अध्याय १६ वा - श्लोक ११ ते १५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


गावो वृषा वत्सतर्यः क्रंदमानाः सुदुःखिताः । कृष्णे न्यस्तेक्षणा भीता रुदत्य इव तस्थिरे ॥११॥

थानतुटे कां अपेट गोर्‍हे । पाड्या काल्हवडी वासुरें । गाई वृषभ विविधें गुरें । लहानें थोरें टवकारलीं ॥४९॥
डोहीं पाहोनि कृष्णाकडां । उठिला एक हंबरडा । आक्रंदती चहूं कडां । घालूनि वेढा ह्रदासी ॥१५०॥
जेंवि एकुलतिया बाळा । देखोनि वरपडी होतां काळा । तये मातेपरी कळवळा । धेनु सकळा दुःखिता ॥५१॥
कृष्णीं गुंतोनि गेलिया दृष्टि । चित्राकार अंगयष्टि । लोपली चेष्टांची रहाटी । अचेष्ट सृष्टीं तिष्ठती ॥५२॥
मनुष्यें रुदती स्नेहसुभरें । तैशीं कृष्णासाठीं गुरें । जळ सांडिती नेत्रद्वारें । लहानें थोरें क्रंदती ॥५३॥
ब्रह्मयाचे मोहनकाळीं । वत्सें होऊनि वनमाळी । पान्हा प्याला त्या धेनु सकळी । परम स्नेहाळी मातृत्वें ॥५४॥
ऐसें झालें ह्रदातीरीं । आतां व्रजींची ऐका परी । डोहीं बुडाला श्रीहरि । हें नेणती घरीं व्रजवासी ॥१५५॥

अथ व्रजे महोत्पातास्त्रिविधा ह्यतिदारुणाः । उत्पेतुर्भुवि दिव्यात्मन्यासन्नभयशंसिनः ॥१२॥

या नंतरें व्रजाआंत । त्रिविध उद्भवले उत्पात । शारीर भौम दैवगत । भय अद्भुत सूचक ॥५६॥
नरांचीं वामांगें वामनेत्र । दक्षिणभागींचें वनितागात्र । अशुभसूचक जें अपवित्र । सर्वीं सर्वत्र स्फुरती पैं ॥५७॥
नेत्र बाहु स्तनमंडळ । पोटीं भडभडूनि उठती ज्वाळ । मानस वैरस्यें व्याकुळ । स्मृति शिथिल मूर्च्छित ॥५८॥
आंगीं कडकडी संताप । कार्यावांचूनि उपजे कोप । अशुभचिह्नें एवंरूप । भय समीप सूचिती ॥५९॥
भूमि कांपे थरथराटें । उगीच उघडे तडतडाटें । कारणें विण पडती गोठे । वृक्ष मोठे उन्मळती ॥१६०॥
दीपमाळा वृंदावनें । डोलती जैशीं सचेतनें । कित्येक प्रतिमा करिती रुदनें । हास्यवदनें कितिएकी ॥६१॥
वाहाटुळी फिरोनि गगनीं । त्यामाजी सैरा वर्षती वह्नि । भयाची प्राप्ति इत्यादि चिह्नीं । पार्थिवां विघ्नीं सूचिली ॥६२॥
दिवसां नक्षत्रांचिया ज्योति । गगनींहूनि उलंडती । रुधिरवर्षें भिजे क्षिति । अद्भुत होती दिग्दाह ॥६३॥
नसतां मेघांचें आभाळ । विद्युत्पात होतीं प्रबळ । दिवि उत्पात ऐसे बहळ । व्रजीं सकळ देखती ॥६४॥
श्वानें रासभें मार्जारें । आक्रंदती आर्तस्वरें । रडती आक्रोशें लेंकुरें । तान्हीं वांसुरें ओरडती ॥१६५॥
भालुवा भुंकती गांवखरीं । वृक जंबुकाद्यही दुपारीं । कोल्हाळ करितां पैं व्रजपुरीं । झालीं घाबिरीं गौळियें ॥६६॥
म्हणती उत्पात हे दारुण । उठावया काय कारण । परस्परें करिती कथन । विघ्नदर्शन शंकेचें ॥६७॥
सद्यचि महाभय संप्राप्त । ऐसें सूचिती हो उत्पात । अवघे विचार करा त्वरित । महा अनर्थ उदेला ॥६८॥

तानालक्ष्य भयोद्विग्ना गोपा नंदपुरोगमाः । विना रामेण गाः कृष्णं ज्ञात्वा चारुयितुं गतम् ॥१३॥

शारीर भौम आणि दैव । उत्पात देखोनि बल्लव । भयें उद्विग्न झाले सर्व । श्रेष्ठसमुदाव नंदादि ॥६९॥
म्हणती आमुचा केवळ प्राण । सकळां जीवांचें जीवन । गाई चारावया तो कृष्ण । रामावांचून वना गेला ॥१७०॥

तैर्दुर्निमित्तैर्निधनं मत्वा प्राप्तमतद्विदः । तत्प्राणास्तन्मनस्कास्ते दुःखशोकभयातुराः ॥१४॥

मग त्या दुर्निमित्तांवरून । हेंचि जाणावें अशुभ चिह्न । म्हणती कृष्ण पावला निधन । हरिमहिमान नेणोनी ॥७१॥
संगी असतां संकर्षण । कदा बाधूं न शके विघ्न । आजि एकला गेला कृष्ण । वनीं मरण पावला ॥७२॥
ऐसा मनीं करूनि तर्क । बल्लव करिती दीर्घ शोक । कृष्णावेगळें जें आणिक । नेणती सुख संसारीं ॥७३॥
कृष्णीं गुंतले ज्यांचे प्राण । कृष्णमयचि ज्यांचें मन । ते नंदादि बल्लवगण । दुःख दारुण पावले ॥७४॥
कृष्णावेगळे आमुचे प्राण । न वांचती पैं दुःखेंकरून । अवघियांसि एक मरण । भय दारुण उदेलें ॥१७५॥
हाहाकारें आक्रंदती । दीर्घशोकें मूर्च्छित पडती । हृदय मस्तकें ताडिती । शंख करिती निःशंक ॥७६॥
तेणें झाला चंड शब्द । गोपी गोपाळ मुग्धामुग्ध । मिळाला व्रजौकसांचा वृंद । पुसती विशद परस्परें ॥७७॥
कृष्णसंगें आपुलालीं । म्हणती लेंकुरें अवघी गेलीं । वनीं तितुकींही निमालीं । कृष्णावेगळीं न वांचती ॥७८॥
ऐसे समदुःखी बल्लव । परी कृष्णाची अगाध माव । मोह ममतेचें न घेती नांव । वेधले जीव श्रीकृष्णीं ॥७९॥

आबालवृद्धवनिताः सर्वेङ्ग पशुवृत्तयः । निर्जग्मुर्गोकुलाद्दीनाः कृष्णदर्शनलालसाः ॥१५॥

नंदपुरोगम बल्लव । आबालवृद्ध स्त्रियादि सर्व । गृहसंग्रह गांव ठाव । देहभाव विसरोनी ॥१८०॥
निघाले व्रजपुराबाहिर । सर्वही करिती हाहाकार । आंगीं स्नेहभुलीचा भर । तेणें विसर सर्वार्थीं ॥८१॥
यास्तव म्हणिजे त्यां पशुवृत्ति । प्रजावात्सल्यीं प्रवृत्ति । आणिक नुमजे कांहीं चित्तीं । शोकावर्तीं निमग्न ॥८२॥
दीनप्राय लहान थोर । कृष्णदर्शनालागीं आतुर । सांडोनि निघाले व्रजपुर । सर्व कांतार हुडकिती ॥८३॥
कृष्णा म्हणोनि मारिती हांक । पाहती श्रीकृष्णाचें मुख । न देखतां मानूनि दुःख । करिती शोक सविलाप ॥८४॥
कृष्णा माझिया पाडसा । मेघश्यामा ये डोळसा । नंदनंदना राजहंसा । जीव हा पिसा तुजलागीं ॥१८५॥
नीलोत्पलदलविशालनेत्रा । कोतिकंदर्पकमनीयगात्रा । पदजलपूता पुण्यचरित्रा । दुःखसन्मात्रा चिन्मया ॥८६॥
कलुषांतका कोमलनामा । कारुण्यपूर्णा कल्पद्रुमा । कमलाकांता निष्कामकामा । पुरुषोत्तमा परिपूर्णा ॥८७॥
पुण्यश्लोका पुराणपुरुषा । पूतनाशोषण पशुपाधीशा । पवित्रचरणा पयोनिधिवासा । पूज्यपरेशा परमात्मा ॥८८॥
कृष्ण भवभावभावना । कृष्णा भवगजपंचानना । कृष्णा भवभावअभावना । भवभंजना श्रीकृष्णा ॥८९॥
ये रे कैवल्यदानी हरि । ये रे संसारगजकेसरी । कृष्णा तूं एक सचराचरीं । दैवीं आसुरीं एकत्वें ॥१९०॥
मानससारसराजह्म्सा । मनसिजमथनालयनिवासा । मादकमन्मथमोहनवेशा । मुनिजनतोषा मधुपते ॥९१॥
विगतविषय प्रियकरचरणा । विमुखविद्वत्स्मयभंजना । विपश्चिदात्मक विशुद्धज्ञाना । विवर्तविहीना विगतेच्छा ॥९२॥
शरणशरण्या शर्मदा । शर्वशर्वाणीसंभवहृदा । शार्वरशर्वरीभेदच्छेदा । आनंदकंदा अगोचरा ॥९३॥
अक्रिया अगुणा अगाधचरिता । अलक्ष्य अनंत सद्गुणभरिता । अरूपा अनामया अच्युता । आद्या अद्वैता अविनाशा ॥९४॥
सत्त्वसंपन्न बल्लवगण । ऐसा स्मरोनियां श्रीकृष्ण । शोक करिती रानोरान । नंदनंदन गिंवसावया ॥१९५॥
राजस म्हणती सर्वांपरी । तुझा भरंवसा धरिला हरि । तो तूं कोठें गेलासि दुरी । दुःखसागरीं लोटूनी ॥९६॥
कृष्णा प्रौढत्वें वाढसी । अनेक संपदा जोडिसी । आम्हां वृद्धां गौरविसी । थोर मानसीं हे आशा ॥९७॥
ते आजि विफळ जाहली वाटे । कृष्णा टाकूनि गेलासि कोठें । झालों अवघेचि करंटे । दुःख अदृष्टें ओढवलें ॥९८॥
तामसदेहबुद्धीच्या भरीं । देहमात्रचि जाणोनि हरि । आंदोळती शोकलहरी । ते वैखरी वदवेना ॥९९॥
कृष्णा तुझी मातापिता । पैल संकर्षण हा भ्राता । इष्टा मित्रां आम्हां समस्तां । सांडूनि केंउता गेलासी ॥२००॥
आजि जेविला नाहींस घरीं । संगें नेली त्वां सिदोरी । कोठें गेलासि दुरिच्या दुरी । कैशी परी तुज झाली ॥१॥
पादत्राणें न लेतां चरणीं । गाई नेल्या त्वां अनवाणी । कांटे खडे दर्भ रानीं । रुपती म्हणोनि जीव धाके ॥२॥
कृष्णा तुझे अनंत गुण । हृदयीं आठवितां ये रुदन । कैसें आमुचें दैव हीन । हातींचें रत्न हारविलें ॥३॥
येक देवदेव्हारे करिती । आणि जोशी एक प्रार्थिती । श्रीकृष्णाची कैशी गति । मोहभ्रांति उमजेना ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP