रामकृष्ण कोमळगात्री । कां पां आले जळान्तरीं । म्हणोनि अंतरीं दचकला ॥७२॥

तौ रथस्थौ कथमिह सुतावानकदुंदुभेः । तर्हि स्वित्स्यंदने न स्त इत्युन्मज्य व्यचष्ट सः ॥४२॥

प्रार्थूनि रथीं म्यां स्थिर केले । जळामाजीं कैसे आले । तरी रथीं नसती म्हणोनि पाहिले । उन्मज्जन करूनियां ॥७३॥

तत्रापि च यथापूर्वमासीनौ पुनरेव सः । न्यमज्जद्दर्शनं यन्मे मृषा किं सलिले तयोः ॥४३॥

तंव रथींहि यथास्थित । आनकदुंदुभीचे सुत । बैसले देखोनि अक्रूरचित्त । परम विस्मित पैं झालें ॥७४॥
मग म्हणे मज सलिलीं यांचें । दर्शन झालें असे साचें । तें काय मृषा या संशयाचें । निवारण करावया ॥३७५॥
पुन्हा तैसाचि यमुनाजळीं । पाहे देऊनिया बुटकळी । तंव तो साग्रज वनमाळी । जळीं स्थळीं समगमला ॥७६॥

भूयस्तत्रापि सोऽद्राक्षीत्स्तूयमानमहीश्वरम् । सिद्धचारणगंधर्वैरसुरैर्नतकंधरैः ॥४४॥
सहस्रशिरसं देवं सहस्रफणमौलिनम् । नीलांबरं बिसश्वेतं शृंगैः श्वेतमिव स्थितम् ॥४५॥

भूयः म्हणिजे तेथेंचि पुन्हा । पाहे निश्चळ करूनि नयना । देखता झाला शेषशयना । त्या विवरणा अवधारा ॥७७॥
द्वादशश्लोकपर्यंत ध्यान । वदला व्यासाचा नंदन । त्यांत दों श्लोकीं संकर्षण । भगवद्वर्णन दशश्लोकीं ॥७८॥
अहि म्हणिजे पन्नगयाति । अहीश्वर तो पन्नगपति । त्यातें अक्रूर कोणे रीती । कोणे स्थिती पाहतसे ॥७९॥
सहस्रशीर्ष विशालतनु । सहस्र म्हणिजे गणनाहीनु । सहस्रशब्दाचें व्याख्यान । अनंत म्हणोनि श्रुति वदती ॥३८०॥
सहस्रशीर्ष जो कां पुरुष । सहस्रपाद सहस्राक्ष । या श्रुत्यर्थामाजि दक्ष । अनंत अलक्ष लक्षिती ॥८१॥
ज्यासि असतीं सहस्र शिरें । दोन सहस्र त्या असावीं नेत्रें । तस्मात् अनंत ऐसा चतुरें । सहस्रवाचक विवरावा ॥८२॥
आणि ते यमुनेचिया ह्रदीं । अक्रूरें मस्तक मोजिले कधीं । मग ते सहस्रगणनाशब्दीं । वदला सुबुद्धि शुक वक्ता ॥८३॥
एवं अनंत संकर्षण । प्रतिमस्तकीं शोभती फण । तद्युक्त मौळीं मणिभूषण । श्वेत संपूर्ण तनुशोभा ॥८४॥
पद्मफुल्लारविसभासुर । तैसा श्वेतमस्तकनिकर । सहस्रशृंगी जेंवि गिरिवर । रजताकार कैलास ॥३८५॥
एवं श्वेतशरीर पूर्ण । परिधान केलें नीलवसन । उदयाद्रिच्छायाचंडकिरण - । मंडित जैसा क्षीराब्धि ॥८६॥
ऐसा साम्बर सालंकार । ज्यातें स्तविती निर्जर असुर । सिद्धचारणगंधर्वनिकर । नतकंधर होत्साते ॥८७॥
सबाह्य भासुर सर्वांकडे । सर्व प्रकाशी निजउजिवडें । यालागीं देव म्हणणें घडे । कोणीं वांकुडें न म्हणावें ॥८८॥
ऐसा अहीश्वर संकर्षण । त्यावरी कैसा श्रीभगवान । दहा श्लोकीं तें व्याख्यान । अन्वय संलग्न एकादशीं ॥८९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP