अध्याय ३९ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - सुखोपविष्टः पर्यंके रामकृष्णोरुमानितः । लेभे मनोरथान्सर्वान्पथि यान्स चकार ह ॥१॥

शुक म्हणे गा परीक्षिति । रामकृष्णें अक्रूराप्रति । जेंवि विधि हर विष्णु पूजिती । तैसिया भक्तीं पूजिलें ॥२६॥
वृद्ध आप्त गुरुसमान । अनन्य भावें सम्मानून । मंचकीं बैसविला वंदून । सुखसंपन्न तद्योगें ॥२७॥
सुखें उपविष्ट पर्यंकीं । भावी हृत्कमळीं श्वाफल्कि । पथीं कल्पना केली जितुकी । कृष्णें तितुकी पुरविली ॥२८॥
जे जे इच्छिले मनोरथ । ते ते लाभलों मी समस्त । प्रत्यक्ष भेटलिया भगवंत । अलभ्य त्रिजगांत मग काय ॥२९॥

किमलभ्यं भगवति प्रसन्ने श्रीनिकेतने । तथापि तत्परा राजन्नहि वांछति किंचन ॥२॥

ऐसा अक्रूर कुरुनरेशा । कृष्णें मानिता परमोह्लासा । पावोनि विसरला भवपथक्लेशा । अन्य दुराशां समवेत ॥३०॥
राया नवल काय यदर्थीं । प्रसन्न जाहालिया कमलापति । काय अलभ्य भक्तांप्रति । ये त्रिजगतीमाजिवडें ॥३१॥
ज्याचे चरणीं श्रीचें धाम । जो कां अवाप्तपूर्णकाम । तो तुष्टल्या पुरुशोत्तम । काय दुर्गम अप्राप्त ॥३२॥
तथापि राया भगवत्पर । निष्काम भक्त निर्विकार । न धरिती कांहीं वांछा मात्र । कीं जालें पात्र प्रेमाचें ॥३३॥
निष्काम भक्तांचिये द्वारीं । स्वयें परमात्मा आज्ञाधारी । न वांछितां सर्व सामग्री । अर्पूनि करी परिचर्या ॥३४॥
बाळ न मागतां आंगी टोपी । अळंकारेंशीं माता वोपी । अनन्यभावास्तव ते जोपी । तेंवि संगोपी श्रीपति ॥३५॥
एवं जे जे निष्काम भक्त । तांसी संगोप्ता भगवंत । काय तयांसी अप्राप्त । ते संतृप्त हरिप्रेमें ॥३६॥
शुकें ऐसा भगवन्महिमा । आणि भक्तांचा निष्काम प्रेमा । निरोपूनियां नृपसत्तमा । कथानुक्रमा सांगतसे ॥३७॥

सायंतनाशनं कृत्वा भगवान्देवकीसुतः । सुहृत्सु वृत्तं कंसस्य पप्रच्छान्यच्चिकीर्षितम् ॥३॥

तोषवूनियां अक्रूराशीं । नंद बाळराम हृषीकेशी । करिते झाले भोजनाशी । सायंतनीय विध्युक्त ॥३८॥
ऐशीं करूनियां भोजनें । तांबूल घेऊनि धरिलीं वसनें । मग अक्रूरासन्निध रामकृष्णें । स्नेहविधानें जाऊनी ॥३९॥
भूतभविष्यवर्तमान । षड्गुणैश्वर्यसंपन्न । सर्ववेत्ता श्रीभगवान । देवकीनंदन जगदात्मा ॥४०॥
तो कंसाचा अभिप्राव । आणि ज्ञातीसी सुहृद्भाव । इत्यादि वृत्तांत अक्रूरा सर्व । पुसता झाला एकांतीं ॥४१॥
आणि अक्रूराचें अभ्यंतर । अवंचक्रभावाचा प्रकार । प्रकटावया कंसविचार । पुसे सविस्तर कर्त्तव्य ॥४२॥
त्याचि कृष्णाच्या प्रश्नोक्ति । चौं श्लोकीं निरोपिजेती । राया ऐकें सादरवृत्तीं । म्हणे सुमति शुक वक्ता ॥४३॥

श्रीकृष्ण उवाच - तात सौम्याऽगतः कच्चित्स्वागतं भद्रमस्तु वः । अपि स्वज्ञातिबंधूनामनमीवमनामयम् ॥४॥

कृष्ण अक्रूरा करी प्रश्न । तात म्हणोनि संबोधून । क्षेमरूप कीं आगमन । भद्र कल्याण असे कीं ॥४४॥
कुशल असे कीं परिवार । कुशल स्वागत पथसंचार । कुशल प्रज्ञा प्रताप शरीर । कुशल मत्पर स्नेह कीं ॥४५॥
आणि स्वज्ञाति स्वबंधूंसी । अनमीव असे कीं सर्वांसी । अनामय ही समस्तांसी । असे म्हणोनि पुसिलें ॥४६॥
स्वज्ञाति म्हणिजे सुहृद सापिंड । बंधूसंबंधी असा पिंड । ज्ञातिसमुच्चय उदंड । सात्वत वृष्णि कुकुरादि ॥४७॥
अमीव पातकांचें नांव । तद्विपरीत तें अनमीव । एवं यदुकुळ निष्पाप सर्व । पुसे माधव कृपेनें ॥४८॥
निष्पाप म्हणिजे पुण्यवंत । पुण्यफलोदय आनंदभरित । एवं यदुकुळ क्लेशातीत । पुसे अच्युत या भावें ॥४९॥
आरोग्य म्हणिजे अनामय । पुसे यदूचा अन्वय । ऐसा येथींचा अभिप्राय । जें मुख्य आमय हृद्रोग ॥५०॥
असतां कंसाचे संगतीं । दुर्लभ यदुवंशा विश्रांति । या लागीं आमुच्या सर्वज्ञाति । भोगिती विपत्ति सर्वदा ॥५१॥
विपत्ती वरपडला जो प्राणी । तैं त्या सहजचि स्वधर्महानि । घडती पातकांच्या श्रेणी । पुसिलें म्हणोनि अनमीव ॥५२॥
हृदयीं जागतां मरणभय । मग त्यां कैंचें अनामय । याचि उघडा अभिप्राय । पुसे यदुराय तें ऐका ॥५३॥

किं नु नः कुशलं पृच्छे एधमाने कुलामये । कंसे मातुलनाम्न्यंग स्वानां नस्तत्प्रजासु च ॥५॥

अक्रूरा कोमळ आमंत्रण । अंग शब्दें करी कृष्ण । म्हणे सखया तुजलागून । काय म्हणोन पुसतों मी ॥५४॥
हें तंव सर्वांसि दिसे प्रकट । कंस सप्रताप वरिष्ठ । सर्वज्ञातींसी रोग स्पष्ट । वाढला असतां सुख कैंचें ॥५५॥
आमचा नाममात्र मातुळ । एर्‍हवीं हा घातक काळ । त्याच्या प्रजा आमुचें कुळ । त्या कें कुशल तो असतां ॥५६॥
हें म्यां काय तुम्हांसि पुसणें । अहो ऐसें खेदें म्हणे । देवकीवसुदेवां कारणें । कंसें जाचणें किमर्थ ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP