यानि चान्यानि वीर्याणि द्वारकामावसन्भवान् । कर्ता द्रक्ष्याम्यहं तानि गेयानि कविभिर्भुवि ॥२१॥

ऐशा अनेक असुरसेना । मर्दूनि धर्मसंस्थापना । करिसी साधुसंरक्षणा । तें गोचर नयना होईल ॥८९॥
नांदतां द्वारकेमाझारीं । अनेक वीर्यें करिसी हरि । तें मी पाहीन आपुल्या नेत्रीं । गाती भूचक्रीं कविवर जें ॥१९०॥

अन्न ते कालरूपस्य क्षपयिष्णोरमुष्य वै । अक्षौहिणीनां निधनें द्रक्ष्याम्यर्जुनसारथेः ॥२२॥

ऐसा भविश संकेतार्थ । बोलोनियां ऋषिसमर्थ । पुन्हा सूची जो गूढार्थ । तो हा श्लोकार्थ पर्येसा ॥९१॥
ऐसें करितां भूभारहरण । तूं जो कालरूपी भगवान । रथी करूनियां अर्जुन । सारथि होऊन विचरसी ॥९२॥
तेव्हां तुझिया पक्षपाता । अक्षौहिणीं समूह पुरता । तावकी अवलोकीन । ऐसें मुनीचें गूध वचन ॥९३॥
त्या अक्षौहिणींचें ही निधन । शेवटीं मी अवलोकीन । ऐसें मुनीचें गूढ वचन । श्रीधरव्याख्यान तें ऐका ॥९४॥
भूभाररूपा अक्षौहिणी । अथवा विश्वाच्या म्हणोनी । बोलिजती त्या समरांगणीं । मरतां पाहीन मुनि म्हणे ॥१९५॥
येथवरी जे नारद स्तवनीं । चरित्रभाग भविष्यकथनीं । पदानुक्रम ये व्याख्यानीं । नाहीं म्हणोनि न दूषिजे ॥९६॥
ऐसा संकेत जाणवून । यावरी करी वास्तव स्तवन । कीं तूं विशुद्धविज्ञानघन । ममता अज्ञान नातळसी ॥९७॥
एवं करूनि विज्ञापन । वास्तव स्तवनें आनंदवून । मुनि भगवंता अभिवंदन । करी संपूर्ण दो श्लोकीं ॥९८॥

विशुद्धविज्ञानघनं स्वसंस्थया समाप्तसर्वार्थममोघवांछितम् ।
स्वतेजसा नित्यनिवृत्तमायागुनप्रवाहं भगवंतमीमहि ॥२३॥

त्या भगवंता तुजप्रति । आम्ही शरण भेदनिवृत्ति । करूनि स्वयंभ आत्मस्थिति । विनयविनति मुनि वदला ॥९९॥
तें भगवत्स्वरूप किंलक्षण । केवळ विशुद्ध विज्ञानघन । जेथ अस्पृष्ट सत्त्वादि त्रिगुण । अपरिच्छिन्न अगाध ॥२००॥
शोधनें निरसूनि गुणादि मळ । तें शुद्धिपूर्वक बोलिजे अमळ । विशुद्धविज्ञानघन केवळ । नित्य निर्मळ जें रूप ॥१॥
खता झाडूनि उजळिजे अरिसा । सूर्य न गणिजे कीं त्यासरिसा । तोही गोचर ज्या प्रकाशा । त्या डोळसा जो प्रकटी ॥२॥
ज्ञेयज्ञातृत्वविहीन । केवळ विशुद्धज्ञानघन । यालागिं स्वसंस्थितीकरून । अभीष्टार्थ संप्राप्त ॥३॥
स्वसामर्थ्यें स्वप्रताप । स्वऐश्वर्यें स्वस्थ भूप । ते स्वसंस्था आनंदरूप । येर तो जल्प क्षुब्धत्वें ॥४॥
सम्यक्स्वरूपस्थितिच जे कां । निरतिशयानंद देखा । तया पूर्णत्वें करूनि असिका । अर्थसमूह अवाप्त ज्या ॥२०५॥
एवं अवाप्तपूर्णकाम । तें हें कथिलें कैवल्यधाम । आतां सत्यसंकल्पात्मक जें ब्रह्म । ईश्वरनाम अभिव्यक्त ॥६॥
अमोघवांछितार्थ ज्याचा । तो सत्यसंकल्पी ईश्वर साचा । ऐसें निरूपितां शंकेचा । संभव झाला श्रोतयां ॥७॥
वांछा असे जये ठायीं । आणि संसृतीचा स्पर्श नाहीं । हेंचि अघटित म्हणाल कांहीं । तरी येविषयीं अवधारा ॥८॥
स्वतेजसा नित्य निवृत्त । मायागुणप्रवाह जेथ । संसृतिसंभव कैंचा तेथ । मुनि समर्थ वदलासे ॥९॥
स्वतेजसा म्हणिजे काय । चिच्छक्ति जे प्रज्ञामय । तयेकरूनि निरसला होय । मायागुणमयप्रवाह ॥२१०॥
मायाउग्णमयप्रवाह कैसा । प्रश्न स्फुरेल जरी मानसा । तरी नावेक सावध बैसा । साद्यंत परिसा संसार ॥११॥
प्रथम स्फुरण प्रणवांकुर । अव्यक्तमाया ते साचार । केवळ अज्ञानतमःप्रचुर । रुद्र संहाराभिमानी ॥१२॥
तयामाजी विवळे सत्त्व । विपरीतज्ञान तें महत्तत्त्व । विष्णु अभिमानी ज्ञातृत्व । पालनपटुत्व प्रकाशी ॥१३॥
त्यामाजी रजोगुणीं विराट । क्रियासमवेत सृजननिष्ठ । सृजनाभिमान जाला प्रकट । ब्रह्मांडघट साकार ॥१४॥
तमोगुणीं अव्यक्त भूतें । सत्त्वगुणीं ज्ञानवंतें । रजोगुणीं दृश्यें मूर्त्तें । विषयस्वार्थें कालवलीम ॥२१५॥
तत्कर्दमें भौतिकसृष्टि । जीवचैतन्या प्रकट राहटी । लक्षचौर्‍यांसीं भगसंकटीं । न चुके घरटी परिभ्रमतां ॥१६॥
मरणें उपजणें व्यवहारणें । सुखदुःखांचें भरलें भाणें । सुर नर तिर्यक् होणें जाणें । सदा जाचणें न सुटतां ॥१७॥
शत्रुषट्क अभ्यंतरीं । विश्वासूनि मैंदापरी । आतुडविती षड्विकारीं । त्रितापजोहारीं कोंडोनी ॥१८॥
अम्धतमिस्र आणि मोक्ष । द्विधा अज्ञानज्ञानपक्ष । आत्मा उभयत्र अपरोक्ष । तो अलक्ष त्या न कळे ॥१९॥
इहामुष्मिक तिर्यग्योनि । तमिस्रमोक्ष ताटस्थ्यकथनीं । जीव पडिले परिभ्रमणीं । निबद्ध गुणीं फळभोगें ॥२२०॥
तो हा मायागुनप्रवाह । चिच्छक्तिप्रकाशें जेथ वाव । संसृतीसि तेथें ठाव । म्हणणें माव अवघी हे ॥२१॥
तमात्मक सत्त्वें विपरीत ज्ञान । मिश्रप्रकाशें मंदनयन । रज्जूवरी सर्पभान । अध्यारोपण तेंवि भवा ॥२२॥
प्रज्ञानतेजाच्या उजिवडें । अध्यारोप कोणीकडे । तेथ संसृति भाविती वेडे । मूर्ख बापुडे भवभ्रांत ॥२३॥
एवं ऐसिया भगवद्रूपा । शरण जाणोनि कीजे कृपा । येथ शंका करिसी बापा । तें संक्षेपामाजि वदतों ॥२४॥
भूतभविष्यवर्तमान । नारदा तूं त्रिकालज्ञ । मायागुणप्रवाहशून्य । मजलागून केंवि वदसी ॥२२५॥
ईश्वर मज जरी मानिसी साच । तरी विश्व अवघेंचि मत्प्रपंच । किंवा म्हणसी यदुपतीच । तरी हें अवघेंचि यदुचक्र ॥२६॥
इतुका प्रपंच माझिये गांठीं । अगुणप्रवाह कैशिये गोठी । म्हणसी तरी तें तूं जगजेठी । ऐके वाक्पटीं निरोपितों ॥२७॥

त्वामीश्वरं स्वाश्रयमात्ममायया विनिर्मिताशेषविशेषकल्पनम् ।
क्रीदार्थमद्यात्तमनुष्यविग्रहं नतोऽस्मि धुर्यं यदुवृष्णिसात्वताम् ॥२४॥

भो भो यदुकुळधुरंधरा । पूर्ण ऐश्वर्यें ईश्वरा । तूंतें नमितों वृष्णिप्रवरा । सात्वतनिकरा प्रभुवर तूं ॥२८॥
ईशितव्यें आपुल्या ठायीं । ईशनशक्तीच्या प्रवाहीं । स्ववश करिसी तूं सर्वही । तूं कोण्हीही वश नव्हसी ॥२९॥
यास्तव मायावशवर्तिनी । सत्ता योगबळें । स्वीकारूनि । अशेष विशेष तियेकरूनी । स्वक्रीडार्थ प्रवर्त्तक ॥२३०॥
तें हें अवघेंचि भवभ्रमचक्र । स्निग्ध मोहक मादक मधुर । परी तें तुज नोहे भ्रमकर । तूं परतर परमात्मा ॥३१॥
अव्यक्तादि गुणप्रवाह । महदहंकार भूतसमूह । इहीं न करवे तुज निग्रह । लीलाविग्रहनाटक तूं ॥३२॥
दुर्गमदुर्गीं भद्रासन । पूर्ण ऐश्वर्यें नृप संपन्न । तेथ निबद्ध दस्युगण । त्यां तें स्थान अनुल्लंघ्य ॥३३॥
कर्मपाशीं निबद्ध झाले । भवभ्रमचक्रीं नियंत्रिले । ते न वचती मुक्त केले । तुजवेगळे कल्पांतीं ॥३४॥
तेचि चक्रीं तूं चक्रवर्ती । परी न पडसी चक्रावर्ती । ऐशी तुझी अगाध कीर्ति । चक्रभ्रांतिप्रभंजक ॥२३५॥
तो तूं काळकळनारूप । सात्वतवृष्नियदुकुळभूप । मनुष्यविग्रही भाससी पशुप । क्रीडाकलाप कलुषघ्न ॥३६॥
अगाध तुझी हे कल्पना । निवटावया खळ दुर्जना । धर्मसेतुसंस्थापना । साधुरक्षणा करावया ॥३७॥
पांडवादि स्वपक्षीं देव । नंदप्रमुख हे बल्लव । सात्वत वृष्नि मधु यादव । घेऊन स्वमेव यदुचक्र ॥३८॥
मृत्युलोकीं अवतरलासी । त्रिजग ग्रथूनि कल्पनापाशीं । नित्य निर्लेप क्रीडा करिसी । पूर्णत्वेंसी साद्यन्तीं ॥३९॥
एवं यादवादि स्वपक्षसृजन । षट्पंचकोटि अभिवर्धन । कार्यान्तीं त्यां उपसंहरण । करितां पूर्ण निर्मम तूं ॥२४०॥
ऐसा अहंताममतारहित । सात्वतवृष्णियदुकुळनाथ । त्या तूंतें मी शरणागत । अभिवंदित साष्टांग ॥४१॥
रायासि म्हणे व्यासनंदन । साद्यन्तभावीं लीलाचरण । सूचनारूप केलें स्तवन । तें हें कथन तुज केलें ॥४२॥

श्रीशुक उवाच :- एवं यदुपतिं कृष्णं भागवतप्रवरो मुनिः ।
प्रणिपत्याभ्यनुज्ञातो ययौ तद्दर्शनोत्सवः ॥२५॥

भगवद्भक्तां जो अग्रणी । भागवतप्रवर नारदमुनि । तेणें ऐशा प्रकारें स्तवूनी । नमिता झाला कृष्णातें ॥४३॥
यदुकुळचक्रचूडामणि । तो वंदूनि चक्रपाणि । दर्शनोत्साह मानूनि मुनि । आज्ञा घेऊनि निघाला ॥४४॥
कृष्णमूर्ति हृदयीं ध्यात । कृष्णकीर्ति वदनीं गात । कृष्णप्रेमें आनंदभरित । गेला विधिसुत स्वच्छंदें ॥२४५॥
ऐसा नारदें केला स्तव । तो श्रोतयां कथिला सर्व । पुढें निरूपी दयार्णव । व्योमदानववधलीला ॥४६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP