अध्याय १४ वा - श्लोक १७ ते १८

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


यस्य कुक्षाविदं सर्वं सात्मं भाति यथातथा । तत्त्वय्यपीह तत्सर्वं किमिदं मायया विना ॥१७॥

जैं तुझिया मुखांतून । तुझिये कुक्षीमाजि जाण । दिसे ब्रह्मांड संपूर्ण । यथार्थपण न मोडतां ॥५१॥
तैसेंचि बाहीर संचलें असे । परस्परें विपरीत न दिसे । तैं बिंबलें हें कैसें । साच मानसें भावावें ॥५२॥
सात्म म्हणिजे तुजही सहित । विश्व दिसतसे वदना आंत । मायेवांचूनि हें अघटित । कैसें यथार्थ मानावें ॥५३॥
तुजमाजि विश्व बिंबलें असतें । तरी तें अवघें विपरीत दिसतें । त्यामाजि तुजही न देखिजतें । हें अघडतें मायुक ॥५४॥
गंगेमाजि बिंबे रवि । तेथ गंगा न बिंबे जेंवि । तूंचि तुजमाजी सावयवीं । तैं माया केंवि न म्हणावी ॥३५५॥
यशोदेसीच दाविली माया । काय म्हणों जी विश्वनिलया । प्रत्यक्ष लोचना माझिया । आजि या समया माजिवडें ॥५६॥
कौतुक दाऊनि विचित्रपरी । यशोदेहूनि निपटा परी । माझी प्रज्ञा केली हरि । तैं वैखरी वदतसे ॥५७॥

अद्यैव त्वदृते‍ऽस्य किं मम न ते मायात्वमादर्शितमेकोऽसि प्रथमं ततो व्रजसुहृद्वत्साः समस्ता अपि ।
तावंतोऽसि चतुर्भुजास्तदखिलैः साकं मयोपासितास्तावंत्येव जगंत्यभूस्तदमितं ब्रह्माद्वयं शिष्यते ॥१८॥

ब्रह्मा म्हणे जी पुरुषोत्तमा । तुज वेगळी कोणें आम्हां । घालूनि अविद्येचिया भ्रमा । दाविली गरिमा मायेची ॥५८॥
या विश्वाचें मायिकपण । आतांचि दाविलें मजलागून । कीं नव्हे तें तव विंदान । असाधारण गोविंदा ॥५९॥
म्यां अज्ञानें करूनि कपट । वत्सें हरिलीं वत्सपांसहित । तेव्हां काननें दुर्घट । एकला एकट हुडकिसी ॥३६०॥
पुढती गोवत्सपगण । सालंकृत परिवारून । केलें व्रजपुरीं क्रीडन । मत्त्रुटिमान पर्यंत ॥६१॥
पाहों जातां निश्चयेंसी । भ्रांत झालों निजमानसीं । सत मिथ्या कोणती कैसी । विवेकासी अनुमज ॥६२॥
वत्सें वत्सप पदाभिमानें । म्यां लपविलीं मायागुणें । एथें केव्हां आणिलीं कोणें । ये विचारणे लागलों ॥६३॥
तया भ्रमाच्या निरसना । करावया तूं जगज्जीवना । चतुर्भुजा पीतवसना । अवघ्या जणां प्रकटिलें ॥६४॥
सृष्टिकर्ता मी एक विधि । ऐशी होती अहंबुद्धि । देखोनि तव माया निरवधि । नलगे शुद्धि मजमाजीं ॥३६५॥
शंखचक्रगदापाणी । सालंकृत सर्वाभरणीं । श्रीवत्सांक कौस्तुभमणि । जैसे तरणि प्रकटले ॥६६॥
विष्णु केवळ माझा जनक । हा मी ब्रह्मा याचा तोक । ऐसें देखोनि अनेक । बुद्धिविवेक हारपला ॥६७॥
अनंत विष्णूचिया मूर्ति । तितुक्या ब्रह्मांडांचिया पंक्ति । तिहीं सहित माझ्या व्यक्ति । तितुक्या पृथक उपासिती ॥६८॥
ऐसें देखोनि निर्बुजलों । पूर्वस्मृति अंतरलों । लिखितचित्रापरी ठेलों । पाहों विसरलों परावर ॥६९॥
जेंवि उदुंबरफळींचे जंतु । ध्रुवमंडळीं होती प्राप्त । ते निर्बुजती गगना आंत । तेवीं अद्भुत मज झालें ॥३७०॥
महासिद्धीच्या अनेक पंक्ति । महाभूतांचे समूह किती । काळस्वभावादि आकृति । वोळंगती पृथक्त्वें ॥७१॥
मी केवळ रजोगुण । एथ अनंत त्रिगुणगण । माझी केतुली आंगवण । गुण परिपूर्ण पहावया ॥७२॥
निर्गुण एकचि निर्विकार । एथ अनंत सद्गुणप्रचुर । पाहतां नलगे पारावार । अचिंत्य अगोचर अलक्ष्य ॥७३॥
एवढी जेथ अचिंत्यशक्ति । तेचि तुझी हे वत्सप व्यक्ति । जैसी तूर्येमाजीं जागृति । प्रकटूनि मागुती सामावे ॥७४॥
नीवारशूकाग्राहूनि तन्वी । पीतप्रभा जे अणूहूनि अण्वी । अपार सृष्टी दावूनि लपवी । जेवीं लाघवी तुरीया ॥३७५॥
ब्रह्मांड भरूनि प्रकाश । दावूनि लपवी जेवीं दिनेश । कीं समष्टीचा स्वप्नाभास । लपे निःशेष चिन्मात्रीं ॥७६॥
बीजीं सामावला वट । कुंडीं गुप्त हव्यवाट । कीं संहारबीजामाजि प्रकट । महानृसिंह सांठवे ॥७७॥
तैशा अनंत ब्रह्मांडकोटी । प्रकटूनि पुढती ठेविल्या पोटीं । ते हे कृष्णाकृति धाकुटी । पाहतां दृष्टि वेधल्या ॥७८॥
अनंतब्रह्मांडांचें बीज । तें तूं ब्रह्म अधोक्षज । ऐशी प्रतीति झाली मज । मायाचोज उमजोनी ॥७९॥
एथ तूं म्हणती अरे विधि । शुद्ध चैतन्य जें निरवधि । तें म्यां दाविलें निरुपाधि । तूं कां उपाधि मानिसीं ॥३८०॥
अमृतोदधीतें मृगजळ । मानूनि करितोसि निष्फळ । माझें चिद्रूप केवळ । प्रपंच टवाळ मानिसी ॥८१॥
माझें ऐश्वर्य परम अमळ । प्रपंच अविद्यात्मक समळ । ध्वांत आणि रविमंडळ । तुळिती केवळ ज्ञानांध ॥८२॥
तरी हें सत्य कैवल्यधामा । मी वरपडलों अविद्याभ्रमा । म्हणोनि तुझी हे वास्तव गरिमा । नुमजे अधमा मोहांधा ॥८३॥
तूं अद्वितीय निष्प्रपंच । तेथ अनेकत्व कैंचें साच । धरूनि अवतार नीच उंच । लीला अवाच्य प्रकटिसी ॥८४॥
पूर्वजन्माचे संस्कारीं । प्राणी जन्मती संसारीं । तूं निष्क्रिय निर्विकारी । लीलावतारी स्वइच्छ ॥३८५॥
हें दो श्लोकीं निरूपण । पश्चात्तापें करी द्रुहिण तेथ सावध कुरुभूषण । करी श्रवण शुकमुखें ॥८६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP