अध्याय ३९ वा - आरंभ

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीकृष्णानाथाय नमः ॥
सज्जनचक्रचकोरचंद्रा । नमो गोविंदा देशिकेंद्रा । तुझी लाहतां वरदमुद्रा । भवसमुद्रा जड तरती ॥१॥
सद्गुरुभजनीं जे अवक्र । तत्समुदाय सज्जनचक्र । त्यातें तोषक अमृतकर । अनंद सधर श्रीमूर्ति ॥२॥
श्रीपदनमनमात्रें दास । देशिकेंद्रा तव आदेश । लाहतां निर्भय कळिकाळास । भवभय त्यास मग कैंचें ॥३॥
ब्रह्म निर्गुण निराकार । करितां स्वगत अंगीकार । शुद्ध सत्त्वात्मक ईश्वर । कर्ता गोप्ता सर्वज्ञ ॥४॥
स्वगतानुगतत्त्वें पूर्णता । तेणें उपलभे सर्वज्ञता । तैं तो एकाकी न रमतां । अनेकविधता परिकल्पी ॥५॥
जडत्वें आलें सर्वज्ञपण । येर्‍हवीं ब्रह्मचि ईश्वर पूर्ण । एकाकी न रमे म्हणोन । शबल माया अवलंबी ॥६॥
अविद्यासंभव तदुत्तर । अव्याकृत जें अज्ञानप्रचुर । तदभिमानी जो कां रुद्र । कर्ता संहार सृष्टीचा ॥७॥
तया तमोगुणाचे पोटीं । सत्त्वगुणाची प्रभा उठी । विपरीत ज्ञानाची पाउटी । गोप्ता सृष्टि हरि जेथें ॥८॥
तेथोनि विराट रजात्मक । जेथ ब्रह्मा त्रिजगज्जनक । जागृतावस्थाप्रकाशक । चिद्भ्रामक भवभान ॥९॥
अव्याकृतीं पंचभूतें । हिरण्यगर्भीं तत्संभूतें । अंतःकरणादि समस्तें । कर्तृकरणें ज्या नाम ॥१०॥
चेष्टा ज्ञान क्रिया करणें । प्रकाशूनियां रजोगुणें । भूतिविषयां अभिलाषणें । दृश्यभानें भुलोनियां ॥११॥
तम प्रसवे व्यापक गगन । गगन प्रसवे सर्वग पवन । पवन प्रसवे प्रकाशमान । विश्वदीपन तेजस्वी ॥१२॥
तेजापासूनि होय जळ । जळापासूनि पृथ्वी स्थूळ । पृथ्वीपासूनि भौतिकमेळ । पंचभूतात्मक बहुयोनि ॥१३॥
परस्परें तो समुदाय । पंचभूतात्मक भौतिकमय । एकमेकांचें अन्न होय । परमप्रिय स्वादिष्ट ॥१४॥
पंचभूतात्मक तो रस । रेत होऊनि सुरतावेश । धरितां तेथ प्रकृतिपुरुष । होती अशेष देहरूपी ॥१५॥
एवं दशगुण उत्तरोत्तर । ब्रह्मापासूनियां स्थूळ शरीर - । पर्यंत जडतेचा विस्तार । जाणती चतुर तत्त्ववित् ॥१६॥
ऐसा चिज्जडग्रंथिमय । भवभ्रमासि जो आश्रय । तो हा जीवांचा समुदाय । भ्रमें विषयपरिबद्ध ॥१७॥
मिथ्याविषय साच मानी । तदभिलाषें नानायोनि । भ्रमतां भवसिंधूचें पाणी । अगाध करूनि बुडतसे ॥१८॥
ऐसे जड तव चरणा शरण । होतां निरसे मग जडपण । केवळ होती चैतन्यघन । जाती लंघोनि भवसिंधु ॥१९॥
त्या तव चरणा प्रणति मात्र । करूनि कृपेसि जालों पात्र । आज्ञानियमें हरिचरित्र । कथनीं वक्त्र प्रवर्त्तविलें ॥२०॥
तेथ अठतीस अध्यायवरी । वाखाणिली शुकवैखरी । अक्रूरा भेटले राममुरारी । कथा पुढारीं अवधारा ॥२१॥
एकोणचाळिसाव्या आंत । मथुरे जातां कृष्णनाथ । विरहें गोपींचा आकांत । तो समस्त कथिजेल ॥२२॥
आणि अक्रूरा यमुनास्नानीं । विष्णुलोक अवलोकूनी । सात्त्विक अष्टभाव होऊनी । हरिगुणस्तवनीं तो वेंठे ॥२३॥
इतुकी कथा या अध्यायीं । व्यासतनयें कथिली पाहीं । भाषाव्याख्यान श्रवणालयीं । दयार्नव कथिल श्रोत्यांचे ॥२४॥
पूर्वाध्यायाचे समाप्तीं । अक्रूर पूजिला परम भक्ति । ऐकोनि नंदादिकांच्या उक्ति । परम विश्रांति मानिली ॥२५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP