यशोदा रोहिणी नंदो गोप्यो गोपाश्च कौरव । कृष्णं समेत्य लब्धेहा आसन् लब्धमनोरथाः ॥१५॥

यशोदा रोहिणी संकर्षण । नंद उपनंद बृहद्भान । वृद्धगोप अवघेजण । थोर लहान सर्वही ॥५१॥
वडजा बोबडा वांकुडा पेंधा । संवगडियांचा वृंद समुदा । गोपकुमारी प्रमुख राधा । परमानंद पावली ॥५२॥
बाळा मुग्धा प्रगल्भा प्रौढा । कन्या रोहिणी गौरी नवोढा । अज्ञातयौवना रजोगूढा । गोपी झडझडा ऊठिल्या ॥५३॥
स्मरणाथिले इंद्रियग्राम । करणीं वरिले चेष्टाधर्म । जेंवि लाहोनि कल्पद्रुम । नुरती काम सुफलत्वें ॥५४॥
अवधीं येऊनि कृष्णाप्रति । मनें नयनें आलिंगिती । ब्रह्मानंदाची विश्रांति । तुच्छ करिती या तोषें ॥१५५॥
अवघे होऊनि पूर्णकाम । वेष्टूनियां पुरुषोत्तम । राहिले त्यांचें देखोनि प्रेम । होती सकाम विधिहर ॥५६॥

रामश्चाच्युतमालिंग्य जहासास्यानुभाववित् । प्रेम्णा तमंकमारोप्य पुनःपुनरुदैक्षत ।
नगा गावो वृषा वत्सा लेभिरे परमां मुदम् ॥१६॥

ज्याचें ऐश्वर्य नोहे च्युत । त्यातें बलराम प्रेमभरित । आलिंगूनि बैसवीत । स्वानंदयुक्त निजांकीं ॥५७॥
वास्तव जाणे ऐश्वर्यमहिमा । पुनः पुनः वदनपद्मा । पाहोनि विस्मयें पुरुषोत्तमा । हास्य रामा न सांठवे ॥५८॥
पुनः पुनः मुखाकडे । ऊर्ध्व पाहे वाडेंकोडें । अभेदसुखाचिये चाडे । मानस वेडें वितुळलें ॥५९॥
नग म्हणिजे वृक्षवल्ली । विरहें शुष्क पूर्वीं झालीं । कृष्णागमनें टवटविलीं । पाल्हायिलीं सप्रेमें ॥१६०॥
गाई वृष आणि वत्सें । निश्चेष्ट होती जैशीं तुच्छें । कृष्णागमें वाहोनि पुच्छें । प्रेमोत्कर्षें हुंबरती ॥६१॥
तृणवीरुधीं कुहरीं कुक्षीं । अनेकजाति कीटकपक्षी । ते कृष्णाच्या मुखानुलक्षीं । होती निरपेक्षी चित्सुखा ॥६२॥
ऐसा खेचरां भूचरां जलचरां । सहित अवघ्या चराचरां । कृष्णप्राप्तिप्रेमभरा - । विण दुसरा भ्रम नुरे ॥६३॥
आनंदाश्रु गोपगोपी । द्राव पाझरती पादपी । ऐसा कृष्ण विश्वव्यापी । त्रिजग जोपी कृपेनें ॥६४॥
तंव पातले याचक जन । वैदिक विद्वांस तपोधन । योगाभ्यासी आत्मनिपुण । नंद वेष्टून घेतला ॥१६५॥

नंदं विप्राः समागत्य गुरवः सकलत्रकाः । ऊचुस्ते कालियग्रस्तो दिष्ट्या मुक्तस्तावाऽऽत्मजः ॥१७॥

श्रौत स्मार्त सोमयाजी । ज्योतिष्टोमादि दीक्षित व्रजीं । आशीर्वादकल्यानकाजी । द्यावया आले व्रजपातें ॥६६॥
ऐसे गुरुवर ब्राह्मणोत्तम । भूमंडळींचे कल्पद्रुम । अक्षत जोडला पुरुषोत्तम । याच्ञाकामें ते आले ॥६७॥
पुत्रकलत्र परिवारेशी । अवघे येऊनि नंदापाशीं । बोलते जाहले उत्साहेंशीं । अभ्युदयासि जाणोनी ॥६८॥
म्हणती नंदातें ब्राह्मण । सूटला कालियापासून । अक्षत आला ह्रदांतून । तंव नंदन दैवबळें ॥६९॥
कालिय केवळ प्रलयकाळ । तेणें ग्रासिला होता बाळ । प्रलयपावकीं नवनीतगोळ । भाग्यें केवळ सूटला ॥१७०॥
पूर्वसुकृताचें बळ । तें अमुष्टी होतें सबळ । म्हणोनि चुकली काळवेळ । भाग्यें घननीळ भेटला ॥७१॥
मरोनि फिरोनि भेटी आला । एवढा उत्साह भाग्यें झाला । दानें देईं ब्राह्मणांला । तेणें विघ्नाला उपशम ॥७२॥

देहि दानं द्विजातीनां कृष्णनिर्मुक्तिहेतवे । नंदः प्रीतमना राजन् गाः सुवर्णं तदाऽदिशत् ॥१८॥

नंद ऐकोनि आर्यवाणी । हर्षभरित अंतःकरणीं । सालंकृता धेनु सुवर्णी । तयां लागूनि संकल्पी ॥७३॥
कृष्णप्राप्तीचा आनंद । कैवल्यप्राप्ति त्याहूनि मंद । तेणें उत्साहभरित नंद । याचकवृंद गौरवी ॥७४॥
कृष्णप्राप्तीच्या उत्साहगजरीं । दीनता पळाली सपरिवारीं । तेथें दैन्य कोण करी । झाले भिकारी धनाढ्य ॥१७५॥
मृत्तिका पाषाण ओषविबीजें । त्यांच्या संग्रहें म्हणविती राजे । तैसे नव्हेती सभाग्य जे जे । कृष्णप्राप्तिवैभवें ॥७६॥
येरीकडे यशोदा सती । तैशीच रोहिणी परमसुमती । आणि व्रजींच्या समस्त युवती । चकारार्थी शुक बोले ॥७७॥

यशोदाऽपि महाभागा नष्टलब्धप्रजा सती । परिष्वज्यांकमारोप्य मुमोचाश्रुकलां मुहुः ॥१९॥

प्राणापरीस जें पढियंतें । कृष्णनिधान हरपलें होतें । तें दैवें जोडलें मागुतें । प्रेमें बहुतें आलिंगी ॥७८॥
अनापत्या अमंगळ । दैवें उजळलें कपाळ । पोटीं जन्मला घननीळ । तैंहूनि सफळ संसार ॥७९॥
श्रीकृष्णाच्या पुत्रपणें । विसरलें होतें जे वदनें । डोहीं प्रवेशोनियां येणें । पुन्हा शतगुणें दाविली ॥१८०॥
ढका लागतां दुखते वर्मी । जैशी प्रणात दाटे ऊर्मी । तैशी अनपत्यतादुःखधामीं । पडतां पैं दुखवतें ॥८१॥
आजिचें चुकलें परम विघ्न । काळें गिळिला मधुसूदन । पुन्हा भेटला दैवेंकरून । झालें वदन उजळतें ॥८२॥
ऐसा अंकीं घेऊनि हरि । यशोदा विलपे नानापरी । कृष्ण सुस्नात अश्रुधारीं । भोंवत्या नारी सबाष्पा ॥८३॥
रोहिणी म्हणे कृष्णाविणें । दुःखें बलराम जातां प्राणें । सर्वां मृत्यु एका मरणें । कृष्णागमनें तो चुकला ॥८४॥
म्हणती समस्त व्रजींच्या नारी । कृष्णवियोगदुःखसागरीं । बुडाली होती हे व्रजपुरी । पुन्हा बाहेरी काढिली ॥१८५॥
महाभाग्याची तूं यशोदे । परम सुकृत केलें नंदें । तेणें पुढती श्रीमुकुंदें । वदनारविंदें उजळिलीं ॥८६॥
कृष्णहानि स्मरोनि शोक । पुढती अलभ्यलाभाचा तोष । कुरवाळुनियां श्रीकृष्णमुख । पावल्या संतोष समस्ता ॥८७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP