अध्याय १४ वा - श्लोक ३८ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


जानन्त एव जानन्तु किं बहूक्त्या न मे प्रभो । मनसो वपुषो वाचो वैभवं तव गोचरः ॥३८॥

कोण्ही मिरविती जाणपण । त्या उपहासें म्हणे द्रुहिण । जाणते जाणोत तव महिमान । परी मजलागून दुर्ज्ञेय ॥८४०॥
काय बोलों बहु चावटी । तव महिमेची अचिंत्य गोठी । काया मनें कां वाक्पटीं । नेणें कोटि जन्मीं मी ॥४१॥
मनबुद्ध्यादि अंतःकरणा । तुझिया अचिंत्य ऐश्वर्यगुणा । असमर्थ मी परिज्ञाना । वृथा वल्गना कां करूं ॥४२॥
आतां विनति जनार्दना । मज लेंकुरा निजांघ्रिशरणा । नाठवूनियां दुष्टाचरणा । कीजे करुणा कारुण्यें ॥४३॥

अनुजानीहि मां कृष्ण सर्वं त्वं वेत्सि सर्वदृक् । त्वमेव जगतां नाथो जगदेतत्तवार्पितम् ॥३९॥

सृष्टिकर्ता मी जगत्पति । हे अहंता टाकूनि परती । विनीत होऊनि करीं विनति । म्हणे श्रीपति अवधारीं ॥४४॥
आपुला किंकर ऐसा मातें । पूर्ण जाणावें कृपावंतें । देहाभिमान म्यां अर्पिला तूंतें । श्रीअनंतें जाणिजे ॥८४५॥
अचिंत्यैश्वर्य तुझा महिमा । तूंचि जाणसि पुरुषोत्तमा । आम्हां पामरांची ही गरिमा । सर्वोत्तमा तुज विदित ॥४६॥
आम्हां अवघियां नियोगवंता । ज्ञानबळादि ऐश्वर्य सत्ता । तुझीच ऐसें तूं जाणता । कीं सर्ववेत्ता सर्वदृक् ॥४७॥
समुद्राचिये वाळवंटीं । विहिरी वेगळाल्या देखिल्या दृष्टी । परी जलोद्गमादि राहाटी । सिंधुपोटीं अवधी ती ॥४८॥
माझिया विराट देहा आंत । जगें नांदती स्वगुणांसहित । त्यां सर्वांचा तूंचि नाथ । हें झालें विदित मज आतां ॥४९॥
जगत्पति मी सृष्टिकर्ता । ऐशी होती पृथग्ममता । ते तुज अर्पिली जगन्नाथा । कृपावंता जगदीशा ॥८५०॥
निष्कपट मी अनन्य शरण । हें तूं जाणसी सर्वज्ञ । माझे अपराध क्षमा करून । प्रस्थापन करवावें ॥५१॥
ऐसें विनवूनि परमेष्ठी । कृष्णचरणीं तैशीच दिठी । पदरज वंदी चहूं मुकुटीं । प्रेमा पोटीं न समाये ॥५२॥
पुढती दुर्लभ मज हें ध्यान । म्हणोनि अश्रु ढाळिती नयन । माझा जळो हा पदाभिमान । मजहूनि धन्य व्रजवासी ॥५३॥
मग आदरें नमस्कारी । संबोधूनि सन्मुख करी । तया संबोधनाची परी । सावध चतुरीं परिसावी ॥५४॥

श्रीकृष्ण वृष्णिकुलपुष्करजोषदायिन् क्ष्मानिर्जरद्विजपशूदधिवृद्धिकारिन् ।
उद्धर्मशार्वरहर क्षितिराक्षसध्रुगाकल्पमार्कमर्हन्भगवन्नमस्ते ॥४०॥

मायायुक्ता भो श्रीकृष्णा । वृष्णिकुलाऽब्जवनतोषणा । तुज उपमितां चंडकिरणा । वाटे मम मना गौणत्व ॥८५५॥
परी ज्यामाजीं असे जितुकें ज्ञान । तितुकेन बोधें तो संपन्न । यालागें माझ्या उपमा गौण । परी हें स्तवन प्रेमाचें ॥५६॥
नापिततनयें रायासि जनक । म्हणतां नुपमावा नापिक । जीवन उपमे पातळ उदक । परी प्रेमा अधिक लक्षावा ॥५७॥
पृथ्वी पशु आणि द्विजादि अमर । हेचि चारी चतुःसागर । निज उदयें यां वृद्धिकर । तरी तूं चंद्र श्रीकृष्णा ॥५८॥
उद्धर्म म्हणिजे उत्पथगामी । केवळ ज्यांसि उपमा तमीं । त्यांचा नाशक स्वधर्मव्योमीं । रविशशिनामीं प्रकटोनी ॥५९॥
भूमंडळीं जे राक्षस । जिहीं रात्रीचा केला दिवस । वरिवरी दिसती विविध वेष । केशी कंस इत्यादि ॥८६०॥
स्वधर्मदिवसाची करूनि रजनी । अविधि प्रवर्तले हिंसाचरणीं । त्यांतें द्रोहिता तूं प्रतापतरणि । स्वधर्मकिरणीं प्रकटतां ॥६१॥
अग्निद्रोहक जैसें नीर । किंवा हिमतमारि भास्कर । तैसा तुझा हा अवतार । द्रोहकर दुष्टांतें ॥६२॥
पुढील कार्यार्थसूचने । रविशशिउपमा संबोधनें । संबोधूनियां चतुराननें । पुढती निजमनें विवरिलें ॥६३॥
रविशशिउपमा कनिष्ठ तर । मानूनि म्हणे तूं सर्वेश्वर । रविशशींचें अभ्यंतर । व्यापक स्वतंत्र तूं पूज्य ॥६४॥
सर्वेश्वरा तूं सर्वपूज्या । जगद्रूपा जगद्वीजा । षड्गुणैश्वर्यें सुतेजा । गरुडध्वजा तुज नमो ॥८६५॥
आकल्प माझा देह जों आहे । तंव तव पदीं मौळ राहे । ऐसें माझें नमन आहे । प्रभूनें स्नेहें पाळावें ॥६६॥
शुकासि म्हणे परीक्षिति । चंद्रसूर्य उपमायुक्ति । विधीनें बोलिला श्रीपति । किमर्थ मजप्रति तें सांगा ॥६७॥
शुक म्हणे गा विचक्षणा । करावी धर्मसंस्थापना । प्रतिपाळावें गोब्राह्मणा । पृथ्वीसुरगणा रक्षावें ॥६८॥
वृष्णिकुलासि द्यावा तोष । हरावे अधर्मी सदोष । आणि त्रासावे क्षितिराक्षस । दैत्यांचा नाश करावा ॥६९॥
इतुक्या कार्याच्या उद्देशें । आज्ञा करितां प्रभुत्व दिसे । म्हणोनि संबोधनाच्या मिषें । कार्यें अशेषें सुचविलीं ॥८७०॥
पूर्वीं स्तविला व्यापकपणें । झणें राहिला बोधें तेणें । अवतारकार्यसंबोधनें । म्हणोनि सूचने दाविलें ॥७१॥
वत्सें आणि वत्सप सखे । यांचें मोक्षण करूनि कौतुकें । स्वपुत्रमोदाकारणें हरिखें । अवघ्या वेखें अवतरला ॥७२॥
अद्भुत दावूनि विरिंचीसी । मंगलकर्ता व्रजौकसांसी । तोचि श्रोतयां वक्तयांसी । अभीष्टासी मेळवी ॥७३॥

श्रीशुक उवाच - इत्यभिष्टूय भूमानं त्रिः परिक्रम्य पादयोः ।
नत्वाऽभीष्टं जगद्धाता स्वधाम प्रत्यपद्यत ॥४१॥

सर्वैश्वर्यसंपन्नाते । जाणोनि विधीनें श्रीकृष्णातें । स्तवन केलें तें राया तूंतें । परिसविलें शुक म्हणे ॥७४॥
ऐसा स्तवूनि श्रीभगवान । त्रिवार प्रदक्षिणा करून । पुनः पुनः करूनि नमन । ब्रह्मा प्रयाण आदरी ॥८७५॥
श्रीकृष्णाचे चरण दोन्ही । तेथ ठेऊनि चार्‍ही मूर्ध्नि । आपुले अभीष्ट प्रयाणीं । पद्मयोनि प्रवर्तला ॥७६॥
अभीष्ट स्वधाम तें सत्यभुवन । जें सर्वपूज्य परम पावन । आपणा अभीष्ट तत्प्रयाण । आज्ञा घेऊनि आदरी ॥७७॥
संबोधोनि कार्यार्थसंज्ञा । घेऊनि कृष्णाची अनुज्ञा । विश्वपूज्या अभीष्ट सदना । सत्यभुवना विधि गेला ॥७८॥

ततोऽनुज्ञाप्य भगवान् स्वभुवं प्रागवस्थितान् । वत्सान् पुलिनमानिन्ये यथापूर्वसखं स्वकम् ॥४२॥

ब्रह्मयातें विसर्जून । त्यानंतरें श्रीभगवान । पूर्ववत्सें पुरस्करून । आणिता झाला पुलिनातें ॥७९॥
कैसें पुलिन तें म्हणाल । तरी जेथ स्वसखयांचा मेळ । यथापूर्व भोजनशीळ । आला गोपाळ त्यांमाजीं ॥८८०॥

एकस्मिन्नपि यातेऽब्दे प्राणेशं चान्तराऽऽत्मनः । कृष्णमायाहता राजन् क्षणार्धं मेनिरेऽर्भकाः ॥४३॥

म्हणाल पुलिनीं संवत्सर - । पर्यंत कैसे होते स्थिर । क्षुधातृषादि दुर्निवार । केवीं कुमार विसरले ॥८१॥
तरी जें पढियें प्राणांहून । त्याच्या वियोगाचा क्षण । बाधी कोटियुगांसमान । तेवीं युगही क्षण प्रियसंगें ॥८२॥
ऐशी अगाध हरीची माया । त्या श्रीकृष्णें मोहितां गडियां । अब्द क्षणार्धा परी राया । मानूनियां विसरले ॥८३॥

किं किं न विस्मरन्तीह मायामोहितचेतसः । यन्मोहितं जगत्सर्वमभीक्ष्णं विस्मृतात्मकम् ॥४४॥

मायामोहित ज्यांचें चित्त । ते काय न विसरति एथ । जिच्या मोहें विश्व समस्त । आपआपणांतें विसरले ॥८४॥

ऊचुश्च सुहृदः कृष्णं तेऽतिरंहसा । नैकोऽप्यभोजि कवल एहीतः साधु भुज्यताम् ॥४५॥

मायेनें मोहिलें म्हणोन । वत्सप नेणती हरिविंदान । म्हणती कृष्णा त्वरेंकरून । तुझें आगमन जाहलें ॥८८५॥
आम्ही तुजवेगळें पाहीं । एकही ग्रास जेविलों नाहीं । आतां वत्सांची शंका कांहीं । नसेचि तूंही जेवीं ये ॥८६॥
वत्सें आणिलीं त्वां समीप । तेणें निरसला विक्षेप । आतां जेवूं ये सुखरूप । अवघे वत्सप मिळोनि ॥८७॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP