अध्याय २० वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तडित्वंतो महामेघाश्चंडश्वसनवेपिताः । प्रीणनं जीवनं ह्यस्य मुमुचुः करुणा इव ॥६॥

विद्युल्लता कडकडाटी । महामेघांचिया दाटी । चंडवायो झडझडाटी । करी दिग्पटी सकंप ॥७४॥
जैसे करुणावंत पुरुष । संतप्त जाणूनि जनास । वेंचूनि आपुलें अर्थायुष्य । देती तोष सर्वस्वें ॥७५॥
तैसेचि जाण चंडघन । मोक्षण करूनि निजजीवन । या जगासि आप्यायन । सदयासमान करिताती ॥७६॥
जलचरां जीवविती जीवनें । तृणांदिकां अभिवर्षणें । भूचरां खेचरां तृणें धान्यें । आप्यायमानें पौष्टिकें ॥७७॥

तपःकृशा देवमीढा आसीद्वर्षीयसी मही । यथैव काम्यतपसमस्तनुः संप्राप्य तत्फलम् ॥७॥

ग्रीष्माकळींचा महा आतप । तेणें शोषूनि गेलें आप । विपर्ण झाले पादप । झाला लोप तृणाचा ॥७८॥
दावानळें जळालीं तृणें । झाडीं न थरती जीर्ण पर्णें । आहळलीं वाळलीं वठलीं उष्णें । तीं संपूर्ण खांकरलीं ॥७९॥
तृणीं वनीं जीवनीं जंतु । ग्रीष्मतापें पावले अंतु । कृप संपूर्ण सस्यरहितु । तापें श्रमित धरित्री ॥८०॥
देखोनि कृशता धरित्रीआंगीं । देव म्हणिजे महामेघीं । मीढाशब्दें शिंपितां वेगीं । पुष्टता सर्वांगीं जाहली ॥८१॥
पतिव्रता विरहतापें । कृशता पावे विरहपापें पुढती । लाहतां स्वामिकृपें । होय कंदर्पे संतुष्ट ॥८२॥
किंवा सकाम तापस । कृच्छ्रें तनु करिती कृश । सफळ होतां त्यांचे क्लेश । पावती तोष पुष्टत्वें ॥८३॥
तैशी पृथ्वी अष्ट मास । उष्णतापें होतां कृश । यथाकाळें तो पाऊस । वर्षतां तोष पावली ॥८४॥
मृत्तिका सांडोनि कठोरत्व । प्रकटे सर्वांगीं मार्दव । उखरी अखरीं जे जे जीव । जीवनें सर्व तोषती ॥८५॥

निशामुखेषु खदोतास्तमसा भांति न ग्रहाः । यथा पापेन पाखंडा न हि वेदाः कलौ युगे ॥८॥

अविद्येचीं मेघपटलें । झांकोळिती ग्रहमंडळें । तेणें गडद पडे काळें । मार्ग न पडे कर्दमीं ॥८६॥
प्रदोषकाळीं निशामुखीं । प्रभा आगळी खद्योतकीं । मोडे ग्रहांची ओळखी । कोणा ठाउकीं नक्षत्रें ॥८७॥
कळीमाजीं जैसी पापें । वेदप्रणीत मार्ग लोपे । जैसे माल्हावलेनि दीपें । विविधें रूपें हारपती ॥८८॥
निगम लोपतां संपूर्ण । प्रकाशती पाखंडगण । वेदविहित निषेधून । महाप्रवीण अभिचारीं ॥८९॥
वेदोक्त पुत्रेष्टिसाधन । सांडोनि सटवीचें पूजन । संतानवृद्धीसि कारण । विपरीताचरण कलीचें ॥९०॥
जारण मारण स्तंभन । उद्वेजण उच्चाटन । संमोहन वशीकरण । इहीं मान्य पाखंडी ॥९१॥
मद्यमासांचीं सेवनें । नानाहिम्सादि बलिदानें । ऐसे पाखंड पापाचरणें । महाज्ञानें मिरविती ॥९२॥
आच्छादूनि निगमाचार । मान्य कलिकाळीं अभिचार । जैसे प्रावृटीं खेचर । लोपूनि धुंधुर फांकती ॥९३॥

श्रुत्वा पर्जन्यनिनदं मंडूका व्यसृजन् गिरः । तूष्णीं शयानाः प्राग्यद्वद्ब्राह्मणा नियमात्यये ॥९॥

प्रावृट्काळाचें निशाण । ऐकोन मेघांचें गर्जन । खवळे मंडूकांएं सैन्य । जेंवि ब्राह्मण नियमांतीं ॥९४॥
स्नानसंध्येच्या शेवट - । पर्यंत आचार्य मौननिष्ठ । त्याचा ऐकोनि शांतिपाठ । उठे बोभाट छात्रांचा ॥९५॥
पूर्वीं प्रसुप्त छात्रभार । ऐकोनि आचार्याचा स्वर । एकसरा ते करिती गजर । तेंवि दर्दुर प्रावृटीं ॥९६॥

आसन्नुत्पथवाहिन्यः क्षुद्रनद्योऽनुशुष्यतीः । पुंसो यथाऽस्वतंत्रस्य देहद्रविणसंपदः ॥१०॥

प्रावृट्काळीं पर्जनभरें । क्षुद्र नद्या लोटती पूरें । मार्ग रोधिल्या उतारे । सार्थ व्यवहारें सांडविती ॥९७॥
क्षणैक उत्पथ वाहती पूर । सवेंचि पात्रीं न मिळे नीर । जेंवि मूर्खाचा स्वैराचार । यौवनभर लोटतां ॥९८॥
इंद्रियाधीन तो परतंत्र । जाणे विषयसेवन मात्र । ओहटूनि गेलिया अर्थ गोत्र । रितें पात्र मग पडे ॥९९॥
त्याच्या देहद्रव्यसंपदा । ओहटूनि जातां प्राप्त आपदा । तैसें उत्पथ नदी नदा । न थरे कदा जलबिंदु ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP