आशिषोऽभिगृणंतस्तं प्रशशंसुस्तदर्हणम् । प्रेत्यागतमिवाऽऽलिंग्य प्रेमविह्वलचेतसः ॥३१॥

मांदी मिळोनि भोंवती । आशीर्वाद मंगळोक्ति । स्वस्ति कल्याण रामाप्रति । अवघे म्हणती उत्साहें ॥५३॥
एक प्रशंसिती रामबळ । एक म्हणती बुद्धिकुशल । एक म्हणती परम चपळ । जाणे कौटिल्य दैत्याचें ॥५४॥
एक म्हणती बल बलिष्ठ । एक म्हणती हा गरिष्ठ । एक वर्णिती धारिष्ट । म्हणती अरिष्ट चूकलें ॥२५५॥
एक म्हणती शौर्यमूर्ति । एक म्हणती अद्भुतशक्ति । एक म्हणती धूर्तमति । जाणे दुर्मति दैत्याची ॥५६॥
एक म्हणती अरिष्ट चुकलें । एक म्हणती दैवें रक्षिलें । एक म्हणती पुण्य फळलें । व्रजौकसां वृष्णींचें ॥५७॥
कृष्ण श्रीदाम भद्रसेन । वृषभादिक गोपगण । जैसा मृतासि परते प्राण । तेंवि धांवोन भेटती ॥५८॥
राम नेला होता काळें । वांचला आमुच्या भाग्यबळें । म्हणोनि प्रेमेम गळीया गळे । लावूनि स्नेहाळ भेटती ॥५९॥
परमस्नेहें विह्वळचित्त । म्हणोनि रामा आलिंगित । पापकर्मा प्रलंबदैत्य । पापें मृत्य पावला ॥२६०॥
ऐसे कृष्णादि संवगडे । रामा आलिंगिती कोंडें । वर्णिती रामाचे पवाडे । तंव देखती पुढें नवलावो ॥६१॥

पापे प्रलंबे निहते देवाः परमनिर्वृताः । अभ्यवर्षन् बलं माल्यैः शशंसुः साधु साध्विति ॥३२॥

अकस्मात मेघपटल । जेंवि आच्छादी नभोमंडल । तेवीं विमानीं संकुल । निर्जर सकल पातले ॥६२॥
पापकर्मा प्रलंबदैत्य । रामहस्तें पावला मृत्य । झाला अखिलकर्मातीत । हा वृत्तांत जाणोनी ॥६३॥
वर्णिती रामाचा प्रताप । प्रलंबदैत्य पुण्यरूप । झाला म्हणोनि हर्ष अमूप । करिती पुष्पवर्षाव ॥६४॥
शत्रु मारिला प्रलंबा ऐसा । राम धर्माचा कुंवासा । प्रतापतेजें उजळलिया दिशा । वर्णिती यशा सुस्वर ॥२६५॥
भला भला संकर्षणा । प्रलंब मारूनि आंगवणा । केलें त्रैलोक्यपरित्राणा । निर्जरगणा तोषविलें ॥६६॥
ऐसे सुरवर पावोनि तोष । वर्णिती रामकृष्णाचें यश । लावूनि दिव्य दुंदुभिघोष । विजयोत्कर्ष मानिती ॥६७॥
सुभरें जैशी वळींव सरी । वर्षे उत्तरानक्षत्रीं । पुष्पवृष्टि तयापरी । केली निर्जरीं आनंदें ॥६८॥
भवंती भांडिरवटाहूनी । पंचक्रोशात्मक अवनि । नंदनवनींच्या दिव्यसुमनीं । आच्छादूनी राहिली ॥६९॥
तया सुमनांच्या सुगंधें । आकर्षिलीं भ्रमरवृंदें । गुंजारवें यशें विशदें । परमानंदें वर्णिती ॥२७०॥
दिव्य सांडूनि दिवौकस । इच्छूनि हरीचा सहवास । आवडी झाले व्रजौकस । योनि अशेष जन्मोनी ॥७१॥
तिहीं घेतां तो मकरंद । म्हणती कृष्णपदारविंद । श्रवणसुखाचा आनंद । निर्जरवृंद नेणती ॥७२॥
म्हणती कृष्णचरणकमळ । परमानंदामोदबहळ । सेवूं जाणती जे अळिउळ । त्यां हा परिमळ रुचेना ॥७३॥
ग्राममक्षिका क्षुद्ररसें । ग्राम्यभोगें विषयी तैसे । निर्जर होऊनि स्वर्गवासें । श्लाघेजती ऐश्वर ॥७४॥
राया ऐसा कुरुभूषणा । प्रलंब वधितां संकर्षणा । देवीं पूजोनि उत्साह नाना । केले ते ते तुज कथिले ॥२७५॥
ऐसें भांडीरवनचरित्र । प्रलंबवध अतिपवित्र । भावें ऐकती ज्यांचे श्रोत्र । कैवल्यपात्र ते होती ॥७६॥
पुढें मुंजाटवीच्या ठायीं । वणवा जळतां गोपगायी । प्राशन करील शेषशायी । श्रवणालयीं तें वसवा ॥७७॥
इतुकी श्रीमद्भागवतीं । दशमस्कंधीं कृष्णकीर्ति । शुकें कथिली नृपाप्रति । जे हे श्रोत्रीं परिसिली ॥७८॥
जनार्दनकृपा एकनाथें । चिदानंदस्वानंदभरितें । गोविंदवरें केलें पुरतें । दयार्णवें सप्रेमें ॥७९॥
हें सप्रेम प्रज्ञाबळें । अष्टादशाचें मोकळें । व्याख्यान केलें जैसें कळे । सुबोध अबळें विवरितां ॥२८०॥
दयार्णवाची हे विनति । सप्रेम करितां भगवद्भक्ति । न वांछितां भुक्तिमुक्ति । पाठीं लागती भक्तांचे ॥८१॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां प्रलंबवधो नाम अष्टादशोऽध्यायः ॥१८॥
श्रीरामार्पणमस्तु ॥ श्लोक ॥३२॥ टीका ओंव्या ॥२८१॥ एवं संख्या ॥३१३॥ ( अठरावा अध्याय मिळून ओवीसंख्या १०३८२ )

अठरावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP