अध्याय २० वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


हरिता हरिभिः शष्पैरिंद्रगोपैश्च लोहिताः । उच्छिलींध्रकृतच्छाया नृणां श्रीरिव भूरभूत् ॥११॥

सार्वभौमाची जैशी लक्ष्मी । तैशी शोभती झाली भूमि । चित्रविचित्र रत्न हेमीं । वस्त्रीं सद्मीं विराजित ॥१॥
हिरवीं बालतृणें लसलसित । तेणें पाचरंगीं राजित । माणिक्यरंगीं विराजित । इंद्रगोपप्राचुर्यें ॥२॥
उच्छिलिंग ठायीं ठायीं । उठती तेणें शोभे मही । राजवाहिनीप्रवाहीं । जैशीं छत्रें विराजती ॥३॥
कोमळ तरूंचे पल्लव । चंचळ चामरीं दाविती भाव । दुंदुभिघोषस्थानीं रव सरिताप्रसवप्रपात ॥४॥

क्षेत्राणि सस्यसंपद्भिः कर्षकाणां मुदं ददुः । धनिनामुपतापं वै दैवाधीनमजानताम् ॥१२॥

यथाकालीं होतां वृष्टि । सस्यें पिकलीं देखोनि दृष्टीं । आनंद कृषीवळाचे पोटीं । सभाग्य सृष्टीं मानिती ॥१०५॥
वृष्टि खंडतां चांचरे पीक । तेणें सवेंचि पावती दुःख । नेणोनि अदृष्टविवेक । जैसे लोक व्यवसायी ॥६॥

जलस्थलौकसः सर्वे नववारिनिषेवणात् अबिभ्रद्रुचिरं रूपं यथा हरिनिषेवया ॥१३॥

जलमाजीं ज्यांचा वास । मत्स्यादि जलचर अशेष । जनकादु वल्ली तृणविशेष । ते जलौकस बोलिजे ॥७॥
जळाबाहिर वनांतरीं । खेटखर्व्टीं पुरीं नगरीं । नाना जंतु चराचरीं । ते निर्धारीं स्थलौकस ॥८॥
ओक शब्दें बोलिजे आलय । जलीं कां स्थळीं ज्यांचें होय । त्यांसि तैसेंचि नामधेय । जलौकसें स्थलौकसें ॥९॥
ते सर्वही स्थलजलवासी । करितां नवनीतसेवनासी । पुष्टी पावती आनंदेशीं । अमरां जैसी पीयूषें ॥११०॥
तेणें नवरसा रति तनु । अवयव टवटविती नूतन । रुचिररूपें शोभायमान । सुखसंपन वर्तती ॥११॥
जैसा श्रीहरि जगज्जीवन । त्यातें सेविती जे जे जन । त्यांचें होय त्रितापशमन । सुखसंपन्न सहजेंची ॥१२॥
संसारसंतप्त उन्हाळा । तापत्रयाच्या तीव्र ज्वाळा । तेणें आहाळणी भूतां सकळां । जीवनकळा हरिप्रेम ॥१३॥
तें लाहती जे जे जीव । ते ते होती वासुदेव । सांडूनि मृत्यूचें लाघव । अमृतगौरव मिरविती ॥१४॥
तैसेम नीलघनाचें कृपाजळ । सेवूनि स्थलजलवासी सकळ । रूपें निवडती सोज्वळ । परम रसाळ लावण्यें ॥११५॥

सरिद्भिः संगतः सिंधुश्चुक्षुभे श्वसनोर्मिमान् । अपक्कयोगिनश्चित्तं कामाक्तं गुणयुग्यथा ॥१४॥

मेघभरें महापूर । सरिता टाकिती सागर । संगमीं एकवटतां नीर । तेणें समुद्र क्षोभती ॥१६॥
वर्षवाताच्या झंझाटा - । सरिशा प्रचंड उठती लाटा । मोडती जलयानाच्या वाटा । पांथ संकटा वरपडती ॥१७॥
सरिता सिंधूसि जेथ मिळणी । महानौका तये स्थानीं । येतां जातां स्थिरावोनी । क्रियाचरणीं वर्तती ॥१८॥
महापुराच्या संगमकाळीं । त्या न थरती तये स्थळीं । प्रबलवातें ऊर्मिमाली । सागर समूळीं क्षोभती ॥१९॥
जैसें साधनीं अपक्कचित्त । योगमार्गें संक्षोभत । तेथ झगटतां कंदर्पवात । ऊर्मि उठत तृष्णेच्या ॥१२०॥
इहामुत्रार्थाभिलाष - । सिद्धि गर्जती अशेष । सरितापूरविषयाभास । मिळती विशेष उत्पथ ॥२१॥
तेणें तरणोपायसन्मार्गतरणि । विषयसरितां उत्पथमिळणी । नियमें थारों न शकती करणी । जाती उधळोनि सैराट ॥२२॥

गिरयो वर्षधाराभिर्हन्यमाना न विव्यथुः । अभिभूयमाना व्यसनैर्यथाऽधोक्षजचेतसः ॥१५॥

भगवन्निष्ठ जैसे व्यसनीं । पीडितां दुर्दैवें ग्रहगणीं । व्यसना पावती अंतःकरणीं । निंद्यवचनीं त्रितापीं ॥२३॥
अक्षजज्ञाना गोचर नव्हे । त्यासी अधोक्षज म्हणावें । चित्तासि तें सुख जेव्हां फावे । मग नाठवे भवदुःख ॥२४॥
तयां अधोक्षजचेतसांसी । विघ्नें बाधूं न शकती जैशीं । कीं अर्कतुळें आकाशासी । नोहे जैसी वेदना ॥१२५॥
तैसें प्रबलवृष्टिभरीं । आच्छादूनि ठाती गिरि । तेणें न दुखवती तिळभरी । धाराप्रहारी खोंचतां ॥२६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP