श्रीकृष्णपरमात्मने नमः ।
श्रीसदाशिवाय नमः । परमकुशला परमपुरुषा । परमात्मया पूर्णपरेशा । परापरज्ञा निर्विशेषा । गोपवेशा गोविंदा ॥१॥
जेथ सर्वांचा उपरम । त्या पदासि बोलिजे परम । कुशल म्हणिजे कल्याणधाम । उत्कृष्टक्षेम तव पदीं ॥२॥
प्रकृतीपर्यंत पदें सकळें । यथामानें ग्रासिजती काळें । यालागीं जाणुनि ते अकुशलें । तव पदकमळें आश्रयिलीं ॥३॥
राजमुद्रा अर्घमानें । राजध्वजदंडवसनें । गुरुपादाब्जें तेणें मानें । सगुणपणें नुमाणवे ॥४॥
मुद्रा नोहे सुवर्णमान । ध्वज नोहे कीं यष्टिवसन । तें नृपासाम्राज्यैश्वर्यचिह्न । नृपा होऊनि मान्यत्वें ॥५॥
भक्तकारुण्यें सगुणता । जरी शोभली सद्गुरुनाथा । परी समान नोहे भौतिकां भूतां । तूं तत्त्वतां चिन्मात्र ॥६॥
पुर्यष्टकाचें वेष्टन । पावोनि वर्तें जीवचैतन्य । तैसा पुरुष तूं नोहेसी जाण । त्याचें मोक्षण तूं कर्ता ॥७॥
यालागीं परमपुरुषा स्वामी । असंगसंगें निष्कामकामी । प्रकृतिपतिव्रतासंगमीं । अस्पष्ट नियमीं नियमिता ॥८॥
तुज परमपुरुषाचा जो अथीं । त्या नांव परमपुरुषार्थी । येर जाणावे विषयस्वार्थी । धर्मकामार्थी अवघेही ॥९॥
तुज परमपुरुषार्थाकारणें । धर्मार्थकामांचें सफल जिणें । त्यावीण येर हें पेखणें । भ्रमोक्तपणें मायिक ॥१०॥
भ्रमामाजूनि चैतन्य । देखे अध्यस्तप्रपंचभान । तेंही आत्माचि परी भेदज्ञ । जीव होऊन जग देखे ॥११॥
त्याची फेडूनि जीवात्ममति । कृपेनें आणिसी आत्मस्थिति । तो तूं सद्गुरु अमूर्तमूर्ति । परंज्योति परमात्मा ॥१२॥
कीं आत्मा अभेद चराचरीं । परंतु भेदातें न निवारी । भेदभ्रमाचा विनाश करी । तूं निर्धारीं परमात्मा ॥१३॥
आत्मा असोनि सर्वगत । जीव अविद्याभ्रमें भ्रांत । अभेद असतांचि संतत । भवावर्तन न चुके कीं ॥१४॥
तया भ्रमाच्या निरसनें । अभेद आत्मा आत्मपणें । वेंठे ऐसें ज्याचें करणें । त्यातें म्हणणें परमात्मा ॥१५॥
जेथें कामा पुरे भरण । त्या पदांतें म्हणिजे पूर्ण । येर पूर्ण म्हणती शून्य । तें अज्ञान नास्तिक्य ॥१६॥
कामापुरतें उरे शेष । तयापरता तूं परेश । परादिवाचांचा अवकाश । सावकाश तुजमाजीं ॥१७॥
कोणापासूनि कोण अपर । कोण तें कोणाहूनि पर । याचा अभिज्ञ तूं साचर । परत्परतर परमात्मा ॥१८॥
गुणसाम्यरूपें स्फुरण । महाभूतादि जे कां त्रिगुण । यांची व्याप्ति जेथ समान । तें सामान्य बोलिजे ॥१९॥
सामान्यत्वें जें अशेष । तें प्रकाश्य तूं स्वप्रकाश । निरसूनि सामान्य विशेष । निर्विशेष अंतीं तूं ॥२०॥
गोमान् म्हणिजे जैसा तरणि । मृगजळ प्रकाशूनि स्वकिरणीं । गोपक होनि अलिप्त गगनीं । तेंवि तूं स्वगुणीं गोगोप्ता ॥२१॥
गोभेद अभेद चराचर । गोपवेश तूं ईश्वर । गोगोपक हृदयीं स्थिर । अगोचर जगदात्मा ॥२२॥
ऐशिया तुझें हेंचि नमन । आपुलें निरसूनि भिन्नपण । तुझें अपरोक्ष परिज्ञान । पावोनि अभिन्न हो जेणें ॥२३॥
यया होणया असोनि आंधळे । निगमगुर्वर्क जों नुजळे । अंतर्विरक्त विवेकमेळें । सबाह्य प्रांजळें धवलिसी ॥२५॥
यालागीं सबाह्य प्रकाशका । अखिलात्मका संतोषका । नमन अभिन्न देशिका । भावजनका भावस्था ॥२६॥
ऐसें ऐकोनि तोषले गुरु । म्हणती पुरे वाग्व्यापारु । उरगप्रवृत्तिनिवृत्तिपरिहारु । लाभल्या हारु कां वदिजे ॥२७॥
तथापि शुभस्वप्नाचा तोष । होय चेइल्याही विशेष । तैसाचि तुझा हा स्तवनोत्कर्ष । अभेदहर्षवर्धन ॥२८॥
आतां सांवरूनि हे स्तुति । प्रवर्तावें आरब्ध - ग्रंथीं । कर्णद्वारें अक्षरपंक्ति । भरली चित्तीं गुरुवरें ॥२९॥
हृद्भू विवेकसगरात्मजीं । खणोनि पर्वत केले रजीं । गंगाओघे वर्णराजीं । भरला सहजीं दयार्णव ॥३०॥
कृपाअपांगसीतळपवनें । उचंबळोनि सप्रेमवनें । प्रज्ञाप्रवाहें सर्वही करणें । पटुतरपणें टवटविलीं ॥३१॥
माजीं बिंबला गगनसदृश । सद्गुरु जो कां स्वप्रकाश । तेणें श्रवणसुखाचा हर्ष । श्रोतयांस उपतिष्ठे ॥३२॥
जैसा महावीराचा शर । फोडी कवचेंशीं शरीर । तेंवि श्रवणीं वरदोत्तर । पडतां संहार संशया ॥३३॥
निःसंशय जेव्हां मन । तेव्हां अयत्नें उन्मन । पावें स्वरूपसमाधान । आनंदघन स्वतःसिद्ध ॥३४॥
ते हे हरिवराची टीका । क्षणैक एकाग्र आइका । होतां श्लोकार्थ ठाउका । मोडे आवांका भेदाचा ॥३५॥
साखर घालूनि पहावी तोंडीं । येरा पुसावी नलगे गोडी । तैशी एथींची श्रवणावडी । अपरोक्ष जोडी आणील ॥३६॥
तरी हें भागवतींचें सर । दशमस्कंधीं कृष्णचरित्र । कालियमथन सविस्तर । ऐकोनि नृपवर पुसतसे ॥३७॥
तो हा दशमीं सप्तदश । अध्याय यांत कथाविशेष । नाग धाडूनि नागलयास । हरि स्वजनांस भेटला ॥३८॥
मग प्रसुप्त यमुनातीरीं । गोपगोधनें श्रमित रात्रीं । दावानळें गिळितां हरि । चमत्कारीं संरक्षी ॥३९॥
तेथ गतकथा अन्वय । सर्पांहूनि विशेष भय । मानूनि गरुडाचें कालिय । ह्रदीं निर्भय कैसेनी ॥४०॥
ऐशिये शंकेचें निरसन । करावया कुरुभूषण । शुकासि करिता झाला प्रश्न । सावधान तो ऐका ॥४१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP