निसृष्टः किल मे मृत्युर्देवैर्वैकुंठसंश्रयैः । तावानय समं गोपैर्नंदाद्यैः साभ्युपायनैः ॥३१॥

मातें जाणोनि कालनेमी । समरीं असमर्थ पराक्रमी । म्हणोनि माझिये मृत्यूद्यमीं । वांछाकामीं सुरवर ॥३७॥
ऐसिया सकाम सुरवरगणा । आश्रय मुख्य वैकुंठराणा । तिहीं तयातें भाकूनि करुणा । माझिया मरणा प्रार्थिलें ॥३८॥
एवं विधि हर सुरवर सकळीं । रामकृष्ण दोघे बळी । मृत्यु केवळ माझिये मुळीं । कुठाररूप निर्मिले ॥३९॥
मजही केवळ मृत्युरूप । कळल्या कैसी लागेल झोंप । मुनीनें कथिली सूचना अल्प । मग म्यां साक्षेप मांडिला ॥२४०॥
तरी जाऊनि व्रजपुरा । येथें आणावें वसुदेवकुमरां । नंदप्रमुख पशुपनिकरां बहुसंभारा समवेत ॥४१॥
उपायनें पूजोपचार । विशेष वार्षिक करभार । रामकृष्णेंसीं नंदप्रवर । थोर थोर व्रजवासी ॥४२॥
येथें आणावे झडकरी । येवढी माझी विनति करीम । ते तां येथें आणिल्यावरी । कृत्य अवधारीं मम मनिंचें ॥४३॥

घातयिष्य इहानीतौ कालकल्पेन हस्तिना । यदि मुक्तौ ततो मल्लैर्घातये वैद्युतोपमैः ॥३२॥

कुवलयापीड नामा हस्ती । स्थापूनियां देहलीप्रांतीं । कुंजर प्रेरूनि शत्रूप्रति । गुप्तस्थिति निर्दळीन ॥४४॥
मदोन्मत्त कुंजर वाटे । येतां मारिलें अवचटें । ऐसा लौकिकीं शब्द उमटे । सहजचि तुटे मम शल्य ॥२४५॥
म्हणसी कुंजरा नाटोपती । तरी सामान्य नोहे हस्ती । प्रळयकाळाची आकृति । दिग्गज लपती या भेणें ॥४६॥
ऐशिया कुंजरापासूनि जिणें । सर्वथा न घडे कोटिगुणें । तथापि मुक्त जाले प्राणें । तरी आणिका यत्नें वधीन ॥४७॥
कोणता यत्न पुसशील । तरी वज्रप्राय माझे मल्ल । थडकोनि विद्युल्लते तुल्य । वधिती तत्काळ शत्रूतें ॥४८॥
देवनिर्मित माझे शत्रु । मुख्य मारिल्या वसुदेवकुमर । पुढील कार्यार्थविचार । तो सविस्तर अवधारीं ॥४९॥

तयोर्निहतयोस्तप्तान्वसुदेवपुरोगमान् । तद्बंधून्निहन्निहनिष्यामि वृष्णिभोजदशार्हकान् ॥३३॥

रामकृष्ण विष्णुव्यक्ति । वृष्णिभोजादि सुरवरपंक्ति । यास्तव मानूनि आपुले पति । हे मद्घातीं सापेक्ष ॥२५०॥
रामकृष्णांच्या वधाअंतीं । वसुदेवप्रमुख पक्षपाती । सहित बंधु सुहृद ज्ञाति । करीन शांति सर्वांची ॥५१॥
भोजदाशार्हवृष्णिकुळें । यांचीं खणोनि सांडीन मूळें । मजहूनि वरिष्ठ आगळे । उरों नेदीं यदुवंशीं ॥५२॥
जरी तूं म्हणसी वरिष्ठ पितर । ऐक त्याचाही विचार । अक्रूरा तूंतें गुह्य मंत्र । कथितां साचार हृदयींचा ॥५३॥

उग्रसेनं च पितरं स्थविष्ठं राज्यकामुकम् । तद्भ्रातरं देवकं च ये चान्ये विद्विषो मम ॥३४॥

माझा पिता उग्रसेन । स्थविर वृद्ध शक्तिहीन । तथापि वांछी माझें मरण । भद्रासनभोगार्थ ॥५४॥
वसुदेवादि अमरपक्षीं । मिळोनि माझें मरण लक्षी । राज्यसिंहासन अपेक्षी । क्ष्वेड कुक्षिगत जैसें ॥२५५॥
आणि त्याचा देवक भ्राता । देवकीप्रमुख अवघ्या सुता । नांदावया सौभाग्ययुक्ता । क्षेम जामाता अभिवांछी ॥५६॥
आनकदुंदुभीचिया मरणें । वैधव्य पावती कन्यारत्नें । म्हणोनि रक्षी नानायत्नें । माझ्या निधनें तोषेच्छु ॥५७॥
मुख्य करूनि पिता चुलता । जे जे मद्वेष्टे तत्त्वता । मी तयांच्या करीन घाता । सुहृदां आप्तां समवेत ॥५८॥

ततश्चैषा मही मित्र भवित्री नष्टकंटका । जरासंधो मम गुरुर्द्विविदो दयितः सखा ॥३५॥

त्यानंतरें हे अक्रूरा । नष्टकंटक वसुंधरा । जाली ऐसें जाण चतुरा । सपत्न दुसरा मग नाहीं ॥५९॥
पिता चुलता सहृद्गण । मारिल्या म्हणसी निर्बळपण । तरी माझे आप्त जैसे प्राण । ते कोण कोण अवधारीं ॥२६०॥
माझा श्वशुर जरासंध । प्रतापसमुद्र जो अगाध । गुरुत्वें जनका तुल्य प्रसिद्ध । आणि द्विविद प्राणसखा ॥६१॥
द्विविद जात्या वानर खरा । जिवलग आप्तत्वें सोयरा । तैसाचि शंबरासुर दुसरा । जेंवि वारा अनळातें ॥६२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP