अध्याय ३८ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


लब्धांगसंगं प्रणतं कृतांजलिं मां वक्ष्यतेऽकूर ततेत्युरुश्रवाः ।
तदा वयं जन्मभृतो महीयसा नैवादृतो यो धिगमुष्य जन्म तत् ॥२१॥

लाहोनि कृष्णाचा अंगसंग । प्रणाम करूनि साष्टांग । बद्धांजलि नम्रोत्तमांग । पाहीन सांग हरिचरण ॥२६०॥
ऐसिया मातें अवलोकून । जो का पुण्यश्रवणकीर्तन । तो उरुश्रवा स्वमुखें करून । सम्मानून बोलेल ॥६१॥
तात अक्रूर ऐसिया शब्दीं । संबोधील जैं कृपानिधि । तेव्हां आमुची जन्मसिद्धि । सफळ त्रिशुद्धि जाहली ॥६२॥
श्रेष्ठीं नादरिला जो प्राणी । वृथा भूभार तो जन्मोनी । धिक्कार त्याचे जननीं मरणीं । वृथा जननीश्रमकर तो ॥६३॥
धिक् त्या जंतूचें तें जन्म । ज्यातें नादरी पुरुषोत्तम । धिक्कृत तयाचें सर्व कर्म । विश्वीं अधम असंमत जो ॥६४॥
विश्वीं संमत जो सौजन्यें । तो आदरिजे श्रीभगवानें । श्रीकृष्ण जीव नव्हे मां मानें । सुहृदादिकां सम्माना ॥२६५॥
सुहृदादिकां आलिंगन । स्वागतप्रश्न संभाषण । न करी प्राकृत जीवांसमान । कां पां कृष्ण तें ऐका ॥६६॥

न तस्य कश्चिद्दयितः सुहृत्तमो न चाप्रियो द्वेष्य उपेक्ष्य एव वा ।
तथाऽपि भक्तान्भजते यथा तथा सुरद्रुमो यद्वदुपाश्रितोऽर्थदः ॥२२॥

कृष्ण परमात्मा ईश्वर । सर्वीं सर्वगत निर्विकार । त्यासि अप्रिय कोण प्रियतम स्वपर । आप्त कीं इतर असेना ॥६७॥
त्यासि सुहृद अथवा द्वेष्य । उदास मध्यस्थ ना उपेक्ष्य । इष्ट मित्र गोत्र पोष्य । हा विशेष त्या नाहीं ॥६८॥
हे संबंध जीवांकडे । ईश्वरीं कांहीं संबंध न घडे । तथापि भक्त भजती कोडें । तैसा त्यांकडे अनुसरतो ॥६९॥
जो जो प्राणी भजेल जैसा । ईश्वर भासे तयासि तैसा । कामिकांचे इच्छेसरिसा । फळे अपैसा सुरद्रुम ॥२७०॥
बैसोनि कल्पतरुतळवटीं । इच्छी संकल्पें रत्नकोटी । तों त्या लाहे कीं नरोटी । इच्छी तैसी लाहे तो ॥७१॥
ते कल्पना सुरतरु न करी । तैसा भक्तांच्या भजनावरी । इच्छेसरिसा भजे हरि । संबंधविकारी न होतां ॥७२॥
मित्र म्हणती त्यांचा मित्र । पुत्र भाविती त्यांचा पुत्र । शत्रु मानिती त्यांचा शत्रु । भावनामात्रफळदानी ॥७३॥
तैसा कृष्ण माझ्या भावें । मज संतुष्ट स्नेहगौरवें । अंगीकारील हृद्गत आघवें । ओळखोनि तें अवधारा ॥७४॥

किं चाग्रजो माऽवनतं यदूत्तमः स्मयन्परिष्वज्य गृहीतमंजलौ ।
गृहं प्रवेश्याप्तसमस्तसत्कृतं संप्रक्ष्यते कंसकृतं स्वबंधुषु ॥२३॥

आणि कृष्णाचा अग्रज बंधु । संकर्षण जो चातुर्यसिंधु । यदुकुळगगनीं जैसा इंदु । आनंदकंदु व्रजकुमुदा ॥२७५॥
बद्धांजलि केली मियां । तैसीच स्वकरीं धरूनियां । हास्यवदनें आलिंगूनियां । ग्रहामाजी प्रवेशवील ॥७६॥
समस्त सत्कार लाधले ज्यातें । ऐसिया मातें धरूनि हातें । पुसेल कंसाचीं चेष्टितें । छळी बंधूंतें केंवि कैसा ॥७७॥
स्वबंधु जे यादवगण । त्यांच्या ठायीं द्वेष गहन । धरूनि कैसा करी छलन । तें संपूर्ण पुसेल ॥७८॥
ऐसें अक्रूराचें प्रेम । नृपा कथूनि मुनिसत्तम । पुढील कथेचा अनुक्रम । अमृतोपम वाखाणी ॥७९॥

इति संचितयन्कृष्णं श्वफल्कतनयोऽध्वनि । रथेन गोकुलं प्राप्तः सूर्यश्चास्तगिरिं नृप ॥२४॥

ऐसा अक्रूर रथावरी । कृष्णप्रेमें कल्पना करी । चिंतूनि कृष्णातें अंतरीं । मार्गीं हरंवरीं चालतां ॥२८०॥
ऐसा श्वफल्काचा तनय । कृष्णचिंतनें कृष्णमय । स्मरणधर्मा मुकला ठाय । तथापि जाय रथयोगें ॥८१॥
अस्त पावतां गभस्ति । अक्रूर पावला व्रजाप्रति । तंव त्या कृष्णाचे चरण क्षितीं । देखता झाला तें ऐका ॥८२॥

पदानि तस्याखिललोकपालकिरीटजुष्टामलपादरेणोः ।
ददर्श गोष्टे क्षितिकौतुकानि विलक्षितान्यब्जयवांकुशाद्यैः ॥२५॥

समस्त लोकपाळांच्या श्रेणी । लागतां श्रीकृष्णाचे चरणीं । तैं निर्मळ पदरज गंगेहुनी । शिरोभूषणीं मिरविती ॥८३॥
त्या कृष्णाचीं अतिसुंदरें । पाऊलें जैसीं सहस्रारें । गोष्ठीं उमटलीं वसुंधरे । मंगलकरें क्षितीतें ॥८४॥
गोगोपाल सह जनपद । त्यां माजि कृष्णाचेही पद । कैसे वोळखिले पैं विशद । तोचि अनुवाद अवधारा ॥२८५॥
वज्रांकुशोर्ध्वरेखाध्वज । पद्मचिह्नें श्रीपादाब्ज । गंगाजनक तेजःपुंज । निरखी सहज निजदृष्टीं ॥८६॥
म्हणाल पाउलांचीं सामुद्रिकें । कैसीं उमटलीं मृत्तिके । केंवि अक्रूर त्यां ओळखे । हें विविकें बोधावें ॥८७॥
तरी येथींची विचित्र परी । सावध परिसावी पैं चतुरीं । वेध्यवेधक परस्परीं । प्रेमादरीं ज्ञातृत्व ॥८८॥
गगनामाजील माग काढणें । हें एक विहंगयाति जाणे । कीं जळगर्भींचा यादोगणें । जेंवि हुडकणें मागोवा ॥८९॥
म्हणाल हें जातिविशिष्ट ज्ञान । तरी येथही तैसेंचि लक्षण । परस्परें ओळखण । वेध्यवेधक सप्रेमें ॥२९०॥
वेधक शक्ति श्रीभगवंतीं । असे स्वतःसिद्ध आयती । तदंश तद्वेधें वेधती । हेही स्थिति नैसर्गिक ॥९१॥
येरां सर्वत्र हें अवघड । परी सप्रेमळांलागिं उघड । जेंवि चंद्रींचे सस्नुत सड । सेविती चंड चाकोरी ॥९२॥
सकौस्तुभ एकावळी कंठीं । ध्यानें घालितां दाटली मुकुटीं । दुज्या ध्यानस्थें देखोनि दृष्टीं । मुकुट काडःओनि घालविली ॥९३॥
कीं दुष्यंत मृगया त्रिपुराचळीं । करितां अश्वचरणातळीं । लोह स्पर्शतां स्पर्शशिळीं । वेधें तत्काळीं हेम केलें ॥९४॥
तैसे अनेक पाषाण इतरां । बहुधा झगडतां अश्वखुरां । लोहनाला ते कर्बुरा । करूं न शकती संस्पर्शें ॥२९५॥
कीं शतयोजनें सिंधुजळीं । अयस्कांताचीं खडकें तळीं । परी जळयानींच्या लोहखिळीं । वेधें तत्काळीं गाळिजेत ॥९६॥
तेंवि कृष्णाचीं पाउलें । ध्वजवज्रादिचिह्नमेळें । अक्रूराचे वेधती डोळे । तीं तीं स्थळें तो पाहे ॥९७॥
वेधक श्रीकृष्णचरणकमळ । अक्रूर तदंश सप्रेमळ । वेध्यवेधक उभयशील । तें केवळ ज्ञातृत्व ॥९८॥
येथें म्हणती सामान्य कवि । ध्यानींची माळा अडस कां व्हावी । मुकुट काढूनि दुजा घालवी । हे गोष्टी आघवी अप्रमाण ॥९९॥
ते धीटपाठ धूर्त वक्ते । अनुभवें विण बहुश्रुत ज्ञाते । ओगमहिमा अविदित त्यांतें । ते प्रमाण यातें केंवि म्हणती ॥३००॥
चकोरां चंद्रामृतें तृप्ति । तेथ नास्तिक मंडूकांप्रति । एवं प्रतीतीविण प्राकृतमति । प्रमाण न मानिती तें उचित ॥१॥
येर्‍हवीं जीवब्रह्मैक्यप्रसंग । ते दशेतें म्हणिजे योग । तत्सिद्धीचे जे जे मार्ग । ते अव्यंग अगाध ॥२॥
लयलक्ष्यादि ध्यानयोग। सांख्य भक्ति ज्ञान अष्टांग । चिदैक्यपूर्ण घडे सांग । साधनमार्ग प्रसिद्ध हे ॥३॥
सूर्यसत्तायोगबळें । सूर्यकांतीं स्फुरिजे अनळें । तेंवि अतिंद्रियज्ञायोगें उजळे । तें केंवि कळे धूर्तांतें ॥४॥
एवं अघटितघटनापटी । योगमायेची शक्ति मोठी । जिचेनि ब्रह्म नटलें नटीं । तें नेणती करंटीं प्राकृतें ॥३०५॥
तस्मात्प्रेमभक्तियोगबळें । आथिले अक्रूराचे डोळे । म्हणोनि श्रीकृष्णपाउलें । देखोनि भरले उल्हासें ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP