श्रीशुक उवाच :- केशी तु कंसप्रहितः खुरैर्महीं महाहयो निर्जरयन्मनोजवः ।
सटावधूताभ्रविमानसंकुलं कुर्वन्नभो हेषितभीषिताखिलः ॥१॥

शुक म्हणे गा उत्तरात्मजा । अधोक्षजाच्या हननकाजा । कंसें केशी धाडिला व्रजा । कवणें वोजा तो गेला ॥४१॥
आधींच केशी महाक्रूर । विशेष प्रेरितां कंसासुर । अश्वरूपी भयंकर । व्रजी सत्वर प्रवेशला ॥४२॥
मनाहुनी चपळगति । पुढिलां खुरीं टांपरी क्षिती । तेणें जर्जर झाली माती । चळीं कांपती व्रजवासी ॥४३॥
आयाल थरकती ग्रीवेवरी । उपायीं येतां नभामाझारीं । विमानें गुप्त अभ्रांतरीं । त्या दे भंवरी प्रळयाची ॥४४॥
मत्तकुंजर डहुळी पाणी । करी कमलांतें भंगाणी । तैसीं विमानें नभांगणीं । सटांकरूनि विध्वंसी ॥४५॥
अश्वजातीचा हेषितशब्द । प्रलयमेघतुल्य भयद । तेणें मनुजादिसुरवरवृंद । प्राणिकदंब त्रासला ॥४६॥
तो भयंकर म्हणाल कैसा । ऐका तयाचा आकृतिठसा । पाहतां सुरवर पावती त्रासा । हेषितघोषा जग जाचे ॥४७॥

विशालनेत्रो विकटास्यकोटरो बृहद्गलो नीलमहांबुदोपमः ।
दुराशयः कंसहितं चिकीर्षुर्व्रज सनंदस्य जगाम कंपयन् ॥२॥

प्रळयाग्नीचा लखलखाट । तैसे विशाळ नेत्रवाट । मुख कोटरासारिखें विकट । गिरिदरकुट ज्यापरी ॥४८॥
स्थूळ विशाळ कंठगळा । सजलजलदासारिखा निळा । कुटिळबुद्धि कपटें भरला । जय कंसाला अभिवांछी ॥४९॥
ऐसा येऊनि नंदव्रजा । कंपायमान केल्या प्रजा । त्यातें देखोनि अधोक्षजा । आवेश पैजा उथलला ॥५०॥

तं त्रासयंतं भगवान्स्वगोकुलं तद्धेषितैर्वालविवूर्णितांबुदम् ।
आत्मानमाजौ मृगयंतमग्रणीरुपाह्वयत्स व्यनदन्मृगेंद्रवत् ॥३॥

आपुले गोगोपगोपी सकळ । एवमादि जें गोकुळ । दैत्यत्रासें अतिव्याकुळ । देखोनि घननीळ कलवळिला ॥५१॥
आणि खेंकाळे भयंकर । तेणें विमानीं त्रासले सुर । पुच्छकेशांचा फडत्कार । तेणें जलदाभ्र भंगिलें ॥५२॥
आणि संग्रामार्थ मातें । हुडकी क्षोभवूनि व्रजातें । कंसशत्रु मी माझेनि घातें । हा कंसातें जय वांछी ॥५३॥
ऐसें विवरूनि अंतःकरणीं । दैत्यनिहंता चक्रपाणि । सरसावोनि समरांगणीं । वीराग्रणी पुढारला ॥५४॥
दैत्या वाहे आपणाकडे । म्हणे व्यर्थ कां इकडे तिकडे । फिरसी पसरूनि चाभाडें । मरण रोकडे पावसी ॥५५॥
ऐसें म्हणोनि ठाकला पुढां । बाहु ठोकोनि आला गाढा । तंव केशी दैत्य महाबळिपाडा । कैसा सिंहाडा गर्जिन्नला ॥५६॥

स तं निशम्याभिमुखो मुखेन खं पिबन्निवाभ्यद्रवदत्यमर्षणः ।
जघान पद्भ्यामरविंदलोचनं दुरासदश्चंडजवो दुरत्ययः ॥४॥

ऐकोनि वीरवृत्तीचा शब्द । दैत्यें केला सिंहनाद । पुढें लक्षूनि मुकुंद । अतिसक्रोध धाविन्नला ॥५७॥
जैसा गगनचि गिळील तोंडें । ऐशीं विकराळ चाभाडें । पसरूनि लोटला कृष्णापुढें । कान पाडूनि डसावया ॥५८॥
तंव श्रीकृष्णाचें अभंग ठाणें । निर्भय देखोनि शंकला मनें । मग तो दुष्ट विमुखवदनें । वदळा हाणे हरिहृदयीं ॥५९॥
आजिपर्यंत कोठें कोणी । पराभविलाचि नाहीं रणीं । यासव दुरासद म्हणोनि । बादरायणि अनुवादे ॥६०॥
दुरत्यय म्हणिजे ज्याचे कवे - । पासूनि कोणी न सुटे जीवें । मारुताहूनि प्रचंड धांवे । म्हणोनि नागव्वे सुरासुरां ॥६१॥
कृष्ण कोमळ अरविंदाक्ष । मदनमूर्ति कुमारवेश । त्याचा लक्षूनि हृदयदेश । लत्ता कुलिशसम ताडी ॥६२॥

तद्वंचयित्वा तमधोक्षजो रुषा प्रगृह्य दोर्भ्यां परिविध्य पादयोः ।
सावज्ञमुत्सृज्य धनुःशतांतरे यथोरगं तार्क्ष्यसुतो व्यवस्थितः ॥५॥

कृष्णहृदया मागिलां पायीं । लत्ताप्रहार करितां पाहीं । तेणें चुकवूनि ते लवलाहीं । दैत्य दोहीं पदीं धरिला ॥६३॥
हृदयावरी ताडितां वदळा । कृष्णें तैशाच धरिल्या चपळा । गरगर भवंडी घनसांवळा । लीलाकमला सारिखा ॥६४॥
बळें सक्रोध टाकितां गगनीं । शतधनुष्यें लंघूनि अवनि । दैत्य पडला जैसा अशीन । कीं अचल भंगोनि कोसळला ॥६५॥
गरुड सर्पातें झुगारी । तैसा दैत्य टाकूनि दुरी । अभंग कृष्ण राहिला समरीं । प्रतीक्षा करी युद्धार्थ ॥६६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP