अध्याय १६ वा - श्लोक २१ ते २४

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ताः कृष्णमातरमपत्यमनुप्रविष्टां तुल्यव्यथां समनुगृह्य शुचः स्रवंत्यः ।
तास्ता व्रजप्रियकथाः कथयंत्य आसन् कृष्णाननेऽर्पितदृशो मृतकप्रतीकाः ॥२१॥

जननिया कृष्णाच्या स्नेहाळा । वत्सप होऊनि जैं केली लीला । तैं जयांचें स्तन्य प्याला । त्या त्या सकळा समदुःखी ॥५६॥
आणि व्रजींच्या अवघ्या नारी । ज्यांचे कुमार पुलिनावरी । मूर्च्छित पडिले प्रेतापरी । यशोदे सरी त्या रडती ॥५७॥
यशोदा कृष्णातें लक्षून । दुःखें करी आक्रंदन । गोपी तीतें अनुसरोन । करिती रुदन समदुःख ॥५८॥
माता पुत्रमोहें रडती । विरहें गोपी चरफडती । न हालतां नेत्रपातीं । मुख लक्षिती कृष्णाचें ॥५९॥
स्तन पाझरती मातृमोहें । शोकें नेत्रीं बाष्प वाहे । कृष्णवियोगें दुःखें देहे । फुटती लाहेसारिखे ॥२६०॥
जन्मापासूनि कृष्णलीला । ज्या ज्या प्रियकर गोपिकांला । त्या त्या स्मरोनि तिये वेळां । ऐकीमेकींला सांगती ॥६१॥
कृष्ण राहिला जैंहूनि पोटीं । तैंहूनि मी सभाग्य मोठी । झालें एकसरी करंटी । रेखा खोटी निवडली ॥६२॥
कृष्णासारिखें लेंकरूं । निर्मूं न शके ईश्वरू । कोंवळें कृष्णाचें अंतर । आजि निष्ठुर पैं झाला ॥६३॥
कृष्णासि आवडे मिष्ठान्न । कृष्णासि आवडे पयःपान । कृष्णासि आवडे माखण । हय्यंगवीन स्वादिष्ट ॥६४॥
कृष्ण नाना आळी करी । मथन करितां पदरीं धरी । चंद्र देखोनि जळांतरीं । मागे करीं खेळावया ॥२६५॥
कृष्णासि आवडे काहाणी । सांगतां ऐके मन ठेवूनी । चिमणीं मुलें मेळवूनी । बोबड्या वचनीं त्यां सांगे ॥६६॥
कृष्ण उमाणी सर्व जाणे । कृष्ण मंजुळ गाय गाणें । सप्तवरीं तानमानें । लास्यनर्तनें संगीत ॥६७॥
कृष्ण सांवळा डोळस । कृष्ण नागर गोपवेश । कृष्णेंवीण विश्व ओस । वाटे उदास भणभणा ॥६८॥
ऐसे अनेक विलाप करून । आठविती श्रीकृष्णेंवीण । कृष्णवदनीं जडले नयन । प्रेतासमान तटस्थ ॥६९॥
कृष्णचि केवळ प्राण ज्यांतें । नंदादिकां त्यां गोपांतें । ह्रदीं प्रवेशतां रोहिणीसुतें । धरूनि वारिलें तें ऐका ॥२७०॥

कृष्णप्राणान्निर्विशतो नंदादीन्वीक्ष्य तं ह्रदम् । प्रत्यषेधत्स भगवान् रामः कृष्णानुभाववित् ॥२२॥

तंव नंदादि गोपवृद्ध । कृष्ण देखोनि सर्पें बद्ध । मोहें अवघेचि झाले मुग्ध । म्हणती ह्रद प्रवेशों ॥७१॥
झणें कृष्ण सोडील प्राण । देखों न शकों हें निर्वाण । कृष्णाआधीं आमुचे प्राण । जातां सगुण त्यापरिस ॥७२॥
ऐसें दुःखें रिघती डोहीं । संकर्षण त्यां धरूनि बाहीं । मागें लोटी हातीं दोहीं । सांगे कांहीं हरिलीला ॥७३॥
म्हणे गर्गाचें ज्योतिष । कोठें तरी झालें फोस । तेणें कथिलें भविष्य । धरा विश्वास ते ठायीं ॥७४॥
षड्गुणैश्वर्याचा पति । तो बलराम ईश्वरमूर्ति । तेणें वारितां गोपांप्रति । तटस्थवृत्ति राहिले ॥२७५॥
तंव परीक्षिति म्हणे मुनि । कालियविषाच्या पवनें वनीं । स्थावरजंगमां आहळणी । वांचले कैसेनि व्रजवासी ॥७६॥
ऐकोनि हांसिला योगिराव । म्हणे शंकेसि नसोनि ठाव । कोमल श्रोत्यांचा जाणोनि भाव । प्रश्न अपूर्व तो केला ॥७७॥
तरी गाई गोपाळ ह्रदींचें पाणी । पिऊनि पावले प्राणहानि । ते कृपादृष्टीं अवलोकनीं । अमृत वर्षोनि जो जीववी ॥७८॥
आणि वत्सें वत्सप अघापोटीं । भस्म झाले ते कृपादृष्टीं । अवलोकूनियां जगजेठी । सजीव सृष्टीं जो काढी ॥७९॥
कदंबा भावी कृष्णचिंतन । यास्तव गरळें न जळे जाण । तो ह्रदीं असतां प्रत्यक्ष कृष्ण । केंवि व्रजजन जळतील ॥२८०॥
कृष्णविरहें रिघते डोहीं । तरी त्यां विषभय न बाधी कांहीं । कृष्णवियोगें मूर्च्छा देहीं । भरोनि पाहीं वश झाले ॥८१॥

इत्थं स्वगोकुलमनन्यगतिं निरीक्ष्य सस्त्रीकुमारमतिदुःखितमात्महेतोः ।
आज्ञाय मर्त्यपदवीमनुवर्तमानः स्थित्वा मुहूर्तमुदतिष्ठदुरंगबंधात् ॥२३॥

व्रजौकसांची हे अवस्था । कळों सरली श्रीकृष्णनाथा । पाहोनि गोगोपां तटस्थां । हृदयीं व्यथा जाणवली ॥८२॥
ऐसें आपुलें गोकुळ । स्त्रिया पुरुष सहितबाळ । देखोनि आपणाविण व्याकुळ । हृदयीं गोपाळ कळवळिला ॥८३॥
मीच ज्यांसि परमगति । मजविण आन न जाणती । ग्रस्त देखोनियां मजप्रति । दुःखी होती मजसाठीं ॥८४॥
जेणें धरिली मर्त्यपदवी । तो मनुष्यापरी वर्तोनि दावी । एरव्हीं चराचरगोसांवी । गोष्टी ठावी अवघी त्या ॥२८५॥
मनुष्यांपरी रडे पडे । मनुष्यापरी भेणें दडे । डोहीं सप्रें घालितां वेढे । निश्चेष्ट पडे नावेक ॥८६॥
तंव व्रजौकसें समस्तें आपणा निमित्त झालीं प्रेतें । अत्यंत जाणोनि श्रीअनंतें । करुणावंतें कळवळूनी ॥८७॥
मुहूर्तमात्र संपादणी । संपादिली मनुष्यपणीं । आप्तांसाठीं अंतःकरणीं । चक्रपाणी कळवळिला ॥८८॥
मग त्या उरगबंधांतून । प्रतापें निघाला श्रीभगवान । जैसा सजळाभ्र लंघून । अमृतकिरण प्रकाशे ॥८९॥
काळियाचा उकलूनि फांसा । उभा ठाकला श्रीकृष्ण कैसा । त्या दोघाम्चा प्रताप जैसा । वर्तला तैसा परियेसीं ॥२९०॥

तत्प्रथ्यमानवपुषा व्यथितात्मभोगस्त्यक्त्वोन्नमय्य कुपितः स्वफणान् भुजंगः ।
तस्थौ श्वसन् श्वसनरंध्रविषांबरीषस्तब्धेक्षणोल्मुकमुखो हरिमीक्षमाणः ॥२४॥

वज्रसारहरिशरीर । कालियवपु रज्ज्वाकार । गुंडूनि कर्षिलें दृढतर । वैक्लव्यपर होवया ॥९१॥
तंव तूष्णींभूत राहोनि कृष्ण । झाला तद्व्यथासहिष्ण । मूहूर्तमात्रें सर्पप्राण । पडिले क्षीण निश्चेष्ट ॥९२॥
अंगप्रौढी विशाळ तरु । लववी जैसा बलिष्ठ नरू । परी तैसाच चिरकाळ होतां स्थिर । भंगें धीर मुहूर्तें ॥९३॥
कीं मनुष्य जळामाजीं बुडी । देऊनि निग्रहें श्वास कोंडी । शक्तीहूनि अधिक घडी । भरतां सोडी प्राणांतें ॥९४॥
तेंवि कालियें अवघें बळ । वेंचूनि कर्षिला गोपाळ । मुहूर्तपर्यंत निश्चळ । मग व्याकुळ अहि झाला ॥२९५॥
मग उकलूनि आंगींचे वेढे । शतशः उभारी विशाळ फडे । प्रपंच क्रोधें हृदयीं कढे । ज्वाळा तोंडें वमीतसे ॥९६॥
जितुक्या फणा तितुकीं वक्त्रें । तद्द्विगुणित नासारंध्रें । गरळाग्नीच्या प्रलयधूम्रें । संपूर्ण भरे स्थळ जळ ॥९७॥
कराल गरल सक्रोध कडके । नासारंध्रें निघती भडके । यमुनाकल्लोळ साहती खडकें । तैसे धडके हरी सोसी ॥९८॥
मांदे करिती ज्या सुरगणी । उबडी ठेविती त्या रांधणी । तैशा संतप्त नेत्रश्रेणी । पाहे क्षोभोनि सक्रोध ॥९९॥
मुखें प्रदीप्त उल्मुकाकार । हिंस्र अशांत विखार । नेत्र सरोष एकाग्र । नंदकुमार अवलोकी ॥३००॥
परंतु कृष्णावरी तवकें । झोंबोनि दंश करूं न शके । तटस्थ गरळा वमिती मुखें । नेत्रीं देखे प्रज्वलित ॥१॥
जैसा स्वधर्मसंपन्न शूर । आधीं पराचे सोसी प्रहार । मग आपण परम धीर । करी प्रहार त्यावरी ॥२॥
तैसा कालियाचा यांवा । कृष्णें साहिला आघवा । आतां दावी स्वा दुर्भावा । तो कौरव्या परियेसीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP