अध्याय १६ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


तांस्तथा कातरान् वीक्ष्य भगवान्माधवो बलः । प्रहस्य किम्चिन्नोवाच प्रभावज्ञोऽनुजस्य सः ॥१६॥

मधुवंशज संकर्षण । म्हणोनि माधव हें अभिधान । स्वस्थचित्तें हास्यवदन । जाणे महिमान अनुजाचें ॥२०५॥
कृष्णविरहें दुःखाभिभूतें । राम देखोनि समस्तांतें । कृष्णप्रभाव जाणें चित्तें । परी कोणातें प्रकटीना ॥६॥
मनुजाकृति नटले पूर्ण । षड्गुणैश्वर्यें संपन्न । परस्परें ते प्रभावज्ञ । परी रहस्यकथन न करिती ॥७॥

तेऽन्वेषमाणा दयितं कृष्णं सूचितया पदैः । भगवल्लक्षणैर्जग्मुः पदव्या यमुनातटम् ॥१७॥

जो कां जीवाचें जीवन । मनादिकरणांचा जो प्रान । सर्वां प्रियतम चैतन्यघन । तो आत्मा श्रीकृष्ण पढियंता ॥८॥
त्या प्राणप्रिया श्रीकृष्णातें । विरहें व्रजौकसें दुःखितें । सैरा काननीं हुडकित । मोहभ्रांतें चालिलीं ॥९॥
एथें कृष्णें चारिल्या गायी । कृष्ण बैसला इये सायीं । कृष्ण क्रीडला इये भोयीं । देहुडा पायीं ठाकला ॥२१०॥
कृष्णें एथें वाहिला वेणु । त्याची अद्यापि पहा खूण । गोधनीं न सेविलें हें तृण । परी भूमीसि चरण उमटलें ॥११॥
व्याघ्रवृकादि हिंस्र जाति । त्यांचे चरण उमटले क्षिती । वेणुवेधें त्यां बाणली शांति । निसर्गवृत्ति उपरमे ॥१२॥
ऐसें पाहती स्थळोस्थळीं । स्नेहसशोक जाती विकळीं । भुली मोहाची आगळी । कीं वनमाळी आळविती ॥१३॥
एथें पुष्पें तुरंबिलीं । एथें कृष्णें फळें वेचिलीं । एथें कृष्णें निद्रा केली । तृणें दडपलीं तद्व्याजें ॥१४॥
जें जें पुढें दृश्य दिसे । तें तें कृष्णचि त्यांतें भासे । कृष्णवेधें झाले पिसे । दीर्घघोषें आळविती ॥२१५॥
कृष्ण पुसती तुरगाउरगा । शशका मशका नागा नगा । भृंगा कुरंगा विहंगा । म्हणती श्रीरंगा देखिलें ॥१६॥
गुल्म लता तृणें वल्ली । लागलीं कृष्णाच्या पाउलीं । तेणें रंगें सुरंग झालीं । कृष्णचालीप्रसंगें ॥१७॥
भोंवता गोपाळांचा थवा । आणि पशूंचा मेळावा । माजीं कृष्णाचा मागोवा । देखोनि धांवा धांवती ॥१८॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो हा श्रीकृष्णभगवान । त्याच्या पदाचें जाणोनि चिह्न । गौळी सज्ञान धांवती ॥१९॥
जिहीं चिह्नीं भगवत्पदें । ओळखोनि गोपवृंदें । धांवती तीं चिह्नें विशदें । मार्गीं मुग्धें लक्षिती ॥२२०॥
तिहीं चिह्नीं दाविली वाट । तेणें मार्गें घडघडाट । अवघे पातले यमुनातट । ह्रदानिकट मिळाले ॥२१॥
एथें म्हणसी कुरुमंडना । समानवयस्कां गोवळगणा । माजीं कृष्णाच्या चरणचिह्ना । कैशिया खुणा चोजविलें ॥२२॥

ते तत्र तत्राब्जयवांकुशाशनिध्वजोपपन्नानि पदानि विश्पतेः ।
मार्गे गवामन्यपदांतरांतरे निरीक्षमाणा ययुरंग सत्वराः ॥१८॥

तरी जैसे कां योगिजन । अप्रमत्तत्वें सावधान । अतद्व्यावृत्ती करून । ब्रह्म निर्गुण गिंवसिती ॥२३॥
तैशीं मार्गीं धेनुपदें । त्यांमाजी गोपाळांचीं विशदें । त्या सर्वांच्या अतद्वादें । श्रीकृष्णपदें गिंवसिती ॥२४॥
कृष्णांघ्रीची ओळखण । ध्वजांकुशोर्ध्वरेखापूर्ण । पद्मयवादि चिह्नीं जाण । भगवच्चरण प्रकाशती ॥२२५॥
धेनुमार्गें रानोरानीं । अन्यपदांच्या निराकरणीं । भगवत्पद विलोकूनी । आले धांवोनि सत्वरा ॥२६॥
परीक्षितीतें अंगशब्दीं । बादरायणि स्वसंपादीं । संबोधूनि विशाळबुद्धि । म्हणे त्रिशुद्धि अवधारीं ॥२७॥

अंतर्ह्रदे भुजगभोगपरीतमारात्कृष्णं निरीहमुपलभ्य जलाशयांते ।
गोपांश्च मूढधिषणान् परितः पशूंश्च संक्रंदतः परमकश्मलमातुरार्ताः ॥१९॥

येऊनि पाहती ह्रदाकडे । तंव कृष्णा आंगीं सर्पवेढें । निश्चेष्ट पडला जैसें मडें । तैसा निवाडें देखती ॥२८॥
कृष्ण सांपडला म्हणती गजरीं । परंतु अगाध जलांतरीं । दुर्विषाच्या उडती लहरी । यालागीं करीं अप्राप्य ॥२९॥
जावों न शकती कोणी आंत । कालियनाग गरळ वमित । अगाध डोहो विषें कढत । तीरीं तटस्थ जन झाले ॥२३०॥
मग पाहती ह्रदाभंवतें । तंव गोपाळ पडिले जैशीं प्रेतें । धेनु आक्रंदती तेथें । महादुःखातें पावले ॥३१॥
अंतःकरणें विकळ झालीं । हाहाकारें धैर्यें गेलीं । दीनें अनाथें होऊनि ठेलीं । मूर्छित पडलीं नावेक ॥३२॥
ऐशी व्रजौकसांची दशा । गोपी प्रेमळा मुग्धवयसा । कोटिमन्मथलावण्यठसा । साभिलाषा श्रीकृष्णीं ॥३३॥

गोप्योऽनुरक्तमनसो भगवत्यनंते तत्सौहृदस्मितविलोकगिरः स्मरंत्यः ।
ग्रस्तेऽहिना प्रियतमे भृशदुःखतप्ताः शून्यं प्रियव्यतिहृतं ददृशुस्त्रिलोकम् ॥२०॥

अनंतैश्वर्यप्रतापी । जो परमात्मा विश्वव्यापी । त्या कृष्णाचे लावण्यरूपीं । स्वमनें गोपी अनुरक्ता ॥३४॥
दृढनिश्चय त्यांचे मनीं । दुसरा समर्थ कृष्णाहूनी । नाहीं ब्रह्मांडभुवनीं । लावण्यगुणीं तुळी ऐसा ॥२३५॥
कृष्ण विधिहरांचा शास्ता । कृष्ण काळाचा नियंता । ऐसा दैवें लाभे भर्ता । तैं समर्था श्रीहूनी ॥३६॥
तें विपरीत झालें कैसें । कृष्ण कर्षिला काळपाशें । खान घालूनि आमुचे आशे । दिलें संतोषें अंतर ॥३७॥
कृष्णा ऐसे सुहृद सृष्टीं । न मिळे पाहतां ब्रह्मांडकोटि । श्रीकृष्णाच्या स्मरोनि गोष्टी । पडती भूतटीं मूर्च्छितां ॥३८॥
श्रीकृष्णाचें हास्यवदन । स्निग्ध अपांगनिरीक्षण । पहतां ब्रह्मानंद गौण । उपमा गौण त्या मुखा ॥३९॥
श्रीकृष्णाचें मधुर बोल । ऐकोनि येती स्वानंदडोल । कोटिब्रह्मपदांचें मोल । तुळितां अतुल पडिपाडें ॥२४०॥
प्रियतम सर्पें ग्रासिला बाई । आतां भूभार जिणें काई । दुःखें पेटली हृदयखाई । पडती ठायीं मूर्च्छिता ॥४१॥
पुन्हा होतां लब्धस्मृति । गोपी दुःखें आक्रंदती । श्रीकृष्णाची मन्मथमूर्ति । भरली चित्तीं तद्विरहें ॥४२॥
बालसूर्याचें आरक्तपण । रातोत्पलदलमॄदुलचरण । शयनीं घेऊनि पहुडों कृष्ण । तैं करूं मर्दन उरोजीं ॥४३॥
काम शत्रु जो असाध्य । येणें साधनें करूं साध्य । म्हणतां आम्हीच झालों वंध्य । स्मर अवंध्य उरला कीं ॥४४॥
श्रीकृष्णाचें अधरामृत । प्राशूनि जिंकूं इच्छिला मृत्य । तें आजि विफळ झालें कृत्य । मृत्य त्वरित पातला ॥२४५॥
श्रीकृष्णाच्या आलिंगना । लाहतां न बाधी काळकलना । कृष्ण डंखूनि काळियाणा । आमुच्या प्राणा घेतलें गे ॥४६॥
चंद्रकाश्मीरचंदनउटी । देऊं कृष्णातें गोमटी । ऐशी इच्छा होती पोटीं । परी अदृष्टीं नाहीं कीं ॥४७॥
श्रीकृष्णाचे उभय चरण । कुरळ केशीं झाडूं पूर्ण । ऐसें इच्छित होतें मन । परी दैवहीन निवडलें ॥४८॥
होऊं कृष्णाच्या किंकरी । कृष्ण सेवूं निरंतरी । इच्छा होती हे अंतरीं । ते ईश्वरी पुरवीना ॥४९॥
कृष्णवियोगें ऐशिया । गोपी विलपती अवघिया । म्हणती चांडाळ काळिया । आमुच्या प्रळया उदेला ॥२५०॥
भरलें असतांही त्रिभुवन । कृष्णविरहें देखती शून्य । कृष्णप्रेमें तनु मन प्राण । ठेलें वेधून तद्रूपीं ॥५१॥
त्या गोपींची विरहकथा । कथी ऐसा कैंचा वक्ता । तथापि भृशदुःखें संतप्ता । त्या श्लोकार्था अनुसरलों ॥५२॥
विरहिणीं कां उपासकाम । कीं अनन्यभावें सद्गुरुभजकां । एवं विरह का ठाउका । येरां मायिका काहणी हे ॥५३॥
ऐशी गोपिकांची कथा । आतां जननीची अवस्था । शुक निवेदी अवनिनाथा । तेही श्रोतां परिसावी ॥५४॥
व्यथित कृष्णातें अनुलक्षून । यशोदेतें करितां रुदन । गोपिका तीतें अनुसरोन । कथिती हरिगुण समदुःखी ॥२५५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP