अध्याय १६ वा - श्लोक ५६ ते ६१

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


वयं खलाः सहोत्पत्त्या तामसा दीर्घमन्यवः । स्वभावो दुस्त्यजो नाथ लोकानां यदसद्ग्रहः ॥५६॥

मग म्हणे जी तमालश्यामा । विश्वविदिता आत्मयारामा । चेष्टविता तूं भूतग्रामा । वृथा आम्हां दूषण ॥५७॥
उत्पत्तीपासूनि आम्ही खळ । तामसयोनि क्रोधबहळ । करुणाहीन द्वेषशीळ । हा स्वभाव केवळ आमुचा ॥५८॥
सकळ लोकांसि दुष्टग्रह । नैसर्गिकचि आमुचा देह । म्हणोनि सर्व प्राणिसमूह । करी द्रोह आमुचा ॥५९॥
ते नेणती मूढमति । योनिभेदें देहाकृति । निसर्गवैराचे संप्राप्ति । जे दूषिती तें उचित ॥६६०॥
तो तूं स्वामि सर्ववेत्ता । आम्हां स्वभवपरतंत्रता । वर्तवूनि आमुचे माथां । सांगे कोणता अन्याय ॥६१॥
श्वानें सांडूनि विटाळ । केंवि हों शकती निर्मळ । कां वायस आचारशीळ । होईल केवळ द्विजवर्य ॥६२॥
करावया उदकंशीं सोयरिक । शीतळ हों पाहे पावक । परी तें आंगींचें दाहक । टाकणें अटक तयातें ॥६३॥
तैसा दुस्त्यज स्वभाव । तामसयोनीं प्रादुर्भाव । तुवांचि निर्मिला हा समुदाव । मायालाघवप्रसंगें ॥६४॥

त्वया सृष्टमिदं विश्वं धातर्गुणविसर्जनम् । नानास्वभाववीर्यौजोयोनिबीजाशयाकृति ॥५७॥

प्रभो तुवां हे सृजिलें । तेव्हांचि गुणभेद विविध केले । तदनुरूप सर्जन झालें । तें पालटिलें नव जाये ॥६६५॥
अश्व श्वान खंडेराव । खांडा म्हाळसा आभरणें सर्व । एक सुवर्ण असतां ठाव । भरला गांव भेदाचा ॥६६॥
तेथ कोरितां ठसा प्रथम । कोठें होय तें रूप नाम । मग त्या ठसां वेढितां हेम । उमटे समसाम्य अवघेंची ॥६७॥
तैसे अवघे योनिभेद । करावया तूंचि कोविद । प्रवृत्तिव्यवहारविभाग । विविध बोधूनि विशद वेगळा ॥६८॥
गुणानुसार कर्में विचित्र । कर्मास्तव प्रारब्धतंत्र । नानास्वभाव पृथगाकार । वीर्यशौर्यप्रतापें ॥६९॥
वेगळाल्या मतिशक्ति । योनिभेद देहाकृति । वैरें मित्रें कर्मप्रवृत्ति । पृथगाकृति पसरिल्या ॥६७०॥
परस्परें जातिवैरें । कर्मतंत्रें पृथगाकारें । भूतें चेष्टती संस्कारें । परी तूं अंतरें वसविसी ॥७१॥
मणि माळेचे भिन्नभिन्न । सूत्रामाजि ते अभिन्न । तैसा जगीं तूं जगज्जीवन । सर्वीं सर्वज्ञ सर्वात्मा ॥७२॥
कुतरें उबगोनि कुतरेपणा । टाकावया करितां यत्ना । खंडेरायपदवी जाणा । त्यासि कोण देववे ॥७३॥
एरवीं असे एक्याचि मानें । खंडेरायाशीं काय तें उणें । निर्मिलीं एकाच सुवर्णें । सर्वाभरणें समवेत ॥७४॥

वयं च तत्र भगवन् जातुरुमन्यवः । कथं त्यजामस्त्वन्मायां दुस्त्यजां मोहिताः स्वयम् ॥५८॥

अनंतअचिंत्यगुणपरिपूर्णा । निखिलैश्वर्यसंपन्ना । श्रीभगवंता तुजवीण कोणा । आमुची करुणा उपजेल ॥६७५॥
तुवां निर्मिलें चराचर । त्यामाजि सर्पयोनि घोर । शीघ्रकोपी आम्ही विखार । भयंकर सर्वांसी ॥७६॥
त्या आमुच्या घोरपणां । टाकूं न शकों जी सर्वज्ञा । तुझे मायेच्या मोहना । तुजविण कोणा निरसवे ॥७७॥
मायामोहें मोहून आम्हां । योजिलें निसर्गजनितधर्मा । टाकों न शकों उग्रकर्मा । हा दुस्त्यज महिमा मायेचा ॥७८॥
भाग्यें लाधलों तव पदपांसु । तेणें उजळला ज्ञानदिवसु । जेणें तव कृपेचा अमृतलेशु । वांछूं विशेषु या देहीं ॥७९॥
एरवीं आम्ही तामसयोनि । पडिलों मायेच्या बंधनीं । आतां जाणों तुजवांचोनी । माया कोणी निरसीना ॥६८०॥

भवान् हि कारणं तत्र सर्वज्ञो जगदीश्वरः । अनुग्रहं निग्रहं वा मन्यसे तद्विधेहि नः ॥५९॥

तूं मायेचें कारण । मायानियंता सर्वज्ञ । जगदुत्पत्तिस्थितिनिदान । करणें जाण तुज अवघें ॥८१॥
उग्रस्वभाव दुस्त्यज आम्हां । परी तूं स्वसत्ता परमात्मा । पालटूनि सौम्यधर्मा । लावीं नियमा अनुग्रहें ॥८२॥
अनुग्रह निग्रह करूनि बळें । जातीमाजूनि वेगळें । आम्हां आणूनि सौम्यमाळे । सत्ता स्वलीले चेष्टवीं ॥८३॥
निग्रह अनुग्रह हे दोन्ही । यांमाजि रुचे अंतःकरणीं । तेंचि करूनि चक्रपाणि । स्वदासगणीं मज लेखीं ॥८४॥
ऐसी करुणा भाकितां फणी । कृपे द्रवला चक्रपाणि । काय बोलिला मधुरवाणी । तें नृपाकर्णीं शुक घाली ॥६८५॥

श्रीशुक उवाच - इत्याकर्ण्य वचः प्राह भगवान् कार्यमानुषः । नात्र स्थेयं त्वया सर्प समुद्रं याहि मा चिरम् ॥६०॥

देवकार्यार्थ मनुष्यपणा । जो निजांगीं लेइला जाणा । तेणें ऐकोनि कालियवचना । केली आज्ञा ते ऐका ॥८६॥
म्हणे रे सर्पा क्रूरमति । यमुनाह्रदीं त्वां न कीजे वसति । शीघ्र जावें समुद्राप्रति । आज्ञा निश्चिती माझी हे ॥८७॥

स्वज्ञात्यपत्यदाराढ्यो गोनृभिर्भुज्यते नदी । य एतत्संस्मरेन्मर्त्यस्तुभ्यं मदनुशासनम् ।
कीर्तयन्नुभयोः संध्योर्न युष्मद्भयमाप्नुयात् ॥६१॥

आपुले स्वजन सुहृदज्ञाति । घेऊनि कलत्रें संतति । शीघ्र जावें समुद्राप्रति । एथें वसति न करावी ॥८८॥
तुज येथूनि गेलिया पाठीं । गाई मनुष्यें जीवकोटि । स्वेच्छा क्रीडती यमुनेपोटीं । भयाची गोठी न धरूनी ॥८९॥
आणिक ऐकें आज्ञापन । तुजकारणें अनुशासन । जें म्यां केलें त्याचें पठन । करिती पूर्ण सद्भावें ॥६९०॥
प्रथम करूनि निग्रह । पुढतीं केला अनुग्रह । नागपत्न्यांचा स्तवनोत्साह । एतत्समूहपूर्वक ॥९१॥
सायं प्रातरुभयकाळीं । नित्य नियमें वदनकमळीं । जे जे पढती पुण्यशाली । त्यां निजमौळीं वंदिजे ॥९२॥
तुम्हीं माझिये आज्ञेवरून । त्यांचें करावें संरक्षण । भय नेदावें अणुप्रमाण । अनुशासन चालविजे ॥९३॥
ऐसा करूनि आज्ञानियम । पुन्हा वर दे पुरुषोत्तम । जेणें हरे संसारश्रम । उपाय सुगम तो ऐका ॥९४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP