अध्याय १४ वा - श्लोक २६ ते २७

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अज्ञानसंज्ञौ भवबंधमोक्षौ द्वौ नाम नान्यौ स्त ऋतज्ञभावात् ।
अजस्रचित्यात्मनि केवले परे विचार्यमाणे तरणाविवाहनी ॥२६॥

ज्ञानी तरले भवाब्धि । हें करणेंचि नलगे प्रसिद्धि । अपूर्व ऐकिली पैं शाब्दीं । तरल्या परी तरले हे ॥२१॥
तरी भवें करूनि बंध मोक्ष । नामें ख्यात जे प्रत्यक्ष । तें विवरितां होऊनि साक्ष । पृथक दक्षा नेक्षिती ॥२२॥
सत्य ज्ञान स्वरूपाहूनी । भिन्न विवरितां नसती दोन्ही । जैसे दिवस आणि रजनी । नेणे तरणि वस्तुतः ॥२३॥
येथ आशंका कराल ऐशी । तरी कां मूढत्व आत्मयासी । सत्य सन्मात्र स्वप्रकाशीं । चोरी कैशी एवढी ॥२४॥
ह्या आशंकेचें उत्तर । केवळ पारमार्थिक विचार । यास्तव रहस्य करणें सार । सहसा दुष्कर न मनावें ॥५२५॥
अर्थ ऐसें धनासि नांव । विषयावाप्ति सुखसंभव । तेणें साधे म्हणोनि जीव । आसक्त सर्व धनासी ॥२६॥
विषयसुख तें नाशवंत । क्षणामाजीं पावे अंत । याचें साधनरूप जो अर्थ । तैं तो अनर्थ दुःखद ॥२७॥
म्हणोनि अक्षय सुखाची राशि । फावोनि निःशेष दुःखा निरसी । त्यासीच आख्या परमार्थ ऐसी । लागलें श्रुतीसी ठेवणें ॥२८॥
विषयसुखद जो कां अर्थ । लोकीं चोरूनि ठेविती गुप्त । वास्तव केवळ हा परमार्थ । कां पां स्वरत न झांकिती ॥२९॥
मोठा अपलाप कां कीजे । तें निरूपिलें ऐशिये वोजे । विषयनिष्ठासि कोठूनि उमजे । देहात्म वाजे निद्रिस्तीं ॥५३०॥
एरव्हीं जें कां अजस्र चित्तीं । जें अखंडानुभव स्वरूप म्हणती । तये शुद्धपरब्रह्मीं नसती । बंध निर्मुक्ति दोन्हीही ॥३१॥
शुद्धसन्मात्र स्वप्रकाश । तेथ अज्ञाना कैंचा वास । अज्ञान नातां भवबंधास । ठाव निःशेष असेना ॥३२॥
जेथ मिथ्या बंध अज्ञान । तेथ कैंचा मोक्ष कैंचें ज्ञान । अभाग्य सभाग्य उभयावीण । सुखसंपन्न श्री जैशी ॥३३॥
ऐसे जे कां स्वात्मतृप्त । सत्यज्ञानात्मक जे नित्य । ते तरलेचि संतत । तरल्यापरी तरताती ॥३४॥
मृगें मृगजळें भ्रांत होती । मानव जळाची परी जाणती । तेणें म्रांत ते न होती । रश्मि म्हणती जळ मृषा ॥५३५॥
एवं बंध मोक्ष ज्ञानाज्ञान । स्वरूपीं नाहींच निपटून । येणें निश्चयें जे अभिज्ञ । ते तरलेचि जाण तरल्यापरी ॥३६॥
ऐशी ज्ञाननिष्ठांची कथा । तरी बंधमोक्ष कवणा माथां । म्हणसी तरी तें ऐक आतां । म्हणे विधाता कृष्णातें ॥३७॥

त्वामात्मानं परं मत्वा परमात्मानमेय च । आत्मा पुनर्बहिर्मृग्य अहोऽज्ञजनताऽज्ञता ॥२७॥

ब्रह्मा अक्रोधें करी विस्मय । अहो केवढें हें आश्चर्य । आपणा आपुली नेणोनि सोय । नाना ठाय हुडकिती ॥३८॥
अन्यथाज्ञानें अध्यारोप । त्या अपवादें करूनि लोप । वास्तव उमजतां स्वस्वरूप । आपेंआप संप्राप्त ॥३९॥
परमार्थज्ञानें आत्मप्राप्ति । वृथा अध्यारोपें निवृत्ति । आग्रह करणें अपवादार्थीं । किमर्थ ऐसें म्हणाल ॥५४०॥
तरी भ्रमें रत्नहाराचा लोप । करूनि प्रकटिला सर्पारोप । त्याचा अपवाद न होतां रूप । वास्तव कदापि न प्रकटे ॥४१॥
तेंवि आत्मयाच्या ठायीं । अध्यस्त अन्यस्फूर्ति पाहीं । उठोनि चैतन्या करी देही । भवप्रवाहीं मग पडे ॥४२॥
अपवाद त्या जीवत्वाचा । न करितां आत्मा सत्य कैंचा । भव विवर्त कळल्या साचा । आत्मत्वाचा सुखलाभ ॥४३॥
ऐसें निकरेंशीं विधि म्हणे । तुज परमात्मयातें परावेपणें । देहाबाहेरी वेगळें जाणें । आपण होऊनि देहमात्र ॥४४॥
ऐशी मूर्खाची मूर्खता । तेचि विवळ परिसा आतां । स्वप्रकाश आत्मा स्वयें असतां । देहात्मता अध्यासी ॥५४५॥
अविद्येच्या भ्रमेंकरूनी । दारापुत्रादि स्वयें मानी । क्षेत्रवित्तादिअभिमानी । होऊनि ग्लानि पावतसे ॥४६॥
तये ग्लानीच्या निवृत्ति । इच्छी नाथिल्या संपत्ति । परमात्मयाची सकाम भक्ति । विषयप्राप्तीलागिं करी ॥४७॥
नानापरीचे करी नियम । देवतांतरीं धरी प्रेम । परमात्मा जो पुरुषोत्तम । म्हणे कर्मफलदाता ॥४८॥
भावी परमात्मा सदेह । देहधर्मादिप्रवाह । त्यासि लावी कवळूनि मोह । करी रोह भजनाचा ॥४९॥
हस्तपादादि अवयव । साङ्ग संपन्न भावी देव । स्नातास्नात इत्यादि सर्व । देहभाव त्या लावी ॥५५०॥
देव भुकेला तान्हेला । देव लेइला नेसला । देव कोपला संतोषला । हा गलबला वाढवी ॥५१॥
देव स्वर्गीं सत्यभुवनीं । कैलासीं कां विष्णुसदनीं । देव आहे शेषशयनीं । नानास्थानीं भावितसे ॥५२॥
देव विष्णु कीं शंकर । देव शक्ति कीं भास्कर । देव इंद्र वैश्वानर । कीं साचार गणपति ॥५३॥
कोण देव कामना पुरवी । कोण दुःखा पराभवी । कोण तारी भवार्णवीं । निष्ठा जीवीं बहुविध ॥५४॥
आत्मा सच्चिदानंदकंद । स्वयें विसरोनि कवळी भेद । दाही दिशा करी शोध । तेंचि विशद परियेसा ॥५५५॥
शाश्वत मानी देहगेह । पुत्रदारास्वजनसमूह । त्याचे ठायीं धरूनि स्नेह । महामोह वाढवी ॥५६॥
भोंवतीं मिळती रांडापोरें । म्हणती धैर्य न टाकिजे नरें । उद्यां देव करील बरें । नाना प्रकारें बुझविती ॥५७॥
शास्त्रज्ञानाचा प्रकाश । विषयलोभें मानी तोष । सच्चिदानंद मानूनि यास । करी दोष स्वैरत्वें ॥५८॥
तंव हें नाशवंत दृश्य । क्षणक्षणा पवे नाश । तेणें होय कासावीस । शोक विशेष वाढवी ॥५९॥
पुन्हां तैसाचि हव्यास धरी । भरे कामाच्या दुर्भरीं । ऐसा जाचे सहस्रवरी । परी अंतरीं न त्रासे ॥५६०॥
मग म्हणे हा मृत्युलोक । नाशवंत दुःखदायक । स्वर्गीं अक्षय चित्सुख । सुकृतें याज्ञिक भोगिती ॥६१॥
ऐशीं लोकलोकांतरें । अक्षय चित्सुख मानूनि फिरे । तंव तें न लभोनि भेदभरें । उपजे मरे पुनः पुन्हा ॥६२॥
सच्चित्सुख मी स्वयेंचि आत्मा । हें नुमजोनि पावे भ्रमा । बाहेरी अक्षय चित्सुखाचा प्रेमा । भेदें अधमा कैम जोडे ॥६३॥
नाभिदेशीं कस्तूरिका । नेणोनि कुरंग भ्रमे देखा । आत्मप्रतिबिंबें बालका । जेंवि उदकामाजीं पतन ॥६४॥
कीं स्वकंठींचा विसरोनि मणि । दिगंतीं प्रवर्ते गवेषणीं । गृहीं हरवूनि धुंडे रानीं । ते हे करणी मूर्खाची ॥५६५॥
आपणाहूनि आत्मा पृथक । तो हा कथिला मूर्खविवेक । आतां प्रत्येक प्रणव होऊनि एक । करिती विवेक तो ऐका ॥६६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP